राजमाची किल्ला, कार्ले लेणी आणि एकवीरा दर्शन
शनिवार दिनांक २५ जून २०२२ रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान चे मावळे घेऊन गाडी निमगाव म्हाळुंगी, शिक्रापूर, कोरेगाव भीमा, वाघोली बायपास, शिवाजीनगर, नाशिक फाटा मार्गे थेट राजमाची किल्ल्याच्या दिशेने निघाली. पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी गाडी ग्रुपचे मावळे गोळा करत पुढे मार्गस्थ होते, नेहमीच. मात्र कोणीही उशीर करत नाही. सगळे आपापल्या स्टॉपवर अगदी वेळेवर उपस्थित राहतात. दुर्गभ्रमंती आणि शिवबाचा जाज्वल्य इतिहास मनामनात जागवणारी अशी वेड असलेली माणसं भेटणं महत्त्वाचं, बाकी अतिशहाणे तर येता जाता आडवे येतातच की..
पंकज माने, शरद काळे, दादा घोरपडे, रविंद्र काळे(सर), वैभव करपे, संतोष लांडे, सोमनाथ चव्हाण, धीरज चव्हाण, गिरीश तांबे, अजिंक्य मांढरे, चंद्रकांत आहेर, विजय माने, भरत साकोरे, लहानू सप्रे, अनिल गायकवाड, प्रदीप वडघुले, ऋषिराज करपे, शिवाजी चव्हाण, सह्याद्री कन्या प्राची वाखारे, रविंद्र काळे, नितीन शिंदे, वैभव नरवडे, शेखर बोटकर, कानिफनाथ ढेरंगे, योगेश थोरात आणि मी गाडीत बसलो. बसलो म्हणजे थोड्या गप्पा मारून डोळे मिटले म्हणा की! वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या ठिकाणची, वेगवेगळ्या वयाची मंडळी शिवरायांच्या विचारांचा जागर करण्याच्या अन् गडभ्रमंतीच्या उदात्त हेतूने एकत्र येतात, हे या गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य. सुट्टीचा दिवस तासनतास मोबाईलवर बोटं फिरवत वाया घालवणारे कैक असतील, जे मुहूर्त शोधतात काहीतरी वेगळं करण्यासाठी. पण भावांनो आपण जिवंत आहोत यापेक्षा मोठा मुहूर्त कोणता?
परगावी नोकरी करणाऱ्या मुलामुलीने आपल्या आईबापाला न चुकता प्रत्येक महिन्याकाठी पैसे बॅंक खात्यात पाठवावेत अगदी तसंच आयोजक रवी काळे सर प्रत्येक महिन्यात आमच्या आयुष्याच्या खात्यात सुखाचे क्षण जमा करत ट्रेकचे आयोजन करतात, अगदी सूत्रबद्ध पद्धतीने! काळे सरांनी सर्वांना मोकळे डबे आणायला सांगितले होते याचे कारण यावेळी जेवणाची सोय थोडी वेगळ्या पद्धतीची होती. प्रवासास सुरुवात करण्याच्या काही वेळ आधीच निमगाव म्हाळुंगी गावातच आमच्या बाळाभाऊंनी आम्हा सर्वांसाठी व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणीचा घाट घातला होता. ग्रुपमधील प्रत्येक भुकेला मावळा या भोजनाचा असा आस्वाद घेतो की घासागणिक आचाऱ्याचा सदैव सन्मान होतो. प्रत्येकाच्या मुखी केवळ एवढंच उमटतं, अन्नदाता सुखी भव!
ड्रायव्हरसोबत बापू असेल तर बाकी सगळ्यांनी बिनधास्त झोपायचं, याची १००% हमी असते. मोबाईलवर गाणी वाजवत ड्रायव्हरला जागं ठेवणं आणि मार्गदर्शन करणं हे जबाबदारीचं काम बापूचं. बाकी सगळे थांबा आला की थांबले याच कामी. गाडीचा अंधाऱ्या रात्री जंगलातून प्रवास सुरू होता. मार्ग बराच खडतर. पहाटे चार वाजता गाडी फसल्याचा फील. झोपेच्या तंद्रीतून सावध होत सगळे उतरलो. चिखलात गाडी रुतली होती. येथून पुढे चालत जायचं ठरलं, अन्यथा आम्ही पायथ्यापर्यंत गाडीतूनच जाणार होतो. डब्यात गरमागरम बिर्याणी भरून आम्ही सगळे निघालो. तासभर चालल्यावर उजाडलं होतं.
शिंपीत केशर हळू उघडला पूर्वेने डोळा,
पांढऱ्या धुक्यासह, अवकाशाचा नयनरम्य सोहळा!
असंच काहीसं दृश्य समोर स्वागतासाठी उभं होतं. किल्ला अगदी दृष्टिक्षेपात. पण अंतर जास्त होतं कारण वळसा घालून जाणारी वाट. चित्रकार असतो तर या सह्याद्रीचं सर्वांगसुंदर रुपडं आपल्या कुंचल्यातून इंद्रधनुष्यासारखं प्रतिबिंबित करण्याचा यत्न केला असता. पण संधी न दवडता मोबाईलच्या कॅमेऱ्यात ते मनोहारी दृश्य अचूक टिपण्याचा मोह पुरा केला. फोटोसेशनला इथूनच सुरुवात झाली. लोणावळ्यातून कुणेगाव, फणसराई मार्गे गडावर मोठी चारचाकी किंवा दुचाकी गाडीने उधेवाडी ह्या गडाच्या माचीवर वसलेल्या गावात पोहोचता येते. हा मार्ग कच्च्या मातीचा असून काही ठिकाणी थोडे डांबरीकरण केलेले आहे. तसेच ओढ्यांवर पुलही बांधण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्रभूमीत पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान हा किल्ला सहजगत्या दिसतो. ८३३ मीटर उंचीचा मात्र अंतर दोन तीन तास असणारा, गिरिदुर्ग प्रकारातील सोप्या चढाईची श्रेणी असणारा सुस्थितीतला हा किल्ला. शिवबाची जन्मभूमी, कर्मभूमी असणाऱ्या, गडकोटाचं ऐश्वर्य लाभलेल्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो, शिवबाच्या राज्यात भटकंतीसाठी एवढंच कारण पुरेसं असावं असं मला वाटतं. लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी अंतरावरचा राजमाची. कल्याण, नालासोपारा या प्राचीन काळातील मोठ्या व्यापारी बंदरापासून बोरघाटमार्गे पुण्याकडे जाणारा हा पुरातन व्यापारी मार्ग. जसा नाणेघाट तसाच बोरघाट. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी जकातवसूलीसाठीचा सर्वांत प्रमुख किल्ला राजमाची. करवंद, जांभळं, आंब्याची अगणित झाडं हे या क्षेत्राचं वैभव.
गणेश घोरपडे (दादा) म्हणजे एक चालतंबोलतं मनोरंजन केंद्र. दादाचा सहवास लाभावा म्हणून आम्ही सगळे दादाच्या पुढेमागेच रेंगाळत असतो. हसत खिदळत भलंमोठं अंतर सहज पार करता येतं, असा हा विनोदी जादुगार. दादाकडे पाहताना वाटतं, मनापासून खळखळून हसणाऱ्या चेहऱ्याला फक्त सौंदर्य असतं, वय नाही. या ग्रुपच्या माध्यमातून कितीतरी जिवलग मित्र लाभले. महिन्यांत एकदाच भेटतो आम्ही, पण जणू काही शेजारीच राहतो अशी भावना उत्पन्न होते.
सह्याद्रीची अभिलाषा दडून आहे
तुझ्या माझ्या काळजाशी,
घेऊ वाटून थोडीशी
जाऊ भटकंतीच्या देशी.
तुला तुझं सौख्य मिळो
मला माझंही मिळावं,
मैत्रीचं जीणं व्हावं
सूर जगण्या मिळावं!
गडाच्या पायथ्याशी उधेवाडीत पोहोचलो. ही २०,२२ घरांची पाणभरे कोळी लोकांची वाडी. वाडीलगतच मारुतीचं मंदिर आहे. इथं तीन जणांचा कर्नाटकी ग्रुप भेटला. सोबत त्यांचा baby speak काळ्या रंगाचा विदेशी कुत्रा. आज दिवसभर या बिचाऱ्यावरून आणि त्यांच्या मालकांवरून विनोदांची बरसात होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ दादाने स्वतः बहुमताने मंजूर केली.
किल्ल्याला दोन बालेकिल्ले. दोन्ही स्वतंत्र किल्लेच भासतात. श्रीवर्धन व मनरंजन ह्या दोन्ही दुर्गांच्या मधील खिंडीत काळ्या कातळाचं भैरवनाथाचं मंदिर. मंदिरापुढे दीपस्तंभ व काही मुर्त्या. इथे सगळे थांबलो. नव्याजुन्यांची ओळख परेड झाली. संतोष, कानिफनाथ, योगेश, नितीन बरेच नवीन मित्र मिळाले. सगळ्यांशी गप्पा मारताना समजलं वरवर सगळं शांत वाटत असलं तरी प्रत्येकाच्या मनात अनुभवांचा एकेक महाभारतासारखा ग्रंथ दडलेला आहे.
शोधूनी स्वर्ग धरतीवरी
भटकतो आम्ही भटक्यापरी,
छंद भ्रमंती आणि धुंद शिवभक्ती
जीव ओवाळतो सह्याद्रीवरी!
अशी आमची गत. मंदिरा समोरून श्रीवर्धनगडावर तर मंदिरामागून मनरंजनगडावर वाट जाते. आधी श्रीवर्धनाची वाट निवडली. पायऱ्यांनी सज्ज वाट. किल्ला बऱ्याच प्रमाणात जपल्याची चिन्हे पावलागणिक जाणवत होती. दोन्ही बालेकिल्ल्यांपैकी सर्वांत उंच श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. दरवाजाची कमान बऱ्यापैकी शाबूत आहे. माथ्यावर जाणाऱ्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकं दिसली. माथ्यावरील बुरुजावर ध्वजस्तंभ तसेच वास्तूंचे अवशेष आहेत. गडाच्या उत्तरेस व दक्षिणेस दुहेरी तटबंदीचे चिलखती बुरुज आहेत. इथे थांबून डब्यातली बिर्याणी फस्त केली.
काय चव, काय लज्जत, काय मेजवानी सगळं कसं एकदम ओक्के!
आयटीसीच्या मित्रांनी आणलेली बिस्किटं खाल्ली. तेवढ्यात Baby speak पुन्हा आला पण आधीच थांबलेल्या गावरान पांढऱ्या कुत्र्याने साधं एक हाडदेखील त्याला मिळू दिलं नाही. पळवून लावलं. याचा रविवार मांसाहाराने साजरा झाला. वैभव नरवडे या मित्राने कॅमेऱ्यातून आम्हा सर्वांचे एकसे बढकर एक फोटो टिपले. खतरनाक फोटोग्राफी आहे भावाची. शिवाय दुसऱ्याचे एवढे फोटो काढणारं काळीजही मोठंच!
डोळे सर्वांना असतात, नजर कमवावी लागते.
मेंदू सर्वांना असतो दृष्टिकोन महत्त्वाचा!
डोळ्यापासून नजरेपर्यंतचं अंतर
आणि मेंदूपासून दृष्टीकोनापर्यंतचा प्रवास जिंकला की सगळं मिळवलं, हेच खरं.
या ट्रेकला असंख्य फोटो काढले, कित्येक व्हिडिओ बनवले. कारण आज कुठेही पोहोचण्याची घाई नव्हती, काहीतरी उरकून टाकण्याची वखवख नव्हती. आयोजकांनी तशी सूटच दिली होती.
हिरवळीने माखलेला निसर्ग डोळ्यात सामावूच नये,
रंगत चाललेली ही मैफल संपूच नये, अशी मनीषा उरात.
भरभरून सौंदर्य देणारा, फुलणारा, बागडणारा निसर्ग. कॅमेरा सुद्धा असमर्थ ठरावा, अमर्यादीतता टिपायला असं देखणेपण. राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर दुसऱ्या बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतात. लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं. ही सगळी माहिती मार्गदर्शक पंकज माने सरांनी श्रीवर्धन बोलेकिल्ल्यावर आम्हाला सांगितली, किल्लेही दाखवले. या अभ्यासू माणसाचा साधा उद्गार सुद्धा मला वेदवाक्यासारखा भासतो. हुबेहूब आकाशवाणी झाल्यासारखा. गडकिल्ले भ्रमंतीतला बाप माणूस. आम्हा सर्वांसाठी आदराचं स्थान.
राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौद्ध लेणी आहेत, कोंढाणे लेणी. सातवाहनकालाच्या सुरुवातीला खोदलेल्या या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरूनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी 'कोकणचा दरवाजा' संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारीनंतर त्याचवर्षी शिवरायांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतच्या सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले, असा इतिहास आहे.
गड पाहून उतरायला सुरुवात केली, उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या मनरंजनची वाट अर्ध्या तासाची, सोपी आहे. मनरंजनच्या माथ्यावर छत नसलेली एक वास्तू, एक मोठा तलाव व काही इमारतींचे अवशेष आहेत. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे व तीन चार मोठे बुरुज तटात आहेत. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाक, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो. मात्र आम्हाला आता पायथ्याचा उदयसागर तलाव जलक्रीडेसाठी खुणावत होता. म्हणून खाली उतरलो.
तलावाचे पाणी पोहण्यास उत्तम नसल्याचे स्थानिकांनी सांगितल्यामुळे पोहणे रद्द झाले. तलावाच्या पश्चिम बाजूला काळ्याभोर पाषाणातलं पुरातन शिवमंदिर आहे, हेमाडपंती बांधणीचं. मंदिराच्या मागून एक नैसर्गिक झरा (पाण्याचा प्रवाह) निघतो. या प्रवाहावरच मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाखालून हा प्रवाह मंदिराच्य़ा दर्शनी भागात जोत्यात बसविलेल्या दगडी गोमुखातून बाहेर पडतो. गोमुखाखाली दगडात बांधलेले कुंड आहे त्यात गोमुखातून पडणारे पाणी साठते व ते पुढे तलावात जाते. हे पाहणं हा एक नयनरम्य सोहळा होता. गिरी भ्रमंतीची व दुर्ग भ्रमंतीची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी राजमाची किल्ला हे एक सुंदर स्थळ.
उगवता अन् मावळता सूर्य, रानफुलांचा बहर, रानमेव्यांची चव सगळं काही जिवंत,अगदी वास्तव. पुढच्या ट्रेक पर्यंत या पाऊलखुणा स्मृतीपटलावर अशाच चिरतरुण राहत रेंगाळत राहतात. रवी काळे सरांनी समविचारी माणसांचा, भटक्यांचा हा गोतावळा उभा केलाय. सुख देणाऱ्या या मार्गांचा शोध थांबता कामा नये, हीच अपेक्षा. फेसबुक, व्हाट्सअप सुरू केल्यावर किती आदळतं आपल्यावर पण ही भटकंतीतून मिळणारी शांतता सुखकारक वाटते, सदैव. गड उतरणीला, पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला. करवंदाच्या जाळीतून बाहेर निघावंसंच वाटत नव्हतं. पोटभर रानमेवा फस्त करूनही मन भरत नव्हतं. यावेळी बापूने आपल्या पोरांसाठी करवंदं गोळा केली. सगळे गाडीपाशी पोहोचलो. काळे सर आणि वैभव करपे यांनी चिखलात रुतलेली गाडी रुळावर आणली होती. माघारी जाताना रात्री खरंच या रस्त्यावरून आपण आलो? याचं आश्चर्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होतं. अंधाराच्या आधारानं ड्रायव्हरने रात्री ही कमालच करून दाखवली होती. हळूहळू निसरड्या वाटेवरून गाडी चांगल्या रस्त्यावर आली. जिवात जीव आला. आता एकवीरेकडे निघायचं होतं. पुढे थोडं अंतर पार करत राहिलेल्या बिर्याणीवर ताव मारला.
भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांत अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची 'रेणुका' या नावाने देखील उपासना केली जाते. लोणावळ्याजवळ प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाची ही देवता. या मंदिरामध्ये बकरी, कोंबडी पशुबळी देण्याचा रिवाज आहे. डोंगरावर स्थित मंदिरावर जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. एकवीरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्त्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे. तिथे गेल्यावर समजले २५ रुपयांत कार्ले लेणी पाहता येतील. मज्जाच की मग.
लोणावळ्यापासून ८ किमी. अंतरावरील कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफांचं सौंदर्य आरस्पानी आहे. स्थापत्य शिल्पांचा नजारा सुंदर आहे. कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. अजिंठ्याच्या लेण्यांची हुबेहूब प्रतिकृती वाटते. चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. भारतात सम्राट अशोकाने असे स्तंभ उभे केले होते. या मालिकेतील सारनाथच्या धर्तीवर हा इथला सिंहस्तंभ कोरला आहे, ४५ फूट उंचीचा. त्यावर चार सिंहाची आकृती कोरलेली. चैत्यगृहाबाहेर सज्जा कोरलेला आहे. येथे मिथुन शिल्पाच्या जोडय़ा, हत्तींचे थर, गौतम बुद्धांचे त्यांच्या अनुयायांसह असलेले शिल्पपट आहेत. लेण्याच्या तळाशी दोन्ही बाजूला तीन हत्तींची शिल्पे, गौतम बुद्धाच्या मूर्तीही कोरलेल्या आहेत. पाषाणातलं सौंदर्य छिन्नी हातोडीच्या साह्याने जगासमोर आणणारे कलाकार आणि त्यांची सुरेख कलाकृती पाहून आणि स्पर्श करत धन्य झालो.
मित्रांनो लक्षात ठेवा,
मरता कधीही येतं, जगता आलं पाहिजे.
आपण एकदाच जन्मतो, अगदी चूक.
आपण एकदाच मरतो, दररोज आपला नवा जन्म होतो.
वेळ आहे तर त्याचे योग्य व्यवस्थापन करायला हवं.
फिरायला हवं, नाविन्यपूर्ण पहायला हवं.
शब्दप्रभू अरुणा ढेरे म्हणतात,
गडद अंधारात मी डोळे संथ उघडले
आणि आयुष्याचा ग्रंथ वाचायला हे दोनच दिवे मला पुरले.
डोळे तृप्त व्हावेत एवढं पहायला हवं.
चहूबाजूंनी सौंदर्याचा अविष्कार करणारं जग कवेत घेण्याची उर्मी कमी होऊ नये. पाय स्थिर नाहीत एवढा सध्या जगण्याला वेग आलाय. नुसती धावाधाव असतानाही प्रत्येक महिन्याकाठी आमचे मावळे निसर्गरम्य भटकंतीसाठी वेळ काढतात हे सगळ्यात महत्त्वाचं..
असावं एखादं तरी असं मुक्कामाचं ठिकाण,
जिथं थोडा विसावा घेत येईल, ते शोधायला हवं.
दाराशी गोजिरं बाळ रडत असावं तसं अनौरस सुख अनेकदा येतं आपल्या आयुष्यात. ते ओळखण्याची संधी मात्र दवडता कामा नये. सहज उचलावं आवेगाने, समाधानाच्या मोहमुठीत अडकलेलं आपलं बोट सुटू नये यासाठीच अट्टाहास करावा, कायम, असं वाटतं. अवघ्या आठशे रुपयांमध्ये ओंजळभरून वाहील इतका समृद्ध अनुभव घेऊन संध्याकाळी नऊच्या सुमारास घरी सुखरूप पोहोचलो.
भेटू पुन्हा नव्या गडकोटांच्या क्षितीजावरती...
तोपर्यंत जय शिवराय!
पुढील ट्रेक नाशिक जिल्हा,
२४ जुलै २०२२ किल्ले ब्रह्मगिरी, दुर्गभांडार, गोदावरी नदी उगम स्थान असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर (कुंभमेळा ठिकाण, साधू संतांची भूमी)
आयोजकांशी अवश्य संपर्क साधा.
आयोजक
रवी काळे सर
(पुणे महानगरपालिका)
गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी
90964 65675
मार्गदर्शक
पंकज माने सर
8668251375
शब्दांकन
आयुब शेख सर
प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका
9552941271
प खूप छान , अप्रतिम वर्णन, मुद्देसूद मांडणी ... तारीफ करावी तेवढी कमी .. तुमच्या सारखा मित्र आम्हला भेटला हे आमचं भाग्य.... अशीच सोबत तुमची आमच्या सोबत राहुद्या.
ReplyDeleteधन्यवाद सर...
Deleteतुमच्या सोबत फिरतोय हेच स्वर्गाहून सरस...
प्रत्येक क्षण नि क्षण हुबेहुब वर्णिला आहे...भटकंती तर सगळेच करतात पण पाहिलेले मुद्देसूद मांडणीत अन् समर्पक शब्दात वर्णन...अप्रतिम
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद मॅडम
Delete