भ्रमणगाथा हरिश्चंद्रगडाची, साथ गड किल्ले प्रेमी ग्रुपची!!
आठवडाभरापूर्वी ठरलेल्या नियोजनानुसार आयोजक श्री. रवी काळे सरांसोबत २९ गड-किल्ले प्रेमी निमगाव म्हाळुंगी गावात २१ ऑगस्ट २०२१ रात्री अकरा वाजता जमलो. शंकर मोरे, रविंद्र काळे, शरद काळे, वैभव नरवडे, वैभव करपे, संदिप फाळके, अजिंक्य मांढरे, प्रीतम वडघुले, आयुब शेख, शुभम डमरे, वैभव चव्हाण, रोहन शिवले, वेदांत देशमुख , सोमनाथ चव्हाण, नवनाथ काळे, श्रीकांत नागवडे, भाऊ चव्हाण, शिवाजी चव्हाण, गणेश घोरपडे, सागर काळे, धीरज चव्हाण, अमर वडघुले, सुमित वडघुले, गणेश वडघुले, अनिरुद्ध मांढरे, रवी नरसाळे, हनुमंत वडघुले, राजेंद्र मरकुटे, संदिप साळुंखे ही गडप्रेमींची यादी!! या टीममध्ये विद्यार्थी, शिक्षक, आयटी कंपनीचे विविध अधिकारी, प्रोफेसर, शेतकरी बंधू सगळे होते पण 'शिवप्रेमी' हीच सर्वांची ओळख होती.
मोठी गाडी, पाण्याचे मोठाले तीन जार, फरसाण, भेळ सफरचंद यांच्या जय्यत तयारीनुसार रात्री बारा वाजता ग्रुप सेल्फी काढून प्रवास सुरू झाला,हरीश्चंद्र गडाच्या दिशेने! सर्वजण उल्हसित होते. हरिश्चंद्रगडाची ओढ मनात घेऊन प्रवासासाठी सज्ज झाले होते. निमगाव म्हाळुंगी- शिक्रापूर- नारायणगाव- राजूर करत पायथ्याशी पहाटे साडेपाच वाजता आम्हीमी पोहोचलो. पाच-सहा तासांचा अखंड प्रवास. प्रवाशांची छानपैकी झोप झाली मात्र आयोजक आणि सोबत बापू यांसारखे धडाडीचे कार्यकर्ते मात्र संपूर्ण प्रवासभर झोपले नाहीत.
ड्रायव्हरसोबत रस्ता दाखवत, गप्पा मारत ते जागे होते. नेतृत्व खंबीर असलं की नियोजनात कसूर आणि ध्येय गाठण्यात दिरंगाई होत नाही हेच खरं. नियोजित वेळापत्रकानुसार आम्ही पोहोचलो. पावसाची रिपरिप चालूच होती. वैयक्तिक स्वच्छता, प्रातर्विधी उरकून सकाळी सात वाजता सर्वांसोबत चढाई सुरु केली. काळे सरांचं एवढं एक खास असतं की, जिथे आपण जाणार आहोत त्या गडाविषयी सर्व माहिती ते मिळवतात,मित्रांना फोन करून जेवणाची सोय कुठे उत्तम होईल? गड किल्ल्यावर पाहण्यासारखे काय आहे? यासोबतच एकाच वेळी आपण आणखी काय काय पाहू शकतो? या सर्वांची चर्चा, सर्वांचा वेध ते अचूकपणे घेतात. पायथ्यापासून २७००मीटर लांब हरिश्चंद्र मंदिर होते. रेनकोट, बॅग, पाणी, खाऊ सर्व काही घेऊन आम्ही निघालो. पावसाचं बरसणं काही थांबलं नव्हतं. हिरवागार निसर्ग, भुलवणारे कडे, फेसाळणारे धवलवर्णी धबधबे, अखंड वाहणारं गार पाणी, सर्वांचा जोश पाहत आमची ट्रीप खासच होणार याचा अंदाज सहज बांधता येत होता.
कोणत्या पाऊलवाटेचा पुढे हमरस्ता होईल हे प्रवासाच्या प्रारंभी सांगता येत नाही, तेव्हा चालावं खुशाल शोधात! संधीचा कोणताही क्षण दवडू नये. प्रेक्षणीय, भूल पाडणारा निसर्ग समोर असताना फोटो काढण्याचा मोह कोणाला आवरता येईल? मस्तपैकी फोटो शूटिंग करत एका धबधब्यापाशी पोहोचलो. संततधार पावसामुळे गारवा खूप होता, रेनकोट असून पावसापासून संरक्षण करता आले असते, तरीही सर्वजण भिजले. मज्जा केली. बोबडी वळविणारा गारवा असतानाही मज्जा येत होती. बाहुबली चित्रपटासारखे scene जिथे तिथे पहायला मिळत होते.
दरीतून कोसळणार्या धबधब्यांचा मदहोश करणारा तुफान आवाज येत होता. निसरडा, घसरवणारा रस्ता असल्यामुळे सर्व जण नियमानुसार ट्रेकिंग करत होते. कोणीही एक्स्ट्रा वागत नव्हतं. एक दोन पोरं थोडी घसरली. काळे सरांनी सर्वांना पुन्हा सूचना दिल्या आणि गांभीर्य लक्षात घेऊन कोणीही हलगर्जीपणा केला नाही, हे विशेष. 'जोशमध्ये होश' सांभाळणारी ही टीम. यांच्यासोबत गडचढाई करताना खरंच भारी वाटत होतं. पारंपारिक किल्ल्यांपेक्षा वेगळा असणारा हा अहमदनगर मधील किल्ला. याला कोणतीही तटबंदी नाही.
शेवटचा एक डोंगर कडा पार केल्यावर हरिश्चंद्राचे काळ्या कातळातील विलोभनीय मंदिर नजरेस आले. कलचुरी राजवंशाच्या राजवटीतील सहाव्या शतकातील हा गड आणि गडाचे निसर्ग वैभव पाहून याला 'ट्रेकर्सची पंढरी'का म्हणतात हे समजले. नेत्रदीपक सौंदर्याने नटलेले शिवमंदिर, मंदिरामध्ये भला मोठा नंदी अकराव्या शतकात झांज राजाने हे मंदिर बांधले असावे अशी माहिती मिळाली. तर कोणी बाराव्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील हे शिवमंदिर आहे असेही सांगत होते. मंदिरासमोर एक दगडी पुरातन पूल बांधला असून त्याखालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो. यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. ही नदी पुढे पाचनई गावातून वाहत जाते.
नाजूक कोरीव काम अजूनही या मंदिराच्या वैभवाचे दर्शन घडवते. मंदिराच्या उजवीकडे कोरलेली भलीमोठी गुहा आहे. यात भलीमोठी पिंड व चार खांब आहेत. हे चार खांब चार युगांचे दर्शक आहेत अशी आख्यायिका ऐकण्यास मिळते. गुहेसमोर रवी काळे सरांसोबत सर्वांनी प्रत्येक शिवप्रेमीला स्फुरण चढवणारी 'प्रौढप्रतापपुरंदर सिंहासनाधीश्वर....' ही आसमंताला दणाणून सोडणारी घोषणा दिली. 'श्वासाश्वासांमध्ये शिवराय' ही म्हण सार्थ ठरवणारा हा अनुभव. यानंतर मंदिरापासून १२४० मीटर अंतरावर असणारा, गडाच्या पश्चिमेकडचा 'कोकणकडा' या गडाचे सर्वांत मोठे आकर्षण आहे. हवा स्वच्छ असली की येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. इंग्रजी यु आकाराचा कडा अंतर्गोल आहे. समोरून बघितला की नागाच्या फण्यासारखा दिसतो. तिथे आम्ही गेलो पण दुर्दैव असे की पावसामुळे धुके इतके होते की पांढऱ्याशुभ्र वलयांशिवाय काहीच दिसत नव्हतं. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा बघता आला नाही हे डोळ्यांचे दुर्दैव. तिथे काही फोटो घेतले.
लोकं मृत्यूनंतर स्वर्गात जाण्याची आशा व्यक्त करतात पण आम्ही तर जिवंतपणीच सह्याद्री रुपी स्वर्गाचे दर्शन घेत होतो. निसर्ग डोळ्यांमध्ये आणि क्षण काळजामध्ये सामावून पुढे तारामती शिखराकडे आम्ही निघालो. तिकडे जाण्याचा मार्ग माहित नव्हता. तरीही ५०० मीटर जंगल सदृश्य वेढलेल्या झाडाझुडपांतून आम्ही पुढे गेलो. मात्र निराशा पदरी आली. दाट धुक्यामुळे आम्हाला पुढचा मार्ग दिसत नव्हता. खबरदारी म्हणून नाईलाजाने माघारी फिरलो. प्रयत्नांना अपयश आणणारा हा अनुभव मात्र 'इतना तो चलता है!' म्हणत आम्ही सर्वजण माघारी फिरलो. भेळीचे मोकळे प्लास्टिकचे पुडे, पाण्याच्या बाटल्या सर्वकाही आम्ही खाली घेऊन आलो. 'गडकिल्ले हा आपला स्वाभिमान आणि आम्ही स्वाभिमानाला जपतो!' हे रवी काळे सरांचं मत आम्ही जपलं.
भुकेमुळे पायथ्याची ओढ पायांना अशी लागली होती की एक तास ४५ मिनिटांत सलग चालत आम्ही पायथा गाठला. ज्यासाठी आम्हाला जाताना चार तास लागले होते. ढगाआडच्या सूर्यनारायणाचे शेवटपर्यंत दर्शन झालेच नाही. त्यामुळे जास्त फोटो काढता आले नाहीत पण दोन चार मित्रांचे वॉटर प्रूफ मोबाईल असल्यामुळे फोटोंचा खजिना रिता झाला. त्यांचे खूप खूप आभार. श्रावणामुळे शाकाहारी मंडळींनी आधी भोजन केले आणि नंतर मांसाहारी मंडळींनी चिकन-भाकरी वर ताव मारला. दुपारी साडेतीन वाजता आम्ही तिथून निघालो. रस्ता थोडा खराब असल्यामुळे दहा वाजता निमगाव म्हाळुंगी गावात पोहोचलो.
सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद आणि यशस्वी ट्रिपचे प्रतिबिंब सहज प्रतिबिंबित झाले होते.
हिंडण्याचा नित्य घडो गुन्हा,
सजा सह्याद्रीची कैद हवी!!
मी आणि शुभम पुण्याला निघणार म्हणून काळे सरांच्या घरी भरपूर जेवलो. घरच्या माऊलींनी सुरेख जेवणाचा बेत केला होता. रात्री बारा वाजता पुण्यात पोहोचलो.
अशी अविस्मरणीय हरिश्चंद्रगडाची भ्रमणगाथा.
नव्या उमेदीने पुढच्या महिन्यात नवागड बघण्याचा निश्चय उराशी बाळगून थांबतो.
तोपर्यंत
जय शिवराय, जय महाराष्ट्र!!
आयोजक
रवी काळे सर
गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान
निमगाव म्हाळुंगी
90964 65675
मार्गदर्शन
पंकज माने सर
शब्दांकन
आयुब शेख सर
प्राथमिक शिक्षक
पुणे महानगरपालिका
9552941271
🙏🏻⛳
No comments:
Post a Comment