Tuesday, November 29, 2022

रक्तरंजित कोथळीगड आणि नितीन शिंदे सरांच्या आंबोली गावची यात्रा! (गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी, पुणे सोबतचा अकरा ताशी थरारक प्रवास!)


रक्तरंजित कोथळीगड आणि नितीन शिंदे सरांच्या आंबोली गावची यात्रा!

(गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी, पुणे सोबतचा अकरा ताशी थरारक प्रवास!)



                                    शनिवारी दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री दहा वाजता निमगाव म्हाळुंगीमधून गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानचे ३४ मावळे म्हणजेच रवी काळे सर, युवराज शिंदे, प्रदीप मांढरे, महेश गोसावी, रवींद्र काळे (अजहर), अभिजीत चव्हाण(डॉक्टर), गणेश (दादा) घोरपडे, विक्रम सूर्यवंशी, शरद काळे (बाळाभाऊ), गुरुदत्त गोसावी, अथर्व गोसावी, आदित्य जाधव, सागर जाधव, वैभव करपे, अजिंक्य मांढरे, विठ्ठल वडघुले, काकासाहेब ढेरंगे, शुभम दौंडकर, संतोष लांडे, रामचंद्र नरवडे, मोहन गुरव, पंकज माने सर, प्राची वाखारे, विशाल घावटे, सुजल अडसूळ, दिपाली अडसूळ, निलेश काळे, अश्विनी काळे, वैभव नरवडे, मयूर नरवडे, मच्छिंद्रनाथ आघोले, सचिन गायकवाड, पद्मा थोरात यांना घेऊन गाडी शिक्रापूर, चाकण, शिरोली फाटा, चांदुस किवळे, कोये, कुरकुंडी, पाईट, पाळू, आडगाव, सुपे, सातकर वाडी करत नितीन शिंदे सरांच्या आंबोली गावी पोहोचली आणि दुसरी गाडी पुण्यातून २७ मावळे म्हणजेच रोहिदास घाळमलकर, शामराव साळुंके, निर्मला साळुंके, श्रीकांत नायकवडी, विकास कापरे, राहुल पोतदार, मुरलीधर कटके, विजय तागड, विजय माने, नितीन डेंगळे, संदीप धोंगडे, लक्ष्मण आरु, सुनील खाडे, सूरज बोरावके, नानासाहेब चव्हाण, वैजनाथ गोल्हेर,  बलभीम बोदगे,  गजानन हेंबाडे, अक्षय दरगुडे, राजू सोनवणे, विशाल नरवडे, मुकुंद फुंदे, परमेश्वर पांडे, संदीप करे, शांतीलाल सूर्यवंशी, मिलिंद बाराते, मयूर बाराते आणि मी यांसोबत गाडी खराडी बायपास, विश्रांतवाडी, आळंदीफाटा, चाकण, शिरोली फाटा, चांदुस किवळे, कोये, कुरकुंडी, पाईट, पाळू, आडगाव, सुपे, सातकर वाडी करत आंबोलीला आली. पुणे गाडीचं संपूर्ण नेतृत्व सुनिल खाडे सरांनी केलं. हा माणूस रात्रभर ड्रायव्हरसोबत जागता पहारा देतो, म्हणून बाकीचे सुखरूप पोहोचतात. त्यांना सहकार्य माने सर, कटके सर व इतर मित्रांनी केले.

                   प्रत्येक महिन्याकाठी काळ्याकुट्ट अमावस्येला छेद देत पौर्णिमेचा चंद्र उगवतो, अगदी त्याच नित्यनेमाने दरमहा गडकिल्ले सफर आणि निसर्गाच्या सान्निध्यात काळे सर आम्हाला घेऊन जातात. गाडीतील सीटची नोंदणी आठ-दहा दिवस आधीच होते, ५०० रुपये आगाऊ रक्कम जमा करून. कोणी रद्द झाले की १०० रुपये वजावट करून ४०० रुपये परत केले जातात आणि दंडाची रक्कम त्याच ट्रेकच्या एकूण खर्चात वापरली जाते. यावेळी २५ जण रद्द झाले. २५०० रुपये रक्कम गोळा झाली, मात्र या २५ मावळ्यांऐवजी नवीन २५ माणसं मिळवणं महाभयंकर काम. किती उपद्व्याप आयोजकांच्या डोक्याला? याचा विचार पुढच्या वेळी प्रत्येकाने नक्की करायला हवा. गडकिल्ले प्रेमी या ग्रुपमध्ये शाळकरी, कॉलेजची मुलं, शिक्षक, शेतकरी, कंपनी कामगार, व्यावसायिक, महिला, नेव्ही आणि आर्मीचे निवृत्त अधिकारी, राजकीय व्यक्तींचा नेहमीच समावेश असतो. वय, जात, धर्म, पंथ, शिक्षण, पैसा, ऐपत यांपलीकडच्या या ग्रुपमध्ये शिवरायांचा जाज्वल्य इतिहास अन् सह्याद्री दर्शन हेच उद्दिष्ट असतं नेहमी. इथे सगळे केवळ भटके.

आमचे फोटोग्राफर वैभव नरवडे म्हणतात, "पोटापाण्याचा विषय नसता तर आयुष्याचा तंबू इथेच या गडकोटांच्या पायथ्याशी ठोकला असता."

    यावेळी पायाला दुखापत झाल्यामुळे आमचे सुरेश चव्हाण, नेव्ही मॅन ट्रेकला येणार नव्हते पण त्यांनी येरवड्याजवळ येऊन आम्हा सर्वांसाठी थर्मासमध्ये घरून बनवून आणलेल्या गरमागरम वाफाळत्या चहाची सोय केली. आम्हीही त्यांच्या या प्रेमळ भेटीचा मनमुराद आनंद लुटला. गडकोटांच्या सफरीसोबत ग्रुपमधील अशा माणसांशी जुळलेले हे ऋणानुबंध केवळ अतुलनीय आहेत. कर्जत, रायगडच्या दिशेने वाटचाल करताना गारठा भरपूर होता, गाडीत सगळे निपचित पडून होते. या शांततेला आणखी एक प्रबळ कारण होतं, पुण्याच्या गाडीत दोन हिरकण्या होत्या, त्यामुळे यंदा गाणी, डान्स झालाच नाही. सगळं कसं सामसुम! पुढच्या वेळी पुणे गाडीत महिला नकोच असा सर्वानुमते ठराव पास झाला, पण काळे सरांना सांगण्याची जबाबदारी कोणीही न उचलल्यामुळे ताबडतोब बरखास्तही झाला.

                       वांद्रे गावात पहाटे तीनच्या सुमारास उतरलो. बाळाभाऊ, अझहर, वैभव यांसोबत बऱ्याच मित्रमंडळींनी सर्वांसाठी चहा बनवला. गॅस, साखर, पातेली यांची सोय मावळे निमगाव म्हाळुंगीमधूनच करतात. यावेळी दुधाची अन् नाष्ट्यासाठी चमच्यांची सोय संतोष लांडे यांनी केली. पतंजली बिस्कीट सोबत अमृततुल्य. अहाहा! काय सुंदर मिलाफ! पहाटे चार वाजता अंधाऱ्या रात्रीत सिमेंटच्या रोडवर दुतर्फा चहाची पंगत बसली. काय नजारा असतो हा! कोण? कुठल्या गावातले? कोणत्या वयाचे? पण गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपमध्ये सगळे एक! आयुष्य फुलायला रोजच्या कटकटीतून विरामाच्या जागा हव्या असतात, ती हीच जागा!

                          ज्ञानदेवांच्या, 'एक तरी ओवी अनुभवावी' या धर्तीवर महाराष्ट्रात जन्माला आला आहात तर 'एक तरी किल्ला पहावा!' ही जाणीवही तितकीच महत्त्वाची वाटते. आमचे मार्गदर्शक पंकज माने सरांनी आम्हाला गडापर्यंत जाणाऱ्या मार्गांची इत्यंभूत माहिती पुरवली, वन्य श्वापदांपासून कसा बचाव करावा याच्याही टिप्स दिल्या आणि मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात प्रवास सुरू झाला. काळ्याकुट्ट अंधारात जेव्हा काहीच दिसत नसतं, तेव्हा दिवा घेऊन तुमच्यासाठी कोणीतरी उभं असतं, हेच खरं. आमच्यासोबत पुढे पंकज सर आणि मागे रवी सर असेच ठाम उभे होते. चालल्यामुळे शरीर गरम झालं, कडाक्याच्या थंडीतही जर्कीनचं आता ओझं वाटू लागलं. हास्यमहारथी गणेश दादासोबत गप्पा मारत, हास्यविनोद करत, माहिती घेत प्रवास सुरू झाला. संतोष लांडे भाऊंनी खमक्या आवाजात जोरदार 'शिवगर्जना' देत निद्रिस्त जंगलाला जाग आणली.

                  डोंगरावरच्या  भल्यामोठ्या पवनचक्क्यांच्या आकाराचा अंदाज अंधारातही स्पष्ट जाणवत होता.एखाद्या विशाल धबधब्याचं पाणी भयाण आवाज करत कोसळावं अगदी तसाच आवाज यावेळी या पवनचक्क्यांचा येत होता. अंधारात कोणीही फोटो काढत नसल्यामुळे अंतर भराभर कापलं जात होतं. डेरेदार वृक्षाला पांढरी फुलं लगडावीत तसं अंधाऱ्या रात्री आभाळभर चांदण्यांचं लुकलुकणं दिसत होतं! तासभर चालून झाडाझुडुपांमधली वाट संपवत सपाट पठाराशी आलो. शर्यतीचा घोडा रात्री उभ्यानेच झोपतो म्हणतात, कोथळीगड नावाचा हा 'स्वराज्याचा वारू' दुरून तसाच भासत होता. गवताचं वाऱ्यासोबतचं शहारणं, आमच्याही अंगावर शहारे आणत होता.

                    सपाटीवरून खाली उतरत पुन्हा वर चढण करत कोथळीगड गाठणं, हा डबल ट्रेक होता आजचा. पुन्हा तासभर चालल्यावर थोडंसं उजाडलं, ताठ उभा तो 'स्वराज्याच्या वारू' आता नव्या दमाने फुरफुरताना दिसला. क्षणार्धात एका ठिकाणी वाट चुकलो, असे वाटले. पंकज सर पुढे जाऊन वाटेची शहानिशा करेपर्यंत आम्ही 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत गायलं. वाट योग्य होती, डोळे झाकूनही अवघा सह्याद्री पालथा घालणाऱ्या पंकज माने या भटक्याकडून वाट चुकल्याची 'कैसी भूल' होणार?

                        एका ठिकाणी थांबून भरपूर गप्पा मारल्या, झोके खेळलो सगळेजण. शिवराज्यात शत्रूंना वेगवेगळ्या गनिमी काव्यांचा वापर करून घाबरवणे, सळो की पळो करून सोडणे, थकवणे, चकवणे या युक्त्या मावळे वापरायचे. अंधारात हल्ले, भाले, दगडांचा जंगलातून होणारा वर्षाव यांमुळे  दुश्मन मावळ्यांना 'भुताटकी' समजत असत! असाच अनुभव प्रत्यक्ष आम्ही अनुभवला, कोथळीगडाच्या घनदाट अरण्यात. आमचे सुनिल, सुरज, अक्षयकुमार, संदीप, वैजनाथ, शांतीलाल, लक्ष्मण, पांडे, फुंदे, कटके सर यांसोबत सगळेच खतरनाक आवाज करत होते. ही माणसं पुणे शहरातून आली होती की गडचिरोलीच्या जंगलातून? हे कळायला मार्ग नव्हता.

                    रामचंद्र नरवडे यांनी दादा कोंडके, नाना पाटेकर यांच्या मिमिक्री केल्या. काय भारी अदाकारी! वरच्या पट्टीतला कलाकार. थकव्याचा सगळा शीण निघून गेला. भरपूर चाललो, नजरेच्या टप्प्यात आलेला गड मृगजळासारखा चकवा देत आणखी लांब वाटायचा. उभ्या चढणीने थकलो, तरीही चालत राहिलो. लख्ख सूर्यप्रकाशात आता फोटोग्राफी, रिल्सला सुरुवात झाली. इंग्लिश मिडीयम शाळेतल्या शिक्षकांची ही गँग मौजमजा करायला भन्नाट होती. आनंद मिळवण्यासाठी कधी कधी वेडेपणाच्या रेषेपर्यंतही पोहोचावं लागतं, ते घडताना आम्ही सगळे पाहत होतो. 

आपलं आयुष्य मजेत जगा असं सांगत एक अनामिक गझलकार म्हणतो,

असो कसाही सूर आपुला

प्रत्येकाचं निराळ गाणं आहे,

मैफल आहे दोन घडीची

नकळत निघून जाणं आहे!

                   या ग्रुपमधील सर्वांसोबत जगलेल्या ह्या सगळ्या अनुभवांची शिदोरी भविष्यात इतिहासाच्या ट्रंकेतून वेळोवेळी काढून पुन्हा पुन्हा पाहत रहावं असं हे देखणेपण! गवत थोडंफार वाळलं होतं मात्र भरपूर घसरडं होतं. पलीकडे उभी दरी आणि निमुळत्या वाटेवरून चालणं तसं जिकिरीचंच होतं. समोर येणाऱ्या प्रत्येकाला चिरडणाऱ्या अजस्त्र पिसाळलेल्या हत्तीसारखा हा उदंड, काळाकभिन्न कोथळीगड. काय बिशाद असेल राव एखाद्या शत्रूची स्वराज्याच्या जवळ येण्याची?

                  गड नजरेच्या आणि कॅमेऱ्याच्या टप्प्यात आल्यानंतर उतू जाणाऱ्या दुधासारखी प्रत्येकाची गत झाली. आतुर मनातून फोटो, व्हिडिओ या सगळ्यांना उधाण आलं होतं. सुस्त अजगरासारखा गड स्वस्त पडला होता, आलेल्या गेलेल्यांवर ठेवणारी नजर मात्र तीक्ष्ण. टप्प्यात आला की कार्यक्रम करणारा हा गड. 

काळे सरांच्या छप्पन वर्षांच्या पद्मा मावशींनी पायथ्याशी थांबण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्वजण गडाच्या जवळ आलो, पुढे दगडी कातळातली गुहा. विश्रांतीचं ठिकाण असावं बहुतेक. थोडं पुढे पाण्याची ओळीत कोरलेली चार टाकी. हिरवळीने आच्छादलेलं थंडगार पाणी. पुढे दगडी पायऱ्या, धातूच्या पुरुषभर आकाराच्या दोन पंचरसी तोफा दिमाखात बैठक मारून बसलेल्या. हा किल्ला देखरेखीसाठीचा. बलाढ्य दुर्ग नाही पण एक संरक्षक ठाणं! मराठ्यांचा शस्त्रागार!

                      चालत पुढे आलो. दगडी कोरीव पायऱ्या वर बालेकिल्ल्याकडे नेणाऱ्या. शेजारी भैरोबाचं मंदीर, शेंदूर लेवून उभ्या दोन आकर्षक मूर्ती. देवळाच्या गाभाऱ्यात गेलेल्या भक्ताने मूर्तीकडे टक लावून पहावं, अगदी तशाच अनिमिष नेत्रांनी आम्ही पाहू लागलो. तटबंदीचे अवशेष आता अंतिम घटका मोजत असल्यासारखे भासत होते. समोर एक भलीमोठी गुहा. दगडी कोरीव खांबांच्या खांद्यावर विसावलेली. हे मंदिर याच गुहेच्या एका खोलीवजा भागात होतं. त्याला दगडाच्याच कोरीव खिडक्याही होत्या. घराच्या गच्चीतून निवांत आकाश बघावं तसं या गुहेची कलात्मकता आम्ही पाहत होतो. दाराच्या चौकटीवर, खांबावर केलेली सुबक दगडी नक्षी. बापरे! काय कौशल्य कमावलं होतं पूर्वजांनी. ना कोणती मशीन ना कोणता कॉम्प्युटर! तरीही अद्वितीय! गो. नी. दांडेकरांच्या‌ दुर्गदर्शन, किल्ले, दुर्गभ्रमणगाथा या पुस्तकांत तर निनाद बेडेकर यांच्या दुर्गकथा, दुर्गवैभव, इतिहास दुर्गांचा या पुस्तकांत कोथळीगडाची नोंद सापडते.

                      मेलेल्या माणसाने अचानक जिवंत होत पुनर्जन्माचा सोहळा अनुभवावा अगदी तसंच आम्ही हा स्वर्ग 'याचि देही याचि डोळा' पाहतो, प्रत्येक महिन्याकाठी. दगडी कातळाचा कोथळा फाडून तयार केलेल्या दगडी पायऱ्या. निर्मितीचा अप्रतिम नमुना. पायऱ्या चढत वर पोहोचलो. संदीप करे नावाचा मावळा म्हणजे महाकठीण काम. आपले पूर्वज माकडांपासूनच निर्माण झाले आहेत, याची साक्ष प्रत्येक कृतीतून देणारा अवलिया माणूस. दगडी कड्यांवर, झाडांवर लटकणारा, उड्या मारणारा.


               कोथळीगड हा महाराष्ट्रातल्या पेठ (ता.कर्जत, जि.रायगड) म्हणजेच कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावरचा किल्ला. आकाराने छोटा पण रक्तरंजित ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला. नारोजी त्रिंबक हे गडाचे किल्लेदार रसद व दारुगोळा, जवळील गावातून मिळविण्याकरिता गेले असता गडावरील माणकोजी पांढरेंच्या ताब्यात गड होता. माणकोजी पांढरे, काझी हैदर औरंगजेबाला फितूर झाले. रात्रीच्या काळोखात मुघल अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला, हे आपलेच लोक रसद घेवून आले आहेत असे सांगून गडात त्यांनी प्रवेश दिला आणि गडावरचं सगळं सैन्य कापून काढलं. रक्ताचा पाट वाहू लागला. गडावरील मावळ्यांना फसवण्यासाठी त्यांनी कपडेही मावळ्यांसारखेच परिधान केले होते. नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयास केला, ज्यात ते आणि त्यांचे सैन्य मारले गेले. असा हा रक्तरंजित इतिहास.

                        किल्ल्याचा दरवाजा अजूनही देखरेख करत उभा आहे. गड संवर्धन करणाऱ्या मावळ्यांनी सागवानी लाकडी दरवाजा बसवून शिवरायांप्रति, गडकोटांप्रति आपले कर्तव्य पूर्ण केले आहे. महादरवाजातून आत जाताच आम्ही शेवटच्या पठारावर पोहोचलो. पाण्याचं मोठं तळं तिथं विसावलंय. काय नजारा? डोळ्यांची पारणं फेडणाऱ्या दृश्यांची अशी कित्येक पारायणं आम्ही केली. १५५० फूट उंचीचा गिरिदुर्ग प्रकारातला, बिकट चढाईच्या श्रेणीतला हा गड. पेठ गावाच्या निकटतेमुळे याला ’पेठचा किल्ला’ म्हणूनही ओळखतात. कर्जतहून खेड-कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिधगड, माणिकगड, पिशाळगड असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो. ग्रुप फोटो घेतला. घोषणा देत खाली उतरत परतीच्या प्रवासाला लागलो. 

                मंदिरासमोरच्या वाटेने म्हणजेच आलो त्याऐवजी दुसऱ्या मार्गे खाली उतरलो.  पायथ्याला असलेल्या गावात पाणी प्यालो. पुन्हा चढणीचा प्रवास. येताना गड कधी येतोय म्हणून गडाकडे लक्ष देणारे आम्ही गड लांब गेलाय का याची वळून वळून खात्री करत होतो. चार तास चालत राहिलो. आता शरीरातलं सगळं त्राण संपुष्टात आलं होतं. भूक आणि तहानेने व्याकूळ झालो होतो.

प्राची वाखारे मॅडम नी आम्हाला गार पाणी, लेमनच्या गोळ्या आणि चॉकलेट दिले. भूकेच्या डोहात बुडत्याला गोळ्या बिस्किटांचा आधार झाला. एका उंचवट्यावर पंकज माने सर सगळ्यांना हात देत वर घेत होते. ग्रुपमधल्या मावळ्यांना आपली गरज भासेल अशी महत्वाची जागा यांना आपसूक कशी काय ठाऊक? याचं कित्येकदा कोडं पडतं.

 काळे सरांची दुसरी मावशी निर्मला साळुंके व काका शामराव साळुंके न थकता चालत होते. मानलं पाहिजे जोडीला. वयाची शांत, सौम्य स्निग्धता लेवून घामाच्या धारांत भिजलेला दोघांचा चेहरा किती सुंदर वाटत होता. कटके सर तर नवतरुणांना लाजवेल असं व्यक्तिमत्त्व. अशा काही व्यक्ती असतात, ज्यांच्याकडे पाहिलं की शिशिरही वसंत होतो. ग्रुपमध्ये अशांची कोणतीच कमतरता नव्हती.

                 दोन प्रवासी आम्हाला परतीच्या प्रवासात भेटले. दर‌ रविवारी ते भटकंती करतात दोघेच. एका मोठ्या दगडी टाक्यातल्या पाण्यावर साठलेलं शेवाळ दूर करत गार, बर्फासारखं, गोड पाणी आम्हाला त्यांनी काढून दिलं. आमच्याही आयुष्यातल्या प्रवाहशून्य क्षणांवरची उदासीनता दर महिन्याला आयोजक असेच दूर करतात. ह्या अनुभवांची आठवण काढत पुढचे बरेच दिवस खळखळून हसतो आम्ही. सोफ्यावर लोळत, आवडता चॅनल बघत रविवारचा दिवस फुकट घालवण्यापेक्षा सह्यगिरीच्या सान्निध्यात अपूर्वाईचं हे स्मित झळकत मनाचा शीण कुठल्या कुठे उडून जातो, भुर्रकन.. सरांच्या मावशी खूपच थकल्या होत्या. पंकज सर, वैभवभाऊ यांनी आधाराचा हात आणि धीर देत त्यांना चालण्यासाठी उभारी दिली. आणखी एक मुलगी खूप थकली होती. काळे सर, बोदगे सर यांनी तीस, चाळीस पावलं मोजत मोजत त्यांना कसंबसं गाडीपाशी आणलं.

                     अकरा तासांची पायपीट करून सगळेच थकले होते. तरीही बाळाभाऊ, प्रदीप मांढरे, अझहर, वैभव करपे आणि इतर कार्यकर्त्यांनी सर्वांसाठी ८० मॅगीच्या पुड्यांची एवढी लज्जतदार मॅगी बनवली की लाजवाब! उन्हाने कोमेजून गेलेल्या वेलीवर पावसाचे थेंब पडावेत अगदी तसंच आम्हीही त्या मॅगीमुळे तितकेच शहारले गेलो, टवटवीत झालो. अन्नदाता सुखी भव! हे बोल काळजातून सहज बाहेर पडले. पुढे एका नदीपात्रात मनसोक्त पोहलो. काय भारी वाटत होतं, शब्दांत व्यक्त करताच येणार नाही. काळे सरांनी प्रत्येक ट्रेक नंतर असं पोहण्यासाठी स्थळ शोधावं ही कळकळीची विनंती.

                 फ्रेश होऊन शिंदे सरांच्या घरी आंबोली गावी पोहोचलो. त्यांच्या गावची यात्रा होती. कोथळीगडाच्या जवळ राहणारे आमचे पुणे महानगरपालिकेतील आदर्श शिक्षक बंधू नितीन शिंदे सरांनी सर्व गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानच्या मावळ्यांच्या जेवणाची सोय आपल्या राहत्या घरी केली. तुफान प्रेम करणारी माणसं जोडाल तेवढी घरं तुमची, या व.पु. काळे यांच्या वाक्याचा ट्रेकमध्ये नेहमीच प्रत्यय येतो. सोन्यानाण्यांपेक्षा दाराबाहेर असणारा चपलांचा ढिग तुमची श्रीमंती प्रतिबिंबित करतो, असे आमचे संतोषभाऊ म्हणाले. साठ सत्तर जणांना व्हेज नॉनव्हेज चा संपूर्ण स्वयंपाक या घरात बनवणारा मायमाऊलींचा राबता सुरू होता. सरांची आई, पत्नी, चुलत्या, बहिणी सर्वजण चुलीवर भाकरी, चिकन, भात, पुरणाची पोळी, आमटी,भात यांचं सुग्रास जेवण आमच्यासाठी बनवत होते.

                   "शिवबांच्या गडकिल्ल्यांची माती तुम्हा सर्वांच्या पावलांनी माझ्या अंगणात येणार, हे माझं भाग्य!" असे शब्द नितीन शिंदे सरांनी काळे सरांकडे व्यक्त केले. एक वेगळाच टवटवीतपणा होता या घरात. अशी प्रेमळ माणसं ज्या घरात राहतात ते घर संगमरवरी का मातीचं? बंगला की चाळीतलं? त्याला अर्थ नसतो. आपलेपणाच्या स्पर्शाने लाभलेली समृद्धी हीच या घरांची खरी ओळख असते. साध्या सरळ माणसांचा कधीही कोणता ब्रँड नसतो. खरंतर साधी माणसं, हाच माणुसकीचा एक ब्रँड असतो. पंगती बसल्या, उठल्या. पोटभर जेवले सगळे. नॉनव्हेज वर ताव मारणारा मी. पण यावेळी दुधात पोळी चुरून खाल्ली. मधापेक्षाही गोड घास. कारण याला प्रेमाचा, मायेचा, आपुलकीचा स्पर्श लाभला होता. साठ सत्तर मावळ्यांचे पोट भरून तृप्त करणाऱ्या नितीन शिंदे सरांचे कोणत्या शब्दांत आभार मानता येतील? अशी अनेक जिवाभावाची, प्रेमळ माणसं या ग्रुपच्या माध्यमातून रवी काळे सर आणि पंकज माने सर यांनी जोडली, याचं खूप खूप कौतुक वाटतंय!

              शिंदे सरांच्या घरची सर्व माणसं आज यात्रा असूनही दिवसभर आमच्यासाठी राबत होती, ही माणुसकी जपणारी माणसं सदैव आनंदात राहोत, हीच मनिषा. कोथळीगड ट्रेकचा हा सुंदर, ह्रदयस्पर्शी अनुभव काळजावर कायमस्वरूपी कोरला गेला. घरभर अत्तराचा सुगंध दरवाळावा, अगदी तसंच या माणसाचं चांगुलपण प्रत्येकाच्या डोळ्यांत, मनात घर करून बसलंय! ग्रुपच्या वतीने 'शिवराज्याभिषेक सोहळा फ्रेम' देऊन या आपल्या माणसांचा गौरव करण्यात आला. निवांत एखाद्या सायंकाळी येईल आठवण या सगळ्या गोष्टींची, मंदपणे लुकलुकणाऱ्या त्या चांदणीसारखी. तृप्त होऊन, अवघ्या पाचशे रुपयांत अवर्णनीय असा अनुभव घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. हिरव्या नोटा फेकून विकत घेता येणारी गुलाबी सुखं किती वेळ समाधान देणार? त्यापेक्षा ही आपुलकी कित्येक पटींनी सुखकारक!

               गाडीत बसलो. चंद्रा गाण्यावर सुनिल, सुरज, अक्षयकुमार, शांतीलाल, संदीप, लक्ष्मण यांनी डान्स करत सकाळची उणीव भरून काढली. सुरज बोरावके हे उत्कृष्ट ढोलकी वादक आहेत याचा उघड्या डोळ्यांनी प्रत्यय आला. ऐसा अदृश्य ढोलकी वादक पुन्हा होणे नाही. अकरा तासांची पायपीट करून थकलेल्या जीवांत एवढा डान्सचा जोर आला कुठून? या प्रश्नांची उत्तरे शोधत मी झोपलो.

तो स्वर्ग कैसा गड्या

जिथे मरणाची सक्ती?

सह्याद्रीदर्शन हाचि मोक्ष

शिवदुर्गाठायी खरी मुक्ती!

या ओळी आपसूक ओठांतून बाहेर पडल्या.

                  स्वराज्यातले सगळे गडकोट पाहण्याची आमची इच्छा रवी काळे अन् पंकज माने या दोघांच्या साथीनं अशीच पूर्ण होत राहो, हीच कामना. भेटू वेगळ्या गडाच्या नव्या वाटा धुंडाळताना...

तोपर्यंत जय शिवराय!

पुढील ट्रेक -

!!मोरोशीचा भैरवगड!!

पिंपळगावजोगा धरण (पोहण्यासाठी) माळशेज घाट, खिरेश्वरचे जगप्रसिद्ध नागेश्वर मंदिर

रविवार दिनांक ११ डिसेंबर २०२२

आयोजकांशी अवश्य संपर्क साधा.

आयोजक

रवी काळे सर

(पुणे महानगरपालिका)

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी

90964 65675

मार्गदर्शक

पंकज माने सर

8668251375

शब्दांकन

आयुब शेख सर

प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका

9552941271

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...