शनिवारी, ५डिसेंबर २०२१ ला निमगाव म्हाळुंगी वरून गाडी साडेदहा वाजता सुधागडाच्या दिशेने निघाली. पंकज माने, शरद काळे, रविंद्र काळे (सर), आयुब शेख, बालाजी बिराजदार, रविंद्र काळे, भरत साकोरे, शुभम डमरे, गणेश घोरपडे, नागेश पाचपोर, वेदांत देशमुख, अथर्व ढमढेरे, संदिप फाळके, सुखदेव रणसिंग, शिवतेज भंडारे, सचिन काळे, रोहन शिवले, शिवाजी चव्हाण, शेखर बोटकर, अभिजित चव्हाण, शैलेश निकम, गौरव कुलथे, सौरभ कुलठे, चैतन्य मेमाणे, महेश ढोकले, योगेश वाघदरे, सोमनाथ चव्हाण, संदीप भोस, नारायण काळे, अभिजित चव्हाण, निखिल जाधव, पवन बेंद्रे तब्बल बत्तीस जण वेगवेगळ्या क्षेत्रातील शिवरायांचे मावळे दुर्गभ्रमंतीसाठी सज्ज झाले. या मावळ्यांमध्ये काही अकरावीचे विद्यार्थी, काही शिक्षक, आयटीसी मधील मित्र, डॉक्टर, कंपनीतील वेगवेगळ्या पोस्टवरील मित्र, शेतकरी बंधू यांचा समावेश होता. दुर्गभ्रमंती हा एकच दुवा सर्वांमध्ये समान होता.
नव्याने परत एकदा नवी
पायवाट शोधावीशी वाटली,
कुणी नसलेल्या अन् सगळं असलेल्या
वाटेने भटकंती करावीशी वाटली.
संदीप भाऊंच्या या मेसेजने स्फूर्ती दिली. दोन-तीन दिवस झालेल्या पावसामुळे रस्त्यावर इतकं दाट धुकं पसरलं होतं की, समोरचे काही दिसत नव्हतं. त्यामुळे पुण्यात पोहोचायला थोडा उशीरच झाला. वातावरण आपलं इच्छित नियोजन पुरं करू देतोय की नाही? याच संभ्रमात सगळे. पण बरं झालं पुण्यापासून धुकं काहीच नव्हतं. शिक्रापूर, येरवडा, कोथरूड, चांदणी चौक, ताम्हिणी घाट मार्गे पहाटे साडेतीनच्या सुमारास आम्ही रायगड जिल्ह्यातील शिक्षक मित्र धनराज बंडगर सर यांच्या पाटणूस गावी पोहोचलो. सेनापती जागा असला की प्रजा निवांत असते, तसंच बापू, शरद काळे, सचिन आणि रवी काळे सर पुढे ड्रायव्हरसोबत जागे होते म्हणून आमच्या सुधागडासारख्या स्वर्गात रममाण होण्याची स्वप्नं पाहत साडेतीन वाजेपर्यंत निवांत झोपा झाल्या. अकरावीची पाच पोरं मात्र रात्रभर कल्ला करत जागी होतीच.
अगदी पहाटे धनराज सरांच्या घरी गरमागरम वाफाळलेला चहा सर्वांसाठी तयार होता. गारठ्यात गरम चहाचा आस्वाद म्हणजे 'अमृततुल्य!' बंडगर सरांना घेऊन साडेपाच वाजता सुधागड पायथ्याला पोहोचलो. नाष्ट्यासाठी बिस्कीट, मूगडाळ, चिलीमिली यांचं वाटप झालं. पंकज सरांनी गडाविषयी संपूर्ण माहिती सांगितली. २९८ किल्ल्यांची भ्रमंती केलेलं हे व्यक्तिमत्व सोबत होतं हे आमचं भाग्य. कुडकुडणाऱ्या थंडीत अंधाऱ्या वाटांवरून मोबाईलच्या लुकलुक प्रकाशात आम्ही सगळे एकामागोमाग मार्गस्थ झालो. अखंड उत्साह, शोधक नजर, प्रवासाची विलक्षण हौस, रानोमाळ हिंडण्याचा नाद हे सगळे गुणविशेष व्हिटॅमिनच्या गोळ्या खाऊन येत नाहीत, हेच खरं. एक ग्रामस्थ बाबा वाट दाखवायला आले. सरळसोट डोंगरकडे असल्यामुळे दोन ठिकाणी मोठ्या लोखंडी शिड्या लावल्या होत्या, त्यांची अवस्था बिकट होती. जणू झुलता पाळणाच.
जंगलात लपलेला डोंगर आता दिसायला लागला होता. जंगली पायवाटेने प्रवास करत पुढे पायऱ्यांचा सुगावा लागला. गडाचं बांधकाम पाहताना 'फक्त सिमेंटमध्ये जान असून उपयोग नसतो, बांधणार्याच्या काळजात ईमान असायला हवं', हे प्रकर्षाने जाणवलं. नजरेच्या टप्प्यात आला दोन दरीत स्वागत करणारा चिलखती बुरुज. शिवरायांचं कर्तुत्वच एवढं महान की नुसता गड-किल्ल्यांचा साज पाहून स्वाभिमान जागृत होत होता. पाठीमागे बघितलं तर धुक्याची शाल पांघरलेला सुधागड परिसर. पांढऱ्या धुक्याची शाल म्हणजे जणू फेसाळणारा समुद्रच भासत होता. डोळ्यांचं पारणं फेडणारी सकाळ आमचं स्वागत करत होती.
गडाविषयी माहिती मिळवताना समजले, इ.स. १३४६ मध्ये सुधागड, सरसगड,हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले. शिवरायांनी स्वराज्यात हे किल्ले घेत नारो मुकुंदाना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. त्यांना सुधागडच्या देखभालीसाठी पाच हजार होन दिले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्याची व्यवस्था होती. सध्या किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्यातरी किल्ला निसर्गाच्या लहरींवर तग धरुन आहे. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. पूर्वी या गडाला 'भोरप' असेही म्हणत. पुढे शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव 'सुधागड' ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत. सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. शिवरायांनी राजधानीसाठी याही गडाचा विचार केला होता, यावरून गडाचे महत्व अधोरेखित होते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच छत्रपती संभाजी राजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजी राजांनी सुधागड परिसरात असणार्या परली गावात हत्तीच्या पायी दिले. असा हा ऐतिहासिक गड.
आम्ही सगळे डोंगर चढून वर जाताच सपाट पठार लागलं. वाड्यांचे अवशेष अजूनही स्वराज्याच्या अस्तित्वाची साक्ष देताना दिसले. हे सगळे बुरुज, कोठारांचे अवशेष निःशब्दतेतही शौर्याची गाथा सांगत होते, डोंगरावर पाखरांच्या थव्यांची निःशब्द कविता व्यक्त होत होती. पाण्याने तुडुंब भरलेलं तळं स्वागतासाठी सज्ज होतं. शिवतेज आणि वेदांत सोबत अकरावीची आणखी तीन पोरं पहिल्यांदाच ट्रेकींगला आली होती. यांच्या फोटो शूटिंगला तर उधाणच आलं होतं. छोट्या पोरांना खेळण्यांच्या दुकानात नेल्यावर जशी अवस्था होईल, अगदी तशीच या पोरांची हालत. आतापर्यंत सुखदेव रणसिंग या मित्रालाच आम्ही फोटोंचं इतकं वेड आहे असं पाहिलं होतं,पण या पोरांनी फोटोसेशनच्या बाबतीत सुखदेवलाही दुसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवलं होतं. प्रत्येक अनुभवाचा एक क्षण असतो, त्याला त्याचवेळी सजवायला हवं, हे या पोरांनी आम्हाला शिकवलं. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांप्रमाणे आम्हा सर्वांचा आनंद भरभरून ओसंडत होता.
पुढे दोन चार रंगीत घरं दिसली, नवरात्रात मोठा कार्यक्रम येथे होतो,अशी माहिती आम्हाला मिळाली. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस काळ्याभोर कातळांत अनेक समाध्या आहेत. त्यांवर सुबक नक्षीकाम होते. अत्तराच्या बुधलीत अत्तर संपला तरी कित्येक वर्ष तसाच सुवास दरवळत राहतो. तसंच या प्रत्येक गडकोटांवर शिवराजांच, स्वराज्याचं अस्तित्व जाणवतं. ऊर्जा, उमेद, प्रेरणा, स्वावलंबन तर बुरुजाच्या प्रत्येक चिऱ्यात झळकतो. पुढे जाऊन शंकराच्या मंदिराजवळ छान पैकी फोटो घेतला आणि निघालो टकमक टोकाकडे. गडाचा घेरा मोठा आहे. गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात. नैसर्गिक तटबंदी अजूनही दिसते. सुधागडाची विशालता इतकी आहे की कितीही चाललं तरी शेवट दृष्टीक्षेपात येत नाही. दोन्ही बाजूला असणाऱ्या दारूगोळा कोठाराच्या मध्यातून आम्ही टकमक टोकाकडे निघालो. अक्षम्य गुन्हा केल्यावर अपराध्यास याच ठिकाणावरून कडेलोट केले जात होते. भोवळ आणणारं दृष्य समोर दिसत होतं. रायगडावरील 'टकमक' टोकासारखेच हे टोक आहे. समोरच उभा असणारा घनगड , कोरीगड, तैलबैला दिसतो. तसेच अंबा नदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.
गर्विष्ट कणे ह्या तक्ता खाली झुकले,
मृत्यू दूतांचे अंदाज इथेच साफ चुकले,
विजयानेही राजाचरणी मुजरा केला,
रयतेचा मुलुख सह्याद्री कडी देखणा झाला.
असं देखणं रुपडं पाहून पुन्हा मागे येऊन संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी असणारी चोरवाट आम्ही पाहिली. गडावर पंत सचिवांचा वाडा अजूनही अस्तित्वात आहे. तिथे नकाशा बघितल्यावर समजले की महादरवाजा राहिलाय पहायचा. रायगडावरील 'महादरवाजा’ची हुबेहूब प्रतिकृती, हे या किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजांमध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. संपूर्ण गड पाहून झाला. पावणे अकरा वाजता उतरतीचा प्रवास सुरू. सुधागडापासून १२ किलोमीटरवर असणारा, पाली गावाला लागूनच असलेला 'सरसगड' त्याच्या कातळमाथ्यामुळे अधिकच बेलाग झालेला आहे. मात्र काही कारणास्तव सरसगडावर जाण्याचा बेत आम्ही रद्द केला.
किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या पाली गावात प्रसिद्ध अष्टविनायकांत गणना होत असलेल्या बल्लाळेश्वराचे भव्य मंदिर आहे. त्याचं दर्शन घेऊन जेवायला पुन्हा पाटणूस गावी आलो. मालवणी चिकन, तांदळाच्या भाकऱ्या, भात, कांदा लिंबू फक्कड बेत होता. धनराज सरांनी उत्कृष्ट भोजनाची सोय केली. रवी काळे सरांचे प्रत्येक गडकिल्ल्यांच्या ठिकाणी मित्र आहेत, याचं आश्चर्य नेहमीच वाटतं.
ताम्हिणी घाटातून पुण्याच्या दिशेने वाटचाल करत नियोजित वेळेत सुखरूप पोहोचलो.
या संपूर्ण प्रवासाचा खर्च फक्त ६५०/- रुपये इतकाच आला, हे 'गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुप'चे वैशिष्ट्य!
मित्रांनो,
तुम्ही दररोजच्या कामाच्या व्यापातून निवांतपणा शोधताय?
विसाव्याचं, मुक्कामाचं, हक्काचं ठिकाण शोधताय?
चला तर मग निघा खुशाल सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकंतीसाठी.
शिवरायांच्या गडकोटांची ही गलबतं, या महाराष्ट्ररुपी अथांग महासागरात खंबीरपणे उभी आहेत. आजही, साडेतीनशे वर्षांनंतरही आणि ती अशीच उभी असेपर्यंत मावळ्यांना कुठल्याच वादळाची किंवा संकटांची चिंता करण्याची मुळीच गरज नाही.
खरंच सह्याद्री खूप सुंदर आहे, प्रतिक्षणी आनंदी राहण्याचा वसा इथे असा मिळतो की समाधानाची कोजागिरी इथे कधी मावळतच नाही.
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना एकच सांगावेसे वाटते,
तेरा दर हो, मेरा सर हो
और ये तमाशा उम्रभर हो!
पुन्हा भेटू वेगळ्या गडकिल्ल्यांच्या वाटा शोधताना...
तोपर्यंत...
जय शिवराय,जय महाराष्ट्र!
आयोजक
श्री.रवी काळे सर,
निमगाव म्हाळुंगी
गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान
9096465675
शब्दांकन
श्री.आयुब शेख सर,
पुणे महानगरपालिका
9552941271
🙏🏻🌹🚩🌸🌺