शिक्षणाच्या नव्या युगाच्या वाटा
आम्ही प्रकाश बीजे रुजवित चाललो,
वाटा
युगाच्या नव्या रुळवित चाललो!
चिमुकल्यांच्या किलबिलाटाने प्रारंभ
होणारी रिक्त शाळा भयान, उध्वस्त, भकास वाटू लागली आहे. पूर किंवा भूकंपासारख्या आपत्तीने जबरदस्त हानी
होऊन भयंकर नुकसानीच्या, उपद्रवाच्या खाणाखुणा मागे टाकाव्या तसंच काहीसं कोरोना नामक
विषाणूमुळे दिड दोन वर्षे उच्छाद मांडलाय, याचे
चित्र जाणवते आहे.
शाळांना लागलेले टाळे अनेक वर्गांसाठी
मात्र आजही बंदिस्त आहेत. असे अघटित काही घडेल याची कणभरही शंका स्वप्नातदेखील
कोणाला आली नव्हती. ऑनलाईन शिक्षणाविषयीच्या साधक-बाधक चर्चा कानांवर पडत होत्याच.
'खायला नाही दाणा आणि...' म्हणण्याच्या परिस्थितीत कित्येक पालक
इंटरनेट रिचार्ज कसा मारणार? या
प्रश्नांनी शिक्षक म्हणून सर्वांनाच भंडावून सोडलं होतं.
महाभयंकर कोरोनाच्या संकटात शिक्षणाची अत्यंतिक दुरावस्था झाली. प्रत्येक
बालकाच्या आयुष्यातील दीड-दोन वर्षाची सुखद शालेय आठवणींची माती होताना आपण
पाहिली. कित्येक पोरांपर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षण पोहोचू शकले नाही पण
वस्तुस्थिती तितकीच भयानक होती हेही खरंच. जीवनाच्या विवंचनेपुढे बाकी सगळ्या
गोष्टींचा क्रम दुय्यमच. पण याच काळात पारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी ऑनलाइन
शिक्षणाची नवनवीन तंत्रही शिक्षक, विद्यार्थी
आणि पालकांना हाताळायला मिळाली. हातांवर पोट असणाऱ्या पालकांनीही काळजाच्या
तुकड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, शिक्षणासाठी
मोबाईल अन् इंटरनेटची सोय केलीच. मग आपत्तीची संपत्ती आणि संकटांचं वैभव करायला
शिक्षकही मागे पडला नाही,
हेच खरं.
काईन मास्टर, व्हिडिओ शो यांसारख्या ॲपचा वापर करून
कित्येक शिक्षकांनी व्हिडिओ मेकिंग केलं. ज्यांना व्हिडिओ एडिटिंग जमले नाही
त्यांनी पुस्तकाचे वाचन करताना, गणितं
सोडवताना, वेगवेगळी माहिती देताना कॅमेऱ्यात
स्वतःचे व्हिडिओ बनवून विद्यार्थ्यांना शेअर केले. कागदावर प्रश्न लिहून त्याचे
फोटो पाठवले, युट्युबवर वेगवेगळ्या पाठांचे व्हिडिओ
सर्च करत त्याची लिंक विद्यार्थ्यांना पाठवली, ऑनलाइन
टेस्ट, व्हिडिओ, पीपीटी यांसारख्या गोष्टी जमत नसल्या तरी सुद्धा सहकार्यांना
विचारलं किंवा खुशाल युट्युब वर सर्च केलं. सध्या सर्वांसाठी युट्युब, गुगल यांसारखा गुरु कोणताच नाही. हा
गुरू विद्यार्थ्याचे वय, जात, लिंग काही पाहत नाही. मुक्तहस्ते ज्ञानाचे वाटप करतो.
विद्यार्थ्यांना फक्त लेखन किंवा खरडपट्टीचा अभ्यास न देता निरीक्षण कर, समजून घे, प्रयोग कर, आकृती काढ, उपाय सांग, कारणे सांग, चित्र काढ, वस्तू बनव, गोष्ट तयार कर, कविता तालासुरात म्हणून रेकॉर्ड करून
पाठव यांसारख्या अभ्यासाची जंत्री शिक्षकांनी दिली. वॉट्सऍपवर तपासलेल्या
अभ्यासाला शिक्षकांनी नावानिशी कौतुकाची थाप दिली, त्यांना प्रेरणा व इतरांना अभ्यास करण्याची उमेदही दिली. अभ्यास न
करणाऱ्यांचा सतत मागोवा घेतला. विद्यार्थी हित जपत पालकांनाही अनेक सूचना दिल्या.
तासाभरापेक्षा जास्त वेळ मोबाईल विद्यार्थ्यांकडे देऊ नका किंवा अधूनमधून मुलं
मोबाईलवर अभ्यासच करत आहेत का? याची
खात्री करायला जागरूक केलं.
शनिवारी कला, कार्यानुभव, संगीत यांसाठी वेळ देत रविवारी
प्रेरणादायी व्हिडिओ बघून त्यांचे अनुभवलेखन करण्यास सांगितले. ऑनलाइन शिक्षण
सध्याच्या काळात कटकट म्हणण्यापेक्षा मुलांची नाळ शाळेशी, शिक्षणाची जोडणारा एक दुवा म्हणून
त्याच्याकडे पाहिलं. प्रवासाला निघालं की वाट सापडत जाते तसेच अध्यापनाचे उपाय सापडत गेले अनेकांना. गरीब असले तरी
बरेचसे पालक विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट रिचार्ज करताना दिसले. आपले विद्यार्थी
हितासाठीचे प्रयत्न शिक्षकांनी सोडले नाहीत. स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस
स्वतःच एक खणखणीत नाणं असतो. स्वतःची इच्छा पूर्ण न झाल्याने अस्वस्थ होणारी माणसं
किती हे मोजण्याची गरज नाही पण विद्यार्थ्यांची इच्छा आणि गरज पूर्ण करता आली नाही
म्हणून अस्वस्थ होणारे शिक्षक अगणित आहेत.
कोरोना सर्वेक्षण, वॉर-रूम, लसीकरण केंद्र येथे काम करत सततच्या अशैक्षणिक कामातून थोडी जरी मुभा
मिळाली तरी 'ओंजळीत हे मला गवसले आकाशातील तारे' असं म्हणत कित्येक शिक्षक वेळोवेळी
ऑनलाइन अध्यापन करत होते,
हे पालकांनी पाहिले आहे. या
महामारीच्या काळात काही कळो न कळो पोरांच्या शिक्षणासाठी गुरुंशिवाय पर्याय नाही, हे मात्र अख्खा जगताला समजले आहे,हे नक्की. उद्या राष्ट्रीय शैक्षणिक
धोरणं आखली जातील, पुस्तकांचं स्वरूप बदललं जाईल, शिक्षणाची पद्धत डिजिटल होईल पण
जोपर्यंत निरागस बालकांच्या मनावरची कीड हलक्या हाताने दूर करणारा, पोरांची मनं समजून घेत त्यांच्या
प्रश्नाचं रूपांतर पूर्णविरामात करणारा शिक्षक समोर नसेल तोपर्यंत शिक्षणाची
रुजवणूक शक्य नाही, एवढ मात्र खरं.
ऑनलाइन तासाला मुलं कमी असली तरी खचून न जाता, वर्गातलं एक मूल म्हणजे एक आयुष्य, याची एकदा खूणगाठ मनाशी बांधली की मग
त्या प्रत्येक आयुष्याला ज्ञानाचा प्रकाश देत उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न सुरू
केले शिक्षकांनी. अर्ध्या रात्री रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी आई जे काही
करते. उदा. दूध पाजते, अंगाई गीत गाते, धरीबाबाची भीती घालते किंवा त्याच्याशी
बोबड्या बोलात खेळते. अगदी तशाच प्रकारे आपल्यापासून, शाळेपासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या
ऑनलाइन शिक्षणासाठी जो काही पर्याय निवडता येईल तो शिक्षकांनी निवडला. गुगल मीट, झूम, पीडीएफ, झेरॉक्स, स्वाध्यायपुस्तिका, ऑनलाईन, ऑफलाईन बरंच काही... मनाची दारं उघडी
ठेवली की नव्या जुन्याचा संघर्ष होत नाही. नव्या विषयाची, नव्या प्रकारची उत्सुकता म्हणजे प्रकाश. शिक्षकांनी मनातला हा प्रकाश
संपू दिला नाही. ऑनलाईन शिक्षण सध्याच्या काळात कटकट म्हणण्यापेक्षा मुलांची नाळ
शाळेशी, शिक्षणाची जोडणारा एक दुवा म्हणून
त्याच्याकडे पाहिलं.
पूर्वी शाळा अकरा ते साडेपाच
भरायची, पण या काळात सकाळपासून रात्रीपर्यंत
शिक्षकांची शाळा सुरूच होती. विद्यार्थ्यांना वेळ भेटेल तेव्हा ते पालकांचा मोबाईल
घेऊन अभ्यास करत होते आणि शिक्षक विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या प्रत्येक उत्तराला
अभिप्राय देत होते. पोरांच्या आलेल्या स्क्रिनशॉटने मेमरी कार्ड भरून जात होतं.
समोर पोरं नव्हती, संवाद नव्हता असं काहीच नाही. तास होत
होते, पोर बोलत होती, प्रश्न मांडत होती, उत्तरे शोधत होती. ऑफलाईन
विद्यार्थीदेखील संपर्कात रहावे म्हणून शिक्षकांची धडपड सुरू होती. शिक्षकांची
अध्यापन अनुकूल अभिवृत्ती,
विद्यार्थ्यांप्रती आस्था यांवर
कोणत्याच महामारीचा परिणाम झाला नाही, ध्येयाने
झपाटलेले शिक्षक कधीच शांत बसत नाहीत, हे
खऱ्या अर्थाने पुढे आले.
'हम तो माहोल के बली' असं म्हणत शिक्षकांनी अंग झटकले नाही.
खेड्यापाड्यात, शहरांच्या गल्लीबोळात
विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन शालेय साहित्य, झेरॉक्स
देत शिकवलं शिक्षकांनी. मित्रांची मदत, पालकांचे
सहकार्य, गृहभेटी हे देखील केलं. विविध ऑनलाइन
स्पर्धा घेतल्या, त्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलासाठी
सर्टिफिकेट स्वतः तयार करून दिले. अभ्यासासोबत प्रेरणादायी व्हिडिओ, संदेश पाठवत जगण्याचं बळ दिलं. शालेय
पोषण आहार योजनेंतर्गत तांदूळ वाटप करून कित्येकांच्या पोटाला आधार दिला आणि हे
तेव्हा केलं जेव्हा कोणी कोणाला स्पर्श तर काय बोलणंही टाळत होते, अशावेळी.
राष्ट्रीय आपत्ती
व्यवस्थापनाच्या यज्ञात कितीतरी निष्पाप शिक्षकांची आहुती गेली. राष्ट्र निर्माण
करणारा शिक्षक राष्ट्रासाठी आपत्तीच्या वेळेप्रसंगी यमदूतापुढेही निर्भीड उभे राहू
शकतो सर्व गुरुजनांनी आपल्या कृतीतून दर्शविले आहे. शाळेच्या प्रांगणात आपल्या
देशाचे उज्ज्वल भविष्य घडवणारा शिक्षक या कोव्हिडच्या भयान काळातही समाजापुढे
आदर्शच ठेवत होता. फैज अहमद फैज यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं,
'लंबी है गम की शाम,
मगर शाम ही तो है!'
आज अंधार असला तरी उद्या लख्ख उजाडणार आहे.
अभ्यासात मागे पडणाऱ्या पोरांवर कष्ट घेत जादूची कांडी फिरवावी तसं शिक्षक मागची
सगळी कसूर भरून काढणार आहेत, याची
खात्री आहे. शेवटी एकच सांगतो,
'रात
सर पर है और सफर बाकी, हमको चलना है सवेरा होने तक!'
धन्यवाद
आयुब कलाम शेख,
प्राथमिक शिक्षक,
म.न.पा.शाळा क्र.174बी, कोंढवा
बुद्रुक पुणे.
9552941271
No comments:
Post a Comment