गडकिल्ले प्रेमींची धुळवड समुद्री किल्ल्यांवर..
शुक्रवारी २२ मार्च
२०२४ रात्री दहा वाजता वैभव वडघुले, रवींद्र नरसाळे, सुमित वडघुले, गणेश साळुंके,
रोहन विशाल वारे, रवींद्र चव्हाण, संतोष कुतळ, सचिन कुसळकर, प्रदीप गवळी, विनोद
बोराटे, प्रदीप वडघुले, सुमित तोरसकर, जालिंदर काने, संदीप धोंगडे, सुशील वाघ,
अजिंक्य मांढरे, दत्ता जगदाळे, गौरव पवार, संतोष गायकवाड, उन्मेश दिघे, अक्षय
खळदकर, योगेश वीर, हर्षद कळवतकर, आदित्य बोलभात, ओमकार बोलभात, शुभम मेहेर, वैभव
कोळपे, अभिषेक चव्हाण, अविनाश धोत्रे, स्वप्नील रोमन, वैभव नरवडे, रविंद्र काळे,
आयुब शेख, शरद काळे, अविनाश शिंदे, शैलेश निकम, राजेंद्र साळुंखे, प्रशांत काळे,
बजरंग शिंदे, संपत गायकवाड, अमोल नागवे, नितीन सटाले, नवनाथ मेमाणे, विठ्ठल वडघुले
या ४७ मावळ्यांना आणि शौर्य, यज्ञ या छोट्या मावळ्यांना घेऊन गाडी निमगाव
म्हाळुंगी, शिक्रापूर, वाघोली, चंदननगर बायपास, हडपसर, दिवेघाट मार्गे कोकणाकडे
मार्गस्थ झाली. ठरल्याप्रमाणे प्रत्येक जण आपल्या स्टॉप वर दहा मिनिटे आधी उभा
राहतो.
धुळवड म्हणजे एकमेकांना भेटत एकमेकांच्या रंगात रंगण्याचा दिवस. आम्ही मात्र गड-किल्ल्यांवर धुळवड साजरी करत शिवरंगात रंगण्याचा निश्चय केला. यावेळी दोन दिवसांचा मुक्कामी दौरा असल्यामुळे महिलांचा समावेश नव्हता. मार्गदर्शक पंकज माने, हास्यसम्राट ह.भ.प.गणेश दादा घोरपडे, ग्रुपचे पैलवान वैभव करपे, वजीर सुळक्याचा बादशहा मुरलीधर कटके, गझलकार विजय माने (विदिमा), सुप्रसिद्ध फोटोग्राफर गिरीश तांबे, चॉकलेट बॉय अप्पा, दिलखुलास लग्नाळू अभि चव्हाण डॉक्टर, मित्रवर्य सूरज बोरावके, रिल्सस्टार अक्षयकुमार कांबळे, सुनिल खाडे सर, सहकार्य करणारे अण्णा मोरे, अमोल हरगुडे, ग्रुपचा खमक्या आवाज मुलूख मैदानी तोफ संतोष लांडे, मेजर नरवडे सर, प्रदीप मांढरे भाऊ, ड्रायव्हर सोबत जागणारे बापू चव्हाण यांसारखी नेहमीची मंडळी नसल्यामुळे थोडं चुकल्यासारखंच वाटत होतं.
गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपमध्ये काही इतकी दानशूर माणसं आहेत की जे ग्रुपसाठी काहीही करू शकतात. वैभव करपे त्यांमधील एक. परवा लिंगाणा गडाच्या पायथ्याशी गडकिल्ले ग्रुपकडून भेट दिलेली एवढी मोठी गिरणी उचलून नेली. कित्येक वेळा बॅजेस स्वखर्चातून ग्रुपसाठी दिले. आजही ५० बॅजेस ग्रुपसाठी दिले. वैभव नरवडेंनी दरमहिन्याप्रमाणे डिझाईन बनवली. असे कित्येक हात या ग्रुपच्या उभारणीसाठी सदैव सज्ज असतात. यावेळी नवीन चेहरे मात्र भरपूर नजरेस पडले, कोकण म्हटलं की आवर्जून येणारेही होतेच. संपूर्ण रात्र पुण्यापासून तब्बल ४५५ किलोमीटरचा प्रवास. रवी काळे सर, बाळाभाऊ, विठ्ठल वडघुले, नितीन सटाले ड्रायव्हरसोबत गप्पा मारत चालकास डुलकी लागू नये याची खबरदारी घेत होते.
पहाटे सहाच्या सुमारास राजापूरजवळ एक तळं बघून गाडी थांबली. खळाळतं शुध्द पाणी आणि नाष्ट्यासाठी भरपूर मोठी जागा. सर्वांनी प्रातःर्विधी उरकला. बाळाभाऊंनी सर्व साहित्य घेऊन आपली नाष्ट्याची तयारी सुरू केली. नेहमीप्रमाणे ठरलेलं कॉम्बिनेशन गरमागरम तुपातली मॅगी, वाफाळता गवती चहा आणि पतंजली बिस्कीट. बाळाभाऊंच्या हातातल्या अन्नपूर्णेच्या सहवासाने आम्ही सकाळच्यापारी तृप्त झालो. या सगळ्याची तयारी बाळाभाऊ दोन तीन दिवस आधीच करतात. चिमुटभर मीठही कमी पडत नाही, असा दणकेबाज अंदाज आहे त्यांचा.
आठ साडेआठच्या दरम्यान गाडी विजयदुर्गाच्या बंदरावर थांबली. किल्ले विजयदुर्ग मराठ्यांच्या आरमारांची राजधानी, महत्त्वाचं व्यापारी बंदर. सळसळत्या सागर लाटांशी झुंज देणारी तटबंदी. २७ बुरुजांचा सोहळा साजरा करणारा शिवरायांच्या कल्पनेतून साकारलेला सागरीगड. गोमुखी द्वार रचना. सागर तीरावर एखादा हटयोगी तपश्चर्येला बसावा, तसा हा विजयदुर्ग भर समुद्रात ध्यानस्थ बसल्यासारखा भासतो. स्वराज्य कणाकणाने तोलामासाने वाढू लागलं, तसं दूरदृष्टी असणारे शिवराय समुद्राच्या दिशेने वळाले. आरमारांचे बलाढ्यीकरण करावे या हेतूने विजयदुर्गाकडे विशेष लक्ष दिले. मार्च महिन्यातलं ऊन अंगाशी चटक्यांचा विलक्षण खेळ खेळत होतं. दमट हवेमुळे आम्ही सर्व घामाघूम झालो, पण गड डोळ्यांचे पारणे फेडत होता. घेरीये गावाला चिटकून गड म्हणून 'घेरीया' गडाचे उपनाव. शिवकाळात मारुती मंदिरांनी शक्ती उपासनेची बीजं रुजवली. कार्य तडीस जावे यासाठी महादेवाचे मंदिर प्रत्येक गडावर आजही स्थितप्रज्ञ स्वरुपात आहे. स्वागतासाठी प्रताप मारुती मंदिर सजलेलं दिसलं.
जीभीचा दरवाजा सुरुवातीला. गोमुखी तटबंदीवर आरमारी लढायांचे व्रण आजही आहेत. असंख्य तोफ गोळ्यांचे मारे समुद्रातून, गलबतातून या तटबंदीने झेलले. पारंपारिक चुन्याच्या घाण्याऐवजी यांत्रिक पद्धतीचा चुन्याचा घाणा वापरून गडाची डागडुजी सुरू होती. काळजाला गारवा लाभला, गडांची देखरेख बघून. या गडाला तिहेरी तटबंदी आहे. समुद्री गड असल्यामुळे भाले, बाण, दगड,बंदुका यांसाठी जंग्या आणि तोफा चालवण्यासाठी फांज्या यांची तटबंदीमध्ये व्यवस्थित योजना केली आहे. लाकडी दरवाजावर खिळे त्याला 'किलग' म्हणतात. हत्ती आला तरी धडका मारताना डोक्याला इजा होण्यासाठी याची योजना. महादरवाजाशेजारीच दारूगोळा कोठार. दगडाचं छप्पर असलेलं असं कोठार पहिल्यांदाच पाहिलं. तोफ गोळा पडला तरी नुकसान होऊ नये यासाठी ही काळजी. प्रकाशाची खिडकी मात्र एकच. गोलाकार खूब लढा बुरुज एकावेळी १२ तोफा चालवता येतील असा. शेजारीच कान्होजी आंग्रेंचा राजदरबार. या दरबाराने मुंबईच्या उरात धडकी भरवून जमा केलेली खंडणी इथे जमा केली. इंग्रजांनी 'लँड शार्क' अशी उपमा आंग्रेंना दिली.
गडाच्या पश्चिम टोकाला शिंदे बुरूज आहे. याची मनोरंजक घटना आहे. इ.स.१७२० मध्ये इंग्रजांनी जोरदार हल्ला चढवला, एक जहाज खालून फुटलं, पाणी आत गेलं. बाकीच्या बोटी पळून गेल्या. १९९५ला याचं रहस्य उलगडलं. भारतीय समुद्र संशोधन संस्थांनी पाणबुडी पाठवून शोधलं. शिंदे बुरुजासमोर दगडांची एक मोठी भिंत दिसली. १२२ मीटर लांब, तीन मीटर उंच आणि ७ मीटर जाडीची. जहाजं जवळ फिरकू नयेत यासाठी. माझं स्वराज्य वाचावं यासाठी महाराजांनी केलेली ही गुप्त योजना. बुरुजांवर दुमजली इमारती बांधल्यात, काही ठिकाणी तिमजलीसुद्धा. ग्रुपसोबत गड न्याहाळताना मज्जा आली. फोटोंच्या मैफिली रंगल्या. या ट्रेकचं विशेष आकर्षण होतं विशाल पाचुंदकर यांचा ड्रोन कॅमेरा आणि गणपतराव काळकुटे यांचे न संपणारे फोटोसेशन. बापरे काय वेड या माणसाला फोटोंचं? पहिल्याच ट्रेकला माझ्या फोटो रेकॉर्डला धूळ चारली यांनी. तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा. भारीच.
पोटात कावळे कोकलत होते. आचरा गावी जाऊन सुरमई, बांगडा माशांवर ताव मारला. पोटभर जेवून तारकर्ली बीचकडे निघालो. क्षणार्धात अफाट सागराने आम्हाला सामावून घेतलं. किती उड्या मारल्या याची गणती होणार नाही. एकमेकांसोबत माती खेळलो, खऱ्या अर्थाने धुळवड साजरी केली. भरलं वांग्याची भाजी करताना वांगं कसं मसाल्याने भरतात तसंच एकेकाला उचलून आणून आम्ही ग्रुप करून समुद्राच्या रेतीत माखत प्रत्येकाचं वांगं भरलं. किनाऱ्याला येऊन गोड्या पाण्याने आंघोळी केल्या आणि मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. रस्त्यात गॅस शेगडी दुरुस्तीसाठी थांबलो. तेवढ्यात संदीप धोंगडे सरांचे मित्र कानेसर यांची चप्पल तुटल्याचे आम्हाला कळले. गाडी दहा-पंधरा मिनिटं थांबली. घामाघुम झालेले काने सर पळत येत होते आणि चपलेची पिशवी त्यांनी लपतछपत आणलेली होती. काळे सर थोडे रागावले पण आम्ही 'आला गं बाई आला गं' गाणं म्हणत वातावरण हलकं केलं. पिशवीके अंदर क्या है? गाणं म्हणून काने सरांची जाम खेचली पण शेवटपर्यंत पिशवीचं गुपित कळलं नाही.
आचरा गावी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. राहणं, आंघोळ, पाणी, शौचालय यांची उत्कृष्ट व्यवस्था होती. संध्याकाळी मसालेभाताला मदत करायला बसलो. खूप थकलो होतो पण मदत न करणाऱ्याला शंभर रुपये दंड, असे काळे सरांनी फर्मान सोडले होते. 'चवदार' या शब्दाचा सन्मान होईल असा मसालेभात बाळाभाऊंनी बनवला. विठ्ठल वडघुले यांची खूप मदत होते ट्रेकवेळी. नितीन सटाले मनापासून काम करतात. स्वार्थाविना काम करणारी हीच माणसे आहेत ग्रुपची शान. सुखाने दोन घास खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत लाभली की आयुष्य जगण्यातली रंगत वाढते, हा अनुभव गडकिल्ले ग्रुपमध्ये वारंवार येतो.
संत तुकोबा म्हणतात, 'कौतुक वाटे झालिया वेचाचि!' जगाला वाटो न वाटो, आपल्याला आपल्या मिळकतीचं कौतुक वाटायला हवं. आमची मिळकत म्हणजे गडकिल्ले ग्रुप. या मिळकतीचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो. पोटभर जेवून पहाटे पाच वाजता उठण्याचे ठरवून आम्ही झोपलो.
उरले उरात काही
आवाज चांदण्यांचे,
आकाश तारकांचे
उचलून रात गेली!
सुरेश भटांची कविता मनात रातराणीसारखी दरवळत होती. शरीर थकल्यामुळे कधी डोळा लागला कळलंच नाही. रात्रभर कोणतरी खूप घोरत होतं, अशी चर्चा सकाळी सुरू होती. झोपण्यापूर्वीच मी सर्वांना विचारलं मात्र कोणीही याची कबुली दिली नव्हती. सगळे छुपेरुस्तम निघाले. मी तर कधीच घोरत नाही, त्यामुळे माझा प्रश्नच नव्हता. हा हा हा हा हा हा... उषःकाल होत रम्य पहाट झाली.
नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर सर्वांना बहाल करते. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करणारं डस्टरच वाटतं मला. त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचे धडे का गिरवायचे? जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरा जातो, नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल पण प्रतिभावंत मात्र असतो, हे नक्की. चुलीवर तापलेलं पाणी घेऊन आम्ही सगळ्यांनी आंघोळी उरकल्या. इकडे बाळाभाऊंनी उपीट, चहा यांची सोय केली. नाश्ता करून देवगडचे आंबे पाहण्यासाठी निघालो. गुरुदक्षिणा म्हणून रवी काळे सरांना 'गडकिल्ले आणि मी' हे पुस्तक भेट दिलं. ज्यांनी आम्हाला किल्ले भ्रमंती घडवून आणली, त्यांच्यासाठी छोटीशी भेट. पाण्यात असूनही ओलं न होणाऱ्या कमलपत्राप्रमाणे काही माणसं असतात, प्रामाणिक. ज्यांना रुपयाचाही मोह नसतो. काळे सर असंच शुद्ध व्यक्तीमत्व.
मध्ये मध्ये कॅमेऱ्यामध्ये फोटो, ड्रोनमध्ये व्हिडिओज यांची रेलचेल सुरूच होती. आंब्यांची ऑर्डर देऊन आम्ही सिंधुदुर्गकडे रवाना झालो. किनाऱ्यावर बस थांबली आणि समोर मदमस्त हत्तीने पाण्यात बैठक मारावी तसा सिंधुदुर्ग किल्ला खुणावू लागला. प्रत्येकी शंभर रुपये बोटीचे तिकीट काढून लाईव्ह जॅकेट घालून आम्ही तयार झालो. काय सौंदर्य भरलंय या अफाट निसर्गात. पण जेव्हा युद्धनौका या समुद्रावर दिसत असतील तेव्हा कसलं रौद्र रूप धारण करत असेल हाच समुद्र. गोमुखी प्रवेशद्वारावरून तासाभरात पुन्हा प्रवेशद्वारावर जमण्याचं आश्वासन आयोजकांना देऊन ग्रुप पांगला. सिंधुदुर्गासारख्या रांगड्या किल्ल्यालाही सौंदर्याची झालर चढवणारा हा फेसाळणारा समुद्र. शौर्य आणि सौंदर्याचा अनुपम संगम यावेळेस पाहायला मिळाला.
किल्ले सिंधुदुर्ग स्वराज्याचं तुळशी वृंदावन! ८४ बंदरात अशी दुसरी जागा नाही, असं शिवबांनी याचं कौतुक केलं होतं. महाराजांनी हिरोजी इंदलकरांकरवी दुर्ग बांधून घेतला. स्वराज्याची महत्त्वकांक्षा दर्शवणारा हा गड अगणित स्वप्नं उराशी बाळगून योग्यासारखा उभा आहे. गोमुखी महाद्वार. ज्याचं आरमार त्याचा समुद्र यानुसार सागरावर सत्ता गाजवणारा गड. मुघलांच्या नाकावर टिच्चून शिवरायांनी सुरत लुटली. मिळालेली अमाप संपत्ती स्वतःचे राजवाडे बांधण्याऐवजी परकीय शक्तींना आवर घालण्यासाठी हा मजबूत जलदुर्ग उभारला. दगड झिजलेत सागरलाटांनी पण पायातलं शिसं तसंच कायम आहे, बांधणाऱ्याची ईमानदारी दाखवत...
राजांचा कोणताही किल्ला पाहिला की शिवरायांची स्वराज्य साधना आठवते. अव्याहत कष्ट, जिद्द, साहस, शौर्य आणि पराक्रम सगळं इथे शांत झाल्यासारखं वाटतं. हा श्रीमंतयोगी जाणता राजा ह्या प्रत्येक गडावर विसावा घेतोय असा भास होतो. कापसाचे तळवे फक्त मांजरांनाच नसतात, भूतकाळालाही असतात. शिवरायांचा सगळा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर लख्ख उभा राहतो, अशा गडकिल्ले भ्रमंतीवेळी. शिवरायांच्या हाताचा नि पायाचा ठसा या गडावर आहे, हेच या गडाचं सदभाग्य. कोळी वेशातली शिवराजेश्वराची मूर्ती पुत्र राजारामाने स्थापित केली. ख्रिश्चनांनी सभामंडप बांधलाय. तटावर चढण्यासाठी सुबक दगडी जिने, मशालीसाठी खोबण्या, गोड्या पाण्याच्या तीन विहिरी (बाव) दहीबाव, दूधबाव आणि साखरबाव. भोवती कितीही गढूळ, खारट पाणी असलं तरी आपण आपलं नितळपण जपलं पाहिजे, ही शिकवण देणाऱ्या या विहिरी. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेलं. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला.
याचं वर्णन
म्हणजे....
चौऱ्याऐंशी बंदरात
हा जंजिरा
टोपीकरांचे उरावर
शिवलंका,
अजिंक्य जागा
निर्माण केला
सिंधुदुर्ग जंजिरा,
जगी अस्मान तारा.
जैसे मंदिराचे
मंडन,
श्रीतुलसी वृंदावन,
राज्याचा भूषण
अलंकार.
चतुर्दश
महारत्नापैकीच पंधरावे रत्न,
महाराजांस प्राप्त
जाहले.
विशेष म्हणजे या किल्यामध्ये एका नारळाच्या झाडाला दोन फांद्या (वाय) आकाराच्या होत्या, अलीकडे त्यातील एक फांदी जोराच्या वीज पडल्यामुळे मोडली आहे. सिंधुदुर्गाचा खचलेला पाया पाहताना वर्मी दगड लागलेल्या पाखरासारखी अवस्था होते. हे वैभव जपलं पाहिजे याची वारंवार हळहळ वाटते. गडकिल्ले नावाचा हा ग्रुप रेशीम तंतूसारखा हा हा म्हणता कित्येक मने कायमची गुंफून टाकतोय, एक चिवट वेल तयार व्हावा तसं. ट्रेक वरून घरी गेल्यानंतर मन अशा गोड स्मृतींचा चित्र संग्रह पुन्हा पुन्हा चाळत राहतो. छंद नाही गडकिल्ल्यांचा तो देह काय कामाचा? असा विचार ढगात वीज चमकावी तसा मनात लख्ख चमकून जातो. परतताना बोटीमध्ये 'आम्ही गड्या डोंगरचे राहणार' हे गीत म्हटलं. गणपतरावांनी शिवराय गीत घेतले. किल्ल्याविषयी थोडीशी माहिती मी सांगितली.
किनाऱ्यावर येताच चालत जवळच असणाऱ्या राजकोटकडे आम्ही वळालो. राजकोट उपदुर्गाची उभारणी महाराजांनी इ.स १६६४ ते १६६७ च्या दरम्यान केल्याचे पुरावे आहेत. १८६२ मध्ये किल्ल्यात काही इमारतींचे अवशेष, तुटलेली तटबंदी व एक तोफ असल्याचा उल्लेख आहे. नंतर मात्र केवळ समुद्राजवळचा एक उंच टेकडी सदृश भाग होता, ज्यावर आता शिवरायांचे स्मारक व लाल विटांची भिंत बांधून राजकोट असे नामकरण करण्यात आले आहे. येथून सिंधुदूर्ग किल्ला व आजूबाजूचा परिसर दिसतो. या भग्न किल्याच्या अवशेषांवरून समुद्रात होणारा सूर्यास्त पाहणाऱ्या मावळ्यांना माहितीच नाही की आपण एक किल्ला गमावलाय... गाडीत बसून आम्ही किल्ले सर्जा कोटकडे रवाना झालो.
मालवणहून अवघ्या ४ किमीवर असणाऱ्या सर्जेकोटला पोहोचलो. सर्जेकोट पंचक्रोशी मच्छीमार सहकारी सोसायटीपासून डाव्या हाताने जाणाऱ्या रस्त्याने थेट किल्ल्याकडे गेलो. शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी राजकोट, पद्मगड आणि सर्जेकोट हे उपदुर्ग बांधले. त्यातील सर्जेकोट हा किल्ला तलाशिल-सर्जेकोट गाव खाडीच्या मुखावर बांधलेला. वेडीवाकडी वळणे असलेल्या कोळंब नदीच्या खाडीत पावसाळ्यात महाराजांच्या आरमारातील जहाजे नांगरून ठेवली जात असत. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६६८ मध्ये हा किल्ला बांधला. सर्जेकोट गडाच प्रवेशद्वार छोटस पण कमानदार आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला बुरुज आहे. आतल्या बाजूला घरे आहेत. त्यांच्या कडेने चालत गेल्यास आपण बालेकिल्ल्यापाशी पोहोचतो. बालेकिल्ल्याचे चारही बुरुज व तटबंदी शाबुत आहे. प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे. बालेकिल्ल्यात विहिर, तुळशी वृंदावन व तटावर जाण्याचे जिने आहेत. बालेकिल्ल्यात झाडी माजली असल्यामुळे इतर अवशेष दिसत नाहीत. किल्ल्याच्या समुद्राकडील बाजुची तटबंदी व बुरुज शाबुत आहेत.
अनेकदा शिवरायांची डिजे जयंती पाहतो आपण सर्वजण. लाखो रुपयांचा खुर्दा उडालेला पाहताना वाटतं, या गडकोटांसाठी तो पैसा वापरला तर काय चित्र दिसेल? आजही किल्ले म्हटलं की शिवाजी महाराज आठवतात. दिवाळीतला किल्ला बांधून पूर्ण झाला, असं कधी म्हणता येतं? जेव्हा शिवबाची प्रतिमा त्यावर विराजमान होते. शिवबा आणि किल्ले हे एक अतूट नातं आहे. ते जतन करायला हवं. किल्ला पाहून गाडीत बसलो. आता जेवल्याशिवाय पर्याय नव्हता इतकी भूक लागली होती.
मध्ये एका रस्त्यात गाडी थांबवून सकाळचे शिल्लक राहिलेले उपीट आणि वडापाव यांच्यावर आम्ही ताव मारला. राहण्याची सोय, वडापाव या सगळ्यांसाठी गोरख काळे सर यांचे मित्र एकशिंगे सर यांनी खूप मदत केली. ग्रुप तर्फे श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. झोपडीवजा पालात राहणाऱ्या एका कोकणी मावशींनी आम्हाला थांबायला जागा दिली, पाणी दिलं. कोकणी सौंदर्य हे केवळ सागरलाटा, माडापोफळीच्या बागांमध्ये सीमित नाहीये. ओंजळीत घेतलेल्या प्राजक्ताच्या फुलांसारखी दिसणारी, गोड गरे लाभलेल्या फणसासारखी ही चिवट, प्रेमळ माणसं हे कोकणाचं खरं लौकिक!
आता आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. गाडीमध्ये 'सखू गेली पाण्याला' या गाण्यावर खूप मज्जा केली. वैभव कोळपे या मित्राने हा खेळ रंगवला. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, स्वभाव, वागणं बोलणं यावर परफेक्ट गाणी निवडली. गणपतरावांच्या फोटो प्रेमाखातर 'तू खिच मेरी फोटो' तर काळे सरांवर 'आया है राजा' अशी गाणी झाली. राजकारणावर गप्पा झाल्या. काने सर अन् सभापतीपुत्र कोळपे यांनी सवालजवाब फड सांभाळला. कमलाबाई आणि घड्याळराव यांचं द्वंद्व युद्ध सुरू होतं. पण सगळं काही गमतीदार वळणात. आम्ही फक्त मध्ये मध्ये शेंडे मारायचं काम केलं. आदमापुरात थांबून बाळूमामा समाधीचं दर्शन घेतलं. कोल्हापुरात थांबून तांबडा पांढरा रश्श्यावर ताव मारला. पहाटे पाच वाजता आम्ही पुण्यात उतरलो. वैभव नरवडे, सुमित वडघुले, अमोल नागवे, वैभव वडघुले, योगेश वीर, वैभव कोळपे, अभिजित चव्हाण, अविनाश धोत्रे, अविनाश शिंदे, शैलेश निकम यांसारखी गडकिल्ले ग्रुपमधली पोरं खऱ्या अर्थाने शिवरायांचा वारसा समृद्ध करतात. गड फिरतात, इतिहास जपतात.
एखादी गोष्ट सुरू करणं खरंतर तसं सोप्पंय पण खरा कस लागतो, तो सातत्य ठेवायला.दर महिन्याला हे संपूर्ण आयोजन, जेवण, गाडी, खर्चाचा ताळमेळ, राहायची जागा या सगळ्या गोष्टी काळे सर बिनबोभाट करतात. कोणत्याही स्वार्थाशिवाय. महिनाभर संसारासाठी काबाडकष्ट करत राबलेल्या आमच्यासारख्या पक्ष्यांना नवीन पंख फुटावे तसे आभाळात भरारी घेतो आम्ही या ग्रुपसोबत एक दोन दिवसासाठी. माऊलीचं दूध पिऊन झोपेत असणाऱ्या चिमण्या चेहऱ्यावरचे जे समाधान असतं ना तीच गोड मुद्रा, तीच तृप्ती असते आमच्या चेहऱ्यावर ट्रेक झाल्यानंतर. इथे येणारा प्रत्येक जण एक किंवा दोन दिवस पूर्ण आयुष्य जगत असतो. संसाराच्या, समाजाच्या विवंचना सगळ्या बाजूला ठेवून इथं प्रत्येक जण लहान मुलासारखं आपले हट्ट पुरवत राहतो.
पैसा म्हणजे सर्वस्व नाही हे म्हणताना खिशात गरजेएवढा पैसा असायलाच हवा, हे खरंय. पैशांच्या जोरावर जगभरातली सुखं अनुभवता येतात, सोबत मात्र जिवाभावाची माणसं हवीत. कटकारस्थान न करणारी, हेवेदावे यांपासून लांबच्या गावात वसणारी. आमच्या गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपसारखी. विकायचं ठरवलं की फुलंसुद्धा तराजूत टाकावी लागतात. विकणाऱ्याने फुलांचं वजन विकावं, सुगंध वेड्या माणसाने वजनात किती फुलं येतात हे मोजू नये. फुलं देणारे हात सातत्याने सुगंधित होतात, एवढे मात्र नक्की.. त्यामुळे प्रत्येक क्षण जगत अनुभवांची मोतीमाळ गुंफावी. आपल्या माणसांना आनंद द्यावा अन् भरभरून प्रतिसादाच्या रुपात पुन्हा घ्यावा. बाकी त्रास द्यायला परके असतातच की! कोकणातले तीन दिवस फुल्ल मजेत गेले.
शुक्रवारी रात्री दहा पासून ते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत आम्ही गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या माध्यमातून विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजकोट, सर्जेकोट, तारकर्ली बीच, बाळु मामा आदमापूर, भरपूर मासे, कोल्हापुरात मटण भाकरी, तांबडा पांढरा रस्सा, बाळा भाऊंच्या हातची चवदार तुपातली मॅगी, उपीट, देवगड हापूस आंबे, वडापाव सगळ्यांचा मनसोक्त फडशा पाडला. महिन्यातून एकदाच ट्रेकमुळे भेटणारे जीव गळाभेट घेतात तेव्हा आषाढी एकादशीला एखादी दिंडी दुसऱ्या दिंडीला भेटतेय, असाच भास होतो. अशा वेळी भेटी लागी जीवा, लागलीसे आस!अशी अवस्था होते.
आमचा विठुराया स्वराज्यनिर्माते शिवबाराजे आणि संतदिंडीचे मानकरी रवी काळे सर, गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान पालखीचे भोई बाळाभाऊ, विठ्ठल वडघुले, नितीन सटाले आणखी कित्येक अनामिक हात अन् सोबत आम्ही सगळे गडदिंडीचे वारकरी मावळे. ज्यांनी हा सोहळा अनुभवला, त्यांनी दोन दिवसांत आयुष्य जगलं असंच काहीसं होतं. दर महिन्याला अशा गडकिल्ले भ्रमंतीचा घाट घातला जावा, हीच सदिच्छा! गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या नावानं चांगभलं...
भेटू पुन्हा नव्या
गडाच्या पायथ्याशी.
पुढील ट्रेक
कात्रज सिंहगड पायी
वारी
दि.२१एप्रिल २०२४
आयोजकांशी अवश्य
संपर्क साधा.
मार्गदर्शक पंकज
माने 7709159044
आयोजक रवी काळे 9096465675
लेखन आयुब शेख 9552941271














