जीवधन किल्ला व नाणेघाट
एक पौराणिक, ऐतिहासिक पावसाळी ट्रेक
गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान, निमगाव म्हाळुंगी
शनिवारी १७
सप्टेंबर २०२२ रोजी रात्री अकरा वाजता गाडी निमगाव म्हाळुंगीमधून गडकिल्ले प्रेमी
प्रतिष्ठानच्या ३७ मावळ्यांना घेऊन शिक्रापूर मार्गे जीवधनकडे रवाना झाली. निमगाव म्हाळुंगी
ते पाबळ मार्गे रविंद्र काळे, शरद काळे, पंकज माने, युवराज शिंदे, गुरुदत्त
गोसावी, सारंग धुमाळ, सुमित वडघुले, अजिंक्य मांढरे, वैभव वडघुले, रोहन गोडसे,
गोरक्ष पाचुंदकर, हर्षवर्धन पाचुंदकर, निखिल नरसाळे, बाळासाहेब लांडे, पंडित
लांडे, संतोष लांडे, अभिषेक चव्हाण, सोमनाथ चव्हाण, अनिल लांडे, गौरव नप, सागर नप,
अभिषेक नरसाळे, सुखदेव रणसिंग, ऋषिकेश शिंदे, भूषण जाधव, लखन सोनवणे, गौरव, सौरभ,
रवी नरसाळे, विशू गोडसे, सुप्रिया मॅडम होते.
यावेळी पुण्यातून २१ मावळे घेऊन
स्वतंत्रपणे दुसरी गाडी तयार होती. आयोजकांच्या या नियोजनाला खरं तर सलाम. यामुळे
अंतर, वेळ आणि पैसा तिन्ही गोष्टींची बचत होणार होती. पुणेमार्गे जाणारी गाडी ११
वाजता पेरणे फाटा, कटके वस्ती, चंदननगर बायपास, येरवडा, विश्रांतवाडी चऱ्होली मार्गे जीवधनकडे रवाना झाली. अक्षयकुमार कांबळे,
सुरज बोरावके, विशाल घुगे, दिनेश लाटे, वैभव भिसे, विष्णू ढमाले, गिरीश तांबे,
सुरेश चव्हाण, नानासाहेब चव्हाण, रामचंद्र नरवडे, विजय कुंभार, संदीप करे,
शांतीलाल सुर्यवंशी, लक्ष्मण आरु, अक्षय चव्हाण, अभिमन्यू वडघुले, कटके सर, माने
सर, सुनिल खाडे, राहुल पोतदार आणि मी अशी आमची टिम. यंदा अक्षयकुमार कांबळे या
आमच्या मित्रामुळे पुणे मनपामधील इंग्रजी माध्यम सात / आठ शिक्षक नव्याने सामील
झाले होते. व्हिडिओ, फोटो, रिल्सला गाडीतच सुरुवात झाली. अक्षरशः चंद्रा गाण्यावर
नाचली ही पोरं. नुसताच धिंगाणा. या गाडीचे संपूर्ण नेतृत्व विजय माने, सुनिल खाडे
या दोघांनी केलं.

गडकिल्ले प्रेमी या ग्रुपमध्ये शाळकरी, कॉलेजची मुलं, शिक्षक,
शेतकरी, कंपनी कामगार, व्यावसायिक, महिला, नेव्ही आणि आर्मीचे निवृत्त अधिकारी,
राजकीय व्यक्तींचाही समावेश होता. पाचवीतल्या अनुष्का घोरपडे पासून ते एकोणसाठ
वर्षांच्या नानासाहेब चव्हाण यांपर्यंत.. वय, जात, धर्म,
पंथ, शिक्षण, पैसा, ऐपत यांपलीकडच्या ग्रुपमध्ये शिवबा राजा अन् सह्याद्री हाच एक
समान धागा असतो नेहमीच. इथे सगळे केवळ भटके. निसर्गाचा आस्वाद घेत, गप्पा मारत
ट्रेक पूर्ण करायचा आणि दिवस सत्कारणी लावायचा एवढाच ध्यास.

नारायणगावात रात्री
दोनच्या सुमारास दोन्ही गाड्यांची आणि आम्हा सर्व मित्रांची गळाभेट झाली. ग्रुप
फोटो झाला. तेथून पुढे एकत्र प्रवास सुरू होणार होता. दर महिन्याला कुठून तरी एक
कल्पना तरंगत आयोजकांच्या डोक्यात येते आणि आपल्या त्या कल्पनेच्या कस्तुरीचा
सुगंध सत्यात देऊन जाते. महिन्यातला एक दिवस सुगंधित होतो. काळे सर गडकिल्ल्यांची निवड करून आम्हांला निसर्ग भटकंतीची मेजवानी बहाल करतात. मैलोनमैल वाळवंटात
चालणाऱ्या एखाद्याला पाण्याचं तळं सापडलं की तो कसा पोट फुटेपर्यंत पाणी पिऊन तृप्त
होईल, तशीच काहीशी अवस्था आमची होते दर महिन्याला.
जीवधन पायथ्याला
पहाटे चारच्या सुमारास पोहोचलो. रिमझिम पाऊस सुरू होता. गरमागरम वडापाव आणि
वाफाळत्या चहाची जय्यत तयारी सुरू झाली. बोटकर आणि राहुल
पोतदार या दोघांनी आचाऱ्याचं काम उत्तम केलं. पंकज सरांच्या ओळखीमुळे इथली सगळी व्यवस्था यथासांग पार पडली. म्हणून तर दरवेळी अगदी माफक खर्चात आमचा ट्रेक पूर्ण होतो. प्रत्येकी दोन दोन
वडापाव असतानाही कित्येकांनी अंधाराचा फायदा घेत दोनाचे चार हात केले. पोरं
म्हटल्यावर असं होणारच म्हणत आयोजकांनीही दुर्लक्ष केलं. गरमागरम चहा बरोबर
पतंजली बिस्किटाचा आस्वाद घेतला.

यावेळी सगळे मावळे गडकिल्ले प्रेमी
प्रतिष्ठानच्या टी शर्ट मध्ये होते. साडेपाच वाजता ट्रेकिंग सुरू झालं. आधी जीवधन
किल्ला करून नंतर नाणेघाटाकडे येण्याचे नियोजन होते. गडकोटांच्या मातीला
शेकडो वेळा स्पर्श केलेल्या पंकज माने सरांनी गड आणि प्रवासाविषयी माहिती सांगितली.
"हिरव्या शेवाळावरून घसराल, काळजी घ्या." म्हणून सांगितले. आमचा अप्पा
हिरवं शेवाळ दिसलं की जपून पाऊल टाकायचा. या हिरव्याला जपण्याच्या नादात चारपाच
वेळा तो चॉकलेटी शेवाळावरून घसरला. हिरवळ दिसली की घसरणारा चॉकलेट बॉय! खेकडे आणि
सापांपासून सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला होता पण माघारी येईपर्यंत दुर्दैवाने सापाची साधी कातणही आम्हाला दिसली नाही.

किल्यावर जाण्यास
अंदाजे दोन तास, फिरायला दोन तास आणि परत यायला दोन तास. साडेबारा वाजता खाली
येणार होतो. वॉट्सअप ग्रुपमध्ये
गडांविषयी माहिती, व्हिडिओ आधीच शेअर केले जातात. फक्त हिंडणं होत नाही तर
माहितीचा संचयही होतो. आता सगळेजण त्या गडकिल्ल्यांचा इतिहास वाचून मग गड किल्ले
सर करतात. कालच्यापेक्षा आज अधिक जाणते, समृद्ध झालो आहोत, असा अनुभव यायला लागला
आहे. आपण फक्त
सह्याद्रीच्या काठावर बसायचं निवांत. ते आपोआप घेतं बुडवून अखंड, आकंठ! असा
साक्षात्कार होतो प्रत्येकवेळी. निसर्गाची मुक्त उधळण बघून रंगीत कुंचल्यांनी आरस्पानी शब्दांचे दान
पानावरती उतरवत काढलेलं चित्र फिकं पडावं असा सगळा प्रपंच. जिथं मन हरखून जातं,
तिथं one plus मोबाईलची काय तऱ्हा?

वडघुले गँग,
अजिंक्य, युवराज, राहुल, अक्षयकुमार, अप्पा कितीतरी मावळे ढिगानं फोटो काढत असताना
काळे सरांनी माझ्याच नावाने शंख करावा, हे माझं दुर्दैव. कानफाट्या पडलेल्या
नावात पुढच्या ट्रेकला सुधारणा करण्याचा निर्धार मी प्रत्येक ट्रेकला करतो. पण
अप्पा आणि दादांमुळे ते शक्य होत नाही. दहा दिशांच्या निश्चिंत
विसाव्यावर सह्याद्रीनं खुशाल विराजमान व्हावं अन् अकराव्या दिशेतून ग्रुपमधल्या
कुण्या फोटोग्राफर बहाद्दरानं अँगल सेट करत फोटो काढावा, अशी कित्येक आश्चर्यकारक
दृश्यं आम्ही नेहमीच पाहतो. काळे सरांचा "चला, बास झालं" हा स्वर सतत कानाशी घोंगावत नसता
तर पावलं तिथंच रुतून कैक फोटो झाले असते आमचे. पण फिरणं कमी झालं असतं. यावेळी आमचा जिवलग
मित्र आणि बेस्ट फोटोग्राफर वैभव करपे सोबत नव्हता म्हणून शेदोनशे फोटो कमी झाले,
हजारचा आकडा पूर्ण झाला नाही याची सल राहिली.

थोडंसं उजाडताच
पद्मासनात मांडी घालून बसलेला 'जीवधन' अन् शेजारी वृक्षासनात उभा राहिलेला
'वानरलिंगी सुळका' नजरेस भुरळ घालू लागला. धुक्यांच्या पारदर्शक आवरणाने त्याचं
सौंदर्य आणखी खुलून येतंय असाच आभास होत होता. जगातली पहिली सौंदर्याची जिवंत उपमा
शब्दांत पेरणारी कविता विजय माने सरांसारख्या एखाद्या कवीला याच ठिकाणी सुचली
असावी, बहुतेक. पसरलेली हिरवळ,
पिवळी - जांभळी रानफुलं, नितळ पाण्याचे ओढे, छोटे मोठे धबधबे यांपैकी निसर्गाच्या
कोणत्या आविष्काराची प्रथम, द्वितीय अशी वर्गवारी कराल तुम्ही? तुमचं आमचं खुजेपण
इथंच प्रत्ययास येतं, सह्यगिरीच्या पायथ्याशी.
जीवधन हा पुणे
जिल्ह्यातील घाटघरच्या परिसरात असलेला पूर्वमुखी किल्ला. प्राचीन नाणेघाटाच्या
व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेला. नाणेघाटापासून सहज
दृष्टिक्षेपात येणारा. पायथ्याचं घाटघर गाव बांबूच्या बनांसाठी प्रसिद्ध.
शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज 'मुर्तिजा निजाम' याला जीवधनच्या कैदेतून
सोडवून संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर निजामशहा म्हणून घोषित केले व स्वतः वजीर
बनले असा इतिहास आहे.
गड सर करताना सुरुवातीला जंगलाची
वाट लागली. पावसामुळे गारठा होता पण प्रवासामुळे सगळे घामाघूम झालो. संतोष
लांडेंनी दिलेली शिवगर्जना परिसरात घुमत होती. काय खमक्या आवाज पठ्ठ्याचा, अगदी
शरीरयष्टीला शोभेसा. चालत पुढे गेल्यावर पायऱ्या
लागल्या. अतिपावसामुळे शेवाळ येऊन निसरड्या झाल्या होत्या. पुढे एका पॅचला सगळे
थांबले. पायऱ्या नव्हत्याच, नुसतं ओलसर, दगडी धुड. वरून येणारं पाणी, घसरडी
स्थिती. तरीही सगळे एकमेकांना धीर देत, हाताचा आधार देत वर चढलो. छोटी पोरं,
महिला, सगळेच शूरवीर.

लोककल्याणकारी राजा
शिवछत्रपतींच्या विचारांची पताका खांद्यावर घेत गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानच्या
मावळ्यांची भ्रमणदिंडी बेभानपणे गड
सर करते तेव्हा सानथोर सगळेच एकरुप होतात. सह्याद्री अनुभवत, आत्मभान जागवत.
कामधंद्याचा, सगळ्या अडीअडचणींचा विसर पडतो. या भ्रमणदिंडीतील प्रत्येक पावलागणिक तुमचं पद,
प्रतिष्ठा, परिवार यात फक्त आठवणीत राहतो सतत सोबत राहणारा दुर्दम्य विश्वास आणि
मिळणारा अविस्मरणीय आनंद. थोडं वर गेलो,
पुन्हा वर दोरी धरत जाण्याचा मार्ग. धडधड वाढली. पण पंकज सर पुढे आणि रवी सर मागे
असले की मधल्यांनी घाबरायचं कारण नाही. काळ्या कातळातील धोंड्यांना आकार देत
गडाच्या उंचीवर नेण्याची धमक मावळ्यांमध्ये होती अन् आम्हाला गड सर करण्यासाठी
प्रेरणा देण्याची या दोघांमध्ये. यावेळी ट्रेकर्स
संख्या आणि रिस्कही जास्त होती पण कोणतीही दुखापत न होता सगळे सुखरूप पोहोचलो हे
वैशिष्ट्य अधोरेखित करायला हवं.

गणेश घोरपडे (दादा)
बालाजी दर्शन करून या ट्रेकला वहिनी आणि मुलीसहीत उपस्थित राहिले. मानलं पाहिजे. सह्याद्रीच्या
कुशीत नितळ पाण्याचा आणि आमच्या ग्रुपमध्ये दादाच्या हास्याचा खळखळाट याशिवाय
मज्जा नाही. जोड मात्र यावेळी कपडे, गॉगल.. सगळं मॅचिंगमध्ये हजर. प्रत्येक
ट्रेकला गुरगुरणारा वाघ यावेळी भिजलेला बोका झाला होता तर. पण हसणं आणि हसवणं
चालूच होतं. दादा, बरं झालं
हसणं बाजारात विकत मिळत नाही. अन्यथा गरीब खळखळून हसायलाही मुकला असता. प्रसिद्ध लेखक
व. पु. काळे म्हणतात, "तुफान प्रेम करणारी माणसं जोडाल तेवढी घरं तुमची."
अशा शेकडोंचा गोतावळा काळे सर आणि पंकज सरांनी उभा केलाय.

पुढे गडाचा गोमुखी
दरवाजा दिसतो. हा कातळकड्यामध्ये कोरलेला आहे. द्वारावर चंद्र, सूर्याची तोरणं सजलेली आहेत. पुढे जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर, आसपास पाण्याची टाकी आहेत. गडाच्या
अंतर्भागात एकात-एक अशी पाच धान्य कोठारे. कोठारामधील कमलपुष्पांचे कोरीव नक्षीकाम
आहे. आयताकार असणाऱ्या या गडाच्या टोकाला सुमारे ३५० फूट उंचीचा
"वानरलिंगी" सुळका लक्षवेधी आहे. नजरेचं पारणं फेडणारा नजारा पाहून
याचसाठी केला होता अट्टाहास असा विचार डोकावून जातो. समोरच नानाचा अंगठा,
हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड गड दृष्टिक्षेपात येतात.
गडावर किंवा डोंगर
माळरानावर उन्हाळ्यात सगळं सुकून, काही ठिकाणी आगी लागून जळून जातं. तरीही पहिल्या
पावसात उगवून येतं हिरवेगार गवत, रोपटी. सर्वत्र हिरवळ दिसते, गवतफुलं डुलतात. या
वनस्पतींना 'जलउभारी' म्हणतात. प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत तग धरून राहण्याचा
आणि अनुकूल परिस्थिती निर्माण होताच उभारी घेण्याचा गुण या गवताकडून शिकला पाहिजे,
खरं तर.
पुण्यापासून
हाकेच्या अंतरावर असणारा सह्याद्री आपल्याला बघणं होत नाही, त्याला अर्थ नाही.
महाराष्ट्राला लाभलेली ही गडकोटांची देणगी पाहण्याचा योग येतोय, याहून श्रेष्ठ भाग्य
कोणतं? युद्ध, शस्त्र,
विजय पराजय, गनिमी कावे, युक्त्या, शह-तह या साऱ्यांच्याही पलीकडे असलेल्या
दुर्गांच्याही अतिप्राचीन अशा जागतिक इतिहासाचं अजरामर प्रकरण त्या रयतेच्या
राजानं तुम्हा आम्हासाठी विरासत म्हणून सुपूर्त केलंय. 'गडांचं लेणं ल्यालेल्या
सह्याद्रीच्या रुपात.'
खूप फिरलो, फोटो
काढले, थकलो तरीही काळ्या कातळाला स्पर्शून जाणारा गारवा आणखी जोम वाढवत होता.
सगळे परतीच्या प्रवासाला लागलो. पण अप्पा आणि त्याच्या तीन मित्रांनी मागे थांबून
महाद्वारापाशी रॅम्प वॉक करत बॉडी शो शुटींग केलं. ते नंतर आम्हाला कळलं. नाही तर
आमच्यात बरेच जण 'ढेरी शो' करायला उत्सुक होते. संधीचं सोनं करण्याचा खुळा नाद
यांनीच करायचा. वेळ भराभर संपत
असतो, पुढचा पल्ला गाठणं भाग असतं, तरीही या शेवटच्या पायरीवरून पाय निघत नाही.
सौख्य डोळ्यांत साठवताना पापणी मिटून हे महान दृश्य अदृश्य होऊ नये ही भिती
काळजाला स्पर्शून जाते.
उतरताना भरपूर भीती
वाटत होती. तोरणा गडाचा 'ढुंगण पॅच' आठवला. आधाराचा एक हात सर्वांसोबत होता, पंकज
माने सर.. पाय ओढणारे बरेच बघितले जगात. पण आपण ढासळू नये, निसरड्यावरून घसरू नये
म्हणून पायाला हाताचा अन् 'मी आहे घाबरू नका, पडू देणार नाही' असा शब्दांचा मनाला
आधार देणारा अवलिया माणूस एखादाच. जो नेहमी आमच्या सोबत असतो.
चिअर्स फक्त
पेल्याला पेला भिडल्यावरच होतं असं नाही, हृदयाला हृदय भिडलं तरी जल्लोष होतो.
त्यातून उमलणारी आनंदधून अधोरेखित होते. ज्यांच्या सहवासात आयुष्य बहरून जावं अशी
विलक्षण माणसं भेटणं नशीबच. एका दिवसासाठी
आम्ही भेटतो, पण पुढच्या ट्रेक पर्यंत ती आठवण तशीच ताजीतवानी राहते, महिनाभर... पुढे अंतापर्यंतही
राहिलंच...
स्मार्टफोन स्लो
झाला की स्पेस तयार करतो आपण. नको त्या फाईल्स डिलीट करतो. आयुष्याला मरगळ आली की
नको असणाऱ्या आठवणी, ताप देणारी माणसं अशीच डिलीट करायची. मग गाडी रुळावर येते बरोबर.
खाली उतरून
नाणेघाटाकडे मोर्चा वळवला. नाणेघाट हा
सातवाहनकालीन इसवीसन पूर्व पहिल्या शतकातला खोदकाम केलेला घाट. म्हणजे जवळजवळ २१००
वर्षांपूर्वीचा. एक टोक जुन्नर तर दुसरं टोक कोकण. टोलसंस्कृतीचा सर्वांत जुना
पुरावा. जकातीचे पैसे-नाणी
साठवण्याचा हंड्याच्या आकाराचा दगडी हौद स्वागतासाठी उभा दिसला. हरिश्चंद्राच्या
रांगेतला हा घाट. मौर्य राजानंतर
सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी हा घाट खोदला. येथील गुहांमध्ये ब्राम्ही भाषेतील
लेख आढळतात. अजूनही कोणी वाचू शकलं नाही. घाटातून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी आरामाची ही जागा असावी. विशेषतः
रोमहून आयात होणारा माल सोपाऱ्याला उतरवला जाऊन तेथून कल्याण, नाणेघाट, जुन्नर,
नेवासा मार्गे पैठणकडे नेला जात असे. तसेच निर्यातीच्या वस्तूंची वाहतूक देखील याच
मार्गावरून उलट दिशेने होत असे. भारी वाटलं बघून. भरपूर फिरलं
पाहिजे, नवनवीन गोष्टी पाहिल्या पाहिजेत याची जाणीव झाली.

उद्या आपण
मृत्यूपत्र लिहायला बसू तेव्हा आपल्याला कळून चुकेल की एकमात्र व्यक्तीचा या
जमवलेल्या संपत्तीवर काडीमात्र हक्क नाही, ती व्यक्ती दस्तुरखुद्द स्वतः आपण. मग
एवढा संपत्ती जमवण्याचा अट्टाहास का? हा विचार महत्त्वाचा. आपण कमावलेल्या संपत्तीचा उपभोग आपणच घ्यायचा. जगायचं दिलखुलास.
गाडीत येऊन ओले
झालेले कपडे बदलले. जेवणाकडे निघालो. पुढे जाऊन एका ठिकाणी व्हेज, नॉनव्हेज
जेवणावर ताव मारला. चिकन भाकरीची चव चाखली. अगदी घरगुती पद्धतीचं जेवण जेवलो. तृप्त जाहलो. पंकज सरांच्या ओळखी सगळ्या
गडकिल्ल्यांकडे कशा काय? हा संशोधनाचा विषय.
गाडीत बसून परतीची
वाट धरली. अवघ्या ६२० रुपयांत स्वर्गीय सुखाचा अनुभव मिळाला. सह्याद्रीत फिरताना
किल्ले, बुरुज, तटबंदी, स्थळ, घटना जाणून घेत, काळजाला शिवबाच्या पराक्रमाचा अर्थ
कळतो. मग अक्षरांच्या पावलांनी जगलेल्या प्रसंगांच्या पाऊलखुणा उमटतात कागदावर आणि
जिवंत होतात अनुभवलेल्या सगळ्या क्षणांची गात्रं! मग या लेखनाला तान्ह्या
बाळासारखं तुमच्या सगळ्यांच्या ओंजळीत मला घालता येतं, अलगद. या ह्रदयीचं त्या
ह्रदयी!! अनुभवांचे बोल लिहिताना लेखक म्हणून मी देखील समृद्ध होतो.
गडकोटांच्या
क्षितीजांची आपली स्वप्नं रवी काळे अन् पंकज माने या दोघांच्या साथीनं अशीच उजळत,
शेकडो गडकिल्ले सर होत राहो, हीच इच्छा. भेटू वेगळ्या
गडाच्या नव्या वाटा धुंडाळताना...
तोपर्यंत जय
शिवराय!
पुढील ट्रेक -
त्र्यंबकेश्वर,
ब्रम्हगिरी, दुर्गभांडार, मिनी केदारनाथ (नाशिक दौरा)
रविवार दिनांक १६
ऑक्टोबर २०२२
आयोजकांशी अवश्य
संपर्क साधा.
आयोजक
रवी काळे सर
(पुणे
महानगरपालिका)
गडकिल्ले प्रेमी
प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी
90964
65675
मार्गदर्शक
पंकज माने सर
8668251375
शब्दांकन
आयुब शेख सर
प्राथमिक शिक्षक
पुणे महानगरपालिका
9552941271