Monday, November 27, 2023

बहिर्जी नाईक कादंबरी भेटीचा प्रसंग!

 बहिर्जी नाईक कादंबरी भेटीचा प्रसंग!

काल‌ वैराटगड, दिवाळी विशेष ट्रेकमध्ये जिवलग मित्र गणेश दादा घोरपडे यांनी माझ्यासारख्या एका वाचकाला 'बहिर्जी नाईक' भेट दिली. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना भेटवस्तू आवडतात, पण ती भेट अशी आवडीची असेल तर आणखी भारी!

दादा, शिंपल्यासारखी खूप कमी लोकं. जे दुसऱ्यांना मोत्यांसारखं घडवण्यासाठी हातभार लावतात. गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या माध्यमातून अशी कित्येक सोन्यासारखी माणसं भेटली. आपल्याभोवती आपल्या चॉईसची माणसं आहेत, हा आनंद वेगळाच असतो, हे ग्रुपचे वैशिष्ट्य आहे. कधी कधी वाचलेल्या पुस्तकांपेक्षा भेटलेली माणसं जास्त काही शिकवून जातात. दादा, तुम्ही त्यांपैकीच एक.

खपण्यासाठी खूप पुस्तकं छापली जातात पण जपण्यासाठी असं दिलेले एखादं पुस्तक लाखमोलाचं. ही भेट मी निकराने जपण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद....

प्रवीण दवणेंच्या कवितेच्या काही ओळी आठवल्या. त्या दादांना समर्पित...

दुःख पाहुनी दुसऱ्याचे

ज्याचे भरतात डोळे,

डोळ्यांतल्या त्या पाण्याला

तीर्थ भेटायास आले!

अशा माणसांचा स्पर्श

पांडुरंग होई,

ज्यास देव सापडला

माणसाच्या ठायी!

त्यास मंदिराच्या भिंती

दिशा सर्व दाही...

अशी प्रेम करणारी माणसं जपण्याचा नक्की प्रयत्न करीन.

माझ्यासारख्या अवगुणी माणसाला सांभाळून घेताय, त्याबद्दल आभार सर्वांचे...

दादा, सुमधुर भेटीसाठी पुन्हा पुन्हा thank you...

😇☺️🙏🏻

Tuesday, November 21, 2023

श्यामची आई चित्रपट

 


कित्येकदा 'श्यामची आई' पुस्तकाची पारायणं केलीयेत मी. अगदी डी.एड.पासून आतापर्यंत.
'भरजरी गं पितांबर' गीत ऐकल्यापासून अन् ट्रेलर बघितल्यापासून फिल्म बघायची आस होतीच मनात. निर्मात्याने आजच्या युगातही कृष्णधवल सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणत घटनांचं मूल्य जपलंय. आईच्या संस्कारांचं पावित्र्य अबाधित ठेवलंय.
'श्याम'ची तिन्ही वयातली रुपं काय खास निभावलीयेत कलाकारांनी.
चित्रपट पाहण्यासाठी तुमचं मन मात्र हळवं हवं, चित्त अगदीच शुद्ध हवंय. हे असेल तर तुमच्या डोळ्यातून वाहणाऱ्या धारेला खंड नसेल एवढं मात्र नक्की.
कळ्या ओरबाडून आणणारा, पोहण्याची भिती वाटते म्हणून लपून बसणारा श्याम अन् कधी मऊ तर कधी जहाल होऊन संस्कार करणारी 'आई'. ज्वराने तापलेली आई अन् वटसावित्रीच्या आईच्या फेऱ्या स्वतः मारणारा श्याम. अहाहा! काय सुरेख.
इतक्या महान कलाकृतीच्या चित्रपटाला प्रेक्षक मात्र अतिशय तुटपुंजे होते, ही खंत अश्वत्थाम्याच्या कपाळावरच्या अमरत्व लाभलेल्या जखमेसारखी भासते. मराठी चित्रपट सृष्टीची ही मरणासन्न घरघर जाणीवपूर्वक थांबविण्यासाठी मराठी प्रेक्षकांनी प्रयत्न करायला हवेत.
पोराबाळांसहीत चित्रपट सहकुटुंब अवश्य बघायला जा.
😇👍🏻

Monday, November 20, 2023

बालदिन शुभेच्छा


 प्रवासाला निघावं, खिडकीजवळची जागा मिळावी आणि भरभर एक एक गाव करत पुढे निघून जावं...

तशीच वर्षे सरत जातात आयुष्यातली....

हळूच फ्लॅशबॅक मध्ये डोकावून पहावं तर लख्ख आठवतं सगळं...

काळजात सगळ्यात जास्त जागा बालपणाच्याच किस्स्यांची...

म्हणून कितीही मोठे झालो आपण तरी काळजातलं ते बालपण हिरव्या कोंबासारखं टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.

मन भरून जगणाऱ्या सगळ्यांना बालदिनानिमित्त गोड गोड शुभेच्छा..

😍😇

दिवाळी टास्क


 Task 😇

गोरगरीबांशी दिवाळीचा घास वाटून खा, असा दिवाळीनिमित्त दिलेला टास्क आणि पूर्णत्वास नेणारे तिसरीचे चिमुरडे...

खरंतर फराळ देणारी ही चिमुरडी पोरं काही जहागीरदार नाहीत, पण मन मोठं करून वाटून खाण्याची दानत महत्वाची असते, हे जाणवतंय या वयातही....

गुरू ठाकूरच्या ओळी कानात हळूवार फुंकर घालून गेल्या...

बाहेर आहे झगमगाट

उजळलाय सारा गाव,

आतल्या अंधाराचं काय?

तिथे एक दिवा लाव....

नेणिवेच्या दारावर

जाणीवेच्या पारावर,

जिथे जिथे असेल वाव

तिथे एक दिवा लाव...

😇🍫

Wednesday, November 15, 2023

12th fail movie

 


12th fail 🎞️📽️📹

जिद्दमेव जयते या धर्तीवर आधारित जबरदस्त चित्रपट.

उगाच मसाला नाही, बोल्ड सीन नाहीत की खोटेपणा नाही.

प्रामाणिकपणाची एक ठिणगी काय बदल घडवू शकते याचं उत्तम उदाहरण.

रात सर पर है और सफर बाकी,

हमको चलना है सवेरा होने तक!

प्रयत्नांची पराकाष्ठा करत IAS झालेलं पोर आणि आनंदाश्रूंनी भिजलेला आईचा पदर तुमच्या माझ्यासारख्या गोरगरीब घरातल्या पोरांच्या कष्टाची जाणीव करून देतं..

फिल्म नक्की बघा आणि आपल्या मुलांनाही दाखवा.

तिकीट काढून सुंदर चित्रपट पाहण्याची संधी दिल्याबद्दल पोटे सरांचे आभार!

😍

Friday, November 10, 2023

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपकडून जि.प.शाळेस पुस्तके भेट



आम्ही प्रकाश बीजे रुजवित चाललो,

वाटा युगाच्या नव्या रुळवीत चाललो!

गड किल्लेप्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी, पुणे हा समविचारी, वैविध्यपूर्ण, सहकार्यशील, सामाजिक जाणिवांचा जागर करणारा ग्रुप आहे.

मागच्या रविवारी सिंधूमाईंच्या शिरूरमधील लेकरांना मायेची ऊब देत आज ज्या गावातून ग्रुपचा पाया रचला तिथल्या प्राथमिक शाळेतल्या पोरांसाठी १९९ पुस्तकं देत दिवाळीच्या प्रारंभीच ज्ञानदीप लावला आहे.

आज गणेश दादा घोरपडे, बाळाभाऊ, अण्णा मोरे, डॉक्टर, बापू, चव्हाण मामा यांनी ग्रुपचे प्रतिनिधित्व करत पुस्तकांचे वाटप करून वाचनाची लेकरांना प्रेरणा दिली, हे कौतुकास्पद आहे.

घरात कित्येक दिवे असूनही निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो. मोबाईलमधले म्हणा किंवा इतर कित्येक ग्रुप असूनही गडकिल्ल्याचा हा ग्रुप अगदी तसाच सात्विक प्रकाश देतो. जगण्याची नवी उमेद देतो, भारी वाटतं...

ग्रुपच्या अशा समाजसुधारक कार्याचा बहर असाच वृद्धिंगत होत राहो, याच शुभेच्छा!

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या नावानं चांगभलं!

🙏🏻☺️🌸💐

त्या बाबाने माझं रक्षण केलंय सिंधुताई सपकाळ



त्या बाबाने माझं रक्षण केलंय...

फोटोत दिसतेय ही पुरंदरमधल्या कुंभारवळण गावातल्या सिंधुमाईंच्या ममता बालसदनाच्या प्रवेशद्वारावरची हजरत फकीर बाबा यांची समाधी आहे.

याठिकाणी माईंनी एका झोपडीत सोळा पोरांना सांभाळलं. त्यावेळेपासून ही समाधी(कबर) सिंधूमाईंना आधार देत आलीये. म्हणून ती आजही तिथेच आहे.

☺️



eduतंत्र दिवाळी अंकासाठी संपादकीय हितगुज लेखन आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका

 हितगुज


वाचक सखेसोबती हो,

दिवाळीची लगबग सुरू असेल. फराळाची चव, दिव्यांची आरास, नवीन कपड्यांचा आनंद, घराची सजावट, रोषणाईत न्हाऊन निघण्याचे कित्येक प्रसंग सुरु असतील. यांसोबत दरवर्षीप्रमाणेच आम्हीही घेऊन आलोय, 'आपला eduतंत्र दिवाळी अंक'.

ज्यात आहेत पोटतिडकीने काम करणाऱ्या शिक्षकांची जगण्यात उतरलेली कथा.

तसं पाहिलं तर शिक्षणाच्या पद्धती, क्षेत्रं वेगाने बदलताहेत, काळ बदलतोय मग शिक्षणाची पद्धत तशीच ठेवून कसं चालेल? शिक्षणाच्या या मांडवाखालून प्रत्येक जण गेलाय, जातोय. तरीही शिक्षणात असमाधानी असेल तर मूलभूत परिवर्तनाची गरज आहे, एवढं मात्र नक्की.

खरं तर संधी देते ती शाळा, अनुभव देतं ते शिक्षण, शोधतो तो विद्यार्थी अन् त्यासाठी पुरक वातावरण निर्माण करतो तो शिक्षक. अशा धडपड्या शिक्षकांच्या अनुभवांची शिदोरी या अंकात आपली भेट घेईल.

प्रत्येक सकाळ आपल्याला एक सुवर्णसंधी देते आणि प्रत्येक संध्याकाळ आपल्याला विचारते की त्या संधीचं काय केलं? आपल्या प्रत्येकाकडे त्याचं उत्तर प्रयत्नांच्या रुपात हवंय.

आमच्या कृतिशील शिक्षकांनी चिमुकल्यांबरोबर काम करताना प्रामाणिक अनुभवांचा एक गोतावळा तयार केलाय.

पाठ्यपुस्तक म्हणा किंवा अभ्यासक्रम यांपलीकडचे उपक्रम खूप काही देणारे असतात, याची प्रचिती येते.

या सर्व प्रयोगशील शिक्षकांच्या वैविध्यपूर्ण लेखनाचा बौध्दीक फराळ 'बदलत्या शैक्षणिक प्रवाहाचा वाटाड्याच्या' रुपात आपल्या सर्वांच्या हाती देताना अत्यानंद होत आहे.

प्रेरणेची ही एक ठिणगी आहे, बाकी काही नाही. दहा दिशांच्या निश्चिंत विसाव्यावर असतानाच काय माहित तुम्हाला एखादी अकरावी दिशा या लिखाणातून सापडेलही.

आपल्या मनाचा तळ ढवळून काढणारी, माणूसपणाच्या संवेदना जागृत करणारी एखादी कृती दिसेल.

कामातली समाधानाची लय हाच खरा देवत्वाचा अविष्कार, असा विचार हळूच डोकावून जाईल.

लेखकांनी शब्दांना कुरवाळत, अनुभव कागदावर उमटवलेत आणि तान्ह्या बाळासारखं वाचकांच्या ओटीत घालण्याचा प्रयास केलाय.

हा अंक कसा वाटला? या प्रतिसादाच्या दाराबाहेर संपूर्ण संपादक मंडळ उभं आहे. आपला अमूल्य अभिप्राय नक्की कळवा.

अज्ञानाच्या अंधाराला ज्ञानाचं प्रकाशमयी कोंदण लाभावं, आपल्या पावलांपुरता प्रकाश प्रत्येकाला सापडावा, याच दीपावलीच्या ज्ञानमयी शुभेच्छा!


आयुब कलाम शेख

प्राथमिक शिक्षक

पुणे महानगरपालिका 

Thursday, November 9, 2023

ममता बालसदनातली कथा

 

स्मिता पानसरे कोषाध्यक्ष ममता बालसदन, कुंभारवळण गाव, पुरंदर तालुक्यातल्या एक किस्सा सांगितला.

माईंचा आश्रमात मदतीचा ओघ आहेच पण दहावी बारावीची चार पोरं वाढदिवस साजरा करायला केक घेऊन आली, या छोट्या मोठ्या पोरींना गिफ्ट स्वतःच्या जमवलेल्या पैशांतून आणलं, ही गोष्ट साधी नाही.

तोंडाला केक फासणारी, डोक्यात अंडी फोडणारी, वाढदिवसादिवशी घोट पिणारी, झुरके मारणारी पोरं कुठं अन् समाजभान जपणारी ही पोरं कुठं?

हा सुंदर अनुभव काळजात कोरून ठेवला, कायमचा...

☺️

खानवडी गाव आणि मी!

खानवडी गाव आणि मी!

मूल बाळ होत नाही म्हणून सावित्रीला सवत आणा म्हणता पण उद्या निदर्शनास आले की मी बाप होण्यास लायक नाही तर सावित्रीसाठी (सवता) दुसरा नवरा आणाल?

असा परखड सवाल विचारणारे ज्योतिबा फुले यांच्या पुरंदर तालुक्यातल्या खानवडी गावात जाण्याचा आज योग दीपक गायकवाड सर आणि प्रवीण पोटे सरांमुळे आला.

साऊ, मला स्त्री शिक्षणाच्या या कामात साथ देशील? असा सवाल करणाऱ्या शेठजींना "अहो मी तुमची बायको हाय, तुम्ही जे काही कराल त्या सगळ्यांत मी उभी राहीन." असं भाबडं उत्तर देणारी सावित्रीमाई. जिनं संपूर्ण हयात समाजोद्धारासाठी खर्ची घातली. 

स्रीशिक्षणाचं बीज रोवत साऊमाईंना पहिली महिला शिक्षिका म्हणून खंबीर उभे करणारे ज्योतीबा...

शुद्र समजलेल्यांसाठी घोटभर पाणी देण्याची मुभा नसण्याच्या काळात घरातला हौद मोकळा करणारे ज्योतीबा...

आजचा दिवस धन्य झाला...

☺️✌🏻

Wednesday, November 8, 2023

गोडाधोडाची दिवाळी साजरी लेखन आयुब कलाम शेख


 https://youtu.be/sXVhNVGEwUY?si=EZYrQBRPFH8loqim


गोडधोडाची दिवाळी!

आज पालकसभेत आमच्या तिसरीच्या वर्गातल्या ८० विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त ५५०० रुपयांचा फराळ वाटला.

यासाठी एका अनामिक शिक्षिकेने २०००, बालवाडी शिक्षिकेने ५०० आणि चंद्रकांत वाघमारे या पालकांनी १३०० रुपये दिले. बाकीचा खर्च वर्गशिक्षक म्हणून मी आणि चोभे सरांनी केला.

देणाऱ्यांची ही दानत पाहून ग्रेसांच्या ओळी आठवल्या,

सूर्य रोज अस्ताला जातो

कळेना मज काही,

झोळीत कधीही माझ्या

अंधार उगवला नाही!

माझ्या चिमुकल्या पोरांसाठी गोड घास देणाऱ्या या सर्व दानशूर हातांचे आभार!

दिवाळी फराळासोबत छात्रप्रबोधन दिवाळी अंक, शैक्षणिक कॅलेंडर, दिवाळी अभ्यास यांचा ही खजिना लुटून विद्यार्थी खूश!

धन्यवाद...

आयुब कलाम शेख

प्राथमिक शिक्षक,

म.न.पा.शाळा क्र.१७४बी,

कोंढवा बुद्रुक पुणे.

☺️💐✌🏻

Friday, November 3, 2023

देणाऱ्याचे हात हजारो लेखन आयुब कलाम शेख



 देणाऱ्याचे हात हजारो....

आज आमच्या राजू गोरे आणि पांडूशेठ या मित्रांनी माझ्या व प्रवीण पोटे सरांच्या शाळेला १००० पॅड भेट दिले.

शाळेतून आम्ही दोघांनी टेंपो ठरवला, गोडाऊन मध्ये जाऊन हजार पॅड उचलून टेम्पोत भरले. घामाने अक्षरशः निथळलो. साडेसातशे रुपये दोघांनी मिळून गाडीभाडे दिले.

शाळेत येऊन पॅड वाटल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरचा तो खळखळ वाहणारा आनंद पाहून आज दुपारी आम्ही जेवलोच नाही, याचाही विसर पडला. तहान भूक हरपण्याची स्थिती अनुभवली.

संध्याकाळी पाच वाजता आमचे डबे वर्गातल्या दोन पोरांना खायला दिले. आमचं पोट मात्र समाधानाच्या त्या मैफलीत तृप्ततेची ढेकर देत होतं.

आजच्या मिळकतीचं सगळं पुण्य त्या दोन मित्रांच्या पदरी आम्ही मात्र केवळ निमित्त ठरलो!

फुलं उधळणारे हात सुगंध पसरत राहतात आयुष्यभर आणि इतरांच्या आयुष्यात इंद्रधनुष्य पेरतात सात रंगांचं! असंच आनंदाचं उधाण आलं आमच्या शाळेत. पॅड नाचवत फिरणारे चिमुकले जीव.

आनंद वाटणाऱ्या ओंजळी जास्त वेळ रिकाम्या राहत नाहीत कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वरदान लाभलेलं असतं, हेच खरं. त्या मित्रांच्या व्यवसायाची आणखी भरभराट होवो, हीच सदिच्छा.

अशा कित्येक हातांची आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना सदैव मदत होते, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

आयुब कलाम शेख

प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका 

☺️🙏🏻💐🌸


उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...