Thursday, October 20, 2022

ब्रम्हगिरी, दुर्गभांडार आणि त्र्यंबकेश्वर मंदिर गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी सोबतची विलोभनीय सफर

त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी पर्वत आणि दुर्गभांडार एक विलोभनीय अनुभव


                            शनिवारी दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री दहा वाजता निमगाव म्हाळुंगीमधून विठ्ठल वडघुले, माधुरी वडघुले, भरत साकोरे, लक्षण लोंढे, रविंद्र काळे, रविंद्र (अजहर) काळे, शरद काळे, प्रदीप मांढरे, गोरक्ष पाचुंदकर, संतोष दिघे, गणेश घोरपडे, प्राची वाखारे, गुरुदत्त गोसावी, महेश गोसावी, वैभव करपे, हरिओम रक्ताटे, शैलेश निकम, अभिषेक चव्हाण, अविनाश धोत्रे, विशाल घावटे, विक्रम सुर्यवंशी, संतोष दफळ, जालिंदर थोरात, वैशाली खळदकर, अक्षता गुळूमकर, बापू चव्हाण, पंकज माने, सुदर्शन जाधव, सागर अवचिते, विशाल मराठे, अभिषेक चव्हाण, प्रियांका धुमाळ, गोजरी मांढरे, शामराव साळुंके, निर्मला साळुंके, आशा नाईकवाडी, लता नाईकवाडी, बंडू पुंडे यांना घेऊन गाडी पाबळकडे निघाली.

                 दुसरी गाडी पुण्याची. रघुनाथ चोरघे, अनिल गायकवाड, मुरलीधर कटके, किशोर वारबडे, नानासाहेब चव्हाण, सुरेश चव्हाण, अक्षयकुमार कांबळे, सूरज बोरावके, नामदेव खांडेकर, सुनील खाडे, विकास कापरे, शांतीलाल सुर्यवंशी, वैभव चव्हाण, नितीन शिंदे, कानिफ ढेरंगे, पवन रेणुसे, संदीप करे, आनंद पवार, मंगेश चोपडे, वैजनाथ गोऱ्हर, मांढरे देवांक आणि मी पुण्याच्या गाडीतून खराडी बायपास वरून कटके वस्ती, पेरणे फाटा, कोरेगाव भीमा करत गाडी रात्री साडेअकरा वाजता पाबळला पोहोचली. दोन्ही गाड्यांची आणि गाडीतल्या सर्व जिवलगांची गळाभेट झाली. महिनाभर कष्ट करून थकलेल्या हातांमध्ये महिनाअखेरीस पगार जमा व्हावा, तसंच घडतं आमच्या बाबतीत. प्रत्येक महिन्याकाठी आयोजक सफरीचे आयोजन करतात. एकत्र आलो, ग्रुप फोटो झाले, चहा झाला. मी, अक्षयकुमार आणि सुनील यांचे घोडा आणि घोडागाडीवर‌ बसून फोटो ही झाले. विशेष म्हणजे अंधारात फक्त घोडा दिसत होता, तरीही हौस मोठी!

                     निमगाव म्हाळुंगी गावातल्या पाच सहा मित्रांनी एकत्र येत सुरू केलेली गडकिल्ले भ्रमंतीची ही मोहीम आज ६८ मावळ्यांपर्यंत येऊन पोहोचली. मजरुह सुल्तानपुरींचा एक शेर यानिमित्ताने आठवला,

मैं चला था जानिब-ए-मंजिल

मगर लोग मिलते गयें,

कारवाँ बनता गया!

                   काळे सर आणि पंकज माने यांनी जोडलेल्या या गोतावळ्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. या ग्रुपमध्ये शाळकरी, कॉलेजची मुलं, शिक्षक, शेतकरी, आयसीटी, इतर कंपनी कामगार, व्यावसायिक, महिला, नेव्ही ऑफिसर, राजकीय व्यक्तींचाही समावेश होता. पाचवीतल्या छोट्या मुलीपासून बाहत्तर वर्षांच्या तरुण मावळ्यापर्यंत.

             बाराच्या दरम्यान जांबूत गावाजवळ मध्यरस्त्यात भलीमोठी थोराड बिबट्या मादी ड्रायव्हर आणि बापूच्या नजरेस पडली. तिला हकलवण्यासाठी ड्रायव्हरने गाडी पुढे रेटली. पण मादी माघारी फिरली. कारण मागे तिची दोन इवलीशी पिल्लं होती. पिल्लं सोबत असणारी मादी जास्त आक्रमक पवित्रा घेते. तिची अन् बापूची नजरानजर. गाडीचा पुढचा दरवाजा उघडा होता, बापू तिथेच. काही क्षणात डोळ्यांसमोर रेड्यावर बसलेला यमदूत मिस्ड कॉल देऊन गेला, अशी बाप्पूची गत झाली. पिल्लं रस्ता उतरेपर्यंत ती तिथंच होती. गेली एकदाची, पुढच्या गाडीतील ठराविक मावळ्यांनी हा चित्तथरारक अनुभव घेतला. मागच्या पुण्याच्या गाडीतील आमचा सूरज," चट्टेपट्टेवाला कुत्रा असेल." म्हणून मोकळा झाला. पण खरी कथा बापूलाच माहित.

                        पहाटे साडेचार वाजता त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पोहोचलो. काळे सरांचे अहिरे दाजी भल्या पहाटे आमचीच वाट पाहत उभे. त्यांनी आम्हाला कुशावर्त कुंडापाशी नेले. पाच जणांनी स्नान केले, बाकींनी गुडघास्नान. मनसोक्त दर्शन झालं. बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक शिवलिंग. मंदिराची काळ्या कातळातली कलाकुसर पूर्वजांची थोरवी सिद्ध करणारी. गाभाऱ्यातला दगडी घुमट अवाक् होऊन आम्ही डोळे भरून पाहिला. 

दररोज सकाळ झाली की समोर करोडो क्षणांच्या प्राजक्त फुलांचा सडा पडलेला असतो, आपल्या जीवनात. त्यातली कोणती आणि किती फुलं ओंजळीत घेत हुंगायची याचं कोडं ज्याला सुटलं तो सुखी! भरभरून जगायचं. कामाच्या दिवशी काम, त्यातही आनंद शोधायचा आणि सुट्टीच्या दिवशी मौजमज्जा करतानाही सुख मुक्त हस्ते लुटायचं. काळ कावळा खडे टाकतो, भरत चालला घडा. हे बिरुद लक्षात ठेवत घडा भरण्यापूर्वी जगून घ्यायचं.


                नाशकात आता उजाडलं होतं. अनलिमिटेड मिसळपाव आणि वाफाळत्या चहाने अहिरे दाजींनी सगळ्यांचं स्वागत केलं. या ट्रेकच्या भोजनाची संपूर्ण व्यवस्था त्यांनीच पाहिली. खूप कौतुक वाटलं. काळे सरांनी प्रत्येक गडकिल्ल्यांजवळ अशी माणसं कशी काय पेरलीत? हा नेहमीचाच यक्ष प्रश्न! पंकज सरांनी गडाविषयी व ट्रेकविषयी माहिती सांगितली आणि मंदिराच्याच मागे असणाऱ्या ब्रम्हगिरी पर्वताकडे आम्ही कूच केली. भलतंच ऊन! नवीन आलेले मावळे ऊन आणि उभी चढण पाहून निम्मे अर्धे शरणागतीच्या मुडमध्ये.

                          खरंतर डोंगरी किल्ले चढणं ही सोपी गोष्ट नाही. कित्येक किलोमीटर चालणं, स्वतःचा सगळा बाडबिस्तारा पाठीवर घेत वाटा धुंडाळणं, कडकडीत ऊन, मोकाट डोंगरदरे, भराट वारा यांसोबत पूर्वजांचा इतिहास स्मरण करणं हे सगळं किल्ले पाहण्यात आलं. आयुष्यात कितीही पडझड होऊ दे, पण ठाम कसं राहायचं हे गड किल्ल्यांकडून शिकता येतं, हेच खरं. वीसेक मिनिटे चालल्यावर त्र्यंबकेश्वराच्या कुशावर्ताकडून येणाऱ्या बांधीव पायऱ्यांपाशी पोहोचलो. ब्रह्मगिरी हा सह्याद्रीच्या रांगेतला एक विशाल डोंगर. उंचीनुसार महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा सुळका. या डोंगरामधून वैतरणा, अहिल्या आणि गोदावरी या नद्यांचा उगम होतो. वैतरणा पश्चिम दिशेने खाली उतरते आणि अरबी समुद्राकडे जाते तर गोदावरी पूर्वेच्या दिशेने आंध्रप्रदेशात राजमहेन्द्री इथे बंगालच्या उपसागराला मिळते. पंकज सरांनी इत्यंभूत माहिती पुरवली.

                      'किल्ले पाहिलेला माणूस' ही Documentary परवाच पाहिली. मोबाईल नसण्याच्या काळात गो.नी.दांडेकरांनी (अप्पांनी) हजारोंना किल्ले दाखवले, वाटा शोधल्या, गडकोट कसे पहायचे याची दृष्टी दिली. फोटो काढून ऐतिहासिक दस्तऐवज जपला. आमच्या ग्रुपमध्ये चारशेहून अधिकवेळा गडभ्रमंती केलेले पंकज माने सर दांडेकरांचा हा वारसा निगुतीने सांभाळत आहेत. कोणत्याही किल्ल्याचं नाव घ्यावं आणि त्यांनी त्या किल्ल्याची कुंडली मांडावी असं चित्र नेहमीच रेखाटलं जातं. त्यांच्या सहवासात आम्ही गडकिल्ले पाहतोय, हे सौख्य स्वर्गी नाही!




                   दाट झाडीमुळे ऊन्हाची तीव्रता कमी भासत होती. जागोजागी सरबत, काकडी, चहा, नाष्ट्यांची दुकानं. डोंगरावर मंदिर असल्याने भाविकांची गर्दी. वाटेवरुन वळण घेत पंकज सरांनी सुरेख बारव दाखवली. दगडी पायऱ्यांची चौकोनी विहीर. थोडं पुढे गेल्यावर दुमजली धर्मशाळा थाटात उभी. दगडी माळवदाची. गारेगार वातावरणाची. पुढे कड्यावर चढण्यासाठी खोदलेल्या पायऱ्या आणि भरपूर माकडं चेतावणीसाठी उभी. बॅग, खाण्याचे पदार्थ, पाणी सुरक्षित राहील अशा अवस्थेत चढाई सुरु केली. इथे हातात काठी असायलाच हवी. एकानेही इथे मोबाईल बाहेर काढला नाही. दोन भांडणाऱ्या माकडांना अभिषेक चव्हाण त्यांच्याच भाषेत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण पूर्वजांनी त्याचं काही ऐकलं नाही. उलट ती सर्व चवताळलीच.

                 पुढे कोपऱ्यावर अंजनीसुताची दगडात कोरलेली, शेंदूरवर्णी भव्य मूर्ती नजरेस पडली. दगडात कोरलेले हे जिने, खिंडीतून जाणाऱ्या पायऱ्या चढत आम्ही किल्ल्याच्या पहिल्या दक्षिणाभिमुख कातळात कोरलेल्या दरवाजातून सपाटीवर पोहोचलो. 



                        कल्पकतेचं सुंदर उदाहरण पहायला मिळालं. पर्यटकांनी फेकून दिलेल्या प्लास्टीक बॉटल्सचा वापर पाणी वाहण्यासाठी लागणाऱ्या पाईपच्या स्वरूपात, छताच्या स्वरूपात केलेला आढळला. 'मिळालंय त्यात सुख सापडलं की तक्रारी आपोआप कमी होतात', हेच यातून शिकता येईल. पुढे आणखी थोडी चढाई करून पठारावर ओळख परेड झाली. वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध माणसं या गडकिल्ले प्रेमापोटी एकत्र आलेत.

                        प्रवासातला सर्वांत मोठा आनंद आपल्यासारखा बेभान होणारा सहप्रवासी भेटण्यात असतो. इथं तर सगळे सहप्रवासी असेच! मग काय आनंदी आनंद गडे! काळे सरांच्या माध्यमातून जमलेला लोकसंग्रह दिवसेंदिवस प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढतोय याची प्रकर्षाने जाणीव झाली. 

दादांनी मला अन् विशालला बालाजीवरून आणलेले पेन भेट दिले. यामुळे लेखणीला आणखी धार येईल, हे निश्चित. रणसिंग अप्पा, माने सर, युवराज शिंदे, राहुल पोतदार, गिरीश तांबे, संतोषभाऊ लांडे नेहमीचे बरेचसे मावळे यावेळी नव्हते. त्यांची आठवण मनात चमकून गेली.


                  ब्रम्हा आणि विष्णू यांमध्ये एकदा शिव शोधण्याची स्पर्धा लागली. ब्रम्हदेवाने उगाच 'मला शिव सापडले' म्हणत वावडी सोडली. त्रिनेत्रधारी महादेवाने खोटं ऐकून रागाच्या भरात आपल्या जटा या पर्वतावर आपटल्या अन् ब्रम्हदेवाला शाप दिला, "अखंड सृष्टीत तुझं कुठेही मंदिर नसेल, तुला कोणीही पुजणार नाही." म्हणून पृथ्वीतलावर कुठेही ब्रम्हदेवाचं मंदिर नाही." अशी आख्यायिका पंकज सरांनी आम्हाला सांगितली. आपटलेल्या जटा या नैसर्गिक भुरुपांचा प्रकार आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. भारावलेल्या अवस्थेत आम्ही गोदावरी उगम स्थानाकडे निघालो. गोदावरीची काळ्या कातळातली सुंदर मूर्ती आणि पायाशी गोमुखातून येणारं पाणी... नजारा विलोभनीय होता. निर्मळ, शीतल, मधूर गोदावरीचं जल प्राशन केलं. आणि पुढे हेच पाणी गुप्तावस्थेत निघतं त्या जटास्थान मंदीराकडे निघालो.

 हरिहर किल्ला येथून स्पष्ट नजरेस पडतो. वैभव करपेंनी ब्लॉगसाठी गरज पडते म्हणून प्रत्येक स्पॉटचे फोटो घेतले. गडकिल्ले भ्रमंती दरम्यान लाभलेला हा खास मित्र. मंदिरामागून एक पायवाट ब्रह्मगिरीच्या उत्तर टोकाकडे असणाऱ्या दुर्गभंडाराकडे जाते. 'बिकट वाट वहिवाट' या प्रकारातली. एका बाजूला डोंगर तर एका बाजूस खोल दरी. हरीत तृणांच्या हिरव्या गालिच्यावर पिवळ्या फुलांची नक्षी शोभावी, असा हा नजारा. 

काही ओळी यानिमित्ताने सुचल्या,

काळे कातळ, हिरवा निसर्ग 

भराट वारा उंच डोंगररानी,

जुने घाटमाथे जुन्या राऊळांचे

बघता सौंदर्य न लवे पापणी!



             दुरुनही दुर्ग भांडार खुणावत होता. शरीराचं गात्र गात्र बहरावं अन् देहाची ही पालखी पुढे हलूच नये अशी अवस्था. सौंदर्य अनलिमिटेड बघण्याची डोळ्यांची ही किमया निसर्गाने आपल्याला बहाल केली. कितीही पाहिलं तरी मेमरी फुल्ल होण्याचा प्रश्नच नाही. नाहीतर असं सौंदर्य कित्येकदा हातून निसटलं असतं. दुर्गभांडाराचा इतिहास म्हणजे सुरुवातीला सम्राट रामचंद्रदेव यादवांनी, नंतर १६२९ मध्ये शहाजीराजांनी हा किल्ला जिंकला. पुढे १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी या संपूर्ण भागावर वचक बसवला.

              एका चिंचोळ्या नैसर्गिक दगडीपुलाने ब्रह्मगिरी आणि दुर्गभंडाराला जोडलंय. रुंदीला साधारण चार ते पाच फुटाचा हा रस्ता. चित्त थरारक, मंतरलेला हा प्रवास आम्ही कधीच विसरू शकत नाही. पलीकडे पोहोचून मागे वळून पहायचं आणि आपलीच पाठ आपुल्या हाती थोपटायची अशी तऱ्हा! हा दगडी पूल सावकाश ओलांडला. चालायला जिथे आम्ही घाबरत होतो तिथे संदीप करे उड्या मारण्याचे व्हिडिओ घेत होता. सगळं गजबच सुरू होतं. दगडी पायऱ्या कोरलेल्या द्वाराशी आलो. विस्तार खूपच छोटा असल्यामुळे पाच मिनिटांत शेवटच्या टोकावरचा चिलखती बांधणीचा बुरुज दिसला. थंडगार वारा अंगावर घेण्याची अन् उंचावरून निसर्ग बघण्याची एक वेगळीच मज्जा! थोड्याशा पावसाची इथे आवश्यकता वाटत होती, पण तसं घडलं नाही. अक्षयकुमार, सुनिल, सूरज यांनी भरपूर रिल्स बनवल्या, मात्र फोटोसाठी बदनाम आम्हीच होतो.!


         पुन्हा माघारी फिरून जटा मंदिर, दगडी पायऱ्या करत खाली उतरलो. पाणी नसल्याने काकडी वर तहान भागवली. वैभवने सगळ्यांसाठी काकड्या घेतल्या. ट्रेकमध्ये नवीन आलेल्या आमच्या नामदेव खांडेकर या मित्राच्या पायाला चमक आली. कानिफने एनर्जेल देत सहकार्य केले. एकमेकांना धीर देत, सांभाळत असाच ट्रेक पूर्ण होतो नेहमीच. खाली उतरत गाडीत बसून जेवण्याच्या ठिकाणी पोहोचलो. अंघोळ करून व्हेज नॉनव्हेज वर ताव मारला. सर्व तजवीज काळे सरांच्या अहीरे दाजींनी केली. त्यांचे कोणत्या शब्दांत आम्ही आभार मानावेत? बापू आणि सुनिल खाडे दोघे ड्रायव्हरसोबत रात्रभर अखंडपणे जागत असतात. बाळाभाऊ, वैभव आणि अझहर निमगावातून काळे सरांना नियोजनात मदत करतात. सगळ्यांचे सहकार्य लाभते, म्हणून भ्रमंतीची ही वारी सफल होते.

         गडकोटांच्या क्षितीजांची भ्रमंती, नाशिकचा प्रवास, नाष्टा, जेवण, दोनदा चहा, बिस्किटे एवढं सगळं अवघ्या ८५०/- रुपयांत बसवणं ही करामत आयोजक रवी काळे सरांशिवाय कोणी करू शकेल यावर आमचा कोणाचाही विश्वास नाही. आम्ही गप्पा टप्पा करत, फोटोग्राफीची चव चाखत, खात-पीत, मनासारखी स्टेशनं घेत प्रवास करतो. हा माणूस जागता पहारा देत राबत असतो, जबाबदारीच्या ओझ्याखाली!

                                  एक किस्सा आठवला, एक चिमुकली नात आजीला विचारते, "आजी, आभाळ खाली का पडत नाही?" आजीचं उत्तर खूप मार्मिक आहे. ती म्हणते, " बाळा, जोपर्यंत निःस्वार्थ काम करणारी चार माणसं जगात आहेत तोपर्यंत आभाळ कधी पडायचं नाही. कारण या चार माणसांनी आपल्या प्रामाणिक खांद्यावर ते पेललंय!" त्या चार माणसांत काळे सर समाविष्ट आहेत. ज्यांच्यामुळे शिवबाचे गडकिल्ले आणि निसर्गाचा आविष्कार आम्ही याचि देही याचि डोळा पाहू शकतो, अगदी माफक खर्चात. रवी काळे आणि पंकज माने या दोघांनीही आमच्यासाठी जगाचं सौंदर्य दाखवणाऱ्या या खिडक्या सदैव उघड्या ठेवाव्यात, हीच मनिषा!

भेटू पुन्हा नव्या गडकोटांच्या मातीला स्पर्श करण्यासाठी...

तोपर्यंत जय शिवराय!

पुढील ट्रेक

कोथळीगड (रायगड) आणि शिंगी डोंगर 

दि. १३ नोव्हेंबर २०२२

आयोजकांशी अवश्य संपर्क साधा.

आयोजक

रवी काळे सर

(पुणे महानगरपालिका)

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी

90964 65675

मार्गदर्शक

पंकज माने सर

8668251375

शब्दांकन

आयुब शेख सर

प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका

9552941271



उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...