नूतन वर्षाभिनंदन!
नवीन वर्ष सुरू झालंय म्हणजे नवीन काहीतरी संकल्प हवाच. नाही तर कालचा आणि आजचा दिवस यात फरक तो काय?
जगणं समृद्ध होईल ते सगळे क्षण भरभरून जगायचे. मग फिरणं, वाचणं, स्वतःसाठी स्वतःच्या शरीरासाठी वेळ देणं, आपल्या माणसांच्या सोबत राहणं, मनसोक्त खाणं, आपल्या कमाईचा पैसा आपल्यासाठी वापरणं यात हातचा राखता कामा नये...
गरजा कमी करायच्या. हिशोब करायचा तर तो दोन्ही हातांच्या बोटांवर झाला पाहिजे इतकाच पुरेसा. कमाईची आवक आणि खर्चाची जावक यांचा ताळमेळ बसला की कोणापुढे हात पसरायची वेळ येत नाही. खिशात किती आहे यापेक्षा तुम्ही खुशीत किती आहात हे महत्त्वाचं. गरजेपुरत्याच वस्तू घरात आणायच्या. घरातल्या वस्तू आणि डोक्यावरचं ओझं निष्कारण का वाढवायचं?
कुंडीतली फुलं, एखाद्याच्या चेहऱ्यावरचं हसू आणि अंगणातलं चांदणं फुललेलं पाहण्यातली मज्जा अनुभवायची.
नकारात्मक माणसांपासून आवर्जून दोन हात लांब रहायचं. आपल्या माणसांशी मनातलं बोलून घेताना थांबायचं नाही. कारण साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला कधी कधी आयुष्य कमी पडतं. एखाद्याच्या फाटलेल्या आयुष्याला मिठी देण्याची संधी दवडायची नाही.
नवनवीन गोष्टी आत्मसात करायच्या. आनंदाचं झाड उभं करायचं. जीवनातली अपरिहार्य माणसं गमवायची नाहीत.
वाईट काही घडलंच तर प्रयत्न करायचे चांगलं होण्यासाठी, सावरण्यासाठी..
आंधळ्याची गुरं राखणाऱ्या त्या अनामिकावर सगळं सोपवत शेवटी एक गाणं गुणगुणायचं...
देवाक काळजी रे,
माझ्या देवाक काळजी रे!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुब कलाम शेख.
प्राथमिक शिक्षक,
पुणे महानगरपालिका
💐🍫🎊😇

No comments:
Post a Comment