Tuesday, December 26, 2023

ठिकरी वपु काळे

 


ठिकरी - व.पु.काळे
आयुष्य जवळपास ठिकरीचा खेळच. जवळच्या घरात ठिकरीचा चतकोर तुकडा अचूक पडतो, घरं लांब गेली की हातातला तुकडा नेमक्या घरात पडेलच याची शाश्वती नाही. आपण खेळ खेळणारे असलो तर सरावाने सगळी घरं जिंकूही, पण ते झालं की नंतरचा टप्पा म्हणजे त्या आखलेल्या चौकोनाकडे पाठ करून ठिकरी टाकायची. त्या टप्प्यात जवळच्या घरांचीही शाश्वती नसते आणि कोणतं घर आपली ठिकरी अचूक झेलून धरील याचाही भरोसा नसतो. जवळच्या घरांनी त्यांची कवाडं उघडी का ठेवली नाहीत आणि अचानक परक्या घरांनी सडारांगोळ्या रेखून स्वागत का केलं? याला उत्तरं नाहीत. ती शोधता शोधता एखाद्याचा डाव संपतोसुद्धा.
हे सगळं केव्हा घडतं? जेव्हा आपल्या हातात ही ठिकरी असते पण आपल्यालाच जेव्हा ठिकरी व्हावं लागतं तेव्हा?
अशाच 'सोना' नायिकेची ही कथा. तिची स्वतःची जरी 'ठिकरी' म्हणून अधूनमधून तगमग होत असली तरी इतर ठिकऱ्यांना ती ऊब देऊ शकली.
नव्या अनोळखी चौकोनात जाऊन पडण्यापेक्षा परिचयाचा जुना चौकोन काय वाईट?
सहा जणींना त्या जीवघेण्या खेळातून बाहेर काढून त्यांची आई होणारी तीस वर्षांची 'सोना'. त्यांच्यापैकी कोणीतरी जेव्हा वाट्याला आलेला चौकोन सोडायचा प्रयत्न करेल, तेव्हा ती ठिकरी योग्य चौकोनात पडणार की नाही हे ती दक्षतेने पाहणार आहे.
वपुंचे कथासंग्रह खूप वाचले, पहिल्यांदाच अखंड कादंबरी वाचनात आली.
वाचन तुम्हाला कायम तरुण ठेवतं. पण तिथेही एकांताची गरज असते. वाचलेल्या पुस्तकाविषयी आपण कुणाशी तरी बोलतो तेव्हाच त्या पुस्तकाचं खरं वाचन सुरू होतं...
म्हणून स्टेटसचा हा अट्टाहास!
पुस्तक मिळवून नक्की वाचा.
😍😇

गडकिल्ले प्रेमी ग्रुपचे अन्नदाता बाळाभाऊंच्या वाढदिवसाचे औचित्य

शरद काळे उर्फ बाळाभाऊ!

गडकिल्ले ग्रुपचे अन्नदाता.

ट्रेकदरम्यान फक्कड चहा, मसालेदार तुपातली मॅगी, मनसोक्त खावी अशी दम बिर्याणी, शिरा, उपीट, पोहे या सगळ्यांची मेजवानी देणारे...

यासाठी लागणारं सगळं साहित्य अगदी मिठाच्या खड्यापासून भांडी पातेलीपर्यंत स्वतः लक्ष देऊन आणणारे आमचे ट्रेक पार्टनर...

प्रत्येक ट्रेकगणिक ग्रुपसाठी मनापासून काम करणाऱ्या बाळाभाऊंच्या आदराची एकेक पायरी पुढे पुढे जाणारी ठरतेय.

काळे सर ट्रेकचा खर्च अत्यंत कमी प्रमाणात करतात, हे खरंय मात्र त्यात खूप मोठा वाटा उचलतात ते बाळभाऊ. त्यांच्या नाष्टा, चहा याआधी तर बिर्याणी बनवायचा घाट घातल्यामुळेच खर्च कमी प्रमाणात येतो.

या माणसाच्या संगतीत मस्त क्षण जगलो, जगतोय, पोटभर खातोय.

हा ग्रुप म्हणजे अशा कित्येक मोत्यांसारख्या माणसांची सुंदर माळ आहे, जी काळे सर अन् पंकज माने यांनी हळुवार ओवलीये.

काही माणसं अपरिहार्य असतात, त्यांची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही.

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपचं जेव्हा कधी नाव निघेल, त्यात बाळाभाऊंचं नाव अढळपदावर असेल, एवढं मात्र नक्की..

आमच्या ग्रुपच्या अन्नदात्यास आणि एका सच्च्या दिलदार व्यक्तीमत्त्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

🎊🍫💐🎂

आषाढ रणजित देसाई

 

आषाढ

- रणजित देसाई

अठरा ग्रामीण कथांचा संग्रह. वैशाख, आषाढ, मेघ यांसारख्या ऋतूंवर अन् माणसांच्या जीवनावर आधारित कथा. लेखकाची सिद्धहस्त लेखणी. माणसातल्या भावभावनांचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारं पुस्तक.

खरंतर रडक्या कथांचा संग्रह, असं म्हणायला हरकत नाही. कारण यातल्या कमाल कथांचा शेवट हा दुःखदच लिहिलाय. पण आयुष्यात सगळ्यांच गोष्टींचा शेवट सुखद थोडीच होतो, हे ही खरंच.

कथेची सुरुवात मात्र वातावरण निर्मिती करणारी. काल एका दिवसात संपवलं.

परवा रवी काळे सरांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या पस्तीस पुस्तकांमधली मी न वाचलेली पाच पुस्तकं उचलून आणली. त्यातलंच हे एक!

त्याबद्दल काळे सरांचे आभार!

पाडी कथा खूप आवडली.

दोन टवाळ पोरं नदीवर पाणी भरणाऱ्या एका सुंदर स्त्रीची शिटी वाजवून दोन-चार वेळा टर उडवतात. रागाने बघत ती काहीही न बोलता पैलवान नवऱ्याला नदीवर घेऊन येते. नवऱ्याला नदीत साप असल्याचे सांगते, तो नदीतला भला मोठा दगड सहजगत्या उचलतो, साप नाही म्हणत निघून जातो. दोघांची बोबडी वळलेली पाहून गालातल्या गालात हसते. दोघांची वाचा बंद असल्याचे पाहून स्त्री दोघांना म्हणते,

"बाबांनो भिऊ नगासा, ह्यांच्या कानावर म्या घातलं असतं तर बोलायला जिता राहिला नसता तुम्ही. देवानं मला जसं रुप दिलं तसाच सूर्यावाणी नवरा दिलाय. मला तुमचं बोलणं वाईट लागलं न्हाई, पण गमतीला बी मर्यादा असते."

भल्या मोठ्या संकटातून वाचल्याचे लक्षात येताच दोघांनी गपकन हात जोडले.

😍💐

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...