भर उन्हाळ्यात तुंग आणि कोरीगडची सफर!
शनिवार दिनांक ७ मे २०२२ रोजी रात्री पावणेबारा वाजता गाडी गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान चे मावळे घेऊन निमगाव म्हाळुंगी वरून लोणावळ्याच्या दिशेने निघाली. यामध्ये आयोजक म्हणजेच पुणे महानगरपालिकेतील शिक्षक रविंद्र काळे, निमगाव म्हाळुंगीतील प्रगतशील शेतकरी शरद काळे, मुरली फार्मा कंपनीतील एच.आर. मॅनेजर वैभव करपे, आयटीसी कंपनीमधील रविंद्र काळे (अजहर), भरत साकोरे, नागेश पाचपोर हे सहाजण. खराडी बायपास वरून भटकंतीचा ध्यास उराशी बाळगत शेकडो वेळा सह्याद्रीच्या दर्याखोर्यातून हिंडणारे पंकज माने आणि मी सहभागी झालो. अशा अष्टप्रधान मंडळाने तुंगगडाच्या दिशेने कूच केली.
प्रत्येक महिन्याला कॅलेंडरचं नवीन पान उलगडावं अगदी तसंच दर महिन्याला नवीन गडभ्रमंतीचं नियोजन काळे सर करतात. मार्ग दाखवायला पंकज माने सर, ज्यांनी तीनशेहून अधिकवेळा गडाच्या मातीस स्पर्श केला आहे. त्यांना प्रत्येक गडाचा इत्यंभूत माहितीसहीत रस्ता कसा काय लक्षात राहतो? हा सदैव आमच्या आश्चर्याचा विषय. गाडीत प्रवासभर दोन्ही रवींची विनोदांची जुगलबंदी सुरू होती. त्यांनी कोणालाही झोपू दिलं नाही, सोबत इंदुरीकरांचं कीर्तन सुरू होतंच... यावेळी विनोदांचे बादशहा अप्पा, दादा आणि डाॅक्टर नव्हते पण त्यांची कमतरता या दोघांनी भासू दिली नाही.
सव्वातीन वाजता तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी थांबलो. उंची ३,००० फूट असणारा तुंगगड गिरिदुर्ग प्रकारातील असून 'कठिणगड' नावे प्रसिद्ध आहे. लोणावळ्याच्या डोंगररांगेतील हे एक दुर्गरत्न. ११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता, हे याचे ऐतिहासिक वैशिष्ट्य.
तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. अलंकृतता हे वैशिष्ट्य असणाऱ्या मिशीधारी आणि जान्हवेधारी हनुमान मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोड्याच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात.
सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे दाट अंधारातही गडाच्या डागडुजीसाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. शिवकाळात शंखशिंपले, चुना, गूळ, माती, दगड, वाळू यांसारख्या चौदा प्रकारच्या मिश्रणाने ज्याप्रकारे बांधकाम केले जात होते अगदी त्याचपद्धतीने स्वयंस्फूर्तीने यांचंही काम सुरू होतं. गडावरील टाकांतील पाणी पाईपच्या माध्यमातून पायथ्याशी आणलं होतं.
अंथरुणावर लोळण घालत आपण शनिवार रविवार सुट्टीचा उपभोग घेत असतो त्याचवेळी असे कितीतरी सह्याद्रीचे मावळे शिवराजांचा ऐतिहासिक वारसा जपण्याचं काम अविरतपणे करत असतात, कोणताही गाजावाजा न करता... पहाटे मोबाईलच्या उजेडात मार्गदर्शक पंकज माने सरांच्या पावलावर पाऊल टाकत आम्ही गड सर करण्यासाठी झटत होतो. पवना धरण परिसर निद्रिस्त अवस्थेत असतानाही दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता.
हवेतला गारवा अन् शरीराचा घाम यांचा संयोग होत भलतीच शीतलता लाभत होती. एवढ्या अंधारातही नागेश पाचपोर एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात बिस्कीट पुडा घेऊन कोणत्याही आधाराशिवाय गड चढत होता. भरत साकोरे शांत व्यक्ती पण प्रत्येक घटनेवर यांचे किस्से तयार. एकूणच मज्जा येत होती.
पहाटे साडेचार वाजता बालेकिल्ल्यावर पोहोचलो. तुंगाईदेवीचं मंदिर होतं. भगवा अखंड फडकत होता. पवना धरणाला स्पर्श करून येणारं वारं कमालीचं गार होतं. त्यात उभ्या माणसाला हलविण्याचा आवेग होता. भर उन्हाळ्यात असा गारठ्याचा अनुभव ऋतू कोणता याचाच प्रश्न उपस्थित करीत होता. थोड्याशा गप्पा मारत, निद्रिस्त परिसर पाहून तासभर झोपण्याचा निर्णय बहुमताने मंजूर झाला. काश्मीरला एक पाऊल मागे टाकावं लागेल असा भयानक गारठा. वारं तर एवढं की झाकलेल्या डोळ्यात मातीचे खडे जात होते. रात्री गडावर मुक्काम केल्याचा थरारक अनुभव ग्रुपमधल्या कोणालाही फोन करून विचारता येईल....
सहा वाजता सर्वजण उठलो, एकत्र येऊन फोटो काढले, शिवगर्जना दिली. नजारा कॅमेऱ्यात आणि डोळ्यांत सामावून घ्यायचा प्रयत्न केला.
सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील पवन मावळ प्रांतात निसर्गाची मनसोक्त उधळण पहायला मिळाली. याचसाठी केला होता अट्टाहास म्हणत सौंदर्य आकंठ काळजात सामावून घेतलं. 'घाटरक्षक' असणाऱ्या या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, मोरगिरी, पवनाधरण आणि तिकोना हे किल्ले नजरेच्या टप्प्यात असून पूर्वीच्या काळी बोरघाट या व्यापारी मार्गावर व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत होता, हे जाणवले.
या गडावर जाणाऱ्या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच येतात. साधारणत: ४५ मिनिटांत गडमाथा तर तासाभरात सर्व गड पाहून होतो. गड फिरलो, पाणी साठवण्याचे नियोजन गडावर उत्तमरीत्या केलेले आढळले. कचेरी, गणेश मंदिर, जुनाट वाड्यांचे अवशेषही अस्तित्वाची साक्ष देतात.
गडमाथा फारच आटोपता असल्यामुळे तासात सर्व गड पाहून झाला. पायऱ्यांची बांधणी, जागोजागी माहिती देणारे फलक, मंदिरांची डागडुजी, वीरगळ स्थापना यांची व्यवस्था सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे.
जातीचं राजकारण करत दंगली पेटवणाऱ्यांनी शिवरायांच्या गडकोटांच्या काळजीखातर पाऊल उचललं तर महाराष्ट्राचं रुपडं काहीसं निराळं दिसेल. आपली ऊर्जा उदात्त ध्येयासाठी समर्पित करण्यासाठी वळवणे ही दीर्घ साधनाच आहे.
गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगीकडून आयोजकांनी पाचशे रुपये भेट सह्याद्री प्रतिष्ठानला देऊन स्वराज्य पायरीचरणी फूल न फुलाची पाकळी वाहिली.
खेळण्या-बागडण्याच्या वयात सवंगडी गोळा करून युद्धाचा सगळ्यात प्रभावी गनिमी काव्याचा प्रकार शोधून काढला शिवछत्रपतींनी. इथे झोपेतून जागं व्हायला तासभर जातो आपला. भवानी तलवार भेटली असती तर आम्हीही पराक्रम गाजवले असते, म्हणणाऱ्यांना काटा टोचला तरी मातोश्री आठवतात.
सुखं पायाशी लोळण घालत असताना जनतेचा, रयतेचा विचार करणारा राजा होता म्हणून जीव देणारी प्रजा निर्माण झाली, हे विसरून कसं चालेल?
निरोप घेत गड उतरलो. थोडं पुढे जाऊन चहा, बिस्कीट आणि मॅगी बनवून आम्ही नाष्टा केला.
नाष्टा, जेवण यांसाठी लागणारे साहित्य, भांडी, गॅस, भाजीपाला या सर्वांची सोय आयोजक टिम करते. यामध्ये प्रामुख्याने शरद काळे म्हणजेच आमचे बाळाभाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या हातात अक्षरशः अन्नपूर्णा वास करते. चवदार भोजन तयार करण्याची हातोटी हे त्यांचं वैशिष्ट्य. जेवणारा तृप्तीचा ढेकर दिल्याशिवाय राहणार नाही, याची १००% हमी. अगदी चाळीस पोटांची भूक शमेल इतका स्वयंपाक ते उत्कृष्टपणे करतात. पाणी,मीठ, तिखट सगळंच मापात.
प्रवासाची तयारी गाडीत बसल्यावर करायचीच नसते मुळी. प्रवासाचा संकल्प सोडण्याच्या क्षणापासून तयारीचा प्रारंभ करायचा असतो, हे त्यांच्याकडून शिकलो.
पुढे सतरा किलोमीटर जाऊन अंबवणे, मुळशी तालुक्यातील पेठ शहापूर गावात कोरीगड (शहागड) पायथ्याशी थांबलो. उंची जेमतेम १०१० मी. असणारा गिरिदुर्ग पायथ्यापासून पाहताना सरळसोट कडा दिसतो.
तुंगपासून १७ किमी तर लोणावळ्याच्या पूर्वेला २५ कि.मी अंतरावर असणाऱ्या गडाला चहूबाजूंनी तटबंदी तर दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो.
पाण्याच्या बाटल्यांमध्ये लिंबू पिळून साखर टाकून मस्तपैकी सरबत बनवलं. आणि निघालो गडचढणीला. आता उन्हाच्या झळा दाटत होत्या. करवंदाच्या जाळीतून काळीभोर करवंदं डोकावून पाहत होती. टवटवीत, गोड करवंदं खाण्याचा मोह आवरला नाही. लालेलाल उंबरांचा सुवास सर्वत्र दरवळत होता.
ही हिरवाई पाहताना वाटतं, आपल्याला शहरात कमी झाडं असूनही मिळणारा प्राणवायू इथूनच सप्लाय होत असावा बहुतेक..
पंधरा वीस मिनिटे जंगलातून गेल्यावर गडाच्या पायऱ्या लागल्या. या गडाची डागडुजी देखील छानपैकी करण्यात आली आहे. जुन्या तटबंदीच्या दुरुस्तीचा घाट घातला गेलाय तशीच सुधारणा अस्तित्व संपत चाललेल्या गडकोटांसाठीही करण्याची सद्बुद्धी आपण मराठी माणसांस येवो, हीच सदिच्छा.
थोडं वर गेल्यावर एक भली थोरली गुहा आहे. रक्तवर्णी पाषाणांत कोरलेली. काय गारवा लाभतो याठिकाणी, अवर्णनीय. गडाच्या मध्यभागी डोगराचं पाणी झिरपून साठण्यासाठी बनविलेली विहीर त्याकाळातील बांधकामांचे उत्तम उदाहरण आहे. त्याचं पाणी बर्फाहूनही गार अन् मधाहूनही गोड होतं. महादरवाजाचे दर्शन झाले की चढाईचा त्रास कुठल्या कुठे पळून जातो.
मी हिरवळ पांघरतो
आणि
रोजचं तेच ते जिणं झुगारून देतो.
सानिध्यात तुझ्या येताना
आम्ही तान्हं होऊन येतो!
अशी आमची अवस्था.
११ मार्च इ.स. १८१८ रोजी कर्नल प्राथरने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करल्याचा इतिहास या गडाने पाहिला.
गड तसा भलामोठा, विस्तृत. चहूबाजूंनी तटबंदीच्या दुरुस्तीमुळे नववधूसारखा सजलेला भासतो, भोवताली हिरव्या निसर्गाची शाल पांघरलेला. गडावर कोराईदेवीचं सुंदर मंदिर आहे. गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. गडावरील एकूण सहा तोफ़ांपैकी सगळ्यात मोठी तोफ ’लक्ष्मी’ मंदिराजवळ अजूनही वास्तव्यास आहे. गडावर दोन मोठी तळी आहेत. भग्नावस्थेतील बरीचशा वास्तू आहेत. गड फिरायला तासभर गेला. बेभान होऊन आपण त्या सह्याद्रीच्या कुशीतलं एखादं कातळ होत अनुभवावं, असा संपन्न निसर्ग.
उभा जन्म कैदेत काढेन मी,
सह्याद्रीरुपी पिंजरा पाहिजे!
अशी आम्हा सर्वांची भावना. परतीचा ध्यास लागला, कारण आता भूक लागली होती.
लोणावळ्यात येऊन भूशीडॅमला भेट दिली. पाणी खूप कमी असल्यामुळे पोहण्याची इच्छा अपूर्णच राहिली. दोन अडीच किलो चिकन घेऊन तुंगार्ली तलावापाशी आडोसा बघून स्वयंपाकाची सोय करू लागलो. ही जागा सुद्धा मार्गदर्शक पंकज माने यांनीच दाखवली. कांदे, टोमॅटो कापणे, चूल तयार करून लाकडं गोळा करणे, तलावातील पाणी बाटल्यांमध्ये भरून आणणे यांसारखी कामे सर्वांनी मिळून केली. बाळाभाऊंनी सुकं चिकन आणि भाजी फक्कड बनवली. भात बनवला. सगळ्यांनी मदत केली.
रवी काळे सरांनी आठ जणांसाठी बाजरीच्या भाकरी बनविल्या. सुगरणीला लाजवेल अशा बनविलेल्या भाकरी पाहताना आम्ही सर्वजण अवाक् झालो. शेवटी सरांना १६ वर्षांचा दांडगा अनुभव होता, याची याचि देही याचि डोळा प्रचिती आली. स्वयंपाक झाला. सर्वांनी तलावात मस्तपैकी अंघोळ केली. फ्रेश झालो. चिकन भाजी, भात, भाकरीवर दणकून ताव मारला. याहून सुख वेगळं काय असतं?
परतीच्या प्रवासाला लागलो. जाताना गाडी बाळाभाऊंनी चालवली अन् येताना वैभव करपेंनी. एक नंबर ड्रायव्हिंग, दोघांची, एकदम स्मूथ! तुंगार्ली गावात पाणी प्यायला उतरलो. दोन मोठमोठाले रांजण ठेवून पांथस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली होती. शेजारीच मोठ्या हौदात पक्षी आणि भटक्या जनावरांच्याही तहानेची, खुशालीची केलेली सोय संवेदनशील मनाची साक्ष देत होती. भारी वाटलं.
आपण इथे येतो,मस्तकात संसाराच्या विवंचना घेऊन वावरतो. जगण्याची कोडी सोडवत बसतो. वेळ आली, दारावर टकटक झाली की सारं जिथल्या तिथं टाकून तडकाफडकी निघूनही जातो. मधल्याकाळात आपल्यापैकी किती जणांना माणुसकीचा लळा लागतो? हा प्रश्न महत्त्वाचा.
भर उन्हाळ्यात दोन किल्ले सर करून चुलीवरचं जेवण बनवून खाणारे गड किल्ले प्रेमी प्रतिष्ठानचे आम्ही मावळे.
पुण्यात आल्यावर गाडी थांबवून जलजिरा, लिंबू सरबत प्यालो, शेवट गार झाला. अगदी मोजकीच माणसं असल्यामुळे भरपूर फिरता आलं, ढिगभर फोटो झाले, आयोजकांनाही एन्जॉय करताना पाहिलं.
संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुखरूप घरी पोहोचलो. अवघ्या आठशे रुपयांत कधीही न संपणारे, अविस्मरणीय क्षण वाट्याला आले, ते गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपमुळे...
स्वतःकडचा मोहक सुगंध, दिव्य सुवासाचा शोध घेण्यासाठी ऊर फुटेस्तोवर धावणारा कस्तुरीमृग शेवटी कोसळून खाली पडतो. तशी आपली गत होऊ नये म्हणून धावपळीच्या जीवनात थोडा वेळ स्वतःसाठी द्यायला हवा. निसर्गाच्या सान्निध्यात जगून पहायला हवं.
अंगणातल्या रातराणीचं फूल हुंगल्याशिवाय त्याचं निर्माल्य होत असेल तर आपण वेळ कशासाठी दवडतो? कुठे वाया घालवतो? याचा ताळा व्हायलाच हवा.
मिली है जिंदगी तो मक्सद भी रखिये,
सिर्फ साँसे लेकर वक्त गवाँना गवाराँ नही!
हे देखील तितकंच महत्त्वाचं.
काहीजण नुसता प्रवास करतात. माझ्या मते ज्याची नशा चढत नाही तो प्रवासच नव्हे. चार दिवसांचं आयुष्य जितक्या विविधतेत घालवता येईल तेवढं घालवायचं, असा संकल्प उराशी बाळगायचं ठरवलं.
आठवणींची ही फुलं सुकू नयेत म्हणून काळजाची धडपड आणि सुकलेली फुलं जपण्यातही मन गुंतलेलं असतानाच लेखणीला थांबवतो.
पुढील पायी भ्रमंती सिंहगड ते राजगड २९ मे २०२२
आयोजकांशी अवश्य संपर्क साधा..
पुन्हा भेटू नव्या गडाच्या वाटा धुंडाळताना....
तोपर्यंत जय शिवराय!
आयोजक
रवी काळे सर
गड किल्ले प्रेमी प्रतिष्ठान
निमगाव म्हाळुंगी
90964 65675
मार्गदर्शक
पंकज माने सर
8668251375
शब्दांकन
आयुब कलाम शेख
प्राथमिक शिक्षक, पुणे महानगरपालिका
9552941271














खुप छान सर..... तुमच्या पोस्ट ला कमेंट करून करून आता आमचे शब्द साठा कमी पडत चाला आहे पण तुमच्या पोस्ट मधील साठा मात्र वाढत चाला आहे अशीच प्रगती होत राहो तुमची...
ReplyDelete