Tuesday, January 31, 2023

लाल मातीतला कत्तलगड, कमळगड - सह्याद्रीचा फ्रीज (गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी सोबतची भ्रमंती)

 

लाल मातीतला कत्तलगड, कमळगड - सह्याद्रीचा फ्रीज

(गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी सोबतची भ्रमंती) 

                  शनिवारी ७ जानेवारी २०२३ रात्री दहा वाजता गाडी निमगाव म्हाळुंगी मधून अमोल नागवे, वैभव करपे, रवींद्र काळे(अझहर), शरद काळे, रवींद्र काळे (सर), विठ्ठल वडघुले, प्रदीप मांढरे, वैभव चव्हाण, गणेश दादा घोरपडे, सौ. लांडगे, सार्थक काळे, गुरुदत्त गोसावी, महेश गोसावी, विशाल घावटे, दिपाली अडसूळ, सुरज अडसूळ, बाळासाहेब लांडे, निलेश काळे, सुभाष बोरकर, प्राची वाखारे, भास्कर शिंदे, शामराव साळुंखे, निर्मला साळुंखे, लक्ष्मण लोंढे, भरत साकोरे, भूषण साकोरे हे २६ मावळे घेऊन सासवडच्या दिशेने निघाली. कारण पहिलं दर्शन नारायणपूरच्या एकमुखी श्रीदत्तात्रेयाचं करण्याचं नियोजन होतं.

               पुण्याच्या गाडीत मुरलीधर कटके, अनिल गवारे, संदीप पंधरकर, शैलेश दाभाडे, प्रियंका दाभाडे, सुधाकर सलगर, पुरुषोत्तम, निलेश दाभाडे, अतुल गोपाळे, दिनेश लाटे, परमेश्वर पांडे, प्रथमेश काळे, रामचंद्र नरवडे, नितीन शिंदे, पांडे सर पुतण्या,  मुकुंद फुंदे, पवन रेणुसे, विजय माने, रासकर सचिन, स्वाती रासकर, भूषण बहिरमे, रवींद्र भोसले, अथर्व भोसले, नामदेव खांडेकर, प्रवीण कासारे, केशव पाटील, सुनील खाडे, लक्ष्मण आरु, वैजनाथ गोल्हेर, मेघराज घोरपडे, रघुनाथ चोरघे आणि मी एकूण ३२ मावळे रात्री साडेबाराच्या सुमारास मंदिराच्या परिसरात पोहोचलो. पुणे गाडीचं संपूर्ण नेतृत्व कटके सर, माने सर आणि खाडे सरांनी केलं. गडकिल्ले प्रेमी या ग्रुपमध्ये शाळकरी, कॉलेजची मुलं, शिक्षक, शेतकरी, कंपनी कामगार, व्यावसायिक, महिला, नेव्ही आणि आर्मीचे निवृत्त अधिकारी, राजकीय व्यक्तींचा नेहमीच समावेश असतो. वय, जात, धर्म, पंथ, शिक्षण, पैसा, ऐपत यांपलीकडच्या या ग्रुपमध्ये शिवरायांचा जाज्वल्य इतिहास अन् सह्याद्री दर्शन हेच उद्दिष्ट असतं नेहमी. इथे सगळे केवळ भटके.

                      ग्रुप आता जोमाने वाढू लागलाय. आयोजक काळे सरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. प्रारंभ लहान असला तरी सातत्याच्या प्रयत्नाला गोड फळे लागतातच. छत्रपतींनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला, तेव्हा मूठभर मावळे सोबतीला होते पण महाराजांचा निश्चय आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे लोकसंचय वाढला. सर्वसामान्य माणसांच्या हक्काचं स्वराज्य निर्माण झालं, महाराज छत्रपती झाले. त्याच श्रद्धेने आमचा हा ग्रुप गडकिल्ले भ्रमंतीची हौस पुरी करतो.

                     गणेश घोरपडे दादांचा फोन आला, काही कारणास्तव गाडी दोन तास उशिरा येणार होती. दत्तमंदिर आणि शेजारीच असणाऱ्या काळ्या कातळातील कोरीव महादेव मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं. गप्पाटप्पा करत वेळ निघून गेला, दुसरी गाडी आली. महिन्याभरानंतर गळाभेटी झाल्या. पंढरपूरच्या वारीला अशाच कित्येक दिंड्या दरवर्षी एकमेकांना भेटतात. हा नयनरम्य सोहळा दर महिन्याला आम्ही अनुभवतो. गारठा बराच जाणवत होता. गाडीत बसून साताऱ्याकडे निघालो.

                         पहाटे चार साडेचारच्या दरम्यान अंधाऱ्या काळोखात आम्ही तुपेवाडी गावात उतरलो. थंडीने हुडहुडी भरली होती. तरीसुद्धा गाडीतून सगळे खाली आले. महिलामंडळी, छोटी मुलं, सगळेच. बाळाभाऊ आणि त्यांच्या टीमने मॅगीची तयारी केली. गरमागरम चहा आणि पतंजली बिस्किटं यांचा आस्वाद घेतला. इथे कोणी छोटे मोठे नाही. सगळे एकमेकांना मदत करतात. बाळाभाऊ आमच्या या ट्रेकींग ग्रुपचे खऱ्या अर्थाने अन्नदाते! चहा, मॅगी, पोहे, साबुदाणा खिचडी, शिरा, बिर्याणी, चिकनचं कालवण यांसारखे कित्येक पदार्थ ते दरवेळी आमच्यासाठी बनवतात. यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव आठवडाभर आधीच निमगावात केली जाते. भरपेट नाश्ता, प्रातर्विधी उरकून आम्ही गडाच्या दिशेने निघालो.

                         साठ जणांची ही टोळी एका रांगेत गडाकडे प्रस्थान करत होती. फोटो व्हिडिओ काढत, मज्जा करत आम्ही चालत राहतो. एक स्थानिक गाईड सरांनी आधीच ठरवला होता. कारण यावेळी आमचे मार्गदर्शक, पथदर्शक पंकज माने सर सोबत नव्हते. लगीनघाईत नवरदेव अडकलेला होता. ते नसल्याची खंत कमी मात्र लग्नबंधनात अडकल्याचं सुख जास्त आल्हाददायक होतं. सुरज बोरावके, गिरीश तांबे, अक्षयकुमार कांबळे, नेव्ही मॅन चव्हाण बंधू, डॉक्टर अभिजीत चव्हाण, अप्पा रणसिंग यांसारखी बरीच जुनी मंडळी नव्हती. संतोष लांडे भाऊंची जंगल हादरवून टाकणारी गर्जना नव्हती. अशावेळी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. पण अनेक नवीन चेहरेही होतेच. या गडाच्या मार्गात ठिकठिकाणी दिशा दर्शवणारी चिन्हे दाखवली आहेत. गडावर कसं वागावं, याचे बरेचसे बोर्ड लावलेत. भारी वाटलं. किल्ल्याला भोर किंवा वाई हे सर्वांत जवळचे शहर. पुण्याहून सहज पोहोचता येते. तुपेवाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचं गाव. तुपेवाडीच्या दक्षिणेकडील टेकडीवरून ट्रेकिंगचा मार्ग सुरू झाला.

                            दोन चार नवीन मावळे सुरुवातीला बिचकले पण जिद्द कामी आली. मोठ्या उत्साहाने त्यांनी चालणं मनावर घेतलं. झाडांनी व्यापलेल्या मार्गातून आमची फौज निघाली. डोंगरी वाट 'कमलमाची' नावाच्या मोकळ्या जमिनीवर संपली. माचीवर जांभूळ आणि पिसा वृक्षांचे घनदाट जंगल. चालत डावीकडे वळण घेत एकट्या गावकऱ्यांच्या झोपडीपाशी पोहोचलो. बालेकिल्‍ला माचीपासून २० मिनिटांत पोहोचता येईल अशा स्थितीत. जंगलाच्‍या क्षेत्रापासून ३०-४० फूट उंचावर जाणारा सर्प आहे, असाच भास बालेकिल्ला पाहताना होतो. उभी चढण चढत मंदिरापाशी आम्ही आलो. कोणीतरी देवाला वाहिलेल्या नारळाचा प्रसाद आम्ही सर्वांनी वाटून खाल्ला. दर्शन घेऊन पुन्हा चढणीला सुरुवात. मोडकळीस आलेलं 'दगडी वयोवृद्ध प्रवेशद्वार' वाकलेल्या अवस्थेत स्वागतासाठी सज्ज उभं होतं. पाठीचा बाक आलेल्या रुपात. वर जाण्यासाठी लोखंडी शिड्यांची सोय करून गड संवर्धन समितीने शिवबाचा जाज्वल्य इतिहास जपलाय.

                              काही पायऱ्या चढून लाल मातीचा समृद्ध प्रदेश नजरेस पडला. लाल कावेची विहीर दिसली. याचसाठी केला होता अट्टाहास. एक वेगळ्या प्रकारची ही विहीर. भलीमोठी, आयताकृती. विहिरीच्या मुखाशी प्रशस्त जागा बघून आम्ही तिथेच बसलो. नवीन जुन्यांची ओळख परेड झाली. सताड उघडी असणारी ही स्वर्गाची दारं पाहण्यासाठी आलेली कित्येक लहानथोर पाखरं अपरंपार सुख अनुभवण्यासाठीची ग्वाही देत इथपर्यंत पोहोचली. काळ्या कातळातला संपन्न सह्याद्री पहायला. सोबत आणलेली बिस्कीटं, चिक्की, खाऊ खाल्ला. छोट्या मुलींची भाषणे झाली. "होय, मी जिजाऊ बोलतेय!" या आशयाचं लख्ख डोळे उघडणारं भाषण पोरीनं केलं. माने सरांच्या मित्रांनी रविंद्र भोसले यांनी स्वराज्याचं गाणं म्हटलं. "आम्ही गड्या डोंगरचे राहणार!" मस्त वाटलं. सगळा शीण निघून गेला. उत्साहाचं भरतं आलं. रामचंद्र नरवडे यांच्या कित्येक मिमिक्री आम्ही ऐकल्या. गडभ्रमंती करत रस्त्याने जाताना सुद्धा त्यांनी कित्येक विनोद सांगून आम्हाला हसवलं. भन्नाट कलाकार माणूस.

                         गणेश दादा घोरपडे यांनी भैरवगडाचे कित्येक किस्से सांगत पोट दुखेपर्यंत हसवलं. घाबरत बिचकत भैरवगड चढणाऱ्या एका व्यक्तीची धर्मपत्नी पायथ्याशी बसून आवाज देत होती, तिचं कुंकू कसं शाबूत परत येईल याची रंगलेली मैफिल ऐकताना हसून हसून काळीज घशाशी आलं आमच्या. सरणावरचं मढं सुद्धा हसत पळत सुटेल अशी जादू दादाच्या विनोदात आहे. प्रतिक्षणी आनंदी राहण्याचा वसा घेतला की कोजागिरी मावळत नाही, हेच खरं. असे कित्येक कोजागिरीचे चंद्र या माणसाच्या व्यक्तिमत्त्वावरून ओवाळून टाकावेत.

                        कमलगडाला भेलांजा किंवा कत्तलगड असेही संबोधले जाते. सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील एक चौकोनी डोंगरी किल्ला. धोम धरण या सरोवरात उमललेलं रक्तवर्णी कमळच जणू. डोंगरी प्रकारातला उंची ४२०० फूट असणारा. वाईच्या पश्चिमेस दहा मैल (१६ किमी) आणि साताऱ्यापासून ३२ किमी अंतरावर. मराठ्यांच्या काळात कमलगड, पांडवगड आणि परिसरातील इतर किल्ले विजापूर येथील मोकसद्दर (व्यवस्थापक) द्वारे चालवले जात होते. मराठी भाषेतील आताच्या मोडी लिपीत लिहिलेल्या सुरुवातीच्या कागदपत्रांमध्ये या किल्ल्याचा उल्लेख 'कट्टलगड' असा होतो. एप्रिल १८१८ मध्ये, मेजर थॅचरच्या नेतृत्वाखालील ब्रिटीश तुकडीच्या प्रतिकारानंतर कमलगडाने आत्मसमर्पण केले. ब्रिटीशांच्या अंतर्गत, युद्धकैद्यांना फाशी देण्यासाठी याचा वापर केला जात असे. म्हणून हा कट्टलगड. किल्ला एक सपाट क्षेत्र ३ते४ एकर आकारात व्यापलेला आहे. माथ्यावर कोणत्याही इमारती नाहीत पण ऐतिहासिक वारसा जपत किल्ला सज्ज उभा आहे. थोडीफार तटबंदी ऐतिहासिक साक्ष देत उभी आहे. सह्याद्रीच्या सौंदर्याला तोड नाही, ज्याने आम्हा सर्वांना अगदी वेडं केलंय.

सह्याद्री

नाद लावतो,

वेडावून सोडतो,

झपाटून टाकतो,

पुन्हा पुन्हा येण्याचे कारणही बनतो....

निळ्याशार नभांचे नि थंडगार तळ्यांचे,

वेड्या वाकड्या घाटांचे,

नि घाटातल्या वळणांचे,

घनदाट झाडीचे नि वेलींच्या जाळींचे,

उदयोन्मुख सूर्याचे आणि सूर्यास्ताच्या चंद्राचे

वेड लावतो,

असा हा सह्याद्री वेड लावतो!

                         नामदेव, पवन, संदीप, ज्युनिअर आणि सिनियर वैभव करपे यांचे बरेच फोटो घेऊन आम्ही पटापट गड उतरू लागलो. मध्येच वैजनाथ, सुनिल खाडे, फुंदे सर भेटले. खाली उतरताना कासारे सरांचा पाय मुरगळला. आम्ही वेगाने खाली येत होतो, ते थांबलेले दिसल्यावर वैजनाथने आपुलकीने चौकशी केली. त्याने आणि संदीपने त्यांना आधारासाठी काठी आणून दिली. खाडे सरांनी दुखावलेला पाय चोळून दिला. सुनिल खाडे हे प्रत्येक ट्रेकला सगळ्याच बाबतीत सहकार्य करतात. माणुसकीचं भलंमोठं उदाहरण त्यांनी इथं मांडलं. चोरघे सर, शिंदे सर आणि तीन चार जण रस्ता चुकले. काळे सरांनी फोनवर माहिती देत पुन्हा त्यांना योग्य मार्ग सांगितला.


                    पुढे गाडीत बसून रिसॉर्टच्या स्विमिंग पूल मध्ये धम्माल केली. व्हेज नॉनव्हेज अनलिमिटेड जेवलो. तिथे प्रत्येकी ६००/- रुपये दर होता पण काळे सरांचे मित्र सचिन वडघुले (तलाठी) यांच्या ओळखीने आम्ही फक्त २००/- रुपयांत हे सुख उपभोगत होतो. सहाशे रुपये खर्चून जेवढी मज्जा इतरांनी केली नाही त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आम्ही मौज केली. भरपूर एक्स्ट्रा गुलाबजाम आम्ही खाल्ले. हॉटेलमधले एक गृहस्थ आम्हाला खुल्या हस्ते देत होते. देवमाणूस वाटले आम्हाला. पण नंतर समजले ती प्रत्येक गुलाबजाम वाटी ५०/- रुपयांना होती. आम्हाला पश्चात्ताप झाला पण सचिन वडघुले यांच्या शिफारशीनुसार ते मोफत मिळाले. सचिनची पत्नी मेघा वडघुले ही आमच्या कटके सरांची विद्यार्थीनी निघाली. आमच्या सरांना आणि त्यांच्या मित्रमंडळींना काहीही कमी पडू देऊ नका अशी तंबी तिने आपल्या पतीराजांना दिली. एकंदरीत सगळं काही उत्कृष्ट झालं. शिवप्रतिमा देऊन गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे यांच्याकडून उभयतांचा सन्मान केला.

                     प्रत्येक गड किल्ल्याच्या पायथ्याला सरांची मित्रमंडळी कशी काय? हा प्रश्न कित्येक वर्ष आमचा अनुत्तरित राहिलाय. गडभ्रमंती करून आल्यावर केलेली ही मज्जा म्हणजे 'नैवेद्यासाठी बनवलेल्या पुरणाच्या पोळीवर साजूक तुपाची धार सोडावी' अगदी तसंच झालं. परतण्याच्या मार्गावर आम्ही मॅप्रो इथे थांबलो. सगळ्यांनी खरेदी केली. तिथे टेस्टिंग साठी काही पेरूच्या चॉकलेट ठेवलेल्या होत्या. पोट भरेल इतक्या त्या चॉकलेट्स आम्ही तिथे घेतल्या की आम्हाला खरेदी करण्याची इच्छाच राहिली नाही. सगळा आनंदीआनंद साजरा करत आम्ही माघारी फिरलो. फक्त ६७०/- रुपयांत स्वर्गीय अनुभवाची अनुभूती मिळाली. तरी यामध्ये पाच सहा छोट्या मुलांचा संपूर्ण खर्च मोफत केला आहे.

श्वास घेतोय तोवर

जगून घ्यावं छान,

झाडालाही माहित नाही

कोणतं गळेल पान?

या विश्वासावर आलेला प्रत्येक क्षण आम्ही दिलखुलास जगतो.

भेटू वेगळ्या गडाच्या नव्या वाटा धुंडाळताना...

तोपर्यंत जय शिवराय!

पुढील ट्रेक - क्र.३९

रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३

कल्याणगड, जरंडेश्वर, वर्धनगड, पुसेगाव मंदिर, गोंदवले महाराज देवस्थान.

आयोजकांशी अवश्य संपर्क साधा.

आयोजक

रवी काळे सर

(पुणे महानगरपालिका)

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी

90964 65675

मार्गदर्शक

पंकज माने सर

8668251375

शब्दांकन

आयुब शेख सर

प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका

9552941271

4 comments:

  1. खुपच अप्रतिम सर 👌👌👌

    ReplyDelete
  2. खुप सुंदर लेख लिहिला आहे.....💐

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर लेख सर👌👌👌

    ReplyDelete

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...