"हाच माझा पुरस्कार!"
"शाळा माझी,सर्व माझीच मुले,
टवटवीत ठेवीन, जशी फांदीवर फुले,
कुरवाळेन प्रेमाने आईपरी,
दक्ष डोळे मात्र असतील सदैव खुले!!"
शिक्षकी पेशा हा निर्जीव फायलींवरची धूळ झटकण्याशी संबंधित नसून रोज नव्या आशेच्या किरणांना, जिवंत मेंदूंना आणि चैतन्याने सळसळणाऱ्या निरागस जीवांना सोबत घेऊन प्रकाशाची वाट चालण्याचा संकल्प आहे, असं मला वाटतं. कितीतरी पिढ्या शिक्षकाांच्या हातून घडतात, बिघडतात! मुलं येतात,जातात. शाळा बदलते, शिक्षक मात्र तिथेच असतो. पथिकाला मार्ग दाखवणाऱ्या रस्त्यावरच्या त्या मैलाच्या दगडासारखा! जिवंत माणसं घडवत आहोत आपण, कच्च्या मातीचे घडे नाही हे सतत लक्षात ठेेवलं पाहीजे. कोवळ्या मनावरचं मळभ हलक्या हाताने दूर करतोय आपण. आपल्या हातात कुण्या आईनं आपल्या काळजाचा तुकडा दिलाय, आपण त्याचं भलं करणार, या विश्वासानं! मूल शाळेत आलं म्हणजे ते माझं झालं, ही आपली भावना महत्त्वाची.
मुलांच्या प्रश्नचिन्हाचं रूपांतर पूर्णविरामात करता आलं की समजावं, खरं शिक्षण देता आलं. फक्त पाठ्यपुस्तक संपवून शिक्षकांचं ज्ञानदानाचं कार्य पूर्ण झालं असं नाही, त्यासोबत विविध उपक्रम, प्रकल्प, शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमधील सहभाग, नीतिमूल्यांचे संस्कार यांसारख्या विविध गुणांच्या उपहारांनी विद्यार्थ्यांना सजवता आलं की समजावं, आपण मुलांसाठीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. मुलांना शाळा हे आपलं दुसरं घरच वाटावं यासाठी आपण काम करायला हवं. शाळेत येण्याची ओढ विद्यार्थ्यांना लागावी यासाठी आपण काय करत आहोत? हा विचार महत्त्वाचाच.
अनेकदा शिकवणं आनंददायी नसतं म्हणून शिकणं मजेशीर होत नाही. शाळेत पोरांना लळा लावला की त्यांना शाळेचा लळा लागणारच, यात तिळमात्र शंका नाही. शिक्षक व्हायचं म्हटलं की अपार करुणा अंतःकरणात असायला हवी. सोबत प्रखर कटाक्ष. प्रत्येक मुलावर घारीसारखं लक्ष. शिक्षक म्हणून आपण मुलांचं पालकत्व स्वीकारावं आणि ते मनापासून अनुभवावं. शिक्षकांची खरी संपत्ती म्हणजे त्यांचे विद्यार्थी. जेव्हा विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये परीक्षांमध्ये चमकतात त्यावेळी शिक्षकाला आकाश ठेंगणं होतं. आपण जोपासलेल्या इवल्याशा रोपट्याला सुंदर फळं, फुलं लगडलेली पाहताना कोणत्या माळ्याला आनंद होणार नाही? एखादा आदर्श शिक्षक निवडायचा असेल तर खरंच त्यांचे विद्यार्थी कुठे आहेत? काय करत आहेत? हे पाहायला हवं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेवरून शिक्षकांचं अढळपद सिद्ध होतं. प्रत्येक शिक्षकांकडे विद्यार्थ्यांसाठी माहितीचा भरपूर साठा कायम तयार असायला पाहिजे. या साठ्यात शिक्षकांनी रोज नित्यनूतन अनुभवांची भर टाकत गेलं पाहिजे. शिक्षकांनी आपल्या बहुश्रुततेचा आणि प्रचंड मोठ्या अनुभवविश्वाचा मुलांना सतत फायदा करून द्यायला हवा.
मान्य आहे, अध्यापन करण्यासोबत अनेक अशैक्षणिक कामं आपल्यावर सोपवली जातात. लेखी कामांचा बोजाही आपल्यावर पडतो. अनेकदा शाळेत हेवे-दावे होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कुरघोडींना ऊत येतो. अशा वेळी शिक्षक म्हणून आपल्या मनात मात्र विद्यार्थ्यांसाठी सतत कल्पक विचारांचं वारं वाहायला हवं. मुलांच्या भविष्याची बीजं समृद्धतेच्या जमिनीवर पेरायची काळजी फक्त आपण करायची.! हसऱ्या चेहऱ्यानं वर्गात प्रवेश करायचा आणि शाळा सुटेपर्यंत पोरं कशी आनंदाने शिकतील, एवढच बघायचं. शाळेत येतानाची मुलांची रीती ओंजळ मात्र शाळा सुटताना ओसंडून भरून वाहायला हवी,एवढं मात्र निकरानं जपायचं! आपल्या व मुलांच्या प्रगतीचा आलेख दरवर्षी कसा वाढतच राहील?यासाठी प्रयत्नशील राहायचं. प्रेरणादायी सतत वाचायचं आणि मुलांसाठी प्रेरणादायी ठरायचं! मुलांच्या कलानं घ्यायचं म्हणजे त्यांच्या प्रगतीच्या वाटा अधिक सोयीस्कर होतील.
मुलांच्या भावविश्वाशी नातं जोडल्यामुळे शिक्षक संबंधित शाळेतील सत्तेचे प्रतिनिधी राहत नाहीत तर मुलांचे लाडके मित्र होतात. आपल्या एखाद्या मित्राचे भावनेने ओथंबलेले एखादे पत्र आपल्याला आले तर आपण काय त्याच्या अक्षराबद्दल तक्रार करतो? आशयच पाहतो ना! त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अवगुणांना बाजूला सारत त्यांच्यातील गुणांची पारख करता यायला हवी. प्रत्येक मुलात काहीतरी विशेष असतंच की, त्याचा शोध फक्त आपल्याला घेता आला पाहिजे. आपण शिक्षक म्हणून शाळेत आपली सर्व ऊर्जा खर्च करायला हवी. जुनीच सामग्री परत-परत वापरणं हे शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखंच आहे. नवनवीन कल्पना वापरायला हव्यात सर्व विषयांना सर्जनशील वळण मिळालं की शिकवणे ही केवळ शिक्षकांची आस उरत नाही तर शिकणे ही विद्यार्थ्यांची सुद्धा आस्था बनते.
बहिणाबाई म्हणतात,"सगळीच झाडं फळं देणारी नसतात,काही डोळ्यांना सुखद हिरवळ देणारीही असतात." वर्गातली सगळी पोरं बुद्धिमान, हुशार असतीलच असं नाही. काही पोरं अभ्यासात कच्ची असली तरी मोठं होऊन तीच पोरं वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करतात. ही पोरं शाळेत खोडकर, मस्तीखोर असतील पण खेळाच्या माध्यमातून, विविध व्यवसायांच्या माध्यमातून आयुष्याच्या शाळेत पहिल्या श्रेणीत पास होतात हे मात्र नक्की!
पेन्सिल हातात धरतानाही लटपटणारे हात जेंव्हा हुबेहूब शिक्षकांच्या अक्षरांची नक्कल करतात, ते असतं आपलं प्रशस्तीपत्र. दिवसातून वीस पंचवीस वेळा शिकवलेली अक्षरं दुसऱ्या दिवशी पुन्हा चुकीची उच्चारणारा विद्यार्थी जेव्हा खडाखडा वाचू लागतो ते असतं आपलं बक्षीस. आदल्या दिवशी ज्याच्यावर प्रचंड रागावून गेलो तोच विद्यार्थी दुसऱ्या दिवशी सकाळी छानसं हसून Good morning म्हणतो ना तेच असतं आपलं खरं गोल्डमेडल.
शाळा सुरु होते, कितीतरी निरागस अबोल चिमणपाखरं येऊन बसतात आपल्या वर्गात. थोडे दिवस बावरतात. आई, आजीची आठवण काढत, हुंदके देतात पण हळूहळू शिक्षकच होतो त्यांचा सखा, सोबती, सवंगडी! देतो त्यांना कौतुकाचे, आपुलकीचे कोवळे, हिरवे शब्द, नाजूक हळव्या चैत्रपालवीसारखे! चार-आठ दिवसांतच विसरतात ते आपलं घर कारण त्यांचं नवं घर त्यांना शाळेत मिळालेलं असतं. नववर्ष प्रवेशावेळी त्यांच्या उघडलेल्या चिमुकल्या बाळमुठीत शिक्षक देतात पेन्सिल. रेघोट्या मारण्यासाठी, गिरगटण्यासाठी. त्या रेघोट्याच हळूहळू आकार घेतात भविष्याचा! "प्रश्न नाहीत सुकणार त्यांचे, धरतील मूळं जोमदार!" याची काळजी घेता आली की समजायचं शिक्षणाची दिशा योग्य आहे.
खेळण्यात जितका आनंद मिळतो तितका शिकण्यात निर्माण करता आला तर खऱ्या अर्थाने शिक्षण आनंददायी होत आहे. "आज इतिहास शिकवताना काय मज्जा आली, सरांनी टॉपचं शिकवलं. ऐतिहासिक चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर!" असे मुलांचे उद्गार लक्षावधी प्रेक्षकांनी वाजवलेल्या टाळ्यांना फिके पाडतात. आम्ही शिक्षक म्हणून आमचं अध्यापन कर्तव्य कसं पूर्ण करतो? यावर आमच्या भ्रष्टाचाराचे स्वरूप अवलंबून आहे. माणसं नोटा खाऊन कागद संपवतात, आम्ही संपूर्ण पिढी नाही ना संपवत? याचाही विचार व्हायला हवा. हा भ्रष्टाचार सर्वाधिक गंभीर आहे.
शिक्षकांनी मुलांच्या प्रत्येक कृतीला प्रतिसाद द्यायला हवा. व्वा! सुंदर, मस्त, छान अशा उपहारांनी. आपण असो वा नसो शाळा चालतेच, वर्ष जातातच. मुलं येतात, जातात दिवस थांबतो का कोणासाठी? आपण नसलो तरी हे होणारच. आपल्या नसण्याने फरक नको का पडायला. पण आपल्या असण्याने फरक पडायलाच हवा. तोही चांगलाच! स्वप्नातली सुंदर शाळा घडवावी, स्वप्न सत्यात, प्रत्यक्षात उतरावं या कल्पनेनंही मन किती सुखावतं. अमक्या शिक्षकांच्या तासाला झोप येते, हे शिक्षकांसाठी इंडिकेटर आहे खरं तर. उत्साहानं सळसळणाऱ्या मुलांना शाळेतल्या बाकावर बसवून फक्त बौद्धिक विषयांचा अभ्यास करायला लावणारी शाळा निखालस वाईट म्हणावी लागेल. शिक्षकांनी नेहमी लक्षात ठेवायला हवं, 'ज्याची भीती वाटते, त्याच्याविषयी प्रेम कधीच वाटत नाही.' आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याविषयी आपुलकी वाटायला हवी, भीती नाही. भीतीयुक्त वातावरणात मुलं मुक्तपणे बागडणार कशी?
शाळेत येऊ पाहणाऱ्या प्रत्येक बालकासाठी कोणत्याही आडकाठीशिवाय प्रवेशाची दारं सताड उघडी ठेवता आली पाहिजेत. शाळा भरण्याची वेळ झाली की पोरं वर्गात येण्याआधी सतत काहीतरी नवीन करण्याचा विचार मनात उसळी मारायला हवा. स्वतःची कौशल्य वृद्धिंगत करत, पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त पुरक माहितीसाठी शोध घेत विषयासंबंधी अधिक ज्ञानाचा संचय शिक्षक म्हणून सदैव करता यायला हवा. सढळ हाताने व्यवहारोपयोगी ज्ञानदान करत बालकांच्या मनावरची किड हलकेच दूर करता यायला हवी. आज गरिबीची झळ सोसत उद्या तरी चांगला दिवस उजाडेल या आशेवर शाळेत पाठवणाऱ्या पालकांच्या पोरांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न रंगवता आली पाहिजेत. प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य देत अभिव्यक्तीसाठी कल्पनाशक्तीचं क्षितीज खुलं करता आलं पाहिजे.
गुणवत्तेसाठी झटत संस्कार, कला, क्रीडा, संगीत, नाट्य यांसाठी नियोजित वेळ देता आला पाहिजे, पोरांना विविध स्पर्धांमध्ये उतरवत यशापयशाच्या भिंतीवर खिलाडूवृत्तीचं चित्र चितारता आलं पाहिजे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक बालकाचं पालकत्व स्वीकारत, वर्गात बसणाऱ्या पोरांची पोटच्या पोरांएवढी काळजी घेत दिलेलं शिक्षण हेच खरं ज्ञानदान ठरलं पाहिजे.
स्कॉलरशिपच्या परीक्षेत माझ्या वर्गातील सुबोध बनसोडे या विद्यार्थ्यांने गुणवत्ता यादीत क्रमांक पटकावला. त्याच्या आणि शाळेसोबत माझंही नाव पुणे महानगरपालिकेत झळकलं. राज्यस्तरीय घनकचरा व्यवस्थापन स्पर्धेत राज्यातील दीडशे मुलांमध्ये त्याने स्थान मिळवलं. यासाठी त्याचा सत्कार प्रसिद्ध शास्त्रज्ञ व विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाला. त्याला वैज्ञानिकांचे प्रयोग पाहण्याची संधी मिळाली. त्याच्यासोबत मार्गदर्शक शिक्षक म्हणून मलाही भारतीय संशोधन संस्था, आयसर, पुणे येथे दोन दिवस निवासी राहण्याचा योग आला, हेच माझं भाग्य! नैतिकने टाकाऊतून टिकाऊ स्पर्धेत सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक पटकावला. सायलीने पुणे मनपा स्तरावर चित्रकला, निबंध, प्रश्नमंजुषा यांसारख्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवले. पुणे महानगरपालिकेचा लोकमान्य टिळक गुणवंत विद्यार्थी पुरस्कार मिळवला. शरदने हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. संकेतने पाढे पाठांतरमध्ये यश मिळवले. पुणे मनपा अंतिम नाट्यस्पर्धेत विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळवला. वर्गाच्या युट्युब चॅनेलमध्ये सर्व विद्यार्थी उपक्रमांची माहिती अचूकपणे सांगतात. विद्यार्थ्यांनी शाळेचे, वर्गशिक्षक, पालक सर्वांचं नाव उंचावलं. हाच खरा माझा नोबेल पुरस्कार, जो विद्यार्थ्यांनी मला दिला!
वर्ग बँकेत खाऊचे पैसे जमवणारा नैतिक ज्यावेळी पैसे जमवून आईच्या वाढदिवसासाठी साडी घेतो तेव्हा मला पुरस्कार मिळतो. अंधश्रद्धेने पछाडलेल्या बाबांची नजर चुकवत सूर्यग्रहण पाहण्यासाठी जेव्हा सुबोध शाळेत धावतपळत येतो तेव्हा माझा खरा गौरव होतो. आमच्या सरांना उलटं बोलायचं नाही, असं ठणकावून अभिलाषा दारू पिलेल्या बाबांना सांगते तेव्हा मी पुरस्कृत होतो. तापाने फणफणत असतानाही रोहित शाळेत येतो, तेव्हा मी सर्वार्थाने आदर्श शिक्षक ठरतो. वाढदिवसाला वर्ग ग्रंथालयासाठी एक पुस्तक व शाळेसाठी एक सुंदर फुलझाड, वर्गासाठी झाडूअशा भेटवस्तू सुजल, आकाश, धनश्री, वर्गातली सगळीच पोरं भेट देतात, तेव्हा मी खरा पुरस्कारार्थी ठरतो. पोरांची सुंदर मोत्यांसारखी हस्ताक्षरं पाहतो तेव्हा त्या अक्षराच्या वळणात मी अजरामर होतो. शिस्तीत,टापटीप गणवेशात येणारी माझी गरीब, झोपडपट्टीतली पोरं पाहतो तेव्हा मी चंदनापेक्षाही जास्त सुगंधित होतो. ट्राॅफी, शाल, श्रीफळ, फेटा यांसारख्या सन्मानाने मी अनेकदा सन्मानित झालो आहे, पण मुलांकडून मिळणाऱ्या या सर्वोच्च पुरस्काराने पुरस्कृत होताना, "देव पहावयासी गेलो,देवचि झालो" अशी माझी अवस्था होते.
हळूहळू होतील ही पिल्लं मोठी. शाळा होईल छोटी,त्यांच्यासाठी. बळकट होतील पंखं त्यांचे अन् उडून जातील सैरभैर, भिंतीपलीकडे. खात्री आहे, होतील पार ती जीवनाच्या परीक्षेत. कधीच हात टेकणार नाहीत, आपलं पळवू देणार नाहीत आणि दुसऱ्याचं पळवणारही नाहीत, एकलकोंडी होणार नाहीत. माझ्या चष्म्यावर साठेल धूकं.पण ते पुसायचं मला भान राहणार नाही. पोरं असतील तेथून काढतील आठवण माझी. कधीतरी स्तब्ध होतील माझा विषय निघाल्यावर. तीच माझी खरी गुरुदक्षिणा! कष्टाचं खातील, आई-वडिलांना सांभाळतील, माणूस म्हणून जगतील! तेच माझं पसायदान!
लेखन
आयुब कलाम शेख,
प्राथमिक शिक्षक,
म.न.पा.शाळा क्र.174बी, कोंढवा बु.पुणे-48
मो.9552941271








