बाईपण भारी देवा!
नात्यांची गुंफण, घराघरातली कहाणी, आनंद, दुःख, दिखावा, समजणं, समजून घेणं, जमवणं, सोडून देणं, दुरावा, प्रेम, भावना, द्वेष, विनोद या विविधांगांनी सजलेला हा चित्रपट केवळ स्त्रियांसाठी नाहीच मुळी...
पुरुषांनाही आयुष्य आहे, संसार, नाती आहेत, अडचणीही आहेत, समाधान हवंय. मग त्यांनी हे का पाहू नये?
'मी ते करायला हवं होतं' हे आयुष्यातलं सर्वांत क्लेशकारक वाक्य आहे, याची प्रचिती आणणारं हे दोन तीन तासांचं अत्यंत भावनिक आवाहन तुम्ही पहायलाच हवं.
पन्नाशीच्या वयात दुसरं लग्न करण्यासाठी नवऱ्याला घटस्फोट देऊन मुक्त करणारी 'ती' स्वतः स्वतंत्र होते, ही घटना जाम भारी वाटते.
ज्या त्या वेळी ते सुचलं नसेल तरीही वेळ गेलेली नसते. माफी मागून किंवा माफ करून चुका सुधारता येतात, हे समजलं की हेवेदावे, रागलोभाची कुंपणं आपोआप गळून पडतात.
चुकलं असेल, रागाच्या भरात बोललं असेल पण आपलंच माणूस आहे, वेळ असते, अडचण असते, विवंचना असते, जातो बोलून काहीतरी, एवढं काय मनावर घ्यायचं? हे सूत्र जपलं की सगळं सोपं होत जातं.
त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने विचार केला तर 'तुटेल या भयाने जोडून राहण्यातही कधीकधी काहीच अर्थ नसतो. असून नसल्यापेक्षा नसलेलं बरं, हेच खरं. समोरचा आपल्याला काय समजतो? हे माहित असणं खूप गरजेचं आहे.
त्या बिरबलाच्या खिचडीच्या गोष्टीतल्या माणसासारखं आपण कडाक्याच्या थंडीत नदीत रात्रभर उभे राहतो, परीकथेच्या विश्वातल्या त्या मिणमिणत्या दिव्याच्या उजेडाच्या भरवशावर. अन् वेळ गेल्यावर हाती कणभरही न शिजलेली खिचडी येते. म्हणून माणूस डोळस असला की इसापनीतीच्या पराभूत झालेल्या ससा कासवांकडूनही बरंच काही शिकतो.
नात्याची वीण दोन्हीबाजूने नीट विणली जातीये का? हे पहायला शिकावं. नाही तर जास्त ताणू नये म्हणून आपण नात्याचा दोर अगदीच सैल सोडतो आणि बऱ्याच उशिराने आपल्याला कळतं की, पलीकडून दोर कधीच सोडलेला आहे. अशावेळी समजतं, वेंधळ्यासारखे नको त्या गोष्टींसाठी किती खपत होतो आपण. माझ्याशिवाय कसं होईल? हा विचार पहिल्यांदा कचऱ्याच्या टोपलीत टाकता यायला हवा.
एकाच विनोदावर पुन्हा पुन्हा हसत नाही आपण, मात्र एकाच दुःखावर पुन्हा पुन्हा रडत बसतो, ही चूक लक्षात यायला हवी.
वाटीतली बासुंदी अगदी चव चाखत संपवावी, कुठं जाण्याची घाई नाही, काहीतरी उरकून टाकण्याची वखवख नाही. असंच कधीतरी आयुष्यही जगायला हवं, अगदी चमचा चमचा क्षणांची चव चाखत, स्वतःसाठी.
जग आपल्याला व्याख्येत बांधू पाहील, आपण मात्र अपवाद म्हणून जगत राहायचं, निरंतर!
थिएटरबाहेर सुरुवातीला बाईपणाची भरगच्च गर्दी पाहून वाटलं उगाच आलो, या घोळक्यात. पुरुष अगदीच बोटांवर मोजण्याइतके, अल्पसंख्याक. पण मस्त वाटलं. चुका सुधारण्याचा शेवटचा एक क्षण तर डोळे पाणावणारा आहे, जिथं वाटतं बरं झालो आलो.
जगून घ्या. आयुष्य एकदाच आहे, ते ही अगदी थेंबाएवढं. आपला अहंकार मात्र समुद्राएवढा.
पोस्ट वाचलीत? आवडली? आता चित्रपट नक्की पहा!
आयुब कलाम शेख, पुणे.
9552941271
☺️




No comments:
Post a Comment