Sunday, March 17, 2024

सुखाची भाकरी गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या वतीने लिंगाणा गडाच्या पायथ्याशी मोहरी गावात पिठाची गिरणी भेट.

सुखाची भाकरी!

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातल्या लिंगाणा गडाच्या पायथ्याशी मोहरी गाव. नुकतीच लाईट या गावात आली. पण रोजच्या भाकरीसाठी लागणारं पीठ आणण्यासाठी चार-पाच किलोमीटर लांब जाणाऱ्या या चिमुकल्या हातांना आता स्वतःच्या घरची पिठाची गिरणी गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या माध्यमातून प्राप्त झाली.

प्रकाशाच्या पहिल्या किरणस्पर्शात अंधार दूर करण्याचे सामर्थ्य असतं. हा प्रारंभ ग्रुपच्या वतीने करण्यात आला.

गिरणी बघताच चांदणं फुलल्यासारखे चेहऱ्यावरचे भाव पाहून आम्ही धन्य झालो.

उन्हातानात वळचणीचा आसरा घेत दुकानं शोधत फिरणाऱ्या या चिमण्या आता गिरणीमुळे वाचलेला वेळ काढतील त्यांच्या शाळेसाठी, अभ्यासासाठी. सावलीत बसून सुखाची भाकरी खातील.

गुरु ठाकूरच्या चारोळी आठवल्या,

मनाच्या मातीची उजळो पणती

नाती आणि मती तेजाळाया,

जाणिवांना राहो वास्तवाचे भान

वसो समाधान अंतरंगी!

या जाणीवा बोथट होता कामा नये, हाच प्रयत्न गडकिल्ले प्रेमी करतात.

जो दिवस तुम्ही भरभरून दुसऱ्यांच्या आनंदासाठी जगलात, तोच खरा दिवस. बाकी सगळ्या कॅलेंडरच्या तारखा असतात खरं तर...

या गडकिल्ले भटकंतीने जगायला शिकवलं, आयुष्याचा महोत्सव करायला शिकवलं. लोकांच्या अडीअडचणीला उभं रहायला शिकवलं.

सकाळी अंगणातला पारिजातक फुलांचा सडा टाकून मोकळा होतो, रीतं होण्यातलं समृद्धपण तो किती सहजपणाने दाखवतो. अशी समृद्धी आम्ही शिकतोय, कृतीत आणतोय.

एखाद्याच्या ढगाळ आयुष्यात इंद्रधनुष्य होण्याचा प्रयत्न करतोय.

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपचं प्रतिनिधित्व आज पंकज माने, शरद काळे, गणेश दादा घोरपडे, वैभव करपे आणि रवी काळे यांनी केले.

निसर्ग गुरु मानला आणि शिवरायांचा सह्याद्री स्वर्ग वाटू लागला. त्यांचं वर्चस्व मान्य केलं आणि जगण्यातलं गुरगुरणं थांबलं, मिजास थांबली, माणसांनी माणसांसाठी स्थिर व्हावं आणि सर्वांनी माणुसकीचं आकाश पेलावं यासाठी माणसांना भेटायचं ठरवलं, आधार द्यावा, सुख दुःख वाटावं, जेव्हा जेव्हा अशा भेटी घडतील व घडवून आणल्या जातील तेव्हा तेव्हा तो दिवस...

भेटी लागी जीवा,

लागलीसे आस! असाच होईल.

या ग्रुपचा एक छोटासा भाग होता आलं, हेच भाग्य...

संपूर्ण गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या नावानं चांगभलं!

🙏🏻💐😇

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...