कोकण दौरा आणि जलदुर्ग भ्रमंती
११ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री अकरा वाजता निमगाव म्हाळुंगीमधून गाडी गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपचे ३९ शिलेदार घेऊन शिक्रापूर, खराडी बायपास मार्गे अलिबाग कडे रवाना झाली. बुलबुल पक्ष्याचं एखादं रंगीत पीस बागडत घरात यावं, अगदी तसंच प्रत्येक महिन्याला आमच्या बहारदार ट्रीपचं आयोजन काळे सर करतात. शरद काळे, रविंद्र काळे (सर), गणेश घोरपडे (दादा), ज्ञानेश्वर चव्हाण (मामा), अविनाश धोत्रे, अजिंक्य मांढरे, रवि नरसाळे, नवनाथ काळे, श्रीकांत नागवडे, आयुब शेख, विजय माने, शिवाजी चव्हाण (बापू) राज शिंदे, वैभव चव्हाण, सुखदेव रणसिंग (अप्पा), मुन्ना (फौजी), सोमा चव्हाण, प्रीतम वडघुले, सुमित वडघुले, गिरीष तांबे, शैलेश निकम, शुभम डमरे, तुषार नरसाळे, अभिषेक चव्हाण, शेखर बोरकर, अर्णव शिंदे, वैभव वडघुले, अनिरुद्ध मांढरे, रोहन शिवले, महेश ढोकले, वेदांत देशमुख, अथर्व ढमढेरे, रवींद्र काळे, रोहन वडघुले, हनुमंत वडघुले, सोमनाथ चव्हाण (नाना), किरण चव्हाण यांमध्ये अनेक शाळकरी विद्यार्थी, कंपनी कामगार, आयटी, शिक्षक, शेतकरी सर्वांचा समावेश. सातवीचा अर्णव एक टोक तर दुसरं टोक होतं साठीतले तात्या.
जीवनातला तोचतोपणा भेदून क्षण नित्य नवे करण्याचं अतुलनीय कसब या ग्रुपला लाभलं आहे. प्रत्येक ट्रेकला रसिकतेचा स्पर्श देत यांनी आमचं अनुभवविश्व नाविन्यतेच्या चांदण्यांनी भरून टाकलं आहे. यावेळी आमचे मार्गदर्शक पंकज माने सर काही कारणास्तव सोबत नव्हते, याची उणीव भासत होती. पहाटे चार वाजता कुरुळ, अलिबाग येथे पोहोचलो. रिसाॅर्टमध्ये प्रशस्त मोठा हाॅल होता. सर्वांनी दोन तास आराम केला. नंतर उठून अंघोळी उरकल्या. बाळासाहेब आणि इतर मित्रांनी मिळून सकाळी सात वाजता शिरा, चहा यांचा नाश्ता तयार केला. मोठमोठाली पातेली, गॅस शेगडी, सिलेंडर, किराणा यांची तयारी आयोजक रवी काळे सर आणि त्यांच्या सोबत निमगाव म्हाळुंगीमधील मित्र व्यवस्थित करतात, त्यामुळे खर्च अगदी कमी होतो, हे या ग्रुपचे नेहमीचेच वैशिष्ट्य झाले आहे.
नाष्ट्यावर यथेच्छ ताव मारल्यानंतर अलिबागमधील मच्छी चौकातील भरपूर मासे खरेदी केले. सुरमई, बांगडा,असे वीसेक किलो मासे घेतले. माशांसोबत अधाशासारखे फोटो काढले. एका महिलेनं तर आम्हाला अक्षरशः हाकलून देत सुनावलं. "माशांपेक्षा तुमचाच बाजार जास्त भरलाय इथे, निघा. आम्हाला दुसरी गिऱ्हाईकं बघायचीयेत." स्थानिक तीन मावश्यांना मच्छी फ्राय, भाजी, भाकरी, भात करण्यासाठी सांगून खांदेरीला कूच केली. खांदेरी किल्ल्यास भेट देण्यासाठी अलिबागवरून थळला आलो. थळच्या किनारपट्टीवर भग्न किल्ला आहे. तेथून नावेतून या जलदुर्गावर जाता येते.
खांदेरीचा दुर्ग हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे. १६७९ साली शिवाजी महाराजांनी मायनाक भंडार्याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला. खांदेरी उंदेरी अगदी शेजारधर्म सांभाळत दर्यात बिनधास्त उभे राहिलेले दिसले. आम्ही दोन बोटीत सर्व मित्र सामावून बसलो. छान पैकी उंदेरीला वळसा घालत तब्बल अर्ध्या तासानंतर खांदेरीवर पाऊल ठेवले. अफाट समुद्रातला हा दुर्ग सुरेखच. कान्होजी आंग्रे ब्रिजवर फोटो काढले. दमट वातावरण, अथांग समुद्र आणि गार गार पाणी काय भारी वाटत होतं म्हणून सांगू. हनुमंत वडघुले यांनी संपूर्ण ग्रुपचा ३६०° कॅमेऱ्यात घेतलेला व्हिडिओ अप्रतिम झाला होता. या बेटावर वेताळाचे एक मोठे राऊळ आहे. त्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी बांधव मासेमारीसाठी नावा समुद्रात घालत नाहीत, अशी प्रथा आहे. इथे कोंबडं आणि मद्य असा नैवेद्य दाखवला जातो, त्यामुळे या दुर्गावर राजरोसपणे मद्यपान केले जाते असे दृश्य दिसले.
आतापर्यंत पाहिलेल्या गडकिल्ल्यांपैकी या दुर्गावर भरपूर प्रमाणात कचरा असल्याचे जाणवले. सुंदर रूपवतीच्या शरीरावर जागोजागी खरुजाचे निशाण दिसावेत, अगदी तसंच त्या गड-किल्ल्यांवर दारुच्या, प्लास्टिकच्या बाटल्यांचे अवशेष दिसत होते. आमचे नेतृत्व असणारे रवी काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली खांदेरीचा कचरा आम्ही एकत्र गोळा करून साफ केला. खरंतर शिवराय सांगायला सोपे आहेत, ऐकायला भारी वाटतं, शिवरायांचा जयघोष करणंही तसं सोपंच पण शेवटी शिवराय अंगीकारणं महाभयंकर काम! शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणील तोच खरा या सह्याद्रीचा चेला! आणि आम्ही नुकतीच त्याची रंगीत तालीम केली होती. किल्ला बराचसा पाहण्यासारखा आहे. बुरुज, तटबंदी समुद्राच्या लाटांशी अजूनही तितक्याच जिद्दीचा सामना करत ठाम उभी आहेत.
समोर दिसणाऱ्या उंदेरीवर सोळा-सतरा तोफा आहेत, बाकी पाहण्यासारखं काही नसल्याने उंदेरी न पाहताच आम्ही माघारी फिरलो. तिथून पुढे किल्ला कुलाब्याकडे वळालो. अलीबाग बीचवरून ओहोटी असल्यामुळे चालतच किल्ल्याकडे गेलो. आयोजकांचं नियोजनच होतं तसं. कुलाबा किल्ला हा कोकण प्रदेशात मुंबई शहरापासून ३५ किलोमीटर दक्षिणेस आहे. हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्यालगतच पण किनाऱ्यापासून १ ते २ किलोमीटर अंतरावर, अरबी समुद्रात आहे. अलिबाग किनाऱ्यावरून १५ मिनिटे चालत आम्ही किल्ला गाठला. अनेकजण घोडागाडी करून जात होते. किल्ल्याची देखरेख शासन करत असल्यामुळे येथे तिकीट काढावे लागले. अलिबागचा हा पाणकोट किल्ला. शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक ‘किल्ले कुलाबा!’ प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरते शेवटी इंग्रज असे कालखंड ‘किल्ले कुलाब्याने’ पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला. उजव्या सोंडेचे गणपती मंदिर, हनुमान मंदिर, शिव मंदिर, दर्गा, इतिहासकालीन तोफा, गोड्या पाण्याच्या विहीरी, दारूगोळा ठेवण्याचे ठिकाण यांसाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे. याचि देही याचि डोळ्यांनी पृथ्वीवरील स्वर्ग आम्ही पाहिला, आकंठ काळजात सामावून घेतला.
पोटात कावळे ओरडत होते, पुन्हा रिसाॅर्टवर येऊन मस्तपैकी मच्छीवर ताव मारला. अहाहा! परमसुख म्हणजे काय? याची प्रचिती आली. संध्याकाळी नागाव बीचवर गेलो. रात्र उगवली, अंधार पसरला तरी बरेचजण पोहलो, गार लागत होतं तरीही. नाना, आप्पा, अर्णव, अथर्व काय जाम मज्जा केली राव! हर घडीला आनंद कसा घ्यायचा, याचा कानमंत्र मिळाला. अनेकदा वाचलेल्या पुस्तकांपेक्षा भेटलेली माणसं जास्त शिकवून जातात, हेच खरं. समुद्रावरून येणारी झुळूक अनुभवणं हादेखील एक महोत्सवच. अनुभव समृद्धीचे असंख्य समुद्र असताना आपण मात्र कोरडे राहता कामा नये, याची जाणीव झाली. मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पुन्हा उरलेले मासे फस्त केले. उद्याच्या बिर्याणीसाठी कांदा, टोमॅटो कापून घेतले. वापरलेली भांडी ग्रुपनिहाय स्वच्छ धुतली. येथे कोणी मोठं छोटं नाही. जबाबदारीला सगळे पुढे. पुन्हा झोपलो, दुसऱ्या दिवशीची मज्जा अनुभवण्यासाठी.
पहाटे साडेचारला सर्वांनी उठून अंघोळी केल्या. चहा, पोहे खाल्ले. बाळाभाऊंनी चिकन बिर्याणी बनवली. आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आज कोर्लई, रेवदंडा, काशीद बीच आणि जंजिरा होणार होता. कोर्लई हा रेवदंडा जवळील किल्ला. कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड व अलिबाग यांमध्ये सीमा ही कुंडलिका नदीची खाडी आहे. खाडीच्या मुखाजवळ उत्तरबाजूला रेवदांड्याचा किल्ला आहे. तर दक्षिणेकडे कोर्लई गावाजवळ कोर्लईचा.
मोक्याच्या जागी असलेल्या या किल्ल्याद्वारे पोर्तुगीजांनी कोर्लईपासून वसईपर्यंतच्या आपल्या प्रांताचे रक्षण केले. अलिबाग पासून २२ कि.मी. अंतरावर आहे. कोर्लईचा किल्ला एका चिंचोळ्या डोंगरावर बांधलेला आहे. निमुळत्या टेकडीवर असलेला कोर्लई किल्ला किलोमीटरभर लांब असून तो दक्षिणोत्तर पसरलेला आहे. कमी उंचीच्या या किल्ल्याच्या पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे, तर पूर्वेला कुंडलिका नदीची खाडी. दक्षिण टोकाकडील कोर्लई गावातील कोळीवस्ती संपली की, एक पाऊलवाट वर चढते. या वाटेने २० ते ३० मिनिटांमध्ये आम्ही डोंगराच्या माथ्यावरील तटबंदीपर्यंत पोहोचलो. पूर्वेकडील तोंड असलेल्या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केला. समोरच चर्चची पडझड झालेली इमारत दिसली. आमच्या शिवगर्जनेनं वास्तू हादरली! या पोर्तुगीज बांधणीच्या चर्चच्या मागे असलेल्या तटबंदीमध्ये दरवाजा आहे. हे प्रवेशद्वार एका पंचकोनी बुरुजाने संरक्षित केलेले आहे. या टोकावर पोहोचल्यावर पूर्व व पश्चिमेचे दोन्ही किनारे तसेच कोर्लई गावाचे उत्तम दर्शन घडले. बाजूला छोटेसे महादेव मंदिर असून त्यासमोर दोन वृंदावनं आहेत. उजव्या बाजूला असलेल्या बुरुजावर तोफा आहेत. कोर्लईच्या किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना पोर्तुगिजांनी सागर आणि कुंडलिका नदीची खाडी या परिसरावर ताबा ठेवण्यासाठी वापरली. चिमाजी आप्पा यांनी काढलेल्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी प्रयत्नांची शिकस्त करून कोर्लईवर ताबा मिळवला होता, हे ऐकिवात होतेच.
कोर्लईची तटबंदी, त्याचे आठ-दहा दरवाजे, आजही जागोजागच्या बुरुजांवरुन रोखलेल्या तोफा, सागराचे विशाल दर्शन आपल्याला मोहवून टाकते. गड उतरून काशीद बीचवर गेलो. काशीद हे उत्तर कोकणातलं मुरुड तालुक्यातील एक समुद्रकिनारी गाव आहे. अलिबाग-मुरुड रस्त्यावर मुरुड शहरापासून १५ किमी अंतरावर. मनसोक्त दोन तीन तास या बीचवर पोहलो, मज्जा केली. पुन्हा सर्वांनी गोड पाण्याने अंघोळ केली. (एका छोट्या बादलीत पाणी, किंमत २५ रुपये) आम्ही सगळे चिंब भिजलो पण एक व्यक्ती किनाऱ्यावर कोरडे उभे राहून सगळ्यांवर कडी नजर ठेवून होते. अगदी काळजातल्या काळजीने. आमचे नेतृत्व रवी काळे सर. जबाबदार माणसाला मोकाट वागताच येत नाही मुळी. आम्हा सर्वांना आनंदाची फुलं वाटणारे हात मात्र रिकामे राहतात याची जाणीव झाली.
समुद्रकिनाऱ्यालगत थांबून बिर्याणीवर मस्त ताव मारला. बाळासाहेबांच्या हातात जादू होती, भन्नाट केली होती बिर्याणी. शाकाहारी मित्रांनी व्हेज जेवण केलं. उशीर झाला होता, जंजिरा कॅन्सल करून घरी पोहोचण्याच्या तयारीत गाडीत बसलो. येताना ताम्हिणी घाटाचं सौंदर्य अनुभवलं. गाडीमध्ये असणारा उत्कृष्ट गायक गिरीश तांबे याचं गाणं आम्ही घाटात उतरून ऐकलं. प्रीतम वडघुले या मित्राने ही सुंदर गाण्याची लकेर छेडली. श्रोत्यांनी दोन्ही नवगायकांना भरभरून दाद दिली. काही व्यक्ती असतात ज्यांच्या केवळ स्पर्शाने रखरखता शिशिरही बहरणारा वसंत होतो, तसा हा ग्रुप. ज्यांच्या सहवासात आयुष्य बहरून जावं अशी विलक्षण माणसं.
युवराज शिंदे या मित्राच्या कल्पनेने आम्ही गाण्याच्या सुंदर भेंड्या खेळल्या. नवीन, जुन्या गाण्यावर थिरकलोसुद्धा. ग्रुपमध्ये एक फौजी मित्र असल्यामुळे देशभक्तीपर गीतांचीही उजळणी केली. अकरा वाजता घरी सुखरूप पोहोचलो. बालपणापासून पुस्तकात वाचलेले कितीतरी किल्ले स्वतः जाऊन पाहणे ही गोष्ट या गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपमुळे सत्यात उतरली. केवळ १५५०/- रुपयांमध्ये आम्ही दोन दिवस कोकण दौरा करून आलो. सोबत लाख मोलाचा आनंद अनुभवला ते वेगळंच!
नोकरीचं, कामधंद्याचं चक्र कुणाला सुटलंय? पण फक्त तेवढ्यासाठीच उभा जन्म कसा खर्ची घालता येईल? स्वतःचा, सुखाचा शोध कधी घ्यायचा मग? स्वप्नांनाही एक वय असतं. जर ती स्वप्नं वेळेत पूर्ण नाही झाली तर आयुष्यभर मनाला कोसत राहतात.
चला तर मग भटकू पुन्हा नव्या ठिकाणी, सह्याद्रीच्या दर्याखोर्यातून! तोपर्यंत जय शिवराय!
आयोजक
रवी काळे सर
गड किल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी
९०९६४६५६७५
मार्गदर्शन
पंकज माने सर
शब्दांकन
आयुब शेख सर
पुणे महानगरपालिका
९५५२९४१२७१