Wednesday, March 16, 2022

शिक्षकांच्या मनातल्या भावना शब्दांत पेरण्याचा यत्न


नुकतीच सुरू झालेली शाळा आणि प्रभागरचनेच्या आदेशाची सणसणीत चपराक!

एकाच शाळेतल्या ११ शिक्षकांना ऑर्डर असेल तर शाळा चालवायची कशी?

शिक्षकांच्या मनातल्या भावना शब्दांत पेरण्याचा यत्न...


सुप्तावस्थेतल्या बियांना

कष्टाचं शिंपण देत,

ज्ञानासोबतच सुसंस्काराचे

कुंपण देतो आम्ही...

शाळाबंदीच्या लॉकडाऊन नामक

शिशिरानंतर

नुकतीच कुठे शिक्षणाची पालवी

बहरण्याची संधी देताना...

मध्येच प्रभागरचना, बीएलओ,

कोव्हिड ड्युट्यांची कित्येक बांडगुळं

जबरदस्तीने आमच्या

कार्यक्षेत्रावर पसरवली जातात...

चिमुकल्यांसाठी एकवटलेला

सगळा जोम पिळून,

अशैक्षणिक कामांच्या

मुळाशी ओतला जातो...

एवढं करूनही दमल्या भागल्या

त्याच शिक्षकी जीवांना

पुन्हा ऊर फुटेस्तोवर

धावायला भाग पाडतात,

वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या

गोंडस मथळ्याखाली...

अन् त्याच सरकारी शाळांचं

मरणासन्न रुपडं

दर्शवलं जातं चोहीकडे...

तितक्याच विद्रूप पद्धतीने...

मराठी शाळांच्या

दर्जाहीनतेची संमेलनं,

वर्तमानपत्राच्या पानापानावर

भरवली जातात...

अशी ही दैना सरकारी प्राथमिक

शाळांची अन् शिक्षकांचीही...

त्यापेक्षाही भलं-थोरलं कधीही

न भरणारं नुकसान असतं...

ते शाळेतल्या उज्ज्वल भारताचं!

सरतेशेवटी ज्यांचं कोणालाच

काहीही घेणं देणं नसतं!

गुणवत्ता नेहमीच

सिद्ध करतो आम्ही,

पुढेही करूच नित्यनेमाने...

पण बाबांनो....

क्षणभर पोरांसोबत थांबू तर द्या...

दिड दोन वर्ष काळवंडलेल्या

पिकांची निदान

पाहणी तर करू द्या...

शिक्षणक्षेत्रात भरघोस उत्पादनाची स्वप्नं रंगवणाऱ्यांनो,

अक्षरांची पेरणी करण्यासाठी

थोडा वेळ तर द्या...

सतत शिक्षकांना वेठीस धरण्याचा...

असा अट्टाहास बरा नव्हे!

सुज्ञास सांगणे न लगे!

✍🏼

आयुब कलाम शेख

प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका

9552941271

एक सरकारी शाळेतील प्राथमिक शिक्षक...

😞

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...