वासोटा किल्ला - एक स्वर्गीय अनुभव
१२ मार्च २०२२ रोजी रात्री साडेदहा वाजता निमगाव म्हाळुंगीमधून गाडी गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपचे ४९ शिलेदार घेऊन शिक्रापूर, हडपसर, कात्रज मार्गे वासोट्याकडे रवाना झाली. महाराष्ट्रभूमीत सह्याद्रीच्या पंगतीला बसणारा, सातारा जिल्ह्यातील दुर्ग भ्रमंतीची विलक्षण अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय.
पावशा पक्ष्यानं दरवर्षी तहान भागवण्यासाठी आभाळाकडे पाहत पावसाच्या पहिल्यावहिल्या थेंबाची वाट पहावी, अगदी तशाच आतुरतेने आम्ही प्रत्येक महिन्याला गड-किल्ले सफरीची वाट पाहतो. यंदा मात्र यात थोडं निराळेपण होतं, कारण यावेळी आयोजक रवी काळे सरांनी एकट्या दुकट्याची नव्हे तर कुटुंबाची सफर आयोजित केली होती. दर महिन्याला आमच्या बहारदार ट्रीपचं आयोजन सर अगदी यशस्वीपणे करतात. यावेळी रविंद्र काळे, विद्या काळे, आरूष काळे, गणेश घोरपडे, ज्योती घोरपडे, तनिष्का घोरपडे, अनुष्का घोरपडे, शरद काळे, वर्षा काळे, यज्ञ काळे, शौर्य काळे, वैभव करपे, ऋत्विक करपे, भरत साकोरे, प्रांजली साकोरे, स्वरूप साकोरे, वैशाली चव्हाण, कार्तिक चव्हाण, माऊली मामा, विक्रम सुर्यवंशी, अश्विनी सुर्यवंशी, सृष्टी कुसालकर, स्वराज पवळे, अमोल टाखळकर, प्रगती टाखळकर, राजेंद्र चव्हाण, मोनिका चव्हाण, विकास कापरे, श्वेता कापरे, घारमळकर रोहिदास, घारमळकर रेश्मा, विजय माने, वैशाली माने, श्रावणी माने, वेदांत माने, आयुब शेख, तमन्ना शेख, सुभाष बोरकर, स्वाती बोरकर, सुयश बोरकर, नवनाथ काळे, रागिणी काळे, यश काळे, सृष्टी काळे, गणेश पवळे, ज्योती पवळे, या कुटुंबांसोबत अप्पा रणसिंग, शुभम डमरे या दोन अविवाहितांनाही सामावून घेतले. या सर्वांमध्ये अनेक कंपनी कामगार, आयटी, शिक्षक, शेतकरी सर्वांचा समावेश. चार वर्षांच्या चिमुरड्यांपासून पन्नाशीपर्यंत सगळेच. वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं अन् त्यांना एकत्र जोडणारा धागा म्हणजे रवी काळे सर. कोण? कुठे? कसं भेटतं? आणि ओळखीचं नातं निर्माण होतं, काहीच सांगू शकत नाही हे त्यांचं ठाम मत.
सत्तेत वर्षानुवर्ष राहिलेल्या राजकारण्यांनाही आश्वासनांची खैरात करावी लागते, माणसं गोळा करण्यासाठी. इथे केवळ एका पोस्टवर माणसं तयार होतात पोराबाळांसहीत. सर्वांच्या विश्वासाचं कोंदण ललाटी लाभलेले काळे सर ही व्यक्ती केवळ अतुलनीयच. दिखाऊपणा, पैशांबाबत खादाड वृत्ती जगात बळावलेली असतानाही प्रामाणिकपणाचा चेहरा लाभलेला असा अवलिया माणूस माझ्या पाहण्यात नाही. या ट्रेकवेळी आमचे मार्गदर्शक पंकज माने सर आणि रात्रभर ड्रायव्हरला मार्ग दाखवणारा बापू हे दोघे काही कारणास्तव सोबत नव्हते, त्यांची उणीव भासत होती. तरीही त्यांच्या अनुपस्थितीत आम्हा सर्वांची जबाबदारी शरद काळे व रवी काळे यांनी यथायोग्य सांभाळली.
पुरुष मंडळी, बायका, चिल्लीपिल्ली पहाटे चारच्या सुमारास पेट्रीगावी एका हाॅटेलात थांबले. फ्रेश होऊन चहा बिस्किटे खाल्ली. दुपारसाठी बटाट्याची भाजी आणि चपाती पार्सल घेऊन पुढे निघालो. पुन्हा दीडेक तासांच्या प्रवासानंतर कासपठार, बामणोली वरून शेमडी गावी उतरलो. काकडी, लिंबू, पेपरमेंटच्या गोळ्यांचे वाटप आयोजकांकडून झाले. कोयना धरणाचे बॅक वॉटर म्हणजेच शिवसागर जलाशयाच्या पूर्वेकडून वासोट्याकडे जाण्यासाठी तीन बोटींमध्ये निघालो.
व्याघ्रगड म्हणून परिचित असणारा, नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे. सह्याद्रीच्या कुशीतल्या जावळी खोर्यामधून वाहणार्या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला 'शिवसागर' ऐसे नाव. तापोळापर्यंत पसरलेले हे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते असेच म्हणावे लागेल. सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. बोटींगचा मनसोक्त आनंद आम्ही लुटला. डोळ्यांचं पारणं फेडणारा नजारा कॅमेऱ्यात कैद करण्याचा अट्टाहासही झाला.
किनाऱ्यावर उतरून वनखात्याच्या परवानगीसाठी रांगेत थांबलो. प्लास्टिक पिशव्या, बॉटल येथे काटेकोरपणे मोजल्या जातात. डिपाॅझिट घेऊन आहे तेवढाच कचरा परत आणला की डिपाॅझिट परत केले जाईल अशी तंबीही दिली गेली. काय भारी आयडिया वापरली होती, मनुष्य नावाच्या प्राण्याला निसर्गात घाण करण्यापासून रोखण्यासाठी. पैसा अडकलाय म्हटल्यावर कशाला कचरा वाटेत टाकेल माणूस? नाक दाबलं की थोबाड उघडणारच की! मलेरिया होतो म्हणून डास मारत बसण्यापेक्षा डबकीच होऊ नयेत याची वनखात्याने घेतलेली दक्षता आवडली आपल्याला. त्यामुळे एकही प्लास्टिक बॉटल गडाच्या परिसरात आम्हाला दिसली नाही. अशीच व्यवस्था खांदेरीवर केली तर काय बरं होईल! आपल्याला जग सुंदर हवं असतं पण ते लोकांनी करावं अशी अपेक्षा असते. इतरांनी केलेल्या त्या सुंदरतेचे आपण मात्र फोटो काढून स्टेटस ला ठेवणार अन् प्रत्येक दोन मिनिटांनी कोणीकोणी बघितलंय हे न्याहाळणार. आपली जबाबदारी तेवढीच, २४ तासांपुरती. सगळंच आभासी. पण आमचा ग्रुप असा नाही. स्वतःहून कचरा उचलून गड साफ करणारा हा ग्रुप आहे. इथे कोणाच्याही जातीची चर्चा केली जात नाही, कामाची मात्र दिलखुलास चर्चा होते. देव प्रसन्न व्हावा म्हणून नैवेद्य दाखवणारे बरेच असतील पण अखंड महाराष्ट्राच्या दैवताचे गड पोरांना दाखवायचं सुचतं ते आमचे ग्रुप मेंबर!
पुढे ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरू होते. चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. आंब्याचा मोहोर, करवंदीच्या जाळ्यातली टपोरी पांढरीशुभ्र फुलं, लगडलेले फणस, नुसतीच हिरवळ. काय मनोहारी दृश्य दिसत होतं. भर उन्हातही किती गार अन् गडद सावली होती म्हणून सांगू. माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कामी येत नाही पण झाडांच्या सावलीत कित्येक जण विसावतात. हा अनुभव आम्ही याचि देही याचि डोळा घेतला. रस्त्यात ठिकठिकाणी परिसरातील प्राणी, पक्षी, किटकांची माहिती देणारे बोर्ड लावलेत. पोरं, बायका यांसोबत ट्रेक करणार्या सगळ्या पुरुषांवर जबाबदारी सोबत साहित्याचंही ओझं होतंच.
भक्कम पोलादी शरीर असणारा बाप अन् त्याच्या हृदयातल्या हळव्या कप्प्यातलं गुज सांगणारी ही भ्रमंती मी खूप जवळून निरखून पाहिली. आमचा मित्र वैभव करपे, पोराला घेऊन आलेला मातृहृदयी बाप मी पाहिला. तसा बघितला तर हा वजनदार माणूस पण ट्रेकला कधी हरला नाही. प्रत्येक वेळी आम्हा सगळ्यांसोबतच. पण आज प्रत्येक पाऊल पोराच्या चालीनं, गतीनं टाकत होता. त्याला काय हवं? काय नको? याची आई पेक्षाही जास्त काळजी वाहत होता. आरुषचे बाबा अन् आई सर्वांत शेवटी. चार वर्षाचं पोरगं चाळीस वर्षांच्या माणसालाही मागे टाकत दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या उत्साहात गड चढत होतं.
प्रत्येक व्यक्तीत एक 'वल्ली' दडलेली असते. जिथे भल्यामोठ्यांची गाळण झाली तिथे चार-पाच वर्षांची पोरं मजल मारत होती आणि तळहातावर द्रोणागिरी पर्वत उचलणाऱ्या हनुमंतासारखे भीमरूपी महारुद्र झालेल्या बापाचं काळीज सुपाएवढं झालेलं आम्ही या उघड्या डोळ्यांनी पाहिलं. लाकडी बंदुकीने ठोठो गोळ्या झाडणारा सुयश, हसरा उत्साही चार वर्षांचा आरुष, न थकता गड चढणारा पाच वर्षांचा वेदांत, अनुष्का, तनिष्का, श्रावणी ज्यांनी आमच्यासोबत धरणात पोहण्याचा आनंद घेतला, स्वरूप ज्याने प्रथम गडाचं टोक गाठलं, न थकता पावलं टाकणारा पाच वर्षांचा चिमुरडा ऋत्विक, स्वराज, शौर्य यांचं करावं तेवढं कौतुक कमीच. धन्य ते पालक ज्यांनी पबजी, फ्री फायर यांसारख्या गेम मधून पोरांना बाहेर काढत राजांचे गड दाखवण्याचा निश्चय मनाशी बांधला आणि तो सत्यात उतरवला.
अर्धाअधिक किल्ला चढल्यावर किर्र आवाजात किड्यांनी आमचं स्वागत केलं. निसर्गाला हानी पोहोचवत वृक्षतोड तर करायला ही गर्दी जमली नाही ना? असं मनाशी ठरवत जास्तीत जास्त ओरडण्याचा ते किडे प्रयत्न करत होते, असा भास होत होता. लक्ष वेधून घेण्यासाठी, नुसताच गोंधळ घालणाऱ्या हट्टी लेकरांसारखं. या कल्लोळात निसर्ग जपण्याची तंबी देणारा हा प्रखर आवाज माणसाला ओळखता येईल का? हाच विचार डोक्यात वळवळत होता. काहीसं पुढे गेल्यावर घसरणारी मातकट उतारी पायवाट आहे. आम्ही बरेचजण घसरलो. महिला मंडळ पुढे होतंच, पण एका वहिनींनी साडी नेसून गड सर केला याचे कौतुक आम्ही सर्वांनी केले. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीच्या रानातून किल्ल्याच्या पायर्या लागल्या. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश केला.
गडाच्या प्रवेशद्वारावरून दिसणारा निसर्गरम्य देखावा आपल्याला मुग्ध करतो. पुढे पाण्याचे टाके आहेत. गडावरच्या कित्येक वास्तू लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. वाटेवर मारुती मंदिर नजरेस पडते. वेदांत आणि स्वरूप या चारपाच वर्षांच्या चिमुकल्या जीवांनी गडावर प्रथम वर्दी दिली. सावली बघून एकत्रित वनभोजनाचा आस्वाद आम्ही घेतला. चिक्की, द्राक्षे, काकड्या, लोणचं, चिवडा सगळं काही एकमेकांना वाटून खाल्लं! श्रावणीने शिवगारद, वेदांतने छोटंसं भाषण केलं. माने सरांच्या शिवरायांवर आधारित कवितांचा रसास्वाद घेतला. सरांनी सर्वांना शब्दवलय काव्यसंग्रह भेट दिला.
पुढे महादेव मंदिराजवळून उत्तरेकडील माची पाहिली. इतर गडांसारखं या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. येथून नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. पूर्व दिशेला ठोसेघर पठारावर दिसणाऱ्या पवनऊर्जा प्रकल्पातील पवनचक्क्याही सौंदर्यात भरच घालतात. अनेक डोळे असेही आहेत जगात ज्यांनी फुलं पाहिली नाहीत, आभाळाचा रंग पाहिला नाही, जन्मदात्री आई, सूर्य, चंद्र पाहिला नाही कारण डोळेच दिले नाहीत निसर्गाने त्यांना. आपण तर डोळस आहोत, कमावते आहोत, काय हरकत आहे असा निसर्गानुभव घ्यायला. मन भरून सुगंध आणि आकंठ निसर्गरम्य दृश्य डोळ्यांत सामावून घ्यायची इच्छा ठेवून सज्ज व्हायला हवे.
वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य याची पुरेपूर प्रचिती आम्हाला आली. महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला ६ जून १६६० रोजी घेतला, अशी माहिती इतिहास दप्तरी नोंद आहे. दोनेक तासानंतर गड उतरून थकूनभागून आम्ही एका झऱ्याकाठी थांबलो, फ्रेश होण्यासाठी. तेवढ्यात एक उच्चशिक्षित महिला आपल्या छोट्या मुलीला, "तुला पाण्यातले मासे पहायचेत का? असं सांगताना दादा आणि अप्पा यांनी ऐकले. 'पाण्यातले मासे' म्हणत भरपूर हसवलं. ज्यांना मनसोक्त हसायला आवडतं त्या प्रत्येकाला दादा, तुम्ही आवडता! तरी बरं डाॅक्टर आणि नाना यावेळी नव्हते, नाही तर पोट दुखेपर्यंत नेहमीच आम्ही हसतो. तिथून पुढं 'पाण्यातले मासे, पाण्यातले खेकडे' अश्या विनोदांची लहरच आली.
खरं सांगायचं तर, अमरत्व कोणाला लाभलंय जगात? असा प्रश्न अनेकदा पडतो. त्यांच उत्तर एकच... आपल्या स्मृतीतून जो कधीच नाहीसा होत नाही तो अमरच की! या ग्रुपची ही सगळी माणसं जीवनाच्या अंतापर्यंत लक्षात राहतील, ह्रदयाच्या गाभाऱ्यात अमर होतील, एवढं मात्र नक्की. पुन्हा शिवसागरातून बोटींच्या प्रवासानंतर काठावर उतरून मनसोक्त पोहलो. सगळा शीण निघून गेला.
पेट्रीगावी येऊन चिकणभाकरीवर ताव मारला. सगळ्यांत शेवटी आयोजक जेवले. लेकीचं लग्न लावताना सगळं कसं सुरळीत पार पडलं या प्रसन्नतेने बाप असाच शेवटी दोन घास पोटात ढकलतो. वेळोवेळी हजेरी घेणारे काळे सर मला लहाणपणीच्या सहलीतले शिक्षकच वाटतात. ज्यांच्यावर प्रत्येक मुलाच्या आईने 'माझ्या मुलावर लक्ष ठेवा' अशी विनंतीवजा ताकीद दिलेली असते. गाडीत बसल्यावर थकलेल्या जीवांची ब्रम्हानंदी टाळी लागावी अशी अवस्था. सुखाची व्याख्या यापेक्षा काय निराळी असेल? असा विचार करत मी ही झोपलो. कारण यावेळी शेवटच्या सीटवर बसून माझी नीट झोपच झाली नव्हती. हा हा हा हा हा...
अकरा वाजता घरी सुखरूप पोहोचलो. दुर्ग भ्रमणाची मनीषा या गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपमुळे सत्यात उतरली. प्रतिव्यक्ती केवळ ११५०/- रुपयांमध्ये स्वर्गीय सुखाचा अनुभव आम्हाला मिळाला. यावेळी ट्रेकिंगच्या खर्चापेक्षा महिला मंडळाच्या खरेदीलाच जास्त पैसे गेल्याचे सर्व पुरुष मंडळींनी कबूल केले. सात वर्षांपेक्षा कमी वयाच्या आठ चिमुकल्या पोरांना मोफत ही सफर घडवून आणणाऱ्या आयोजकांचे आभार.
नारायण सुर्वे म्हणतात,
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दिवस दुःखात गेले.
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे?
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली.
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली!
अशी आपली गत होऊ नये म्हणून कमावताय तुम्ही पैसे तर त्याचा उपभोगही तुम्हीच घ्या ना. आयुष्यात काय कमावलं? असा प्रश्न पडू नये आणि पडला तर त्याचं उत्तर फक्त पैसा असू नये, असं मनापासून वाटतं. संपत्तीचा डोंगर उभारून पुढच्या पिढीच्या पोरांना आयदाड बनवण्यात कसलं आलंय शहाणपण? शिवरायांच्या पायाशी जडलेली नजर सुटू नये यासाठी राजांचे जोडे उराशी कवटाळून श्रीमंत सकल सौभाग्यसंपन्न पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या. आपल्याला त्याच राजांचे ऐतिहासिक साक्ष देणारे किल्ले पाहता आले तरी जन्म सफल झाला म्हणता येईल.
चला तर मग, पुढच्या महिन्यात नवीन दुर्ग पाहू...
आयोजक
रवी काळे सर
गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान
निमगाव म्हाळुंगी
90964 65675
मार्गदर्शन
पंकज माने सर
7709159044
शब्दांकन
आयुब शेख सर
प्राथमिक शिक्षक
पुणे महानगरपालिका
9552941271
🙏🏻⛳
छान लेखन
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद मॅडम
Deleteआयुब सर तुम्ही खूप छान शब्दांकन,वर्णन केले आहे . सकाळी-सकाळी कामाच्या गडबडीत असूनही तुमचे स्टेटस पाहिलं आणि वाचण्याचा मोह आवरला नाही अगदी हावऱ्यासारखं .. कधी एकदा वाचेल आणि तुमचा नवीन अनुभव वाचायला ऐकायला मिळेल आणि मनाची तृप्ती होईल अगदी लहान मुलांसारख असं झालं होतं .खूप छान लेखन केले असल्यामुळे प्रत्यक्ष जरी मी तुमच्या ट्रीपमध्ये नसले तरी वाचताना तो अनुभव जणू काही मी स्वतः घेत आहे असे वाटत होते .👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद वैशाली काळे मॅडम...
Deleteतुमच्या या कौतुकामुळे लेखनास आणखी उत्साह येईल.
Very nice Sir
ReplyDeleteThank you
Deleteसर तुमचे लेखन खरंच अप्रतिम आहे. आता आम्हाला ट्रेक झाला की एक उत्सुकता लागते तुमचा लेख वाचण्याची.
ReplyDeleteखरंच खूप शैलीदार लेखन.
उत्तरोत्तर असेच आपले लेखन बहरत जावो सर.👌👌👌
खूप खूप धन्यवाद वैभव भाऊ
Deleteखर सांगू सर काल तुम्ही म्हणले फॅमिली ट्रेक आहे काय लेहू ते समजत नाही पण आतापर्यंत chya ट्रेक पेक्षा अनोखं लिखाण आज तुमच्या लेखणीतून बाहेर पडले आहे ... आपण ट्रेक करतो पण सर्व काही अनुभवत नाही ती उणीव तुमच्या लिखाणातून भरून निघते सर ...
ReplyDeleteआयोजक रवी काळे सर खूप खूप धन्यवाद..
Deleteतुमच्या मुळे आम्हाला ही संधी उपलब्ध होते.
आयुब सर तुमच्या प्रत्येक कार्यास कायम शुभेच्छा आहेतच����
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद मॅडम
Deleteमस्त लेखन सर, वासोटा पुन्हा एकदा सर केल्याचा अनुभव आला,लहान मुलांना घेऊन ट्रेक करण्यात वेगळीच ऊर्जा आहे..
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
DeleteKhup chan
ReplyDeleteखूप छान लेखन सर लेख वाचताना परत एकदा किल्याला भेट दिल्या चा सुखद अनुभव आला
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद मॅडम
Deleteज्या दिवशी आमच्या घरात मुलांचे बोलणे सुरू होते की वासोटा किल्ला पाहायला जायचंय नेमके त्याच दिवशी तुमचा स्टेटस पाहिला आणि आज हा लेख वाचला.आपल्या उत्कृष्ट आणि अनुभवसंपन्न लेखनशैली मुळे जणू काही आपणही वासोटा किल्ल्यावर भ्रमंती करीत आहोत याचा भास आम्हाला झाला. आपली लेखनशैली अशीच बहरत राहो आणि आमच्या ज्ञानात मोलाची भर पडत राहो हीच सदिच्छा.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद मॅडम
Deleteसर तुमच्या स्टेटस फोटो व लेखन यामुळे आम्ही स्वतः किल्ला पाहून आल्यासारखे वाटते खूप छान लेखन केल मस्त 👌👌 असेच 👍👍गड-किल्ले सर करत राहो
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद 🙏
Deleteअतिशय सुंदर सर...😊
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
Deleteअप्रतिम वर्णन सर👌👏🏻👏🏻😊 मराठी भाषेचे अलंकार वापरून समृद्ध लिखाण केल आहे ..वाचतानाच् मी हा प्रवास अनुभवला ....पुन्हा एकदा तुमच्या लेखनाला सलाम...असेच लेख आम्हाला वाचायला मिळो ..हीच् सदिच्छा..🙏🏻
ReplyDeleteछान
ReplyDeleteअप्रतिम वर्णन, सुंदर लेखनशैलीचा उत्कृष्ट नमुना !
ReplyDeleteखूपच सुंदर वर्णन केले आहे. वाचताना असे वाटते की, आपण ते प्रत्यक्ष अनुभवत आहोत.
ReplyDelete