Tuesday, January 11, 2022

थरारक पदरगड आणि निसर्गरम्य भीमाशंकर दुर्गभ्रमंती गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी लेखन आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका

 




थरारक पदरगड आणि निसर्गरम्य भीमाशंकर


                        शनिवारी दिनांक ८ जानेवारी २०२२ ला रात्री अकरा वाजता गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान, निमगाव म्हाळुंगीमधून गाडीने भीमाशंकरच्या मार्गाने प्रवास सुरू केला. पुण्यातून काही मित्र सोबत घेऊन रविंद्र काळे(सर), पंकज माने, शरद काळे, माऊली, विजय माने, आयुब शेख, रवी काळे, भरत साकोरे, विकास भागवत, राहुल पोतदार, युवराज शिंदे, रोहन शिवले, अभिजीत चव्हाण, योगेश वाघदरे, काकासाहेब ढेरंगे, गिरीश तांबे, दादा घोरपडे, अजिंक्य मांढरे, प्रितम वडघुले, सुमित वडघुले, शुभम डमरे, अक्षय विधाटे, गणेश वडघुले, शुभम चव्हाण, वेदांत देशमुख, अर्णव शिंदे, सुखदेव रणसिंग, वैभव चव्हाण, अनिरुद्ध मांढरे, शैलेश निकम, महेश ढोकले, शुभम भंडारे आणि सोमनाथ चव्हाण तब्बल चौतीस गडकिल्ले प्रेमी वेगवेगळ्या क्षेत्रातील शिवरायांचे मावळे दुर्गभ्रमंतीसाठी सज्ज झाले. या मावळ्यांमध्ये विशेष म्हणजे अवघ्या तेरा वर्षांचा अर्णव, काही शाळा,काॅलेजचे विद्यार्थी, काही शिक्षक, आयटीसी मधील मित्र, डॉक्टर, कंपनीतील वेगवेगळ्या पोस्टवरील मित्र, शेतकरी बंधू यांचा समावेश होता. दुर्गभ्रमंती हा एकच दुवा सर्वांमध्ये समान होता. विकेंडसाठी मनोरंजनाच्या असंख्य वाटा असतानाही गडकोटांची पायवाट धरणारी ही पिढी जगण्याचं, जन्माचं सार्थक करणार, हे नक्की.

                      गाडी व्यवस्थितपणे भीमाशंकरच्या मार्गी लागली. भीमाशंकरजवळ येईपर्यंत बरेच जण झोपा काढत होते. बाप्पू, काळे सर आणि काही मित्र ड्रायव्हर सोबत जागे होते. पहाटे चारची वेळ. धुक्याची दाट भिंतच जणू रस्त्यावर वाट रोखत उभी होती. तेवढ्यात गाडीचे एक चाक खड्डयात अडकले. गाडी एका बाजूला कलंडल्याचा फील. झोपेतले सर्वजण दचकून उठले. जणू गाडी दरीतच फसली आहे असा विश्वास. सगळेच घाबरले. उतरून पाहतो तर समोर सिमेंटचा रस्ता आणि एका बाजूचे चाक सिमेंटच्या रस्त्याच्या खाली सरकले होते. सर्वांनी मोठमोठाले दगड गोळा करत चाकाखाली लावून गाडी ड्रायव्हरने अलगदपणे वर घेतली. जीव भांड्यात पडला. साडेचार वाजता भीमाशंकरच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. पावसाची भूरभूर सुरू होती. आभाळ कधीही सर्जनशील किंवा बाळंत होईल अशी परिस्थिती.

                  गाडीमध्ये गॅस सिलेंडर, शेगडी, मोठमोठाली पातेली, चिकन, दूध, साखर आणि इतर वाणसामान भरपूर होतं. यंदा नियोजन थोडसं वेगळं होतं. प्रत्येक वेळी बाहेर जेवण करताना आयोजकांच्या लक्षात आले की बऱ्याच पोरांना चिकन खूप कमी मिळते. म्हणून यंदा ही वेगळी शक्कल. आपणच भरपूर जेवण बनवायचं आणि मनसोक्त हादडायचं. गोष्टी सगळ्या त्याच असतात. क्रम तोच, व्यवहार तोच. पण दृष्टी निराळी असली की लज्जत वाढते. साहित्य गाडीतून खाली घेत सर्व प्रथम चहा तयार झाला. फक्कड चहा आणि बिस्कीट यांचा नाष्टा थंडगार गारठ्यातही ऊब देऊन गेला. बाळाभाऊंनी सर्व मित्रांच्या सहाय्याने स्वयंपाकाला सुरुवात केली. पहाटे साडेचार वाजता चिकन बिर्याणी शिजवायला सुरुवात. कारण पूर्ण प्रवास करून येण्यासाठी उशीर लागणार होता. आणि सर्वांना भुका लागलेल्या असतील त्यावेळी स्वयंपाकासाठी वेळ देणे योग्य ठरणार नव्हते. चिकन बिर्याणी ची सर्व तयारी म्हणजे कांदा, टोमॅटो, तांदूळ, मसाला, सर्व काही आयोजकांनी व्यवस्थितपणे नियोजित केलेली होती. तासाभरात बिर्याणी शिजून ओके झाली.

               सहा वाजता रामाच्या पाराला शिवशंभूचं नाव घेत पंकज माने सरांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गभ्रमंतीच्या वारीला आम्ही सुरुवात केली. आयोजकांनी सर्वांना नाष्ट्यासाठी भेळ, बिस्कीट व लिंबू सरबतसाठी लिंबूंचे वाटप केले. साखरपाणी प्रत्येकाने आणले होते. आदल्या दिवशी तसे नियोजन ठरलेच होते. गारठा भरपूर होता पण चालताना शरीर गरम होते म्हणून पंकज सरांच्या सांगण्यावरून कोणीही स्वेटर किंवा जर्किन सोबत घेतले नाही. ३०२ ट्रेक पूर्ण करणारा दुर्गभ्रमंतीतला 'बाप माणूस' आमच्या सोबतीला आहे हे आमचं नशीब! हे ट्रेकिंग थोडेसे वेगळे होते. प्रत्येक गड चढून उतरायचे असतात. इथं मात्र भीमाशंकर हे उंचावर असणारे ठिकाण असल्याने पदरगडासाठी जाताना भीमाशंकर पासून दोन तास खाली उतरून पुन्हा पदर गड चढण्याची कसरत करावी लागणार होती आणि पदरगड उतरून पुन्हा भीमाशंकरच्या ठिकाणी दोन-चार तासाची चढण. जोरदार शिवगर्जना देत अंधारातून मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात वाट उजळत सगळे निघाले. तासाभरात उजाडले. समोर पांढऱ्याशुभ्र धुक्याची 'मलई' संपूर्ण परिसरावर 'साय' धरून तरंगत होती.  स्वप्नामागे कुत्रेघाईने धावताना थकलेले आमचे जीव इथे निसर्गाचा, पानाफुलांचा आनंद घेत जगण्याशी नाळ जोडत होते. शेवटी मातीच होते सर्वांची पण जगण्याचं सोनं करत होते. छंद जोपासले की मनाचे रंग बदलायला आणि आयुष्यात दंग व्हायला वेळ लागत नाही, हेच खरं.

           डोंगराच्या कडेकडेने उतरत घनदाट जंगलातून वाट काढत तीन तासांच्या पायपिटीनंतर आम्ही पदरगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. निसर्गरम्य भीमाशंकर डोळ्यांत साठवताना हिरवळ आकंठ काळजात सामावून घेत होतो. पायथ्याला तुडुंब भरलेली विहीर आहे. या विहिरीला जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत पाणी असते. चालता-चालता गणेश घोरपडे (दादा), डॉक्टर अभिजीत आणि काकासाहेब या त्रिकूटाच्या मनोरंजनात्मक हास्यमैफिलीने चालण्याचा सर्व त्रास कुठल्या कुठे गायब होत होता. जगाला देण्यासाठी आणि देण्यासारखं आपल्याजवळ आनंदापेक्षा वेगळं चांगलं काहीच नसतं. प्रसन्नता संसर्गजन्य असते. एक माणूस प्रसन्न दिसला की आपोआप आजूबाजूची माणसं प्रसन्न होतात हेच खरं. चार्ली चॅप्लिन आणि इंदुरीकर यांनाही धोबीपछाड करणारी ही अवलिया माणसं ग्रुपमध्ये आहे हे आमचं भाग्य. नऊ वाजले तरीही सूर्यदर्शन नव्हते, त्यामुळे चालण्याचा कोणताच त्रास वाटत नव्हता. हसत-खेळत गप्पा मारत पदरगड चढाईला सुरुवात झाली. एकही पायरी नसणारा हा गड अत्यंत कठीण गिरीदुर्ग समजला जातो. कर्जत-खांडस मार्गे भिमाशंकरला जाणार्‍या पुरातन गणेश (गणपती) घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड व तुंगी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. हे दोन्ही किल्ले टेहळणीसाठी बांधण्यात आले होते, त्यामुळे या किल्ल्यांवर फारसे अवशेष नाहीत. पदरगडावर जाण्याचा मार्ग ठिकठिकाणी तुटल्यामुळे प्रस्तरारोहणाचे (ट्रेकिंगचे) सामान वापरूनच गड सर करता येतो. पदरगडावरील दोन कातळ सुळक्यांना "कलावंतीणीचा महाल" या नावाने ओळखले जाते. पदरगड कोणी व केंव्हा बांधला याची माहीती उपलब्ध नाही. 

   पायऱ्या नसतानाही एकमेकांच्या साथीने आम्ही मध्यापर्यंत गेल्यानंतर पंकज सरांनी आणलेली दोरी बांधून एकेक मावळा वर चढला. पायऱ्या नसणारा सरळ कातळ पाहताना डोळे गरगर फिरत होते. काळजात धस्स होत होतं. तरीही न घाबरता दोरीवरून सरसर वर जाणाऱ्या तेरा वर्षाच्या अर्णव नावाच्या या मिणमिणत्या पणतीने सर्वांना अखंड उत्साहाचा प्रकाश दिला. थोडासा घाबरत असल्यामुळे मी मात्र तेथेच थांबलो. दर क्षणी गडावरच झेंडे गाडले पाहिजे असं जरुरी नाही, कधी कधी पायथ्याच्या सावलीत विसावा घेतलेला बरा! अशी समजूत घालत स्मृती पाखरांचा थवा माझ्या ओंजळीत विसावला. वर पोहोचलेल्या माझ्या सहकाऱ्यांच्या गर्जनांनी आसमंत दणाणून सोडला होता.

गडकोटांच्या चिऱ्याचिऱ्यात चिन्हे तुझी पाहतो,

दिव्य तुझ्या त्या दृश्य रुपाला 'सह्याद्री' ऐसे नाव लावतो! 

           अशी सगळ्यांची गत झाली होती. पदरगडावर चढण्यासाठी "चिमणी क्लाईंबचा" टप्पा व त्यानंतरचा प्रस्तरारोहणाचा टप्पा पार करावा लागतो. त्यानंतर आपण गडमाथ्याला लागून असलेल्या डोंगराला वळसा घालून, गडमाथा व डोंगर यांमधील खिंडीत येतो. येथे उजव्या बाजूला कातळात कोरलेली मोठी गुहा पहायला मिळते.यात ५-७ माणसे आरामात राहू शकतात. तर डाव्या बाजूला ५ फूट उंचीवर कातळात कोरलेली छोटी गुहा पहायला मिळते. (यात जेमतेम एक माणूस बसेल एवढी जागा आहे.) या दोन्ही गुहांची तोंड वेगवेगळ्या दिशांना आहेत. चिमणी क्लाईंब म्हणजे पाठ व पाय एकाचवेळी भिंतीवर रोवून वर चढणे. या दिव्य पराक्रमासाठी पंकज सर व रवी सरांनी सर्वांना मदत केली. हात देणाऱ्या या दोघांच्या हातात सर्व मावळ्यांच्या गडचढाईचं आकाश सामावलं होतं. रवी काळे सर, पंकज माने सर यांच्या सहवासात जगलेल्या प्रत्येक क्षणांचं इंद्रधनुष्य होतं. दोघांमधलं पाऊस कोण? ऊन कोण? नाही सांगता येणार. दोघंही तितकीच तोलामोलाची. अत्यंत कठीण गड सर केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. आमच्या ग्रुपमधील सर्व मावळे अजिंक्य ठरले होते.

             गडावरून उतरताना प्रत्येक जण काहीतरी अप्रूप गवसल्यासारखा प्रफुल्लीत होता. थोडा वेळ सर्वांनी एकत्र विश्रांती घेत पुन्हा परतीसाठी जंगलातील पायवाट धुंडाळायला सुरुवात केली. पुन्हा अप्पा, दादा, डॉक्टर, काका, बाप्पू यांचे विनोदांच्या हास्यांचे कारंजे अंगावर घेत आम्ही चिंब भिजलो. जगण्याला कंटाळलेल्या कोणाही बहाद्दराला यांसमोर आणून उभं केलं आणि त्याने हसता हसता जीव नाही दिला तर शप्पथ! अशा प्रसन्न झऱ्यांचा शोध घेणे आणि ते वाहतं ठेवणं महत्त्वाचं असतं. ते काम काळे सर आणि गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुप चोख पार पाडत आहे. जगात चांगल्या माणसांची संख्या खरंच जास्त आहे. प्रत्येकाच्या नावाभोवती एक वलय होतं. कर्माचं, कर्तृत्वाचं, कर्तव्याचं. प्राजक्त, निशिगंध, चाफा, मोगरा यांच्या सुगंधाला कोणत्या निकषांवर अव्वल ठरवावं? अशाच द्विधा अवस्थेत मी. आयुष्यभर ऊर फुटेस्तोवर धावणारी माणसं या आनंदाला मात्र मुकतात, पारखी होतात.

कर्तव्यापासून भावनांची कधीतरी फारकत असावी

अन् मनासारखं जगायला स्वतःचीही हरकत नसावी.

                 गडकोटावरून आम्हा मावळ्यांची पालखी वर्षानुवर्षे पायरीला स्पर्श करत राहील आणि शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे सर्व भोई प्रत्येक पिढीत घडतीलच,असा ठाम विश्वास वाटतो. पुढे चालत येताना भर जंगलात पाणी विकणारं पोर. लिंबू सरबत विकणारे म्हातारे आजोबा यांच्याकडे एक ऊर्जा दिसली. बस यायला दहा मिनिटं उशीर झाला किंवा एक-दोन दिवस पगार उशीरा झाला तरी जगातलं सारं दुःख आपल्या चेहऱ्यावर जमा होऊन अमावस्येचे रूप घेतं पण सगळ्याच ऋतूत त्यांच्या चेहर्‍यावर उमेदीचे चंद्र कसे उगवत असतील? चंद्रकला नव्हे पूर्ण चंद्र! तो ही पौर्णिमेचा! आम्ही मात्र त्यांच्यासाठी दवाखाने नाहीत, रस्ते नाहीत, सरकारचे लक्ष नाही या चर्चेत गुंग. बोलाचा भात अन् बोलाचीच कढी.

                 दहा तासांच्या पायपिटीनंतर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. थोडसं फ्रेश होऊन आम्ही दर्शन घेतलं. गाडीत बसून एका व्हेज हॉटेलपाशी येऊन तिघांनी हॉटेलमध्ये व्हेज भोजनाचा आस्वाद घेतला. उरलेल्या आम्ही सर्वांनी मात्र गरमागरम बिर्याणीवर यथेच्छ ताव मारला. रिकाम्या सकाळच्या घागरीत संध्याकाळी परतताना अनुभवांची रत्ने गोळा झाली होती. आयोजकांनी शिल्लक राहिलेली बिर्याणी आवर्जून गाडी थांबवून रोडला राहणाऱ्या काही पालातील गरीब मुलांना दिली. ओवता आलं पाहिजे विणता आपोआप येतं. मनं, धागा, माणसं, सर्व काही. ही शिकवण सहज मिळाली.

रस्त्यावरच्या, जाती-धर्माच्या, पुतळ्यांच्या दंगली घडवणाऱ्या अंधभक्तांनी एकदाच आमच्या ग्रुपबरोबर सफर करावी. द्वेषाचा डोंब कुठल्याकुठे शांत होईल याचा त्याला थांगही लागणार नाही, अशी माणसं या ग्रुपमध्ये आहेत. वेगवेगळ्या पदावरची, जातीपातीची, मांडीला मांडी लावून एकत्र जेवणारी, हातात हात देऊन सोबत देणारी, मनोरंजन करत दुःखाचा डोंगर पार करणारी, प्रेमळ, सुज्ञ माणसं.

२६व्या या ट्रेकच्या निर्धाराची बीजं फुलवत अखंड संकल्पात रूपांतर व्हावे आणि गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानचा वेलू गगनावरी जावा, हीच सदिच्छा! प्रत्येक महिन्याचा या दुर्गभ्रमंतीचा एक दिवस आमचं जगणं अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण करतो.

परतीच्या हिशोबाचा आपला प्रवास राहू दे,

जायचे चालून किती अंतर, अंदाज राहू दे.

तुझ्या नशिबात होती ती उन्हे घेतली मी,

तरी तुझ्या अंगणी वसंत बारोमास राहू दे!

अशा शुभेच्छाच जणू गड आम्हाला देत होता. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं जाण्याच्या काळात एकही रुपया जास्त न घेता फक्त पाचशे सत्तर रुपयांत ट्रेक घडवून आणणाऱ्या आयोजकांना लाल सलाम! काही दिवसांनी या आठवणी प्राणवायूसारख्या सोबत देतील.

दुर्ग प्रेमाचा संसर्ग घडवत भटकंतीची प्रत्येकाला बाधा व्हावी.

आनंदाचा पारा सदैव वाढावा,

सुखाचं तापमान परमोच्च व्हावं,

वेळोवेळी दुर्गभ्रमंतीची अशी लस घ्यावी की

निश्चयाचा अगदी कस लागावा!

थरारक पदरगड आणि निसर्गरम्य भीमाशंकर ची ग्रेट भेट घेऊन भीमाशंकरहून पुण्याच्या दिशेने वाटचाल करत नियोजित वेळेत रात्री दहा वाजता आम्ही सुखरूप पोहोचलो. या संपूर्ण प्रवासाचा खर्च फक्त ५७०/- रुपये इतकाच आला, हे 'गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुप'चे वैशिष्ट्य.

पुन्हा भेटू वेगळ्या गडकिल्ल्यांच्या वाटा शोधताना...तोपर्यंत...

जय शिवराय,जय महाराष्ट्र!


आयोजक

श्री.रवी काळे सर,

निमगाव म्हाळुंगी

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान

9096465675


शब्दांकन

श्री.आयुब शेख सर,

पुणे महानगरपालिका

9552941271

🙏🏻🌹🚩🌸🌺🚩





Sunday, January 2, 2022

साऊमाई - एक विचारधारा! लेखन आयुब कलाम शेख.


 साऊमाई - एक विचारधारा!


प्रगल्भ विचारांच्या ज्ञानात भिजली

ध्येयनिष्ठ साऊ आद्यशिक्षिका थोरली,

काळ्या मनुला निर्धाराने पुरुन उरली

फुले जोतिबांची ती धगधगती सावली!

                                  भारतातल्या समस्त स्त्री वर्गाचं माणूसपण सिद्ध करणाऱ्या, प्रत्येक महिलेला समतेचा, स्वातंत्र्याचा अधिकार बहाल करणाऱ्या सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव येथे झाला. वडिल खंडोजी नेवेसे आणि आई लक्ष्मी यांची ही लेक. १८४० मध्ये ज्योतीबांशी विवाह झालेली ही नऊ वर्षांची, अक्षरांचा कोणताही गंध नसणारी पोर. प्रगल्भ विचारांचं देणं लाभलेल्या जन्माच्या जोडीदारामुळे भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, समाजसुधारक आणि पहिली मराठी कवयित्री झाली. सावित्रीबाईंचे संरक्षक, मार्गदर्शक आणि समर्थक त्यांचे पती जोतिबा होते. पती-पत्नीने एकत्र बसून एकमेकांशी बोलणेही अपराध समजला जाण्याच्या काळात ज्ञानमहर्षी ज्योतीबांनी साऊमाईला जमिनीची पाटी अन् लाकडाची पेन्सिल घेऊन शिक्षण दिलं. अक्षरांच्या ज्ञानासोबत साऊमाईच्या विचारांनाही प्रगल्भ केलं. तत्कालीन संकुचित विचारांना हद्दपार केलं. समाज उद्धाराची आकांक्षा आणि समाजाभिमुख विचारांचं सामर्थ्य यांचा संगम साधणाऱ्या दोन्ही थोर व्यक्तिमत्त्वांच्या या जळजळीत आविष्कारात कुठेही क्लिष्टता आढळत नाही.

                                       मुलींचं शिकणं हे पाप समजले जाण्याच्या काळात सावित्रीबाई मुलींना शिकवायला जायच्या तेव्हा वाटेत नीच प्रवृत्तीचे लोक त्यांच्यावर घाण, माती, शेण, विष्ठा टाकायचे. शाळेत आल्यावर मातीने माखलेली साडी आणि सोबत नेलेली दुसरी साडी यांची अदलाबदल सावित्रीबाई करायच्या. प्रत्येकवेळी त्यांचा आत्मविश्वास कमी होण्याऐवजी दुपटीने वाढत होता. शारीरिक इजा तर होत होतीच पण जीवन उत्कटतेने जगताना एका प्रज्ञावंत ह्रदयाला झालेल्या जखमा अदृश्य रक्ताने माखलेल्या होत्या. या रक्ताचंच ज्वालेत रूपांतर केलं आणि साऊज्योती एक योगमुद्रा ठरले. त्यांच्या नजरेला बुरसटलेल्या विचारांची घाणेरडी स्वप्नं कधीच अडवू शकली नाहीत. इतिहासाच्या दर्पणात त्यांच्या समर्पणाची प्रतिमा भविष्यातील अनेक पिढ्यांना दिसत राहील. काळाच्या भाळावरती उमटलेली ही तप्त योगमुद्रा कोणत्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही.

                                शिक्षणाचा गंध नसणाऱ्या स्त्रीने पहिली महिला शिक्षिका होत अखंड ज्ञानाची ज्योत पेटवली. तितक्याच जिद्दीची फातिमाबी शेख यांनीही मदत केली. फातिमाबी या माऊलीला सुद्धा कित्येक पटींनी विरोध सहन करावा लागला असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. रस्त्यावरून चालणारी प्रत्येक मुलगी म्हणजे आपल्या बापाचा माल आहे असं समजून तिच्यावर अचकट-विचकट बोलण्याला पुरुषार्थ समजला जातो, अशा मनुवाद्यांची जमात आजही अस्तित्वात आहेच की. असमता, स्त्री-शिक्षणाची बंदी, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, चातूर्वर्णावर मात करत ज्योतीबांनी साऊमाई, फातिमाबी  यांसोबत मुलींची पहिली शाळा काढली. कुसुमाग्रजांच्या 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' या कवितेत "एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार!" या उक्तीप्रमाणे प्रचंड दुःख, अपयश, अवहेलना वाट्याला आली असली तरी समाजोपयोगी कार्य करण्याची उर्मी कमी नाही असं हे व्यक्तिमत्व.

                          सर्व त्रास सहन करून शेणानं भिजलेली, खरकट्या पाण्याने ओली झालेली साऊमाई अक्षरं  गिरवणारी शाळेतील पाखरं पाहून सगळे दुःख विसरायची. कोणताही पगार किंवा पुरस्कार यासाठी मिळणार नव्हता. मिळणार होतं माती, दगड, अपमान, त्रास, विरोध. तरीही सच्च्या समाजसुधारणेसाठी, स्त्री उद्धारासाठी द्वेष पत्करणारी ही माऊली ३ जानेवारीशिवाय कुणाला नाही आठवत नाही, यासारखे दुर्दैव ते कोणतं? मुलींच्या पहिल्या शाळेचं स्वागत करणाऱ्या त्यांच्याच भिडे वाड्यात आज वेश्या व्यवसाय उभा रहावा हे पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्भाग्य नाही तर काय? स्त्री शिक्षणाचा गंध जिथे दरवळला तिथेच आज स्त्रीचं स्त्रीत्त्व गहाण पडलेलं दिसतंय, वासना आणि पैशांच्या बाजारात. माणुसकीचं अन् स्त्रीजन्माच नरडं फोडण्यासाठी बेभान होणाऱ्या भ्याड, जंगली, पशुसम समाजव्यवस्थेच्या, नीच विचारांनी बाधित जातीव्यवस्थेच्या गळ्यात स्त्री-शिक्षणाची साखळी बांधून खुंटीला अडकवणारी वाघीण म्हणजे सावित्रीबाई फुले.

                            समाजात भिनलेल्या असमतेच्या विषावर मात करून तेव्हा आणि आजही एकात्मता निर्माण करणारी जी ठिणगी दिसते तिचा उगम सावित्रीबाईंच्या कर्तृत्वात आहे. मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत साऊ शिक्षिका झाली, मुख्याध्यापिका झाली. सावित्रीच्या रूपात नवा इतिहास, नवं धैर्य समाजासमोर उभं ठाकलं. पण एवढंच मर्यादित काम नव्हतं सावित्रीबाईंचं. दहा वर्ष शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून त्यांनी स्त्री शिक्षणाच्या नव्या वाटा शोधल्या. तत्कालीन परिस्थितीनुरूप अभ्यासक्रम तयार केला. भारताच्या आधुनिक शिक्षणाच्या शिल्पकार म्हणून साऊमाईंचं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांत नोंदवले गेले. पन्नास वर्ष समाजात सतत शैक्षणिक कार्य, सामाजिक पारंपारिक व्यवस्थेच्या बुरसट कल्पनांच्या विरुद्ध स्त्रीमुक्तीचं आभाळ खुलं करण्याचं क्रांतीकारी कार्य, स्त्रीला प्रथमतः माणूस म्हणून सिद्ध करणं, स्त्री शिक्षणाची समाजात जाणीव निर्माण करणं, बंदिस्त स्त्रीच्या गुलामगिरीविरुद्ध बंड करणं, केशवपनाविरुद्ध न्हाविकांचा संप आणि भारतातील पहिला आंतरजातीय विवाह घडवून आणणं असं संघर्षशील कर्तृत्व सावित्रीबाईंचं होतं.

                                सावित्रीबाई वक्त्या होत्या, आद्यकवयित्री होत्या. माणसं मारणाऱ्या, माणसामाणसांमध्ये द्वेष उत्पन्न करणार्‍या लेखण्या निर्माण होण्याच्या भयानक काळात साऊजोतिबांची माणसं तारणारी, एकेश्वरवादाचा सिद्धांत सांगणारी लेखणी उदयास आली. अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या, अठराविश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या हरिजन गिरीजन, अडलेल्या नडलेल्या, वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पिडलेल्या, शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्व स्त्रियांचा उद्धार साऊमाईंनी केला. गळ्यात मडकं, कमरेला कुंचा आणि सावलीचा सुद्धा विटाळ असणाऱ्या माणसांना घरातला पाण्याचा हौद पिण्यासाठी खुला करणारा ज्योतिबा जिचा जन्माचा सोबती होता अशी साऊ अवघ्या समाजाची पालनकर्ती झाली. लहुजी वस्तादांच्या तालमीत तयार झालेल्या ज्योतीबांनी साऊला अभय दिलं आणि साऊमाईंनी उभ्या स्त्रीवर्गाला! परिस नावाची एक कल्पित गोष्ट सत्यात उतरली असेल तर ती यांच्याच रूपात. ज्यांनी दीनदलितांच्या आयुष्याचं सोनं केलं.

                              विधवा पुनर्विवाहाची संधी नसताना गर्भधारणा झालेल्या स्त्रीला जीव देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी समाजाने केलेल्या पापाची भागीदारी फक्त स्त्रियांचीच होती. 'बालहत्या प्रतिबंधक गृह' स्वतःच्या घरात सुरू करून या माऊलीने तीस-पस्तीस बाळंतपण केली. त्या स्त्रियांची नावं त्यांनी कोणालाही कळू दिली नाहीत. शंभर अनाथ,अनौरस मुलांना त्यांनी सांभाळलं. त्यातलाच यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर केलं. विद्येच्या क्षेत्रांना सीमा नाही आणि समाज, स्त्रीउद्धाराला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे सांगणारी सावित्री अंधाराचा काळ आणि मुक्तीचं आभाळ झाली. बाबा आमटे यांच्या 'ज्वाला आणि फुले' या कवितेतल्या ओळी मला आठवतात.

लक्ष लक्ष रक्तामधल्या पेटल्या मशाली

दुःख या धुळीचे येथे धुंद घाम गाळी

वेदना जीवाची येथे साधनाच झाली!

               समाजसुधारकांच्या प्रतिमेचे पूजन करण्याऐवजी विचारांची कृतीत पेरणी करायला हवी. इतका छान काम केलेलं असतानाही आज एकविसाव्या शतकात साक्षर समजल्या जाणाऱ्या समाजात काही तरी विचित्र घडतंय, याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे...

                  ज्योतिबा आणि सावित्री यांच्या जीवनावर आधारित 'सावित्रीज्योती - आभाळाएवढी माणसं होती' नावाची समाजप्रबोधनाची सोनी मराठी चॅनलवरील २०६ एपिसोड पूर्ण करणारी एक टिव्हीवरील सिरीयल केवळ टीआरपी किंवा जाहिराती नसल्यामुळे दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी खेद व्यक्त करत बंद केली. प्रेक्षकांची चव चटपटीत, मसालेदार झाली आहे. त्यांना वैचारिक, पोषक काहीही नकोय. थोर समाजसुधारकांचे विचार जिवंत ठेवण्याचं कार्य होणे गरजेचे आहे. महापुरुषांना जातीच्या चष्म्यातून पाहणाऱ्या बुद्धीची कीव येते. समाजसुधारकांची परंपरा अव्याहतपणे सुरू ठेवायलाच हवी. अण्णाभाऊ साठे, आंबेडकर समाज विधायक कार्य करणाऱ्या पुरुषांना विचारांतून जिवंत ठेवायला हवं. प्रेक्षकांनी अभिरुची आता बदलायला हवी. मनोरंजनासोबत ज्ञानवर्धकही पहायला, वाचायला हवं. साऊज्योती मालिकेतील निर्मितीचं चोख काम, कलाकारांची उत्तम निवड, मोठ्या सेटची उभारणी, निर्मितीमूल्य, चांगल्या पद्धतीचे लिखाण आणि योग्य सादरीकरण असतानाही अशा समाज विधायक मालिकांना प्रेक्षक वर्ग न मिळणं, ही खरी पुरोगामी महाराष्ट्रातील शोकांतिका. उत्तम दर्जाच्या मालिकांना पाठ फिरवणाऱ्या, फक्त मनोरंजनामागे धावणाऱ्या बुद्धिजीवी किंवा समस्त महिलांनी हा विचार करायला हवा. टीव्हीसमोर बसणारे बहुतेक असतानाही सावित्रीज्योती मालिकांसाठी प्रेक्षक मिळत नाही हे दुर्दैव. मालिका बंद पडली पण विचारांचा बळी पडू नये एवढीच इच्छा. ज्योतीसाऊचा एकेक शब्द हृदयात ज्ञानाचा पाझर फोडत असतानाही आजकालच्या सर्व प्रेक्षकांनी सासू-सुनांची भांडण, लावालाव्या, नवऱ्याची लफडी, कौटुंबिक कलह, बुवाबाबांचे चमत्कार या मालिकांना पसंती दिलेली दिसते. पुरोगामी महाराष्ट्रात सावित्री ज्योती मालिका ही प्रेक्षकांची आवड नाही, हेच किती विसंगत आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही बदल घडवणारा एक चेहरा म्हणजेच साऊज्योती.

                त्यांचं कार्य सर्वांना माहीत आहेच, मुद्दा फक्त इतकाच की त्यांच्या प्रगल्भतेचा दरवळ आकंठ काळजात सामावून घेताना, त्यांच्या कार्याचा विसर पडायला नको. त्यांचा त्याग पुन्हा पुन्हा आठवून प्रेरणा मिळत राहावी हाच उद्देश. अभ्यास करणाऱ्या पोरींनी फक्त परीक्षेपुरत्या सनावळ्या आणि फोटोपुरती जयंती साजरी करू नये,असं मनापासून वाटतंय. विचारांचे खंदे समर्थक महत्वाचे. विलक्षण दूरदृष्टी, सामाजिक स्वातंत्र्य, समतेची आरोळी, अद्वैताचा विचार असणारी साऊमाऊली. स्त्रीच्या ईश्वररुपाची पूजा करणारी जगाच्या पाठीवर एकमेव आपली भारतीय संस्कृती आणि स्त्रीला मिळणारी वागणूक यात दरी दिसायला नको यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.

                प्रत्यक्ष शक्य नसल्यामुळे नजरेने किंवा शब्दांनी व्यभिचार करणारे पौरुषत्व पाहिलं की वाटतं का झिजले या अशा कृतघ्न समाजासाठी हे समाजसुधारक? प्रत्येक स्त्रीने शिक्षणाने समृद्ध आणि ज्ञानसमृद्धीची खाण होताना, यशाच्या कळसावर विराजमान होताना, उघड्या डोळ्यांनी जग बघताना, विज्ञानाशी नाळ जोडताना साऊमाईला विसरून चालणार नाही. कारण स्त्री ही भोगवस्तू आहे इथपासून ते स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा प्रवास इथपर्यंतची संघर्षमय यात्रा स्त्री फक्त साऊज्योतीमुळेच पूर्ण करू शकली आहे.

पुस्तकांची पानं चाळताना,

ज्ञानाची सांगड घालताना,

मस्तिष्क ज्ञानात चिंब भिजवताना,

काळजात अक्षरबीजं रुजवताना,

तुझ्या माझ्या उरात दिसेल साऊ

अखंड प्रेरणेने उजळताना!

ज्योतिबा फुलेंच्या 'सार्वजनिक सत्यधर्माच्या' सोबतीनं सावित्रीबाईंनी तत्कालीन 'ब्राम्हणांचे कसब' समाजासमोर आणत 'शेतकऱ्यांचा आसूड' असा उगारला की अनेक 'दीनबंधूं'ची आणि समस्त महिलांची अज्ञानाच्या 'गुलामगिरी'तून मुक्तता केली. फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर भारतासाठी जगण्याचं भान,  शिक्षणाचे वेड, संघर्षाचं बळ, सुधारणेची पायवाट आणि जिद्दीची प्रेरणा देणारी ही साऊज्योतीची जोडी माझ्या आईबाबांप्रमाणेच मला मनाच्या गाभार्‍यात नेहमीच पूजनीय राहील, एवढं मात्र खरं!


लेखन

आयुब कलाम शेख

प्राथमिक शिक्षक

म.न.पा.शाळा क्र.१७४बी,कोंढवा बुद्रुक पुणे-४८

मो. ९५५२९४१२७१

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...