Friday, October 22, 2021

ईद-ए-मिलाद आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर

 


ईद-ए-मिलाद आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर

              समस्त जगाने ज्यांचा आदर्श घेतला, ज्यांच्या संवेदनशीलतेचे गोडवे गायले अशा मानवतेच्या पुरस्कर्त्यांचा आज जन्मदिवस.  'मोहम्मद पैगंबर म्हणजे अमन अन् शांतीचा वैचारिक सुगंध' असा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. त्या वैचारिक सुगंधाने कित्येकांचे आयुष्य सुवासिक झाले त्याची गणतीच करता येणार नाही.

              इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते. पैगंबरांमार्फत कुराण हा धर्मग्रंथ अल्लाहने सर्वांपर्यंत पोहोचवला, अशी आख्यायिका आहे. आपापसांत बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करत प्रेम आणि आनंदाने साजरा केला जाणारा हा सण. सर्वांच्या लाडक्या प्रेषितांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्व मुस्लिम बांधव सकाळी खीर पुरी करून लहान लहान मुलांना खाऊ घालतात. सगळ्यांचे तोंड गोड करत आनंदोत्सव साजरा केला जातो. मशिदीत नात, सलाम, दुवाँ मागत कुराणाचे पठण केले जाते. मिलाद म्हणजेच जन्मोत्सव.

             पैगंबरांच्या जन्मावेळी वातावरण, तिथली परिस्थिती अत्यंत वेगळी होती. म्हणजे गुलामगिरी, गुलामांची विक्री त्यात महिलांचाही समावेश, सावकारशाही, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अत्यंतिक अभाव अशी स्थिती. त्यांच्या जन्मावेळी त्यांचे वडील हयात नव्हते आणि ते चार पाच वर्षांचे झाले तेव्हा आईसुद्धा अल्लाहला प्यारी झाली. त्यांचे पालनपोषण चुलते अबू-तालिब यांनी केलं. अनाथांचं दुःख काय असतं याची पुरेपूर जाणीव असणारे पैगंबर अवघ्या जगाचे पालक झाले. दयेपेक्षाही सहृदयतेची जास्त आवश्यकता असल्याचे त्यांनी सर्वांना सांगितले.

इकरा म्हणजे वाचन कर. या पहिल्याच शब्दाने प्रभावित होत त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. सर्वसामान्यांना ज्ञान घेण्याची बंद कवाडे समस्त मानवजातीसाठी त्यांनी कायमची उघडली. ज्ञानी माणसाला मोहम्मद पैगंबर यांनी खूपच मोठं स्थान दिले आहे. लोकांनी त्यांना सादिक म्हणजे सत्यवादी ही उपमा दिली.

त्याकाळचे बंड करणारे, विद्रोही,  सत्यशोधक, संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून मोहम्मद पैगंबर मानवतेसाठी एक वरदान ठरले. पंचवीस वर्षांचे असताना चाळीस वर्षांच्या विधवेशी त्यांनी लग्न केलं. एक तर्फी तलाख देणाऱ्या पुरुषांना चाळीस कोडे मारण्याची शिक्षा पैगंबरांनी दिले होते. स्त्रीभ्रूण हत्या पाप आहे, हे सांगणारी व्यक्ती, पुरुषांप्रमाणे स्त्रियांना मालमत्तेमध्ये समान वाटा देणारा जगातील पहिला विद्रोही आणि क्रांतिकारी विचार मोहम्मद पैगंबर यांनी मांडला.

मोहम्मद म्हणजे त्यांची अत्यंत प्रशंसा केली जाते असे व्यक्तिमत्व. महात्मा फुलेंवर त्यांच्या वैचारिक समृद्धतेचा चांगलाच प्रभाव पडल्याचे जाणवते. महात्मा फुलेंनी मोहंमद पैगंबर यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारा पोवाडा लिहिला.

महंमद झाला जहामर्द खरा ॥ 

त्यागीले संसारा ॥ सत्यासाठीं ॥धृ.॥

खोटा धर्म सोडा, सांगे जगताला ॥ 

जन्म घालविला ॥ ईशापायीं ॥१॥

जगहितासाठी लिहिलें कुराण ॥ 

हिमतीचा राणा ॥ जगीं वीर ॥२॥

जगाचा पालक निर्मीक अनादि ॥ 

सर्व काळ वंदी ॥ निकें सत्य ॥३॥, 

मन केलें धीट, धरीली उमेद ॥ 

नाहीं भेदाभेद ॥ ठावा ज्याला ॥४॥, 

जनहितासाठीं खोटा अभिमान ॥ 

दिला झुगारुन ॥ अग्नीमध्यें ॥५॥, 

मर्द महंमद ढोंग्यांत पांगळा ॥ 

शोभला पुतळा ॥ सज्जनांत ॥६॥, 

नव्हता कोणी त्या तेव्हां साह्यकरी ॥ 

एकटाच सारी ॥ सत्य पुढे ॥७॥, 

एक त्याला फक्त सत्याचा आधार ॥ 

हिय्या समशेर ॥ मनामध्ये ॥८॥, 

य येई अजा । निर्मीकाच्या ध्वजा ॥ 

उभारील्या ॥९॥, 

कोणी नाहीं श्रेष्ठ कोणी नाहीं दास ॥ 

जात-प्रमादास ॥ खोडी बुडी ॥१०॥, 

मोडीला अधर्म आणि मतभेद ॥ 

सर्वांत अभेद ॥ ठाम केला ॥११॥, 

केल्या कमाईचा न धरी अभिलाषा ॥ 

खैरात दिनास ॥ देई सर्व ॥१२॥, 

मानवी मनाचा घेई अंतीं ठाव ॥ 

कल्याणाची हाव ॥ पोटीं माया॥ १३॥

           विनोबा भावे यांनी कुराणाचा अर्थ स्पष्ट करत 'कुराण सार' हे पुस्तक लिहिलं.

            त्याकाळी भोंगे नव्हते, घड्याळी नव्हत्या, अल्लाहची इबादत करण्यासाठी सर्वांनी ठराविक वेळी एकत्र यावे असा संदेश देण्यासाठी अजानची निर्मिती झाली. त्याकाळी गुलामगिरी आणि गुलामांची विक्री करण्याची प्रथा होती. हजरत मोहम्मद पैगंबर यांकडे बिलाल नावाचा एक गुलाम होता. आपल्या विचारांना कृतीत उतरवताना मोहम्मद पैगंबर यांनी बिलाल या गुलामाला गुलामीतून मुक्त केलं आणि अजान देण्याचं दातृत्व बहाल केलं. या कृतीतून त्यांनी दाखवून दिलं की, कोणीही गुलाम नाही, कोणीही मालक नाही, सर्व समान आहेत.

             हजरत मोहम्मद पैगंबर यांचा कोणताही फोटो किंवा चित्र अस्तित्वात नाही. व्यक्तिपूजा त्यांना मान्य नव्हती. उद्या माझ्या फोटोंची पूजा केली जाईल, माझे पुतळे उभारले जातील आणि ते मला मान्य नाही अशी त्यांची शिकवण होती. इस्लाम म्हणजे अमन, शांतता. ईश्वरचरणी शरणागती. अल्लाह एकच आहे,  मग तुम्ही त्याला कोणत्याही नावाने बोलवा असे म्हणत एकेश्वरवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला. ज्याच्या हाताने अन बोलण्याने समोरचा व्यक्ती सुरक्षित आहे अशी व्यक्ती म्हणजे इस्लामी.

            धर्म साच्यात न अडकता कालसुसंगत व्हावा, प्रवाहित व्हावा यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. कोणताही दिवस अशुभ नाही म्हणून मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही असेही सांगितले. रमजान ईदनिमित्त रोजे ठेवून तहानलेल्या भुकेल्या माणसांच्या दुःखाची जाणीव व्हावी, अन्नपाण्याची कदर कळावी म्हणून रोजे पाळण्याची योजना केली. एका ताटात पाच सहा जणांनी एकत्र येऊन जेवण करत समभाव जपायचा, नमाज पठण करताना खांद्याला खांदा लावून निर्मात्यासमोर झुकणं, या गोष्टी छोट्या वाटत असल्या तरी यांमधून समानतेचा अंकुर जन्मास येतो.

            मजुराचा घाम वाळण्यापूर्वीच त्याचा मोबदला आपण त्याला दिला पाहिजे ही कल्पना पैगंबरांनी मांडली. त्यांनी उच्चनीचतेचा भेद दूर सारला. यावरून त्यांनी सर्वांशी कशी सहृदयतेची बांधिलकी जपली याचा अंदाज येतो. आपलं काम सांभाळत दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे म्हणजे दुनियादारीच्या विवंचनेतून वेगळे होऊन अल्लाहची इबादत करणे. रस्त्यावरून दगड, काटे उचलून बाजूला करणे हीसुद्धा एकप्रकारे नेकीचे काम आहे, आपल्या संपत्तीचा काही हिस्सा गोरगरिबांना वाटा, अनाथांना मदत करा असे उपदेश वारंवार केले. मानवतेचा धर्म सगळ्यांत मोठा ही शिकवण दिली.

आईच्या चरणाखाली स्वर्ग आहे, असा आईचा महिमा त्यांनी गायला. वैश्विक शांतीचा संदेश, विश्वबंधुता मानवतेचा पुरस्कर्ता, सहिष्णुतेचा शिरोमणी म्हणून त्यांची ख्याती आहे.

सारे नबीयोंके औदे बडे है,

लेकिन आका का मनसब सबसे जुदा है,

वो इमामें सफेअंबिया है,

उनका रुतबा बडों से बडा है!

                  आज धर्माचं अंधानुकरण करण्याऐवजी इस्लामचं खरं रुप समाजासमोर येणं, खूप महत्त्वाची बाब आहे. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी कुराणाचे अर्थ निर्वेचण करून तजुर्मा-ए-कुराण सर्वांसमोर मांडले. त्याचे वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे. सृष्टी निर्मात्याचे सर्वांत आवडते प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लाल्लाहू अलैही वसल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी केलेल्या अमूल्य कार्यासाठी विनम्र अभिवादन!

ईद-ए-मिलाद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

आयुब कलाम शेख

प्राथमिक शिक्षक

म.न.पा. शाळा क्र.174बी, कोंढवा बुद्रुक पुणे.

9552941271

3 comments:

  1. आयुब सर तुमचे लेखन खूपच सुंदर आहे .👏👏👍👍👍

    ReplyDelete

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...