देवकुंड धबधबा आणि महडचा वरदविनायक!
शनिवार दिनांक २३जुलै २०२२ रोजी रात्री साडेदहा वाजता शरद काळे, रविंद्र काळे, सुमित वडघुले, प्रितम वडघुले, रवींद्र नरसाळे, अजिंक्य मांढरे, विजय माने, अप्पा रणसिंग, वैभव करपे, पंडित लांडे, गोरक्ष लांडे, संतोष लांडे, प्रदीप पाटील, बाळासाहेब लांडे, रोहन गोडसे, किरण भंडारी, अविनाश धोत्रे, अभिषेक चव्हाण, अक्षय चव्हाण, सारंग धुमाळ, गिरीष तांबे, शैलेश निकम, अक्षय दसगुडे, विश्वंभर गोडसे, अल्ताफ शेख, घारमळकर रोहिदास, कापरे विकास, अनिल गायकवाड, अभिमन्यू वडघुले आणि मी अशा २९ गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानच्या मावळ्यांना घेऊन गाडी निमगाव म्हाळुंगी मधून शिक्रापूर, पेरणे फाटा, आळंदी फाटा, चदननगर करत महडच्या दिशेने निघाली. यांमध्ये कंपनी मॅनेजर, सर्व्हिस करणारे, काॅलेजचे विद्यार्थी, उद्योजक, शिक्षक यांसोबत यंदा राजकीय व्यक्तींचाही समावेश होता.
सर्वजण आपापल्या स्टॉपवर नेहमीच अगदी वेळेवर उपस्थित राहतात, चंदननगर बायपासची टिम ( मी, माने सर आणि गिरीश) मात्र दहा मिनिटे उशीरा पोहोचली. गाडी एवढी चिखलात माखलेली होती की आम्हाला दिसलीच नाही, असं बालीश कारण आम्ही आयोजकांना सांगून अपराधी भावनेने गाडीत बसलो. तिथेच सर्वांचा ग्रुप फोटो झाला. यावेळी आमचे मार्गदर्शक पंकज माने सर, ड्रायव्हर सोबत रात्रभर जागून मार्ग दाखवणारे बापू आणि हास्याचा खळाळता धबधबा गणेश दादा घोरपडे ही तीन रत्नं सोबत नव्हती. त्यांची कमतरता वेळोवेळी जाणवत होती.
प्रत्येक महिन्यात ज्याप्रमाणे आकाश पौर्णिमेच्या पूर्णाकृती चंद्रामुळे विलोभनीय भासतं अगदी तसंच महिन्यातला एक दिवस ट्रेकचं आयोजन करून आमचं आयुष्य सुखद अनुभवांच्या चांदण्यांनी आयोजक भरून टाकतात.
पहाटे दोनच्या सुमारास महडच्या गणेश मंदिराच्या प्रवेशद्वारावर गाडी उभी राहिली. पावसाचा जोर वाढला होता. मंदिराच्या राखणदारांनी द्वार उघडत आम्हा सर्वांना यथेच्छ दर्शन घडवून दिलं. बाप्पाच्या पदस्पर्शाने पावन झालो. गाभाऱ्यातलं दर्शन घडलं. सगळ्यात भारी काळे सरांचा फोटो आला, जणू देवाशी संवाद सुरू. ग्रुपमधल्या सगळ्यांना वरदविनायकाचं दर्शन घडविणाऱ्या या माणसासाठी देवही काही क्षण स्तब्ध थांबला बहुतेक! भले सगळी माणसं सोन्यासारखी असतील, पण कॅरेटचा फरक असणारच की!रवी काळे सर म्हणजे निश्चिंत २४ कॅरेटचं शिक्कामोर्तब.
आमचे विजय माने सर म्हणतात, लोकं अष्टपैलू वगैरे असतातच पण अधिकचे दोन पैलू आहेत आपल्या लिडरला आणि तसंही चैतन्याचा प्रकाश देणाऱ्या या रवीच्या सानिध्यात वावरायला कुणालाही आवडेल!
पहाटे पाचच्या सुमारास पाचणूस गावात नाष्ट्यासाठी उतरलो. काळे सरांचे जिवलग मित्र धनराज बंडगर सरांनी इथलं सगळं नियोजन पाहिलं. मागे सुधागडवेळीही त्यांनी असेच सहकार्य केले होते. हक्काचा आरामाचा रविवार ही माणसं आपल्यासाठी वाया घालवतात अशी खंत मनाशी बोचली. काळे सरांनी अशी कितीतरी माणसं मिळवलीये, जपलीये. नाष्टा उरकून भ्रमंतीकडे मार्गस्थ झालो. भर पावसात लहानथोरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधबा निसर्गप्रेमींना खुणावत असतो. माणगाव तालुक्यातील पाटणूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत पोहचल्यानंतर अंदाजे दोन तासांचा ट्रेक केल्यानंतर साडेसात किमी अंतरावर स्थित देवकुंड धबधब्याचं दर्शन लाभतं.
इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब यांसारख्या सोशल मीडियाचा वरदहस्त लाभल्यामुळे कमी कालावधीत भरपूर प्रसिद्ध झालेला हा देवकुंड धबधबा पाहण्याची उत्सुकता मनी दाटली होतीच, बरंच चालावं लागतं यासाठी. मागच्या पाच सहा वर्षांपूर्वी ज्यांनी देवकुंड शोधलं असे निखिल महामुणकर यांनीच आम्हाला देवकुंडपर्यंत नेलं हे आमचं भाग्यच. सुरुवातीला तीन चार ट्रेकर्स पुढच्या वर्षी दिडशे आणि आता मुंगीलाही जागा नाही इतकी गर्दी असा प्रवास या धबधब्याच्या इतिहासाचा. पाऊस असेल तर खबरदारी घेणं गरजेचं आहे. धबधबा परिसर संवर्धन, माहितीसाठी गाईड यांमुळे बरचसं सोयीस्कर झालं आहे. सोबत किंवा एकत्र आलेला संपूर्ण ग्रुप परतीच्या वाटेने संपूर्णच जायला पाहिजे अशा अनेक कडक सूचना गाईडने आम्हाला दिल्या. आयोजक काळे सर तर इतके काळजीत होते की ते रेनकोट मध्ये उभे राहून सगळ्यांवर लक्ष ठेवत होते.
पाण्याचे ओहोळ, हिरवळ, जोरदार प्रवाह स्वागतासाठी सज्ज उभे होते. झपाझप वाढणारं पाणी, पावसाची संततधार, गाईडची व्यवस्था खूप छान वाटत होतं. जिथे धोकादायक वातावरण असेल तिथे त्यांची माणसं उभी आहेत. "त्याला काय होतंय, घेऊ की रिस्क" असा कोणताही उपद्रव आमच्या ग्रुपमधील कोणीही करत नाही, यंदाही केला नाही. तशी तंबी देण्यासाठी पुढे रवी काळे सर आणि मागे बाळाभाऊ होते. तीन भले मोठे ओढे थोडक्यात नद्याच लागतात प्रवासात. दुसऱ्या, मोठ्या ओढ्यामध्ये लाकडी पुलाखालून वाहणारा भलामोठा पाण्याचा प्रवाह थरकाप उडवतो. डुलणारा लाकडी पूल भीती उत्पन्न करतो.
जन्नत किंवा स्वर्गाचं रुपडं कसंय कोणास ठाऊक? कोणी पाहिलंय? पण कल्पनेतील चित्र याहून निराळं नसावंच बहुतेक. दऱ्याखोऱ्यात भटकणं हेच आम्हा सह्याद्रीवेड्यांचं स्वर्गसुख. धबधब्याला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून १०० रुपये प्रवेश कर घेतला जातो. बंडगर सरांच्या ओळखीमुळे आमचे प्रतिव्यक्ती सत्तर रुपये घेतले. गाव पातळीवर छान नियोजन केलंय, टिममधली माणसं मोजतात, नंबर देतात. धबधब्यावर गर्दी होऊ नये म्हणून माणसं मापात पाठवली जातात. गावात रेस्क्यू टीम तयार केली आहे स्थानिक पोरांची. काही घडलं तर पोलिसांच्या आधी धावत येतात अशी ही सगळी पोरं. सुरक्षिततेसाठी भरपूर सुविधा आहेत. जागोजागी दोरखंड बांधलेले आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिक युवा गाईडचे काम करतात.
झुळझुळ वाहणारे इथले सौंदर्यसंपन्न झरे पावसामुळे बऱ्याचदा रौद्ररूप धारण करतात. याबाबत बरीच खबरदारी घेण्याची आवश्यकता भासते. निसर्गाची ही बहरलेली रुपं डोळ्यांमध्ये टिपण्याची तुलना कशाशी करता येईल? खूप फोटो काढले यावेळी. काळे सर चिडलेच. अंतर कापणंही महत्त्वाचंच होतं. जाताना मोठमोठाले भरपूर धबधबे तिथे होते. नजरेतला प्रत्येक धबधबा देवकुंडच असेल असं वाटायचं. चालणं सुरूच होतं. सगळीकडे हिरवळ, एकमेकांना हात देत डोळ्यांनी निसर्ग पाहत फिरणं सुरू होतं.
आयुष्यातले आपले हक्काचे क्षण प्रवाहशून्य होत त्यावर उदास शेवाळ साठतंय हे लक्षात येण्याइतकं आपण सावध रहायला हवं. थोडंही उदास झालं मन की लगेच निसर्ग गाठायचा.
काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, समदं ओक्के म्हणत ब्लाॅगसाठी लागतील म्हणून आवर्जून वैभव करपेंनी प्रत्येक ठिकाणचे फोटो घेतले. काय मोबाईल क्वालिटी, एकदम दर्जा! पैशाचं वैभव होत नाही, करपेंच्या वैभवसारखी माणसं सोबत असली की आपण जहागीरदार समजायचं स्वतःला... जवळ पोहोचलो होतो. वनराज सिंहाने गर्जना करत भोवतालच्या परिसरावर स्वतःचं अस्तित्व, अधिराज्य सांगावं अगदी तसंच या धबधब्याचा आवाज आपलं कार्यक्षेत्र दर्शवत होता. जंगलातल्या त्या नीरव शांततेला भग्न करत होता. दिसला एकदाचा देवकुंड.
कित्येक नजराणे मिरवावेत असं चित्र, डोळे तृप्त! काय नितळ पाणी, अंतर्बाह्य पारदर्शक. प्रत्यक्ष धबधबा पाहताना आपल्या डोळ्यासमोरून निसर्ग चमत्काराची कित्येक दारं सताड उघडी व्हावीत असं दृश्य. त्या नजाऱ्यापुढं साऱ्यांची दोन-तीन तासांची पायपीट अक्षरशः लुप्त झाली. खूप गर्दी होती. वाट काढत पाण्यात उतरलो. भर दुपारची वेळ असतानाही गारव्याचा अमृत महोत्सव शरीराशी खेळत होता.
गिरीचे मस्तकी गंगा,
तेथुनि चालली बळे..
धबाबा लोटती धारा,
धबाबा तोय आदळे!
कोण्या निसर्गप्रेमी कवीने केलेलं धबधब्याचं वर्णन येथे अगदी सार्थ ठरतं.
बालकवींची निर्झरास ही कविता यावेळी आठवते,
गिरीशिखरे वनमालाही
कड्यावरूनि घेऊन उड्या
घे लोळण खडकावरती
जा हळूहळू वळसे घेत..
दोन दऱ्यांमधून वाहणारा विराट धबधबा पाऊस कमी झाल्यावर किती भारी वाटत असेल? पाण्याचा पडणारा प्रवाह अन खडकावर पडणारा प्रवाह यातलं अंतर जोखायला पुन्हा एकदा यायला हवं, अशी अवस्था. निसर्ग पाहून कोणाचं पोट भरलंय? तो तर वेड्यांचा उद्योग म्हणणाऱ्यांनो फेसबुक, व्हाट्सअपवर ॲनिमेटेड फोटो शेअर करण्यापेक्षा स्वतः सौंदर्य अनुभवा. अर्ध मेला माणूसही जिवंत असतोच की, जगणं महत्त्वाचं! आयुष्य फुलायलाही विरामाच्या जागा हव्या असतात. असा विराम निदान महिन्यात एक दिवस तरी असायलाच हवा. गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानसोबत अनुभवलेल्या या क्षणांची कित्येक पारायणं करावीत?
गर्दीमुळे देवकुंडजवळ मनसोक्त भिजता येईना. काळे सरांची नजर चुकवत थोडं माघारी फिरून दुसऱ्याच धबधब्यापाशी वैभव, संतोष, गिरीश, किरण आणि मी पोहोचलो. काय मस्त जागा होती ही. भिजलो मग मनसोक्त. कानशीलं शेकत होती अक्षरशः वरून पडणाऱ्या पाण्याच्या धारेने, पण मागे हटलो नाही. ओरडून ओरडून अक्षरशः घसा बसला. सुख खरंच वेड्यासारखं बरसतं, आखीव रेखीव नाही. सगळीकडे सुखच सुख होतं, कॅमेऱ्यात कैद करता न येणारं. फोटो काढताच येईनात कारण मोबाईल वडघुले कडे दिले होते प्लास्टीक पिशवीत आणि ओळखीचा चेहराही नजरेस पडेना. एका साऊथ इंडियन पोराला रिक्वेस्ट केली फोटोसाठी. त्याला वैभवचा नंबर दिला. (त्याने सुद्धा माणुसकी दाखवत दुसऱ्याच दिवशी फोटो पाठवले.)
तेवढ्यात अप्पा आणि त्याचे दोन मित्र मोठं दांडकं घेऊन आले. अन् पोलिसी खाक्या दाखवत सगळी गर्दी पळवली. हसून हसून पुरेवाट झाली. अख्खा धबधबा फक्त आमचाच... त्या धबधब्यात अंघोळ करून शेकडो गंगास्नानाचं पुण्य आम्ही पदरी पाडून घेतलं. बरसणाऱ्या सरी, कोसळणारे धबधबे, भिजण्यासाठीच असतात. उद्याच्या सर्दीची चिंता कित्येकांना असते. धबधब्यावर रेनकोट, छत्र्या घेऊन येणारी माणसं पाहून जरा गंमतच वाटली. पावसातही कोरडं राहणाऱ्यांची कीव येते खरं तर.
गड किल्ल्यावरून सूर्यास्त, सूर्योदय पाहताना दुपारी जेवायला काय असेल? असा प्रश्न पडतो बऱ्याच जणांना. आयुष्यातले काही क्षण वेड लावून मनासारखे जगण्याचे असतात. आतली धुंदी जपत! परतीच्या वाटेला लागलो. एखाद्या काश्मिरी गालिच्याला जुन्या फाटक्या वस्त्राचं ठिगळ लावावं अगदी तशाच प्रकारे काही ठिकाणी प्लास्टीक बाटल्यांची रास दिसली. वाईट वाटलं. गडकिल्ल्यांवर फिरताना आमचा ग्रुप प्लास्टीकचा तुकडाही खाली पडू देत नाही, तोच नियम आम्ही इथेही कटाक्षाने पाळला. निसर्गाची किमया अन् माणसाची वागणूक किती भिन्न?
ट्रेक दरम्यान ग्रुपमधली बरीचशी पोरं गरज पडेल त्याला हात देत सावरत होती. ऐतिहासिक ठिकाण नसल्यामुळे इथे बंधनं थोडी शिथिल होती. आमचा रणसिंग अप्पा सिंगल पोरगा, फोटोग्राफीचा जबरदस्त नाद, जिम करणारा, हेल्थ कॉन्शियस! ट्रेक दरम्यान अवघड वळणाच्या निसरड्या वाटेवर एक मुलगी अप्पाला म्हणाली,"excuse me" अप्पा पुरता घायाळ झाला असावा बहुतेक. पण क्षणाचाही विलंब न करता तिचे पुढचे शब्द कानी पडले,"Side please". अन् भर पावसात अपेक्षांवर पाणी पडलं... गाडी पुण्यात पोहोचेपर्यंत ही दुःखद घटना सांगून प्रत्येक जण अप्पाच्या जखमेवर मीठ चोळायला विसरला नाही. तेवढ्यात सुखाची बाब म्हणजे दादा यंदा ट्रेकला नव्हते. नाही तर अवघड होतं. आज धबधबा पहायला जाताना आम्हा सर्वांना हास्य वर्षावात चिंब भिजवणारा विनोदांचा खळाळता निर्झर दादा आजारी पडल्यामुळे सोबत नव्हता, ही एवढ्या चांगल्या सफरीतली दुखरी बाजू. दिलखुलास हसत नाहीत कित्येक माणसं. समोरच्या माणसांशी बोलत नाहीत, ती औषधांच्या बाटल्यांशी बोलतात नंतर. भरपूर हसत एकमेकांशी चेष्टा मस्करी करत ट्रेक पूर्ण होतो. वेगवेगळ्या वयोगटातली माणसं एकत्र येतात, मौज करतात. कोणालाही चेष्टेचा राग येत नाही म्हणा किंवा कोणीही चेष्टेची सीमा ओलांडत नाही म्हणा. हास्य क्लबमुळे शरीराच्या शिरांचा व्यायाम होतो पण मनमुराद हसणं याहून सुंदर काय? डॉक्टरांच्या गोळ्यांपेक्षा मित्रांच्या टोळ्या जास्त सुख देतात, हेच खरं...
पुन्हा पाटणूस गावी परत येऊन व्हेज नॉनव्हेज वर सर्वांनी ताव मारला. सरत नव्हतं एवढं चिकन खाल्लं. बाजरीच्या भाकरी,भात फक्कड बेत. चालून थकलेले जीव पुन्हा गाडीत येऊन शांत झोपले, साखरेच्या पाकात गुलाबजाम लोळत पडावेत अगदी तसेच. सुख म्हणजे वेगळं काय असेल? सुखाच्या व्याख्या वेळोवेळी बदलतात, मघाशी भिजणं, आता लोळणं त्यानंतर लवकर घरी पोहोचणं अशा विविध गात्रांतून सुख पाझरतं!
मित्रांनो, उमेदीच्या काळात आपण काय पेरतो हे महत्त्वाचं. कारण पीक येतं तेव्हा आयुष्य संपलेलं असतं बहुतेकदा. म्हणून सौख्याचे क्षण जगायचे स्वतःसाठी. पायाला जखम असतानाही आनंद घेणारे आमचे संतोष लांडे म्हणतात, घराच्या खिडकीतून पावसाची धमाल बघण्यापेक्षा ती अनुभवण्यासाठी सह्याद्रीतल्या सर्वांगसुंदर अशा देवकुंड धबधब्यावर यायलाच हवं. संपूर्ण ट्रेकचा खर्च फक्त ८५०/- रुपये इतकाच. बाळाभाऊंनी बिर्याणी केली असती तर खर्चाला आणखी कात्री लागली असती. आयोजक संपूर्ण खर्चाचा तपशील देतात. रुपयाही एक्स्ट्रा नसतो. कणभरही स्वार्थ नाही अशा कार्याशी स्वतःला जोडणारी ही माणसं किती भारी!
तुटलेला तारा हतबलपणे बघत रहावा छतावरून अशी अवस्था आपली होऊ नये, चांदण्यांच्या प्रकाशात मनसोक्तपणे फिरा. तेहतीसावा ट्रेक पूर्ण करत बहरलेल्या या ग्रुपला अनेक भटकंतीची पालवी फुटत राहो. अनुभवांनी आपली जिंदगी आणखी समृद्ध होत राहो, नवनवीन माणसं या ग्रुपमध्ये ओतप्रोत भरत राहो याच शुभेच्छा!
तोपर्यंत जय शिवराय!
पुढील सफर भोरगिरी ते भिमाशंकर
दिनांक २१ ऑगस्ट २०२२
आयोजकांशी अवश्य संपर्क साधा.
आयोजक
रवी काळे सर
(पुणे महानगरपालिका)
गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी
90964 65675
मार्गदर्शक
पंकज माने सर
8668251375
शब्दांकन
आयुब शेख सर
प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका
9552941271