वैचारिक महिला दिन!
विज्ञान दिन,
मातृभाषा दिन, स्वातंत्र्यदिन हल्ली असे बरेच दिवस इव्हेंटप्रमाणे साजरे करतोय
आपण. फक्त स्टेटस ठेवणं किंवा शुभेच्छा देण्यापुरतंच मर्यादित नसेल तर खरोखरच
चांगली गोष्ट आहे ही सुद्धा. निदान या दिनांच्या निमित्ताने जाणीव तरी होते असं
काहीतरी असतं याची. आज ८ मार्च, जागतिक महिला दिन. खरं तर एका दिवसापुरतं साजरं
करण्याइतपतच संक्षिप्त स्वरुप या दिनाला नाहीच मुळी. उभ्या आयुष्याची सुरुवातच
जिच्या असण्याने होते, अशा स्त्रीचा फक्त एक दिवस कसा असू शकेल बुवा? पण महिला
दिनानिमित्त रांगोळी, मेहंदी, केशभूषा, सौंदर्य स्पर्धांचे अनेक ठिकाणी आयोजन
केलेलं पाहिलं की वाटतं, सगळ्यांच्या लेखी महिला अजूनही सजवायचीच वस्तू आहे की
काय? यांसोबतच कर्तृत्व दाखवणाऱ्या स्पर्धांचंही आयोजन आवर्जून व्हायलाच हवं.
पहिल्या महिला
डॉक्टर आनंदीबाई जोशी, ज्ञानेश्वराचा राग आणि चांगदेवाचा अहंकार घालवणारी मुक्ताई,
बुरसटलेल्या विचारांच्या नवऱ्याला तुकोबांसारखा गुरु मिळवून देणारी बहिणाबाई,
स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात उतरवणारी शिवबा निर्माती जिजाऊ, अखंड
उपेक्षितांची आई, बाबासाहेबांची सावली रमाई, मुलींसाठी शिक्षणाचा दीपस्तंभ ठरलेली
साऊमाई आणि तितक्याच प्रखरपणे साथ देणारी फातिमाबी शेख, निर्भीड लेखिका ताराबाई
शिंदे, आदर्श राज्यकारभार करणारी अहिल्याबाई होळकर, पाठीवर मुलाला घेऊन लढणारी
झाशीची राणी लक्ष्मीबाई, अंतराळाची सफर करणारी कल्पना यांसारख्या कित्येक
स्त्री-प्रवाहांनी प्रस्थापित भिंती फोडून जगाला दाखवून दिलंय स्वतःचं स्वतंत्र
अस्तित्व. या स्त्रियांची थोरवी आभाळमोलाची आहेच पण प्रत्येक कुटुंबासाठी झटणारी
आजची स्त्री यांपेक्षा निराळी नाहीच मुळी! घराबाहेर राबणाऱ्या आईच्या चिमुकल्या
मुली तर लहानपणापासूनच आपल्या छोट्या भावंडांची आई बनून जातात. अनेक महिलांचं
कर्तृत्व आपण पाहतोय उघड्या डोळ्यांनी. नुकतंच भारतीय महिलांच्या क्रिकेट टीमनं
विश्वचषकात अंतिम फेरीत स्थान पटकावलं, विजांसारख्या त्या कडाडल्या. क्रिकेटसारखा
खेळ फक्त पुरुषांची मक्तेदारी असण्याच्या कार्यक्षेत्रात स्त्रियांनी विजयाचे
झेंडे रोवले. महिलांकडे पाहण्याची अक्षरशः नजरच बदलून टाकली.
त्यांच्या तर उंबऱ्यानेही गाठली उंची
नभाची,
ज्यांची चौकट चुलीपाशी जगाने बांधली होती!
असं चित्र रेखाटले
आहे आजच्या पोरींनी. तरी आजही लेकीच्या जन्मावेळी बापाचा धीर खचतो. मुलीची नाळ
आईपासून अलग होते न होते तोच हुंड्याची तडजोड, सुरक्षिततेचा प्रश्न डोक्यात वळवळू
लागतो. मुली फक्त वंशाच्या दिव्याची सोय करणाऱ्या ठरतात, आजही.
किती निर्बंध पोरींवर? शालेय विद्यार्थ्यांना पुढे करत कुणीतरी
पेटवतंय हिजाब आणि भगव्या शेल्यांचं राजकारण अगदी शाळा महाविद्यालयांच्या सुपीक
रानातही. जिथे समता, समभावाची शिकवण पेरली जाते, उज्ज्वल भारताच्या भविष्याचं पीक
घेतलं जातं. तिथं जातीवादाच्या दंगली घडवणाऱ्या अंधभक्तांनी नासधूस माजवलीये.
मुलींनी कोणता पेहराव करायचा? हे मुलींनाच ठरवू द्या ना. तिच्या हिजाबला विरोध
करणाऱ्या किंवा मुलींनी किती अंग झाकावं, किती उघडं ठेवावं? याचे पूर्वापार नियम
बनवणाऱ्या किती जणांनी आपल्या बहिणीला ड्रेस घेतलाय? कित्येकांनी आईला साडी
दिलीये, स्वतःच्या कमाईतून? याचीही चर्चा होऊ द्या की. जिवंत माणसांच्या कवट्या
फुटायची वेळ आली तरी जातींचे मुडदे जळत नाहीत, अशी दयनीय अवस्था काय कामाची?
कित्येकदा शेतकरी
आत्महत्या करतो तेव्हा तो सगळ्यात मोठी अडचण आपल्या बायकोची करतो. निराधार करून
जातो तिला. दुष्काळाला कंटाळून महिला शेतकऱ्यांनी किंवा बळीराजाच्या बायकांनी
आत्महत्या केल्याचे चित्र सहसा दृष्टीक्षेपात नाहीच. शेतकऱ्यांच्या बायकांना जीव
द्यायचीही सोय नाही. लेकरांचे चिमणे चेहरे दिसतात त्यांना आणि हात पुन्हा
कष्टांकडे वळतात, अगदी सहज. आत्महत्या करण्यात पुरुष आघाडीवर तर स्त्रिया शेतात
राबण्यात अव्वल आहेत. कुठून एवढा आशावाद या मायमाऊलींमध्ये येतो कुणास ठाऊक? कधी
नकोसं वाटलंच जिणं तर अशावेळी 'नाम' सारख्या संस्था पाठीशी भावासारख्या भक्कम
उभ्या राहतात. अश्रू पुसण्यासोबत आधाराचा हात देतात. आपणही अशा वेळी सहकार्य
करण्याची दानत दाखवायला हवी. रस्त्याला भाजीपाला विकायला बसणाऱ्या शेतकरी
मायमाऊलीला कोणताही मोलभाव न करता खरेदी करायला हवी. दत्ता हलसगीकर सुचवतात,
ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत,
ज्यांचे सूर जुळून आले, त्यांनी दोन गाणी
द्यावीत!
ज्यांच्या अंगणात झुकले ढग, त्यांनी ओंजळ
पाणी द्यावे,
आपले श्रीमंत हृदय त्यांनी, रिते करून
भरून घ्यावे!
आभाळाएवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे
खाली यावे,
मातीत ज्यांचे जन्म मळले, त्यांना थोडं
उचलून घ्यावे!
यानुसार जगायला काय
हरकत आहे?
ऑस्ट्रेलियातून
शिकून आलेला, आयटी क्षेत्रात उद्योग सुरू करणारा संगमनेरमधील गिरीश लाड हा एक
तरुण. तंत्रज्ञानाचा वापर करत 'सेव्ह द गर्ल' उपक्रमाचा त्याने पाया रोवला.
कोल्हापुरात सोनोग्राफी मशीनसाठी एक ट्रॅकिंग यंत्रणा लावली. त्यामुळे गर्भपाताला
आळा बसायला मोठी मदत झाली. मुलींचं हजारामागे ८२९ प्रमाण होतं ते ८८० पर्यंत
वाढलं. स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर लिहिणारे, आतडीला पीळ बसेल एवढं कोकलणारे
खूप. पण 'सायलेंट ऑब्झर्व्हर' या मोहिमेत स्त्रीभ्रूणहत्या प्रमाण कमी करणारे
गिरीश लाड देशासाठी जास्त महत्त्वाचे आहेत. 'बेटी बचाव' च्या जाहिरातीवर होणारा
सगळा खर्च योग्य कृतींसाठी वापरला तर चित्र वेगळं दिसेल, एवढं मात्र नक्की.
एक आठवण आवर्जून
सांगावीशी वाटते. माझ्या शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनात चौथीच्या 'देश रंगीला'
या नृत्यात सावळ्या थोडक्यात काळ्या रंगाच्या पोरीला भारत माता का दाखवली ? जरा
उजळ पोरगी नव्हती का ? असा प्रश्न विचारणारी सहकारी स्त्री शिक्षिका मला अजूनही
लक्षात आहे. भारतभूमी, धरणीमाय काळीच असते
मग भारतमातेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पोरीचं काळं रुप का चालत नाही ? का पचत नाही
आपल्याला ? मुलींनो, एक गोष्ट
नेहमी लक्षात ठेवा. जो आतून स्वच्छ तोच बाहेरून चमकतो. तुम्ही कसे दिसता याच्याशी
आनंदाला काहीही घेणं देणं नसतं. तो कुणाच्याही चेहऱ्यावर येतो. तो चेहरा कसाही का
असेना. आपोआप सुंदर दिसू लागतो. घामाच्या थेंबांनी डवरलेल्या साजसौंदर्याची तुलना
मेकअप केलेल्या भपकेगिरीशी कशी करता येईल? निराशेची चौकट काढून टाकली की
आत्मविश्वासाने उत्फुल्ल चेहरा आरशात कधी मावणारच नाही मुळी! प्रत्येकाचा जगाकडे
पाहण्याचा वेगळाच दृष्टीकोन असतो. आपण मात्र आपल्याच रंगात रंगायचं. खुल्या मनाने,
मोठ्या दिलाने विचार करायचा. मुखवटा वापरायचाच नाही, आंतरिक सौंदर्यावर भर
द्यायचा. फेअरनेस क्रीम, पावडर, लिपस्टिक यांचा वशीला हवाच कशाला? आतून
उजळण्यासाठी कला, कौशल्य, पुस्तकं, साहित्य, पदव्या, शिक्षण अशा आभूषणांनी
कर्तृत्वाची उंची गाठायची! केवळ वरलिया रंगा भुलू नये, मनही लोभसवाणं आहे अशी
माणसं जगात खूप दुर्मिळ असतात. आपणही त्यातलंच एक व्हावं, हे लक्षात ठेवायला हवं.
लोकल ट्रेनमध्ये
लेडीज डब्यात भाज्या निवडत घरी जाणाऱ्या बायका आणि जनरल डब्यात जगभराच्या गप्पा
मारणारे पुरुष कितीदा पाहतो आपण. आयुष्यभर संसाराचीच काळजी वाहतात बायका. तरीही
उपेक्षितच राहतात. पण काही पुरुष देतात समानतेचा हक्क स्त्रियांना. मुलामुलींमध्ये
नाहीत भेद करत. लेकीला परीसारखं जपतात. केवळ एकच मुलगी अपत्य असणारी कित्येक घरं
मी पाहिलीयेत. त्या घरांत महिला दिन साजरा करण्यासाठी ८ मार्चची वाट बघत असतील का?
आदीवासींचा संघर्ष,
धरणग्रस्तांची हाक आणि नर्मदेच्या पाण्यासाठी लढणाऱ्या समाजसेविका मेधाताई पाटकर,
बाबा आमटेंची अर्धांगिनी, कुष्ठरोग्यांसाठी 'आयुष्याची समिधा' अर्पण करणाऱ्या
साधनाताई आमटे, गडचिरोलीत महिलांच्या आरोग्याची काळजीवाहू डॉ. राणी बंग, अनाथांची
माय सिंधुताई सपकाळ यांसारख्या असंख्य स्त्रिया समाजोद्धाराच्या वाटा धुंडाळत
आहेत, नव्याने स्वत्व शोधत कर्तृत्वाची मोहर उमटवत आहेत. त्यांचं कार्य या
दिनानिमित्त अधोरेखित होणे गरजेचे आहे, समस्त महिलांना ऊर्जा मिळण्यासाठी.
करिअर ऐन भरात
असताना अनघा मोडकची डेंग्यूच्या निमित्ताने दृष्टी गेली. कायमच्या अंधत्वावर मात
करत आकाशवाणीवर ती निवेदिका झाली. अंधाराला प्रकाशाचं कोंदण ठरली. छंदाचा मुक्तछंद
करत आत्मविश्वासाने तिच्या प्रतिभेचा गाभारा उजळत राहिला. दुःखालाही चिमटीमध्ये
धरत त्याचं फुलपाखरू तिनं केलं. दूरदर्शनवर एबीपी माझाच्या 'माझा संघर्ष आणि मी'
या कार्यक्रमात निवेदिका होत अनेक अंध, अपंग, मतिमंदांच्या उत्कर्षाच्या कहाण्या
तिने मांडल्या पण हरली नाही, रडली तर मुळीच नाही. तिचा कार्यक्रम पाहताना गुरु
ठाकूरच्या ओळी मला आठवल्या,
खोचते वीज पंखात जरी पदरात
तिच्या सांडून चालली माया,
ओठात हसू गोंदून उभी निक्षून
जणू उभं आभाळ पेलाया!
आणखी एक उदाहरण.
डॉ. उज्ज्वला सहाणे यांनी आपल्या १००% कर्णबधिर अन् जन्मतःच पांगळ्या पोरीला भरत
नाट्यातली श्रेष्ठ नृत्यांगना म्हणून जगासमोर उभं केलं. हेलन केलर वाचली आणि
पोरीसोबत आत्महत्येचा त्यांचा विचार गळून पडला. नवीन आयुष्याचा प्रारंभ झाला.
निसर्गाने दिलेल्या आपत्तीची संपत्ती करत लेकीच्या आयुष्यात पश्चात्तापाऐवजी
नृत्याची हळुवार निःशब्द कविता त्यांच्यामार्फत उमटली. अशा असतात स्त्रिया ज्यांना
वर्षानुवर्षे आपण अबला म्हणत राहिलो, त्यांनी सबला असण्याचं अढळपद सिद्ध केलं.
आपण जाणतोच, मृत्यूसाठी असंख्य वाटा असतील
पण जन्मासाठी एकच, ती म्हणजे आई! बाळाच्या सुखासाठी देहाच्या चिंध्या करणारी
प्रत्येक आई हिरकणीच असते. काही दिवसांपूर्वी वाचलेला एक प्रसंग नेहमी माझं मन सुन्न करून टाकतो.
एका वृद्ध आईच्या दोन मुलांपैकी सकाळचं जेवण एक मुलगा आणि रात्रीचं दुसरा देतो.
आईच्या जेवणाची अशी समानतेची शिकवण देणारी वाटणी फक्त मायदेशातच घडत असावी बहुतेक.
आईच्या चेहऱ्यावर याबाबत चिंता स्पष्ट जाणवत होती. कोणीतरी सहज विचारताच थरथरत
तिचे बोल पाझरू लागले. "थोरल्या लेकाची काळजी वाटते रे. त्याला एकुलता एक
पोरगा. तो आत्ताच हे सारं बघतोय. बापाला म्हातारपणी संध्याकाळचं जेवण मिळणारच नाही
बघ!" अतीव दुःखाने मिटलेल्या तिच्या पापण्या आणि चेहऱ्यावरचं विकृत हास्य
अस्वस्थ करणारं होतं. 'पुरुषी पांडुरंगालाही माऊली' म्हणणार्यांना आपल्या घरातलं
हे दैवत का दिसतं नसावं?
आणखी एक अनुभवलेला
खराखुरा किस्सा सांगू इच्छितो. आईवडिलांपासून वेगळं राहणारा, बऱ्याचदा आईला नावं ठेवणारा एक मित्र मी
खूप जवळून अनुभवला. काही दिवसांपूर्वी आईच्या वर्षश्राद्धानिमित्त 'आई तुझी खूप
आठवण येते, तू अजून हवी होतीस!' असं त्याचं स्टेटस ठेवलेलं मी परवा पाहिलं. हे बोल
समोर ती व्यक्ती जिवंत असताना बोलावं असं का वाटलं नाही त्याला?
वेळ निघून गेली खरंतर. आता सूर्यास्तानंतर
रेंगाळणाऱ्या धूसर, अस्पष्ट संधिप्रकाशासारख्या या स्मृती जतन करण्याऐवजी
त्याचवेळी प्रखर ऊन्हासारखं एकदा कडकडून आईला भेटता आलं असतं तर? जन्मदात्या आईचं
असं काय चुकलं असेल की तिला पूर्णतः आयुष्यातून बहिष्कृत करावसं वाटलं असेल
एखाद्या मुलाला? धडधडणारं हृदय अन् त्यासोबत लेकराला अमूल्य जीवनाचं दान बहाल
करणाऱ्या आईचा एखादाही अपराध आपल्याला पोटात घालता येत नसेल तर आपण तिचं अपत्य
म्हणायच्या तरी लायकीचे आहोत का? आई नामक त्या ज्योतीची शक्ती उमगण्यासाठी कायमचा
अंधार होण्याचीच वाट पहायची का?
आई मेल्यावर तसबिरींना बकुळीचा घमघमणारा
हार घालणं, वृत्तपत्रात किंवा स्टेटसला 'तुझ्या आठवणींशिवाय एकही दिवस जात नाही.'
अशा दिखाऊ वात्सल्याच्या जाहिराती सर्रास देणं या सर्वांपेक्षा मोलाची आहे, जिवंत
असताना त्या क्षणी दिलेली आर्त साद, तो आपुलकीचा संवाद. उभा जन्म लेकरांच्या
जिंदगानीवरून ओवाळून टाकणाऱ्या आईला दोन सुखाचे घास भरवता येत नसेल तर त्यासारखं
नरकजिणं कोणतं? मुलं हेच आपलं विश्व समजणारी जन्मदात्री अचानक कशी काय एवढी जड वाटू
लागते? की घरातली एखादी अडगळ भासू लागते. आपल्या धडधडणाऱ्या ह्रदयाला तिच्या
कित्येक त्यागाचं कोंदण लाभलंय याची मुलाला कधी चाहूलच जाणवतच नसेल का? पुरुषार्थ
कितीही गगनभेदी असला तरी तो निपजतो स्त्रीच्या ममतामयी कुशीतच. आपल्याकडे फुलं
आहेत पण ती आपल्याला जिवंत माणसाला देण्याऐवजी कुणाच्यातरी समाधीवर वाहण्याची
जास्त इच्छा असते, हेच खरं.
मुलाचा अट्टाहास
करणाऱ्यांनो, जर मावळत्या काळात अंधारच असेल तर वंशाचे दिवे तुम्हाला हवेतच कशाला?
पणत्यांचा प्रकाश कुठे अपुरा पडतोय सध्या? कित्येकांना वृद्धापकाळात आधारासाठी
वेलींचाही आधार होतोयच की!प्रत्येक आव्हानांना स्त्री संयमानं, सकारात्मकतेनं
सामोरी जाते. समजुतदारपणा, क्षमाभाव, सहनशीलता, वात्सल्य, अमाप प्रेम ही फक्त
स्त्रियांची कशी काय मक्तेदारी असू शकते? असा नेहमी विचार डोक्यात येतो.
परवा सुमित्रा भावे यांचा 'बाई' नावाचा
चित्रपट पाहिला. महानगरपालिकेतील एक झाडूवाली. तिचा बेवडा नवरा जाम मारायचा तिला.
तिनं कष्टाने दोन पोरं मोठी केली, शिकवली. एके दिवशी आईला मारताना मध्ये पडली
दोघं. चित्र बदललं. नवरा हादरला. पिऊन आला की कोपऱ्यात गप्प बसायचा. मध्यरात्री
किचनमध्ये भांड्यांचा अचानक तिला आवाज आला. उठून बघितलं नवरा चोरून काहीतरी खात
होता. बाईला रडू आलं. "अरे घर तुझंय बाबा, मी नाही तुला उपाशी ठेवायची. खा
पोटभर." म्हणत मागचे सगळे हाल विसरत नवऱ्यासाठी तिनं हंबरडा फोडला. अशा घर संसार
चालवणाऱ्या शहाण्या बायका भारतात घरटी एक या संख्येने आहेत, म्हणून संसार व्यवस्था
टिकून आहे.
लग्नानंतर नावात बदल करत आयुष्यभर दुसर्याचं
नाव घेत मिरवणं पुरुषांना जमेल का? कित्येक नवरे तर लग्नापर्यंत जपलेलं
स्त्रियांचं नावरुपी अस्तित्व केवळ भटांच्या सांगण्यावरून बदलून घेतात. आजपर्यंत
ओळख असणारं नाव बदलणं ही सोपी गोष्ट नव्हे. बेवड्या नवऱ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा
करत सात जन्माचं नातं विणण्याचा निरर्थक प्रयत्नही स्त्री करतेच. कोठून आणते एवढा
उदारपणा देव जाणे. स्त्रियांसोबत वटपौर्णिमेला पतीनंही एक व्रत जोपासावं. जेव्हा
कधी जोडीदाराला आपल्या आधाराची गरज असेल तेव्हा वटवृक्ष व्हावं. प्रेयसीला चंद्र,
तारे तोडून आणण्याच्या बाता मारणाऱ्यांनी बायकोला दोन चार फुलं तोडून आणावीत,
निदान त्यांचा गजरा तरी करेल ती, केसात माळण्यासाठी.
दुसरीकडे कित्येक
दलालांच्या तावडीत अडकलेल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी बुधवार पेठेसारख्या
वासनेच्या बाजारात अख्खं आयुष्य नासवावं लागतं एखाद्या स्त्रीला. यासारखं दुर्दैव
कोणतं? वेश्याव्यवसाय करणाऱ्या त्या महिलांना कोणत्या तोंडाने महिला दिनाच्या
शुभेच्छा देता येतील?
बलात्कार झाला
म्हणून मोर्चे काढणं, मेणबत्त्या पेटवत शांततेत कॅन्डल मार्च करणं यांसोबतच
संपर्कातल्या महिलांविषयी आदराची भावना, मदतीचा हात देणं, उघड्या डोळ्यांनी
समाजातले स्त्रियांवरचे अत्याचार पाहून आवाज उठवणं महत्त्वाचं. एखाद्या जरी
स्त्रीला संकटकाळी सहकार्य केले तरी पुरेसे. इथल्या जातिव्यवस्थेमुळे दिड दिवसाची
शाळा शिकणारे अण्णाभाऊ साठे स्वतः वाचायला, लिहायला शिकले. त्यांनी प्रस्थापित
साहित्याला प्रचंड तडाखे देत समाजात हिणवले जाणार्यांना नायक-नायिका म्हणून उभं
केलं. त्यांना 'स्त्री' शब्द कधीही लिहिता आला नाही मात्र त्यांनी बंड करणाऱ्या
सशक्त नायिका उभ्या केल्या, अगदी तसंच स्वतः शिकलेल्या स्त्रीने तृप्तीची ढेकर न
देता इतर स्त्रियांसाठीच्या आवश्यक बदलासाठी प्रयत्न करत प्रखर इच्छाशक्तीने पावलं
उचलायला हवीत.
दोन
साड्यांवर टब विकणाऱ्या गरीब, फाटक्या साडीतल्या त्या बाईला एखादी साडी भेट द्यावी
वाटली तर तुमचं बाईपण अजूनही शाबुत आहे एवढं नक्की!
गुरु ठाकूरच्या
भाषेत सांगायचं तर,
लाज द्रौपदीची वेशीवर जळे आमचे उमाळे
कोरडेच,
फुकाच्या चर्चा फुकाचे निवाडे न्यायासाठी
मढे वाट पाही.
अशी आपली गत होऊ
नये म्हणजे मिळवलं.
स्त्रियांचं महत्व सांगताना, काहीवेळा
महिला स्त्रित्वाचा गैरवापर करून पुरुषांना गोत्यात आणतात. त्यांचाही समाचार घेणं
गरजेचं आहे. द्राक्षांच्या पिकलेल्या घोसातही एखादं आंबट द्राक्ष निघतंच की, अगदी
तसंच काही स्त्रिया घातक ठरतात. मुद्दाम एखाद्या आरोपात विनाकारण फसवू पाहतात.
वंशाच्या दिव्यासाठी कित्येक सासवा सुनांचा छळ करतात. तसंच सासूला त्रास देणाऱ्या
सुनादेखील कमी नाहीत. कामाच्या ठिकाणी काम सोडून साडी, बांगड्या, स्वयंपाकाच्या गप्पा
मारणाऱ्या महिलांनी नोकऱ्या करूच नयेत असं वाटतं.
प्रवास करताना गाडीत महिला सीटवर तुमचा
१००% हक्क, अधिकारच आहे. पण तरुण असाल आणि एखादा वृद्ध उभा असेल शेजारी तर द्या ना
त्याला क्षणभर विश्रांती. मनोरंजनाचा अधिकार महिलांनाही आहेच पण तासनतास
टीव्हीसमोर ठाण मांडून बसणाऱ्या, त्याच त्या भंपक मसालेदार कौटुंबिक कलहाच्या
मालिका
तासनतास चघळत बसण्याला काही अंत?
कित्येक महिलांच्या
कर्तृत्वाचे दाखले द्यायचे अन आपण मात्र वायफळ गप्पा मारत कित्येकांची धुणी
धुवायची, कशासाठी? पुढच्या महिला दिनानिमित्त आपलीही कोणीतरी आठवण काढेल अशा कार्याची नांदी
ठरवत सुरुवात करू.
शेवटी जाताजाता
स्त्री जन्माची कहाणी...
महिला दिनाच्या संध्यासमयी
शिळ्या प्रासंगिक शुभेच्छांचा पसारा
अगदी सहज आवरून
ह्रदयाच्या कुठल्याशा कोपऱ्यात ठेवत
पुन्हा एकदा घरादारासाठी
ती अखंड राबत राहील,
पोळ्याच्या बैलासारखी!
तरीदेखील समस्त
स्त्रीवर्गास महिला दिनाच्या आभाळभर शुभेच्छा!!
आयुब कलाम शेख,
प्राथमिक शिक्षक,
पुणे महानगरपालिका
९५५२९४१२७१