Friday, October 29, 2021

दिवाळी - मनातून मनाकडे!


                             

                                       दिवाळी - मनातून मनाकडे!

                                                विरो अंतर्बाह्य अंधाराचे भय

                                                   तेजाचे वलय उमलोनि

                                                उजळो अंतरी जाणिवेची ज्योत

                                                   जुळो गणगोत चैतन्याशी!

           खरंतर दिवाळी अंधारावर मात करत उजेडाचं अस्तित्व जपण्याचा सण. गोडधोड पदार्थ बनवून मनमुरादपणे आस्वाद घेण्याचा, नवनवीन कपडे परिधान करत आनंदोत्सव साजरा करण्याचा, दिव्यांची आरास करत परिसर रोषणाईने न्हाऊन निघण्याचा महोत्सव! लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांच्याच आनंदाचा, जिव्हाळ्याचा विषय. मालकाने खूश होत बोनस देण्याचा, छोट्यामोठ्यांना गिफ्ट देण्याघेण्याचा, मनमुराद खरेदीचा हंगाम. आजच्या इंटरनेटच्या युगात वाॅट्सऍपवर चार पाच दिवस आधीपासूनच मेसेज, इमेजेस, व्हिडिओ पाठवून मोबाईलची मेमरी फुल्ल करण्याचाही आभासी उत्सव. पण या दोनशे गोडबोल्या भंपक संदेशांपेक्षा इतकं करुन बघायचं, आसुसलेल्या कानांसाठी, व्याकुळ झालेल्या नात्यांसाठी थोडा वेळ काढून दोन शब्द बोलायचं. जग आपल्याला व्याख्येत बांधू पाहिल पण आपण अपवाद म्हणून जगायचं, निरंतर!

           घरातल्या पसाऱ्यासोबतच या दिवाळीत मनातलाही पसारा आवरायचा, नव्या विचारांची कास धरून पर्यावरणाचे रक्षण करायचा संकल्प हृदयी जतन करायचा. प्रदूषणाला फाटा देत प्रकाशाचं कोंदण व्हायचं. पुस्तकं माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात, म्हणून बाळांनो यंदा फटाक्यांऐवजी पुस्तके खरेदी करायची. क्षणाच्या आतिषबाजीऐवजी चिरकाल टिकणाऱ्या ज्ञानाची निवड करायची. दिवाळी अंक, किशोर मासिकं, गोष्टी आणि वैज्ञानिक शोध यांच्या पुस्तकात बिनधास्त रमून जायचं. एखादं रोप लावायचं कुंडीत किंवा अंगणात अन् त्याची वाढ होताना पहायचं उघड्या डोळ्यांनी. प्रत्येक पानागणिक झाडाची होणारी वाढ तुमचं कुतूहल वृद्धिंगत करेल.

             आई-वडिलांसोबत नजिकच्या अनाथालयांना भेट द्यायची, आईबापाचं छत्र गमावलेली पोरं कसं जगतात? काय खातात? याचि देही याचि डोळा पाहून घ्यायचं म्हणजे पिझ्झा बर्गर ची चटक विसरून जाईल आपली. उदार मनाने छोटीशी का होईना भेट द्यायची तिथे. देण्यात काय परमोच्च सुख मिळते ते प्रत्यक्ष अनुभवायचं. हो, पण दानधर्माचं इव्हेंट करत फोटोग्राफी सुरू करायच्या फंदात नाही पडायचं. नडलेल्या अडलेल्यांची हाक आपल्या काळजापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार मानायचे कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने आपली निवड केली. कोणाच्यातरी फाटक्या आभाळात सहकार्याचं, आनंदाचं इंद्रधनुष्य होण्याचं सौभाग्य प्राप्त करण्याची संधी दवडायची नाही. कारण मदत करताना सुगंधित झालेले हात हे एक वरदानच.

                घर सजवताना आपल्यासोबत लेकरांची मनं सजवली पाहिजेत याचा पालकांनी विचार करायचा. संस्कार म्हणजे काही गंडेदोरे नव्हेत, बांधलं हातात की झाला मुलगा किंवा मुलगी सद्वर्तनी? पाठांतराने किंवा अनुभवाच्या एका फटकाऱ्याने संस्कार होत नाहीत. विविध अनुभव, त्यांची आवर्तनं घडवतात पोरांची मनं. घराशेजारी, गल्लीत असेल कोणी  गरीब तर मनमोकळेपणाने मदत करा. दुसऱ्यांच्या फाटलेल्या आयुष्याला मिठी दिल्या की बऱ्याचदा आपली ठिगळं बुजवता येतात. दिवाळीचे दिवे, आकाशकंदील, रांगोळी शक्यतो गोरगरीब विक्रेत्यांकडून घ्या, तेवढाच त्यांच्या दिवाळीला हातभार! चकाचक माॅलचा गल्ला तुडुंब भरण्याऐवजी कष्टकऱ्यांच्या फाटक्या खिशात एखादी नोट जाऊ द्या. लक्षात ठेवा, आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या नसतात, कारण त्यांना पुन्हा ओसंडून भरण्याचे वरदान लाभलेले असते.

                                           दिलास मज तू अनोखा दिवस हा

                                                  नवीन जगण्या काही

                                               स्पर्श मनाला, चराचराला

                                                अविरत घडण्या काही!

           असं म्हणत सतत कार्यमग्न रहायचं. वेडीवाकडी का होईना मुलांना रांगोळी काढायला द्यायची, मातीत खेळत किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारायला प्रोत्साहन द्यायचं, सोबतच त्या किल्ल्यावर घडलेल्या घटनेला उजाळा देत इतिहासाचं भान जपायचं. एका पिढीच्या हातून दुसऱ्या पिढीच्या हाती सुपूर्द करण्यात येणारं हे महाराष्ट्रीय संस्कृतीचं वैभव आवर्जून जपायला हवं. मग पोरांची कल्पकता बघा नियमांचे कसे बांध तोडतेय. कल्पनांच्या भराऱ्यात मनोमन तरंगायला हवं पोरांनी. असंख्य दिवे उजळावे कल्पनांचे यासाठी मुलांच्या हाती रंग द्या, माती द्या. फुलत्या कोवळ्या झाडांना चौकटीत ठेवून सर्जनशील हाती फटाके, फुलबाजे, सुतळी बाॅम्ब यांतून अनैसर्गिक आकार देण्याचा प्रयत्न कशासाठी करायचा? फुलपाखरू फुलांवर बागडावे तसं मुलांना बागडू द्यायला हवं. आजी-आजोबांशी गप्पा मारत पारंपारिक खेळ त्यांना खेळू द्या, भटकू द्या रानोमाळ, शेतातले काम पाहू द्या. शिकलेलं, पाहिलेलं, अनुभवलेलं सगळं काही त्यांच्या अंतरंगात तरंगत राहिलं पाहिजे. डोळ्यांतून ओसंडून वाहीलं पाहिजे.

             उटणं किंवा चंदनापेक्षाही कृतीने उजळणारे पोरांचे चेहरे, मित्रांना पुस्तकातल्या रंजक गोष्टी सांगताना हरपून गेलेलं भान, स्वहस्ताक्षरात लिहिलेलं ग्रीटिंग कार्ड देताना दिपून गेलेले डोळे म्हणजे झाली की इकोफ्रेंडली दिवाळी साजरी. मूल्यशिक्षण कोणी कोणाला द्यायची बाब नाही. मनावर, डोळ्यांवर, हातांवर होणाऱ्या संस्कारांचे प्रतिबिंब असतं ते.

            दिवाळी मनात असते. आकाशदिवे, पणत्या, रांगोळ्या, सजावट ही सगळी आनंदाची बाह्यरूपं. एकमेकांबद्दल मनातून वाटणाऱ्या भावनांची गर्दी काळजात व्हायला हवी. एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, स्नेह, माया, वात्सल्य, आपलेपणा जपणं हीच खरी दिवाळी. आपल्या आणि इतरांच्याही मनाचा गाभारा प्रसन्न करत, चैतन्याची उधळण करणारे दीप लावून प्रकाशबीजं रोवूया. म्हणजे अनाथ,पोरक्यांसाठी सहकार्याचं वलय आणि भुकेल्यांसाठी दातृत्वाचा सुगंध दरवळत राहील, तीच खरी दिवाळी पहाट ठरेल. त्यासाठी प्रत्येक वेळी 'मोती' साबणच कशाला हवाय? कर्तृत्वाचाही दरवळ चिरकाल टिकतोच की.

            वाटीभर खीर पाहताना दूध, सुकामेवा, शेवया दिसतात पण ज्यामुळे माधुर्य लाभलं ती साखर कुठे दिसत नाही. शेवट सगळ्यांना गोड हवा असतो मग साखर पेरायचं काम कोणी करायचं? कोणाच्यातरी आयुष्यात क्षणभर का होईना गोडवा आणता आला तर काय हरकत आहे? दुसऱ्याच्या दारात सुखाचं झाड लावलं की, आनंदाची फुलं आपल्याच दारात पडतात. फक्त ती दानत कमवायला हवी.

              अशा हेल्पफुल्ल, सुखद, समृद्ध दिवाळीच्या मनाकडून मनाकडे स्नेहमयी शुभेच्छा!!

                                                 आयुब कलाम शेख

                                                  प्राथमिक शिक्षक

                           म.न.पा.शाळा क्र.१७४बी, कोंढवा बुद्रुक पुणे. मो. 9552941271

Friday, October 22, 2021

प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग

                                                          प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग

                                                                    पनवेल, रायगड

                                      गड किल्ले प्रेमी प्रतिष्ठान सोबत दुर्गभ्रमंतीचा थरारक अनुभव!!




             २५ सप्टेंबर २०२१ रात्री अकरा वाजता निमगाव म्हाळुंगी मधून गाडी पनवेलच्या दिशेने निघाली.

              शरद काळे, रविंद्र काळे, रविंद्र काळे, वैभव करपे, वैभव नरवडे, तुषार चव्हाण, सोमनाथ चव्हाण, गणेश घोरपडे, शेखर बोटकर, रवि नरसाळे, अजिंक्य मांढरे, प्रीतम वडघुले, सुमित वडघुले, प्रताप ढमढेरे, सुखदेव रणसिंग, ज्ञानेश्वर चव्हाण, शिवाजी चव्हाण, रोहन वाळके, सोहम करपे, संदीप फाळके, वेदांत देशमुख, शिवतेज भंडारे, संदेश मुरकुटे, संतोष डफळ, जालिंदर थोरात, भरत साकोरी, तुकाराम मंचरे, ओम संकपाळ, विकास मोरे आणि आयुब शेख सर्व मित्र वेगवेगळ्या गावांतून एकत्र जमलो. चंदननगर, पुणे, लोणावळा करत गाडी पहाटे चार वाजता शेडुंग गावातून पायथ्याला पोहोचली. रवींद्र काळे सरांनी सर्वांना दोन दोन सफरचंद, लिंबू, साखर लेमनगोळ्या, खारे शेंगदाणे यांचं वाटप केलं. गडावर सरबत विकत घेऊन पिण्याऐवजी आपणच आपलं सरबत करून मित्रांसोबत त्याचा आस्वाद घ्यावा, हा यामागचा हेतू. पहाटे सव्वाचार वाजता मोबाईल आणि बॅटरीच्या प्रकाशात रेल्वेच्या डब्याप्रमाणे एका मागोमाग एक करत अंधाऱ्या पायवाटेवरून सुरू झाला भ्रमंतीचा प्रवास. इतक्या सकाळी ट्रेकिंगची अनेकांची ही बहुतेक पहिलीच वेळ असावी. सोबत पंकज माने, संकेत यांसारखी चार जणांची तज्ञ टीम होतीच. मुंबईच्या परिसरात असल्यामुळे पहाटेसुद्धा हवामान अगदी दमट होते. घामांच्या अक्षरशः धारा निथळत होत्या. जणू पावसात भिजावं तसे कपडे ओलेचिंब झाले होते. एका ठिकाणी थोडासा विसावा म्हणून थांबलो.

               पंकज माने सरांनी गडाविषयी माहिती सांगितली. संकेतने दिलेली शिवरायांविषयीची गारद शिवगर्जना स्फुरण देऊन गेली. 'शिवराया असे स्फूर्तिदाता' याचा प्रत्येक क्षणी प्रत्यय येत होता.

          कलावंतीण आणि प्रबळगड हे अगदी एकमेकांना खेटून उभे असणारे दुर्ग. प्रबळगड महादेवाच्या पिंड तर कलावंतीण समोर बसलेला नंदी असे दृश्य दिसते. मध्यावर पोहोचलो. अनेक दुर्गप्रेमी तंबू ठोकून मुक्कामी राहिले होते. येथून दोन मार्ग निघतात, एक प्रबळगड आणि दुसरा कलावंतीण दुर्गाकडे. प्रबळगड केंव्हा बांधला याची इतिहासात नोंद नाही. परंतु प्रबळगडावर असलेल्या गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड ठरवता येऊ शकतो. बुद्ध कालीन अथवा त्यानंतरच्या कालखंडात या गडाचे बांधकाम झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रबळगडाची मोक्याची जागा पाहता परिसरातील पनवेल आणि कल्याणच्या समुद्रातील प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी हा गड बांधण्यात आला असावा, असे म्हणतात. प्रबळगड हा व्यापारी मार्गावर तसेच समुद्र किनार्यापासून जवळच असलेला गड आहे. त्यामुळे शिलाहार आणि यादवांनी येथे लष्करी तळ उभारला होता. यादवांनी त्यावेळी गडास मुरंजन असे नाव दिले होते.

                  काही काळानंतर मुरंजन अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला. त्यावेळी निजामशाहीत असलेल्या शहाजी महाराजांनी मुघलशाही, निजामशाही आणि आदिलशाही असा संघर्ष सुरु असताना मुरंजनावर आश्रय घेतला होता. मुरंजनवर त्यावेळी शहाजी राज्यांच्या सोबत त्यांच्या धर्मपत्नी जिजाबाई साहेब आणि बाळ शिवाजी देखील होते. त्यानंतर इ.स. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला, या तहानुसार मुरंजनवर मोघलांची सत्ता स्थापन झाली.

              काही काळानंतर इ. स. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठेशाहीचा सरदार आबाजी महादेव यास कल्याणच्या मोहिमेवर पाठवले. त्यावेळी कल्याण, भिवंडीपासून रायरीपर्यंतचा सारा मुलूख आबाजी महादेव यांनी स्वराज्यात घेतला. तेंव्हाच हा मुरंजन स्वराज्यात आला. त्यावेळी किल्ल्याचे नाव बदलून किल्ले "प्रबळगड" असे ठेवण्यात आले. ( प्रबळ गडास प्रधानगड असे देखील म्हणतात.) . इ. स. १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मिर्झा राजे जयसिंग यांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड कलावंतीण दुर्ग देखील होता. त्यावेळी मिर्झाराजे जयसिंग यांनी किल्ल्यावर राजपूत सरदार केशरसिंह यांची किल्लेदार म्हणून नेमणूक केली. त्यानंतर झालेल्या केशरसिंह राजपूत आणि मराठ्यांच्या लढाईमध्ये प्रबळगड पुन्हा स्वराज्यात आला. पुढे कंपनी सरकारने प्रबळगडला माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता. परंतु स्थानिक परिस्थितीमुळे ते शक्य होऊ शकले नाही.

                 पावणेसहा वाजता एका हाॅटेलात नाश्त्याची ऑर्डर देऊन प्रबळगडाकडे वाटचाल सुरू केली. थोडसं उजाडलं होतं. पायऱ्या नव्हत्याच मुळी, अक्षरशः दगडांचा खच होता. त्यावरून वाट काढत उंचच्या उंच कड्यावर चढाई सुरु केली. एका टप्प्यावर थांबत लिंबू सरबत बनवून आम्ही प्यालो. झाडांना झोके बांधलेले दिसले. मनसोक्त झुला झुलत, सफरचंद, शेंगदाणे खात भरपूर गप्पा मारल्या. काळे सरांच्या मार्गदर्शनानुसार प्लास्टिकचा कचरा योग्य ठिकाणी ठेवत कोठेही घाण केली नाही. गड आम्हाला सांगत होता, पावलांच्या ठशांशिवाय येथे काही ठेवू नका,

            सुखद आठवणींशिवाय येथून काहीही नेऊ नका! एकमेकांच्या साथीने माची प्रबळ येथे वाट काढत पोहोचलो. सलग तीन-चार तास चालून थकलेल्या शरीराला अचानक गारवा जाणवला. प्रबळ गडावरून दिसणारा कलावंतीण दुर्गाचा सुळका डोळ्यांचं पारणं फेडत होता. काय नजारा होता, बापरे! अखंड धुक्याच्या शालीचं पांघरूण आणि हिरव्या वनराईचं अंथरूण घेतलेला हा गड बघणं ही एक अनुभव संपन्न कार्यशाळाच होती. स्वर्ग म्हणतात ते हेच असावं असा विश्वास वाटू लागला.

'याच साठी केला होता अट्टाहास', अशी सर्वांची धारणा झाली. स्वच्छंदाने वाढणारी वनराई, आकाशाशी गुजगोष्टी करणारे डोंगर हा निसर्ग डोळ्यात सामावताना असे सुवर्णक्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह कोणालाच आवरला नाही. 'उम्रभर जिंदा रहा मगर जिंदगी देखी नहीं असा पश्चात्ताप आम्हाला कधीच होणार नाही, याची खात्री वाटते.' पुन्हा खाली उतरून कलावंतीण दुर्गाकडे कूच करण्यासाठी आम्ही सज्ज झालो.

                              आयुष्यात अशा अनुभवांच्या संधी कधीच सोडू नयेत.

                               एक से बढकर एक गड त्याला तराजूत तोलू नये,

                              जिथं डोळ्यांचे पारणे फिटते तिथे आपण बोलू नये.

                गडकोटांचे सौंदर्य पाहून आम्ही सर्वच निःशब्द झालो होतो. उतरताना पायवाट निसरडी होत होती. जपून चालावं लागत होतं. गावातून एक कुत्रा सलग तीन-चार तास आमच्या बरोबर वरपर्यंत आला होता. जवळच्या रस्त्याची विचारणा केल्यावर गडाच्या बांधाबांधाने जवळची एक पायवाट आहे कलावंतीण दुर्गाकडे जायला हे समजले. सगळे खूश होऊन पुन्हा पाऊणतासाच्या पायपिटीनंतर मार्ग काढत कलावंतीणच्या पायथ्याशी पोहोचलो.

ताठ मानेने उभा असलेला पिवळा लालसर कातळाचा, दगडी कोरीव पायऱ्यांचा हा दुर्ग आमच्यासारख्या कित्येक गिर्यारोहकांना आव्हान देत होता.

सुरुवातीला पायऱ्यांचा लवलेशही नसणारा हा कडा चढण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्तीचा कस लागणार होता, याची सरळसरळ जाणीव होत होती. या गडाला 'मृत्यू तांडवगड' असं का म्हणतात? याची प्रचिती प्रत्यक्ष डोळ्यांनी घेतली.

                                                      हिमाचला तू असोत मोठा

                                                      तुझी हिमनगाची काया,

                                                   दौलत अमुची गडकोटांची,

                                                आमुचा रायगडीचा शिवराया!!

                             असे भाव मनामनांत होते. असे म्हणतात कि, पूर्वी कोण्या एका राजाचे कलावंती नावाच्या राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून जाऊ नये, म्हणून त्या राजाने राणीला प्रबळगडाच्या शेजारी असलेल्या सुळक्यावर एक महाल बांधून दिला. कलावंतीण दुर्गचा सुळका चढण्यास अवघड असल्यामुळे आणि गिर्यारोहणाचा थरार अनुभवता येत असल्यामुळे दुर्गप्रेमी याठिकाणी येत असतात. कलावंतीण दुर्गच्या सर्वात वरच्या टोकावर गेल्यानंतर परिसरातील माथेरान, चांदेरी, पेब दुर्ग, इर्शलगड, कर्नाळा किल्ला आणि समोर पनवेल तसेच नवी मुंबई शहर सहजपणे दिसते.

                           माची प्रबळ गावाच्या संरक्षकासारखा त्यांच्या मागे उभा असलेला हा मुरंजन डोंगर माची प्रबळ गावातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच कलावंतीण दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. परिसरातील लोक प्रबळगडावरील मंदिरामध्ये पूजा करतात. गिर्यारोहणाचा थरार अनुभवण्यास उत्सुक असलेल्या गिरीप्रेमींसाठी प्रबळगड (मुरंजन / प्रधानगड) आणि कलावंतीण दुर्गचे गिर्यारोहण एक पर्वणी आहे. आपण फक्त वर्ष बदलताना पाहतो. या गडकोटांच्या तट-बुरुजांनी, चिर्‍यांनी, दगडधोंड्यांनी अख्ख्या पिढ्या बदलताना पाहिल्यात.

                      काही मित्र परिस्थितीची गंभीरता ओळखत मध्यावर थांबले. बरेचसे टोकावर पोहोचले. वर पोहोचलेल्या आमच्या ग्रुपमधल्या मावळ्यांची शिवगर्जना स्पष्ट ऐकू येत होती. घट्ट काळजाचे, प्रयत्नांची पराकाष्टा करणारे आमचे ग्रुपचे मावळे पुन्हा खाली उतरले. ढासळलेल्या आत्मविश्वासाच्या कमानी सावरणारी ही ठिकाणं. कधी निराशा,अपयश वाट्याला आलं की खुशाल सह्याद्रीच्या कुशीत शिरावं. मनसोक्त फिरावं, हिंडावं. नवीन उभारी येईल मनाला!

                  News18 लोकमत न्युज रिपोर्टर विलास बडे अचानक भेटले. खूप गप्पा मारल्या. मध्यावर बसलेल्या आमच्या मित्रांना 'आपत्ती व्यवस्थापन हेलिकॅप्टर बोलावू का?' अशी त्यांनी गंमत करत विनोद निर्मिती केली. पुन्हा तासभर उतरून भात, बटाटा, चवळीच्या भाजीचा आम्ही नाश्ता केला. मस्तपैकी चहा पीत पडणाऱ्या पावसाचा आनंद लुटला. गाडीत बसून लोणावळ्या नजीकच्या शिवराज हॉटेल (बुलेट थाळी फेम) मध्ये भरपेट जेवण केलं.

                  शिवरायांच्या पायाशी जडलेली नजर सुटू नये यासाठी आणखी गड पाहण्याचा निश्चय करत , उत्कृष्ट, मैत्रीपूर्ण गडकिल्ले प्रेमी ग्रुप, आयोजक रविंद्र काळे सरांचे अतुलनीय नियोजन, खिशाला परवडणारा फक्त ९१५ रुपयांचा खर्च आणि अखंड प्रेरणादायी अनुभवांची शिदोरी घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू करत घरी पोहोचलो. गड किल्ल्यांच्या सहवासात अनुभव संपन्न होत आपल्या सर्वांचं आयुष्य बहरत जावो,

या ग्रुपमधील माणसांच्या सहवासाच्या अस्तित्वाचा सुगंध दरवळत राहो, हीच सदिच्छा!!

जय भवानी, जय शिवराय!!

आयोजक

श्री.रविंद्र काळे सर

(गड किल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी)

90964 65675

शब्दांकन

श्री.आयुब शेख सर

(शिक्षक, पुणे महानगरपालिका)

9552941271

ईद-ए-मिलाद आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर

 


ईद-ए-मिलाद आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर

              समस्त जगाने ज्यांचा आदर्श घेतला, ज्यांच्या संवेदनशीलतेचे गोडवे गायले अशा मानवतेच्या पुरस्कर्त्यांचा आज जन्मदिवस.  'मोहम्मद पैगंबर म्हणजे अमन अन् शांतीचा वैचारिक सुगंध' असा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. त्या वैचारिक सुगंधाने कित्येकांचे आयुष्य सुवासिक झाले त्याची गणतीच करता येणार नाही.

              इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते. पैगंबरांमार्फत कुराण हा धर्मग्रंथ अल्लाहने सर्वांपर्यंत पोहोचवला, अशी आख्यायिका आहे. आपापसांत बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करत प्रेम आणि आनंदाने साजरा केला जाणारा हा सण. सर्वांच्या लाडक्या प्रेषितांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्व मुस्लिम बांधव सकाळी खीर पुरी करून लहान लहान मुलांना खाऊ घालतात. सगळ्यांचे तोंड गोड करत आनंदोत्सव साजरा केला जातो. मशिदीत नात, सलाम, दुवाँ मागत कुराणाचे पठण केले जाते. मिलाद म्हणजेच जन्मोत्सव.

             पैगंबरांच्या जन्मावेळी वातावरण, तिथली परिस्थिती अत्यंत वेगळी होती. म्हणजे गुलामगिरी, गुलामांची विक्री त्यात महिलांचाही समावेश, सावकारशाही, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अत्यंतिक अभाव अशी स्थिती. त्यांच्या जन्मावेळी त्यांचे वडील हयात नव्हते आणि ते चार पाच वर्षांचे झाले तेव्हा आईसुद्धा अल्लाहला प्यारी झाली. त्यांचे पालनपोषण चुलते अबू-तालिब यांनी केलं. अनाथांचं दुःख काय असतं याची पुरेपूर जाणीव असणारे पैगंबर अवघ्या जगाचे पालक झाले. दयेपेक्षाही सहृदयतेची जास्त आवश्यकता असल्याचे त्यांनी सर्वांना सांगितले.

इकरा म्हणजे वाचन कर. या पहिल्याच शब्दाने प्रभावित होत त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. सर्वसामान्यांना ज्ञान घेण्याची बंद कवाडे समस्त मानवजातीसाठी त्यांनी कायमची उघडली. ज्ञानी माणसाला मोहम्मद पैगंबर यांनी खूपच मोठं स्थान दिले आहे. लोकांनी त्यांना सादिक म्हणजे सत्यवादी ही उपमा दिली.

त्याकाळचे बंड करणारे, विद्रोही,  सत्यशोधक, संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून मोहम्मद पैगंबर मानवतेसाठी एक वरदान ठरले. पंचवीस वर्षांचे असताना चाळीस वर्षांच्या विधवेशी त्यांनी लग्न केलं. एक तर्फी तलाख देणाऱ्या पुरुषांना चाळीस कोडे मारण्याची शिक्षा पैगंबरांनी दिले होते. स्त्रीभ्रूण हत्या पाप आहे, हे सांगणारी व्यक्ती, पुरुषांप्रमाणे स्त्रियांना मालमत्तेमध्ये समान वाटा देणारा जगातील पहिला विद्रोही आणि क्रांतिकारी विचार मोहम्मद पैगंबर यांनी मांडला.

मोहम्मद म्हणजे त्यांची अत्यंत प्रशंसा केली जाते असे व्यक्तिमत्व. महात्मा फुलेंवर त्यांच्या वैचारिक समृद्धतेचा चांगलाच प्रभाव पडल्याचे जाणवते. महात्मा फुलेंनी मोहंमद पैगंबर यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारा पोवाडा लिहिला.

महंमद झाला जहामर्द खरा ॥ 

त्यागीले संसारा ॥ सत्यासाठीं ॥धृ.॥

खोटा धर्म सोडा, सांगे जगताला ॥ 

जन्म घालविला ॥ ईशापायीं ॥१॥

जगहितासाठी लिहिलें कुराण ॥ 

हिमतीचा राणा ॥ जगीं वीर ॥२॥

जगाचा पालक निर्मीक अनादि ॥ 

सर्व काळ वंदी ॥ निकें सत्य ॥३॥, 

मन केलें धीट, धरीली उमेद ॥ 

नाहीं भेदाभेद ॥ ठावा ज्याला ॥४॥, 

जनहितासाठीं खोटा अभिमान ॥ 

दिला झुगारुन ॥ अग्नीमध्यें ॥५॥, 

मर्द महंमद ढोंग्यांत पांगळा ॥ 

शोभला पुतळा ॥ सज्जनांत ॥६॥, 

नव्हता कोणी त्या तेव्हां साह्यकरी ॥ 

एकटाच सारी ॥ सत्य पुढे ॥७॥, 

एक त्याला फक्त सत्याचा आधार ॥ 

हिय्या समशेर ॥ मनामध्ये ॥८॥, 

य येई अजा । निर्मीकाच्या ध्वजा ॥ 

उभारील्या ॥९॥, 

कोणी नाहीं श्रेष्ठ कोणी नाहीं दास ॥ 

जात-प्रमादास ॥ खोडी बुडी ॥१०॥, 

मोडीला अधर्म आणि मतभेद ॥ 

सर्वांत अभेद ॥ ठाम केला ॥११॥, 

केल्या कमाईचा न धरी अभिलाषा ॥ 

खैरात दिनास ॥ देई सर्व ॥१२॥, 

मानवी मनाचा घेई अंतीं ठाव ॥ 

कल्याणाची हाव ॥ पोटीं माया॥ १३॥

           विनोबा भावे यांनी कुराणाचा अर्थ स्पष्ट करत 'कुराण सार' हे पुस्तक लिहिलं.

            त्याकाळी भोंगे नव्हते, घड्याळी नव्हत्या, अल्लाहची इबादत करण्यासाठी सर्वांनी ठराविक वेळी एकत्र यावे असा संदेश देण्यासाठी अजानची निर्मिती झाली. त्याकाळी गुलामगिरी आणि गुलामांची विक्री करण्याची प्रथा होती. हजरत मोहम्मद पैगंबर यांकडे बिलाल नावाचा एक गुलाम होता. आपल्या विचारांना कृतीत उतरवताना मोहम्मद पैगंबर यांनी बिलाल या गुलामाला गुलामीतून मुक्त केलं आणि अजान देण्याचं दातृत्व बहाल केलं. या कृतीतून त्यांनी दाखवून दिलं की, कोणीही गुलाम नाही, कोणीही मालक नाही, सर्व समान आहेत.

             हजरत मोहम्मद पैगंबर यांचा कोणताही फोटो किंवा चित्र अस्तित्वात नाही. व्यक्तिपूजा त्यांना मान्य नव्हती. उद्या माझ्या फोटोंची पूजा केली जाईल, माझे पुतळे उभारले जातील आणि ते मला मान्य नाही अशी त्यांची शिकवण होती. इस्लाम म्हणजे अमन, शांतता. ईश्वरचरणी शरणागती. अल्लाह एकच आहे,  मग तुम्ही त्याला कोणत्याही नावाने बोलवा असे म्हणत एकेश्वरवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला. ज्याच्या हाताने अन बोलण्याने समोरचा व्यक्ती सुरक्षित आहे अशी व्यक्ती म्हणजे इस्लामी.

            धर्म साच्यात न अडकता कालसुसंगत व्हावा, प्रवाहित व्हावा यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. कोणताही दिवस अशुभ नाही म्हणून मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही असेही सांगितले. रमजान ईदनिमित्त रोजे ठेवून तहानलेल्या भुकेल्या माणसांच्या दुःखाची जाणीव व्हावी, अन्नपाण्याची कदर कळावी म्हणून रोजे पाळण्याची योजना केली. एका ताटात पाच सहा जणांनी एकत्र येऊन जेवण करत समभाव जपायचा, नमाज पठण करताना खांद्याला खांदा लावून निर्मात्यासमोर झुकणं, या गोष्टी छोट्या वाटत असल्या तरी यांमधून समानतेचा अंकुर जन्मास येतो.

            मजुराचा घाम वाळण्यापूर्वीच त्याचा मोबदला आपण त्याला दिला पाहिजे ही कल्पना पैगंबरांनी मांडली. त्यांनी उच्चनीचतेचा भेद दूर सारला. यावरून त्यांनी सर्वांशी कशी सहृदयतेची बांधिलकी जपली याचा अंदाज येतो. आपलं काम सांभाळत दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे म्हणजे दुनियादारीच्या विवंचनेतून वेगळे होऊन अल्लाहची इबादत करणे. रस्त्यावरून दगड, काटे उचलून बाजूला करणे हीसुद्धा एकप्रकारे नेकीचे काम आहे, आपल्या संपत्तीचा काही हिस्सा गोरगरिबांना वाटा, अनाथांना मदत करा असे उपदेश वारंवार केले. मानवतेचा धर्म सगळ्यांत मोठा ही शिकवण दिली.

आईच्या चरणाखाली स्वर्ग आहे, असा आईचा महिमा त्यांनी गायला. वैश्विक शांतीचा संदेश, विश्वबंधुता मानवतेचा पुरस्कर्ता, सहिष्णुतेचा शिरोमणी म्हणून त्यांची ख्याती आहे.

सारे नबीयोंके औदे बडे है,

लेकिन आका का मनसब सबसे जुदा है,

वो इमामें सफेअंबिया है,

उनका रुतबा बडों से बडा है!

                  आज धर्माचं अंधानुकरण करण्याऐवजी इस्लामचं खरं रुप समाजासमोर येणं, खूप महत्त्वाची बाब आहे. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी कुराणाचे अर्थ निर्वेचण करून तजुर्मा-ए-कुराण सर्वांसमोर मांडले. त्याचे वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे. सृष्टी निर्मात्याचे सर्वांत आवडते प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लाल्लाहू अलैही वसल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी केलेल्या अमूल्य कार्यासाठी विनम्र अभिवादन!

ईद-ए-मिलाद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

आयुब कलाम शेख

प्राथमिक शिक्षक

म.न.पा. शाळा क्र.174बी, कोंढवा बुद्रुक पुणे.

9552941271

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...