स्वराज्य तोरण 'तोरणा' ते प्रथम राजधानी 'राजगड' पायी वारी सोहळा
शनिवार दिनांक २८ मे २०२२ रोजी रात्री साडेदहा वाजता गाडी गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानचे मावळे घेऊन निमगाव म्हाळुंगी मधून शिक्रापूर, हडपसर, कात्रज, खेड शिवापूर, नसरापूर करत तोरण्याच्या दिशेने निघाली. पंकज माने, प्रताप ढमढेरे, दादा घोरपडे, रविंद्र काळे, चंद्रकांत आहेर, भरत साकोरे, गोपाळ, आनंद, आयुब शेख, वैभव करपे, गिरीश तांबे, अथर्व खांडेकर, प्रशांत शेलार, महेश चोपडे, सागर पांढरकामे, मंगेश आणि दोन सह्याद्रीकन्या प्राची वाखारे, रोहिणी शेलार यांमध्ये शिक्षक, शेतकरी, व्यावसायिक, अधिकारी, कंपनी कामगार, काॅलेजचे विद्यार्थी सर्वांचा समावेश होता. वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या गावांतील, 'शिवप्रेम' या एकाच ध्येयानं पछाडलेली मित्रमंडळी यावेळी एकत्र येतात याचं कारण आयोजक रवी काळे सर. शिंपल्यासारखी खूप कमी लोकं असतात, जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवताना स्वतःचा स्वार्थ पाहत नाहीत त्यापैकीच ते एक. आप्तेष्टांच्या संपर्कात राहण्यासाठी मोबाईलचा आपण जसा दर महिन्याला रिचार्ज करतो, अगदी तसंच प्रत्येक महिन्याला किल्ले भ्रमंतीचे आयोजन ते करतात. यावेळी बाळाभाऊंची कमतरता प्रकर्षाने जाणवली.
भररात्री अडीच वाजता तोरणा पायथ्याशी पोहोचलो. किती गार! हुडहुडी भरली नुसती. यंदा ट्रेकला बरेच जण नवीन असल्यामुळे ओळख परेड झाली. रात्रीचा प्रवास, त्यात येथे रानडुकरांचा वावर असल्यामुळे मार्गदर्शक पंकज सरांनी छोटीशी धारदार कुऱ्हाड जवळ बाळगली. गारठा भरपूर होता पण कोणीही जर्किन, स्वेटर घेऊ नये फक्त पाण्याच्या बाटल्या आणि जेवणाचे डबे घ्यावेत असे पंकज सरांनी सांगितले. पुढे जाऊन हात रुमालाचंही ओझं होईल असं त्यांचं मत. ज्याची पुढं आम्हाला पुरेपूर प्रचिती आली. पंकज मानेंसारखा एक तारा या ग्रुपला गवसला आहे, हे आमचं भाग्यच. मोबाईल बॅटरीच्या उजेडात दुर्गप्रवास सुरु झाला. काही ठिकाणी सौरदिवेही होतेच. वाऱ्याचा वेग भरपूर होता, जागोजागी असणाऱ्या रेलिंगने मात्र चढाईचं काम सोप्प केलं होतं. नवीन मावळे प्रशांत शेलार यांनी थोडी माघार घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या अर्धांगिनीने अशी काय जादू केली की ते सर्वांत पुढे चालू लागले, याचं कोडं शेवटपर्यंत उमगलं नाही. या यशस्वी पुरुषामागे त्यांची खंबीर बायको उभी होती, असे काळे सर म्हणाले. साडेचार वाजता आम्ही गडावर पोहोचलो. पाण्याचे टाक, तुटके वाडे नजरेस पडले.
तुझ्या आरतीला नभी लक्ष दीप,
कसे सांग वर्णू तुझे विश्वरूप?
असं वर्णन करावंसं वाटलं तोरण्याचं. काळोखातही किल्ला चांदणी प्रकाशात न्हाऊन निघत होता. आपण एसी म्हणतो त्या उपकरणालाही लाजवेल असं गारेगार वातावरण. पुणे जिल्ह्यातल्या दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल प्रचंडगड म्हणजेच तोरणा. वेल्हे तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरलेत. त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड तर दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग आहे. गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी तर उत्तरेला कानद नदीचे खोरे नजरेस पडते. कात्रजपासून अवघ्या ५१ किलोमीटरवर.
स्वराज्य स्थापनेची मनीषा उराशी बाळगत १६४७ मध्ये वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी म्हणजे ज्या वयात आपल्याला दहावीच्या बोर्डाचा फॉर्म भरताना दहावेळा, दहा ठिकाणी विचारावं लागतं, अशा वयात शिवबाने कोणत्याही प्रकारचा रक्तपात न करता सवंगड्यांसोबत निजामशाहीतील हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून हा तोरणा. प्रारंभ लहान असला तरी सातत्याच्या प्रयत्नाला गोड फळे लागतात, हे या किल्ल्याच्या इतिहासातून शिकता येते. प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून 'प्रचंडगड' ठेवले. याचं किल्ल्यावर सापडलेल्या १२ हंड्यांतील सुवर्णमुद्रांचा उपयोग शिवरायांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला. शंभूहत्येनंतर १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घालत लढाई करून ताबा मिळवला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे 'दैवी विजय' ठेवले. चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड जिंकला, यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. औरंगजेबाने प्रत्यक्ष लढाई करून जिंकलेला असा हा स्वराज्यातील एकमेव किल्ला, इतिहास दप्तरी नोंद आहे.
प्राचीन मेंगाई मंदिरात विश्रांती घेण्याचे ठरले. आमच्या आधी तेथे वीस-पंचवीस मावळे विश्रांती घेत होते. मंदिराचा गाभारा भरपूर मोठा होता, जणू एखादी भलीमोठी धर्मशाळाच. सर्वजण झोपण्याची खटपट करत असतानाच बडबड करणाऱ्या आमच्या गटातील तीन चार जणांना ढमढेरे गुरुजींनी सज्जड दम भरला आणि सगळीकडे भयाण शांतता पसरली. तासाभराची विश्रांती घेत पहाटे साडेपाच वाजता पुन्हा उठलो. तोरणेश्वर मंदिर, बुधला माची, झुंजार माची पाहिली. धुक्यामुळे स्पष्टता नव्हती मात्र नयनरम्य दृश्य दिसत होते. थोडं फिरून कल्याण दरवाजा मार्गे राजगडाच्या प्रवासास प्रारंभ केला. गड पुन्हा आलो त्याच वाटेने न उतरता मागील दरवाज्यातून डोंगर रांग पकडत राजगड गाठायचा असा हा ट्रेक नव्हे ट्रेल होता. मार्ग खडतर होता, घसरण्याची भीती वाटत होती. भरपूर थंडी असूनही घाम फुटला होता. जागोजागी रेलिंग करून अवघड ठिकाणी पुरातत्त्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत, ही त्यातल्या त्यात सौख्याची बाब. काही ठिकाणी अक्षरशः आपला पृष्ठभाग दगडांना चिटकवून घसरत जावं लागत होतं. असे अनेक कठीण पॅच होते, जिथे धडकी भरत होती. दादा आणि वैभव भाऊ यांनी याला 'ढुंगण पॅच' असं नाव दिलं. आणि आम्हीसुद्धा सर्वानुमते त्यास अनुमोदन दिलं. कारण हा जिवंत अनुभव प्रत्येकाने भोगला होता. हसत खिदळत, चेष्टा मस्करी चालली होती पण काळीजही धडधडत होतंच.
निसर्ग डोळ्यात सामावण्याचा प्रचंड प्रयत्न केला. अथांग निसर्ग ना कवेत घेता येत होता ना नजरेत मावत होता. तरीही प्रसन्न वाटत होतं. क्षणभर सूर्यप्रकाशामुळे स्पष्ट दिसायचं की क्षणार्धात धुक्यांची पांढरी शाल पांघरली जायची. उजेड आणि धुकं यांचा पाठशिवणीचा खेळ बराच वेळ सुरू होता. फुफ्फुसं तुडुंब भरून होईपर्यंत प्राणवायू घेता येणं, हे जगातलं सर्वश्रेष्ठ सौख्य आहे, याची पदोपदी जाणीव होत होती. नऊ वाजता घरून आणलेल्या डब्यांतून आम्ही नाश्ता केला. वेगवेगळ्या पदार्थांच्या देवाणघेवाणीतला गोडवा चाखता आला. पोट भरलं आणि पुन्हा निघालो राजगडाच्या प्रवासाला. आता ऊन वाढलं होतं, बॅगेत पाण्याच्या चारपाच बाटल्यांमुळे जड झालं होतं. घामाघूम झालो होतो. पुढे करवंदाचं एक झाड दिसलं, आम्ही सगळे तुटून पडलो. अगदी लाल करवंदं सुद्धा अधाशासारखी खाल्ली. जसं जसं पुढे जावं तसं करवंदाची जाळी दिसायची, मनसोक्त करवंद आम्ही इतकी खाल्ली की आता नकोसं वाटायला लागलं होतं. सुरुवातीला तुटून पडलो नंतर एकमेकांना वाटू लागलो. आपलं पोट भरलं की जग दिसतं, हेच खरं. संपूर्ण झाडाचं एक करवंद कोणीतरी खायचा आणि गोड आहे की आंबट आहे असं सांगायचा. मग आम्ही त्या झाडावर तुटून पडायचो किंवा दुर्लक्ष करायचो. ढमढेरे सरांनी खिसा भरून करवंद आपल्या पोरासाठी जमा केली. हात, ओठ अगदी चिकट झाले होते.
रात्री अडीच वाजल्यापासून सगळे चालत होते. तोरणा सोडल्यापासून समोर राजगड दिसत होता, जवळ आहे म्हणत भुलवत ही होता.
भेटीचिया ओढ लागलिसे डोळा
वाट ही विरळा दिसे मजला,
लाखो राऊळाशी टेकविला माथा
देव कुठे माझा शोधू आता?
कुणी पाहिला हो,
माझा देव कुणी पाहिला?
अशी आम्हा सर्वांची अवस्था. एके ठिकाणी थांबून गिरीश तांबे या मित्राचं गाणं ऐकलं. विसाव्याचा क्षण उपभोगत पुन्हा चालू लागलो. डीएसपी आणि ढमढेरे सर यांनी थकत गुंजवणे गावात जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर प्रवास थांबवला. दोन मावळे धारातीर्थी पडले. काळे सरांच्या हारपुडे सर आणि पासलकर सर या दोन मित्रांनी तोरण्यापासून राजगडाकडे गाडी पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली. प्रत्येक गडकिल्ल्यांच्या ठिकाणी काळे सरांचे मित्र कसे अवतरतात? हा एक यक्ष प्रश्नच! तोरण्यापासून १३ किमी तर भोर गावापासून २४ किमी अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर. हाच दुर्गराज राजगड शिवरायांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड कर्तृत्वाचा विस्तार.
तोरण्यावरून राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग अळू दरवाजा. संजीवनी माचीकडचा कडा एकदम उभा होता त्या मार्गे वर चढलो. उभ्या चढणीवर सागर इतक्या वेगात चढत होता की बास! झाडावर चढणारी खारुताईच जणू! त्याच्या मागोमाग आमचीही दिंडी राजगडाच्या दिशेने वर चढू लागली. चालण्याच्या या वारीत कधी पांडुरंग भेटतोय हीच ओढ लागली. आपण नेहमी गड वरून पाहतो, आम्ही मात्र अर्धा अधिक गड खालून वळसा घालत पाहिला. डोंगराला गडाच्या स्वरुपात साकारताना काय मेहनत अन् दृष्टी लागते याचा अर्थ समजला. राजधानी राजगडाची भव्यता डोळ्यांचं पारणं फेडत होती. तटबंदी अजूनही थाटात उभी. काळ्या कातळाचं सौंदर्य नजरेत भरत होतं. थोडं वर गेलो, संजीवनी माची दिसली. दुहेरी तटबंदीचा नजारा अवर्णनीय, सुखद भासत होता. कोणीतरी सुरेख नक्षीकाम केल्यासारखा. राजधानीचा गड म्हटल्यावर हल्ला होणारच म्हणून एक तटबंदी जरी नेस्तनाबूत झाली तरी राखणीला दुसरी असावी या उद्देशाने राजांनी दुहेरी तटबंदीचा घाट घातला. शिवाय दोन तटबंदीच्या मध्ये सैन्य सावलीला बसेल अशी व्यवस्था. तसेच टेहळणीसाठी सुरक्षित जागा निर्माण होईल हा या मागचा मनसुबा.
स्वतः शिवरायांनी या गडासाठी स्थापत्य कल्पनेतून साकार केलेला हा गड. गडावरील प्रत्येक गोष्ट माच्या, बुरुजं, सदर, मंदिर, बालेकिल्ला, वाडे सगळं काही राजांच्या देखरेखीत निर्माण झालं, आकारास आलं. २५ वर्ष स्वराज्याची राजधानी असणाऱ्या या गिरीरत्न राजगडाच्या चिऱ्याचिऱ्याने दस्तुरखुद्द शिवबाचा अगणित वेळा स्पर्श अनुभवला असेल, हे जाणवलं. काळ्याभोर कातळाला स्पर्श करत बंद डोळ्यांच्या पापण्यांपलीकडे शिवबाच्या स्पर्शाची अनुभुती घेण्याचा यत्न आम्ही केला. संजीवन माचीच्या बांधकामावेळी किल्लेदार वरून खाली पडला पण त्याला साधं खरचटलं सुद्धा नाही म्हणून ही संजीवन माची. माची तयार करताना बहुधा ती ढासळतेच, दगड पडतात, पुन्हा पुन्हा बांधावी लागते पण सुवेळा माची एकदाही ढासळली नाही म्हणून जी सुवेळी निर्माण झाली ती सुवेळा! असा रंजक इतिहास पंकज सरांनी आम्हाला सांगितला.
राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना येथे घडल्या आहेत. हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला शिवबाच्या कर्तृत्वाची ग्वाही देत उभा आहे. २२ कोसांचा घेर आणि मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरं काहीच येथे फिरकू शकत नाही. काय वर्णन करावं? जणू काही अथांग आकाशच पसरलंय. बालेकिल्ला पाहून छाती दडपते. या गडाच्या भाराने पृथ्वीचा घाम निघत असावा बहुतेक. शिवबाने तोरण्यापाठोपाठ हा मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून घेत डोंगरांच्या तिन्ही माच्यांना तटबंदी केली. सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती.
राजाच्या तलवारीवर प्रजेच्या निष्ठेचं पाणी चढलं की राष्ट्र अजिंक्य होतं. पंचवीस वर्ष स्वराज्याची राजधानी असणारा राजगड याचं मूर्तीमंत उदाहरण आहे. इथे येणं खरं तर केवळ निमित्तमात्र. दैदिप्यमान हा शब्द समर्पक असणाऱ्या शिवरायांच्या अफाट कार्यासमोर आपण किती खुजे आहोत, हेच मनाला नेहमी पटवायचं असतं. म्हणजे गर्वाची बाधा होतच नाही, ही प्रेरणा सतत श्वासात भरून घ्यायची असते पुढच्या प्रत्येक कार्यासाठी. गडावर जाण्यासाठी चोहोबाजूंनी पाऊलवाटा आहेत. शिवकालीन राजमार्ग असलेल्या पाली दरवाजा मार्गे साखर, वाजेघर, पालखुर्द, भोसलेवाडी मार्गे रस्ता प्रशस्त असून पायऱ्या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्तीसुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो, अशी योजना आहे. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे, ब्रम्हर्षी मंदिर आहे. सुवेळा माचीवरून सुर्योदय पाहणे ही दुर्ग भटक्यांसाठी एक पर्वणीच.
राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी २ दिवसही अपुरे पडतील. गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात. पद्मावती मंदिरात शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती आहे. सुबक बांधणीचा विस्तीर्ण पद्मावती तलाव शिवबाने स्वतः बांधून घेतला. पावसाळ्यात धोधो बरसणाऱ्या पावसाच्या पाण्याचा विधायक बंदोबस्त केला. राजवाडा, अंबारखाना, सदर यांचे अवशेष आजही अस्तित्वाची साक्ष देतात. नजरेच्या टप्प्यात जेवढं येईल तेवढं पाहत चोर दरवाज्याकडून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. तोरणा, राजगड किंवा कोणत्याही किल्ल्यांची एकमेकांशी तुलनाच करता येणार नाही. चाफ्याच्या सुगंधाने धुंद होणारा माणूस मोगऱ्याच्या वासाला विसरतो, असं थोडीच होतं?
जवळजवळ तेवीस किलोमीटर आम्ही चाललो, तेही अविश्रांत. खिशात किती आहे? यापेक्षा तुम्ही खुशीत किती आहात हे महत्त्वाचं. गुंजवणे गावात फ्रेश होऊन खेड शिवापूरजवळ ढाब्यावर जेवलो. रात्री नऊच्या दरम्यान घरी परतलो. सुखाच्या या अनुभवाचा आणि भ्रमंतीचा एकूण खर्च ६२० रुपये इतकाच आला, हेच तर आमच्या आयोजकांच्या नियोजनाचं वैशिष्ट्य. प्रत्येक महिन्याला एक दोन किल्ल्यांची सफर आम्ही करत आहोत, या सफरीचा परीघ सतत विस्तारत जावो, हीच सदिच्छा..
सुरेश भट म्हणतात,
देखावे बघण्याचे वय निघून गेले,
रंगावर भुलण्याचे वय निघून गेले,
आला जर जवळ अंत
का हा आला वसंत?
हाय, फुले टिपण्याचे वय निघून गेले.
अशी आपली गत होऊ नये म्हणून फिरत रहा मित्रांनो. स्वप्नांना सुद्धा एक वय असतं, जर ती वेळेत पूर्ण नाही झाली की आयुष्यभर मनाला कोसत राहतात म्हणून भटकत रहायला हवं. स्वर्गरुपी या सह्याद्रीच्या ऐतिहासिक, निसर्गरम्य धरतीवरून जीव ओवाळून टाकावा अशी याची महती असताना हयातभर ते पाहणंही आपल्याकडून होऊ नये यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती? गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानच्या प्रवाहाचं आपणही पाणी व्हावं, दर महिन्याला पैलतीरी शिवगर्जनेचा सातत्याने नाद ऐकू यावा आणि या वाहण्याला कधीच अंत नसावा ही मनोभावना ह्रदयात तेवत ठेवत थांबतो...
पुन्हा भेटू वेगळ्या गडाच्या वाटा शोधताना...
तोपर्यंत जय शिवराय!
पुढील ट्रेक २५ जून २०२२ रोजी राजमाची किल्ला आणि एकवीरा देवी असा असेल.
आयोजकांशी अवश्य संपर्क साधा.
आयोजक
रवी काळे सर
(पुणे महानगरपालिका)
गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी
90964 65675
मार्गदर्शक
पंकज माने सर
8668251375
शब्दांकन
आयुब शेख सर
प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका
955294127















