भाळावरी काळोखाच्या
भीम उजेड कोरतो,
काळ्या आईच्या उरात
भीम लेखण्या पेरतो!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, शिक्षणास वाघिणीच्या दुधाची उपमा देत प्रत्येक माणसाला माणूसपण बहाल करणारे भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
डुकरं, गाढवं, कुत्र्यांना स्पर्श करणारी माणसं ठराविक माणसांना स्पर्श करणं विटाळ समजायची पण त्यांच्या पोरी, बायका बाटवायची अंधारात. अशा दलितांचे कैवारी, अस्पृश्यांचे तारणहार, शोषितांचे उद्धारक या बिरुदांनी बाबासाहेबांना ओळखतोच आपण. पण त्यांनी केवळ दलितांसाठी आयुष्याची समिधा अर्पण केली का? महिलांना नीच वागणूक देणाऱ्या मनुस्मृतीची लक्तरं भारताच्या वेशीला टांगत, मनूचा मुडदा पाडत स्त्रीमुक्तीची पताका फडकवली. नाही तर मनुस्मृतीच्या राज्यात नशीब समजून जिवंतपणी जळत्या आगीत सती जाणाऱ्या बायका, आजोबाच्या वयाच्या थेरड्याबरोबर लग्न होणाऱ्या बालिका, शूद्र म्हणून वक्षस्थळाचाही कर देणाऱ्या मातामाऊलींची विटंबना खुलेआम दिसली असती, आजही. महिलांसाठी समान कामात समान वेतन, प्रसुतीरजेची तरतुद यांसारख्या कित्येक विचारांचं विस्मरण करून कसं चालेल? बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद घालणारे, महात्मा फुलेंच्या विचारांचे सच्चे वारसदार म्हणजे बाबासाहेब. सर्व जातिधर्मातील समस्त स्त्रीवर्गाच्या समग्रमुक्ती व उद्धारासाठी हिंदूकोडबिल नावाची एक आदर्शसंहिता निर्माण केली. त्यात स्त्री-पुरुषात समानता निर्माण करून मुलांच्या बरोबरीने मुलींनाही वारसाहक्क देऊन वडिलाच्या संपत्तीत समान वाटा, पुरुषाप्रमाणे स्त्रीलाही घटस्फोट मागण्याचा हक्क अशी तरतूद केली. मनुस्मृती जाळून ते गप्प बसले नाहीत, त्यांनी त्याला एक अत्यंत समर्थ, समर्पक पर्यायी मार्ग दिला. त्याचेच नाव हिंदू कोडबिल.
शाहीर संभाजी भगत म्हणतात, बाबासाहेबांनी आम्हाला अस्तित्व दिलं. अंधाऱ्या रातीला मुक्तीचं गीत गाणाऱ्या, पिढ्यानपिढ्यांच्या जोखडातून स्वतंत्र होणाऱ्या, झोपड्यांना सुखाच्या चांदण्याचं तोरण बांधणाऱ्या माझ्या भावांनो चाकोरी तोडा. संविधान सोडवा, भीमाचं विधान सोडवा." शीतल साठे, सचिन माळी यांसारख्या नवोदित शाहिरांनीही समाजात शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ, लहूजी यांच्या समतेच्या, संघर्षाच्या विचारांची बीजं रोवण्याचं कार्य सुरू ठेवलं आहे. ते स्पृहणीय आहे.
बाबासाहेबांच्या अंतःकरणाला लाभलेल्या समाधानाचा रेखीव अविष्कार 'निखार्यावर भाजलेल्या माझ्या मुलांनो' या स्वयंकथनात रतनलाल सोनग्रा यांनी केला आहे. ते जरुर वाचायला हवं. मॅट्रिक झाल्यावर बाबासाहेबांना सत्कार कार्यक्रमात बुद्धांचे चरित्र भेट मिळाले. त्यावेळी झालेला बुद्ध परिचय बाबासाहेबांच्या जीवनकार्याचं द्योतक ठरला. मुंबई मध्ये सिडनेहॅम कॉलेजात ते एकटेच अर्थशास्त्राचे अस्पृश्य प्राध्यापक. त्यांची पाण्याची सोय वेगळी. प्राध्यापक असूनही जातीची लेबलं दूर होत नव्हती, अशी दयनीय अवस्था.
महाडच्या तळ्यावर बाबासाहेब ओंजळीने पाणी प्याले, बाबासाहेबांच्या स्पर्शाने अखंड समाजासाठी तळ्यासोबत सर्वत्र पाणी चवदार झाले. निसर्गात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या पण दलितांसाठी मृगजळ ठरलेल्या अशा पाण्यासाठीचा लढा भारतातल्या पहिल्या सामाजिक क्रांतीचा अग्रणी ठरला. कित्येकदा दलित फक्त पाणी प्याले, तथाकथित सवर्णांनी मारहाण करत त्यांचे रक्त सांडले. हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी होता. महाड प्रसंगात मनुस्मृती जाळणारे बाबासाहेबांचे सहकारी सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृतीचे प्रत्येक पान वाचून त्यातील विषमतावादी सूत्र दाखवून ते पान स्वाहा म्हणून जाळले. बाबासाहेबांचा विरोध पशूंच्या मुत्रापेक्षा माणसांना हीन समजणाऱ्या ब्राम्हणवादी विचारसरणीला होता. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह साडेपाच वर्षे चालला. नाशिकचे भाऊराव गायकवाड अस्पृश्यांचे खंदे नेते. सत्याग्रही रोज यायचे, पोलीस लाथा मारून हाकलायचे. 'आम्हाला लढल्याशिवाय काहीच मिळालं नाही', अशी खंत बाबासाहेब व्यक्त करतात.
एकदा निवडणूक प्रचारावेळी पनवेल नाक्यावर भीमरावांची गाडी थांबली. भटाने बाबासाहेबांस पाणी देण्यास नकार दिला. सोनबा येवले या मजूराने ऐकलं. गावातून पाणी आणायला पळत गेला. पण तोपर्यंत बाबासाहेब तेथून निघून गेले होते. पुढे सात वर्ष बाबा या रस्त्यावरून येतील म्हणून तो माठ घेऊन रस्त्याला थांबलेला असायचा. बाबासाहेबांना हे समजताच आवर्जून तेथे आले पण आदल्या दिवशीच त्याने प्राण सोडला होता. उद्धारकर्त्याची वाट पाहणारे डोळे अनंत काळासाठी मिटले गेले होते. बाबासाहेब म्हणाले, "सोनबा तुला जगू न देणारी, माझ्या माणसांना कुत्र्यामांजरापेक्षा हीन वागवणारी ही बामणी वृत्ती नष्ट करीन. तुझ्या वेड्या भक्तीनं सात हत्तीच बळ मला दिलं."
आपल्याला वाटतंय, पूर्वी होतं हे आता कुठंय जातीभेद? भावांनो मुळीच संपला नाही हा भेद. खैरलांजीची कथा, खर्ड्याची गाथा अशी कितीतरी ज्वलंत उदाहरणं आहेत जातीच्या हिंसेची. मनुवाद्यांची जमात अजूनही सर्रास जन्मास येतेच आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच पारधी समाजावरील अत्याचारांची एक बातमी टिव्हीवर पाहण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील माळवागद गावात पारधी समाजाच्या साठ कुटुंबांना जंगलात राहण्याची नामुष्की आली. मानसिक आणि शारीरिक शोषण, महिलांवरील अत्याचार, पाणी भरण्यासाठी विहिरीवर जाताना गलिच्छ शिवीगाळ आणि अश्लिल भाषेत हेटाळणी यांमुळे जंगलात उघड्यावर या साठ कुटुंबांनी संसार थाटलाय. कुठंय डिजिटल इंडिया? पुरोगामी महाराष्ट्र? आणखी एक जातीव्यवस्थेचा शिकार म्हणजे हरियाणामधील शाहपुरीया गावात दलित विद्यार्थ्यावर पोलिस बंदोबस्तात दहावीच्या परीक्षेसाठी येण्याची वेळ आली. उच्चवर्णीयांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या या विद्यार्थ्यासाठी गावात राहणे मुश्कील झालंय. पण त्याला संरक्षण देणारं बाबासाहेबांचे संविधान आहे. पोलिस संरक्षणात तो परीक्षेला हजर राहिला.
देशभक्तीची प्रमाणपत्रं विशिष्ट जातीसाठी जन्मसिद्ध हक्काने प्राप्त करून देत सढळ हाताने वाटप करत फिरणार्यांनी स्वतःच्या देशभक्तीचा एखादा तरी पुरावा द्यावा. किती माणसांना माणुसकीचा हात दिला त्याची जंत्री करावी. आज धर्म संकटात आहे म्हणत जात वाचवण्याच्या पोकळ बाता मारून दंगली पेटवणाऱ्यांनी कोरोना काळात किती पोटांची आग शमवली? याचा हिशेब मांडा आधी. बंगल्यांची दारं बंद करुन बसणाऱ्यांपेक्षा रस्त्यावर उतरत मदतीचा हात देणारे लक्षात ठेवले पाहिजेत सर्वांनी. कशाला अशा भूलथापांना बळी पडता? शेजारधर्म सांभाळत कितीतरी वेगवेगळ्या धर्मांची माणसं मदतीला आलीच ना मरणाच्या वाटेवर असताना. प्लाझ्मा घेताना, रक्त चढवताना का नाही जातीची आठवण होत? त्यावेळी कशी दयनीय अवस्था होते? तेव्हा येतो का एखादा नेता सहकार्याला?
जय भीम चित्रपट एकदा पहाच तुम्ही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरूषाने अन्यायग्रस्त समाजासाठी शिक्षण, न्याय विषयीचा जो अधिकार बहाल केला त्यासाठी एक जन्म काय हजारो पिढ्यांची जिंदगानी ओवाळून टाकली तरी कमीच!बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत काळजात तेवत असली की शिक्षणाचा, भावनांचा बाजार मांडत स्वतःचा खिसा भरत गडगंज संपत्ती कमवण्याची आस लागत नाही तर पिडीतांचे अश्रू पुसण्याचा ध्यास लागतो, हेच खरं. बाबासाहेबांच्या प्रेरणेने प्रस्थापित भिंती फोडून जगाला आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवून देणारं, ओसाड डोंगरावरही पेटून उठलेला मोहर व्हायला हवं.
तरुण पोरांचे पाय तर जमिनीवर राहायला नकोत, सतत भिंगरी पाहिजे पायाला. शिक्षणासाठी, उद्योगधंद्यांसाठी कष्टाची सवय करून घ्यायला हवी. मेंदूंची चक्रं फिरायला हवीत पुस्तकांच्या विश्वातून. घर कोंबड्या सारखे टीव्हीसमोर किंवा मोबाईल चिवडत बसून कसे चालेल? कित्येकांच्या आज्यापंज्यांनी बाबासाहेबांची गीतं गायिली. अशिक्षित, अडाण्यांना बाबासाहेब कळले कसे हा प्रश्न विचार करायला उद्युक्त करतो. सोबतच बऱ्याच सुशिक्षितांना बाबासाहेब अजून कसे नाही उमगले हा ही प्रश्न गहनच!
लहानपणापासून गावात अनेकांना 'बाबासाहेब आमचा बाप' असं म्हणताना मी ऐकलं. त्यावेळी त्या बापाची थोरवी तितकीशी उमगली नव्हती, पण जसजशी पुस्तकं वाचली, भीमराव समजून घेतले तसं सारं समजलं. जन्मदाता बाप एखाद दुसरं पोर जन्माला घालतो, भीमराव नावाच्या बापाने करोडो लेकरांना सन्मानाचं आयुष्य दिलं. भीमजन्मामुळे कोटी कुळं उद्धरली. स्वतःची चार पोरं गमावली पण जातीभेदाच्या अंधारात खितपत पडणाऱ्या कोट्यावधी पोरांना उजेडाची वाट दाखवली. भाकरी मागणारे हात भाकरी देणारे झाले. सावलीचा विटाळ होऊ नये म्हणून अस्पृश्यांना भर दुपारी गावात अनवाणी प्रवेश मिळे. कारण त्यावेळी आपली सावली आपल्याच पायात असते. अशी पोरं देशविदेशात जाऊन शिक्षण घेऊ लागली. गळ्यात मडकं, कंबरेला खराटा बांधणाऱ्यांनी शिक्षणाचे पंख लावून अधिकारी पदावर शिक्कामोर्तब केला. पण आज त्यातलीच काही पोरं जयंतीला दारू पिऊन फुल्ल होतात, डिजेच्या जल्लोषात गटारीत लोळतात. काय वेदना होत असतील त्या बापास? याच साठी केला होता का अट्टाहास? असा प्रश्न उभा ठाकत असेल, बहुधा.
जल्लोषाला तुझ्या दारुचा वास नको,
वागण्याला शहाणपणाचा सुवास लाभो,
संघटीत होण्याचा अर्थ झुंडीनं धिंगाणा घालणं कसा असेल?
असं काम कर ज्यात बाबासाहेबांच्या स्वप्नाचं रुपडं दिसेल.
शिक्षण दलितांसाठी क्रांती ठरली. ज्ञानबंदीच्या काळात एका अस्पृश्याला पीएचडी मिळणं काय असतं? या जाणीवेने बाबासाहेब ढसाढसा रडले. बाबासाहेबांच्या पुण्याईनं ज्यांनी लाल दिव्याच्या गाडीचा घाट घातला त्यापैकी कितीजण आज प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडत आहेत, एका रुपयाचीही लाच न घेता? याचाही विचार व्हायला हवा. जिल्हाधिकारी झालेल्या कित्येकांनी आपल्या समाजाला पुढे नेण्याची जबाबदारी सुशिक्षित खांद्यावर घेतलीये? यांचीही उत्तरं शोधायला हवीत. भीमाच्या आरत्या किंवा भक्तिगीतांचा सूर आळवण्याऐवजी कर्तृत्वाचा ठसा उमटवणारं कार्य भीमलेकरांच्या हातून घडावं एवढीच माफक अपेक्षा.
लक्षात ठेवा, श्रद्धा ही आत्यंतिक वैयक्तिक बाब आहे, श्वासोच्छवासाइतकी. त्याचं सार्वत्रिकरण झालं की पंथ तयार होतात. आपला धर्म आपल्या उंबऱ्याच्या आत ठेवला की कसे वाद होतील? बाहेर आपण सगळे माणुसकीच्या शाळेतले विद्यार्थी. तरुणांनी कट्टर देवधर्माच्या नादी न लागता सर्जनाची आस मनी बाळगायला हवी. विवेकाची वाट धरून उत्कर्षाचे मळे फुलवायला हवेत. कारण कट्टरतेचा सर्प जातीवादांचं डोकं वर काढतो. त्याच्या विषारी तोंडालाही फेस आणण्याचा यत्न करताना शिक्षणातून लाभलेली गुणवत्ता हे एकच जालीम औषध. कित्येक सूर्यांचा प्रकाश अडवला असेल त्यांनी याची गणतीच नाही. कर्तृत्वाचे नवे मापदंड प्रस्थापित करत कित्येकांनी यशाचं शिखर गाठलं असतं कदाचित. सोनं कितीही मौल्यवान असलं तरी त्याची सुरी करून आपण शरीरावर चालवत नाही, तसंच धर्माच्या बाबतीत. धर्म कितीही चांगला असला तरी कोण स्वतःला त्या धर्माच्या दावणीला कशाप्रकारे बांधून ठेवतो यावर तो धर्म त्या व्यक्तीला मुक्त करणार आहे की बेडी घालून बांधून ठेवणार आहे ते अवलंबून असते.
बाबासाहेबांचा विचार कृतीत आणणारी बरीच माणसं आहेत. मिणमिणत्या पणत्याही जेथे विजत चालल्या होत्या तिथे एखाद्या स्वयंस्फूर्त ज्वालेचे दुर्लभ दर्शन म्हणजे बाबा आमटे. सदृढ समाजाने बहिष्कृत ठरवलेल्या बहुसंख्य पिडीतांची सेवा करण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या अशा माणसांच्या जाती कोणत्या असतील माहित आहेत का तुम्हाला? माणुसकीची प्रबळ इच्छा, सह्रदयतेची जाणीव हीच त्यांची जात.अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम गाडगेबाबांनी विनोदी रुपातही बऱ्याचदा केले. एका भोंदू बाबाने गाडगेबाबांना सांगितले पाचशे वर्षांपेक्षा जास्त माझं वय आहे. नक्की आठवत नाही, पण युधिष्ठिराच्या यज्ञात मी तूप वाढायला होतो. हे ऐकताच गाडगेबाबांनी त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवलं. लोकांनी विचारल्यावर सांगितले, "मी तिथं जेवायला होतो. हा गाढव मला तूप वाढायचं विसरला!",एकच हशा पिकला. भोंदूगिरीवर हसत हसत घाला घातला.
आशुतोष राणा यांच्या कवितेतल्या काही ओळी मला आठवतात...
बाँट दियाँ इस धरती को
क्या चांद सितारों का होगा?
नदियों के कुछ नाम रखें
बेहती धाराओंका क्या होगा?
और क्या?
खुदा ने मंदिर तोडा था?
या राम ने मस्जीद तोडी है?
विचार करण्याची गरज आहे. पानं, फुलं, वारा ही सृष्टीची देण आहेत अगदी तसंच माणसं एकाच रक्ताची, एका हाडामांसाची असताना हा भेदभाव कोणत्या तत्वात बसतो? ठराविक जातीची गावात, ठराविक जातीची गावाबाहेर, घाणीच्या साम्राज्यात. रस्त्याने जाताना ड्रेनेज फुटलेलं दिसलं की वासानं हैराण होतो आपण. नाकाला रुमाल लावून तोंड वेडंवाकडं करत जातो. पण त्या ड्रेनेजमध्ये घुसून साफसफाई करणाऱ्यांच्या कपाळी आयुष्यभर घाणीचं काम आलंय याचा कितीदा विचार करतो? दुसऱ्यांच्या वेदना त्यांनाच समजतात, ज्यांच्या स्वतःच्या संवेदना जिवंत असतात.
साजूक तुपाचा, खारीक खोबऱ्याचा नैवेद्य प्रस्थापित समाजासाठी आणि अख्ख्या गावाची घाण तथाकथित खालच्या जातीसाठी? हे कुठवर चालायचं? स्वार्थापोटी रचलेला खोट्या चातुर्वर्णाचा डोलारा मुळापासून नष्ट करायला हवा. 'वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा' म्हणत तुकोबांची गाथा पाण्यात बुडवण्यासाठी हतबल करणारे, आजही हुशार एकलव्याचा अंगठा फोडणारे, शांततेच्या कविता लिहिणाऱ्या सफदर हाशमीला गोळ्या घालणारे आजचे मनुवादी फोफावत आहेत.
अरविंद जगताप म्हणतात, "प्रत्येक आडनावाला आज-काल फक्त मेलेल्या जनावरासारखा वास येतोय, अगदी असह्य. सगळी आडनावं गावाबाहेर पुरून टाकायला हवीत, त्यावर उगवायला हवा कडूनिंब. कडू घास काढायला. तेव्हा नंतर वागतील सगळे एकमेकांशी गोड. दारिद्रयात भर उन्हात एखाद्या पालाबाहेर मातीत रेघोट्या ओढणारा पोरगा उद्याचा नामदेव ढसाळ असेल. त्याला शिकू द्या. भाकरीपासून आत्मसन्मान मिळवण्यासाठीच्या माणसांच्या लढाया इतिहासाच्या पानापानांवर दिसतील, बाबासाहेबांमुळे. बाबासाहेबांइतकीच थोर रमाई. 'माझ्या संसाराची तू गाडीवान आहेस रमा', असा उल्लेख बाबासाहेब पत्रात करतात. माझ्या दरिद्री, फाटक्या संसाराला तू कष्टानं ठिगळ लावलंस अशी प्रेममयी कबुली देतात.
मूठभर धूर्त लोकांच्या स्वार्थापायी घृणास्पद वागणुकीचे बळी ठरणारे कित्येक निष्पाप जीव, ज्यांचा कोणताच दोष नाही अशा पिढ्यानपिढ्यांचे आयुष्य नरकजिणं करणारी समाजव्यवस्था आणि स्पृश्य-अस्पृश्यांच्या तुलनेत अडकलेली गलिच्छ मानसिकता यांच्याविरुद्ध बंडाचे विद्रोही निशाण फडकवणाऱ्या बाबासाहेबांचे अगणित उपकार आहेत आपल्यावर. ज्यांनी संविधानाचं अभेद्य, संरक्षक कवच आपल्यासाठी निर्माण केलं. आपल्याला जिवापाड हे संविधान जपायला हवं. कट्टर जातीवादाच्या आडून कोकलणाऱ्यांच्या पेकाटात लाथ घालण्याची हिंमत केवळ संविधानाच्या पानापानांत आहे हे लक्षात ठेवा. म्हणून ते संविधान संपवायला निघालेत.साधना साप्ताहिक चालवणारे, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, व्यसनमुक्तीच्या तीस-चाळीस रुग्णांना दररोज मोफत उपचार देणारे, भोंदूगिरीवर घाव घालणारे विवेकवादी विचारांचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना छुप्या हल्ल्यानं त्यांनी संपवलं. गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा कितीतरी उजेडाच्या शेकडो लेण्यांना नेस्तनाबूत केली.
माणुसकीवर श्रद्धा असलेल्या माणसांवर गोळ्या चालवणाऱ्यांनो, अंधश्रद्धेविरुद्ध निडरपणे आयुष्यभर लढणाऱ्या माणसाचा शेवट करणाऱ्यांनो, चळवळ दुपटीने वाढली. विवेकाचा आवाज आणखी बुलंद झाला. तुमचं काय? तुम्ही बसा बुवाबाबांच्या आडोशाला. त्यांचे चमत्कार बघत. वेद ऐकले म्हणून कानात शिसं ओतलं. संस्कृत उच्चारलं म्हणून जीभ कापली. कित्येक सूर्यांच्या वाती त्यांनी विजवल्या. पण संविधानाच्या धास्तीने का होईना जेरबंद आहेत. म्हणून म्हणतो, फक्त १४ एप्रिल किंवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुम्हाला बाबासाहेब आठवत असतील तर त्याला काही अर्थ नाही. समता, शिक्षण, इतरांना सहकार्य या बाबासाहेबांच्या गोष्टी अंगिकारल्या पाहिजेत.
वामनदादा कर्डक म्हणतात, "उपाशी जगाचा पसा भीम होता, असा भीम होता!"
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते,
तलवारीचे त्यांच्या न्यारेच टोक असते.
वाणीत भीम आहे
करणीत भीम असता,
वर्तन तुझ्या पिलांचे
सारेच चोख असते.
माणसा इथे मी तुझे गीत गावे
असे गीत गावे की तुझे हित व्हावे,
एकाने हसावे लाखोंनी रडावे
असे विश्व आता येथे ना उरावे!
राबणाऱ्या हातांमागे, शिकणाऱ्या मुलामुलींमागे, कष्ट सोसणाऱ्या मायमाऊली स्त्रियांमागे, पुस्तकांच्या राशींमागे भीम खंबीर उभा आहे. स्वतःस लाभलेल्या एका आयुष्यात लाखो-करोडोंची जिंदगानी उजळून टाकण्याचा संकल्प उराशी बाळगणाऱ्या, भारतभूमीच्या उदरात समतेची बीजे रोवत एकात्मतेचं पीक घेणाऱ्या, युगायुगांची सामाजिक कुरुपता दूर करणार्या अन् स्वाभिमान जागृत करत प्रत्येकास 'माणूस' बनण्याचा अधिकार बहाल करणाऱ्या बाबासाहेबांची समतेच्या विचारांची पायवाट आपल्याला खुणावतेय.
चल गड्या,
विवेक अन् विज्ञानयात्रेचे वारकरी होऊ,
माणुसकीच्या पालखीचे भोई होऊ.
हिरव्या, भगव्या, निळ्या रंगात अडकण्यापेक्षा
समतेच्या इंद्रधनुष्याची रंगत पाहू!
जय भीम!
लेखन
आयुब कलाम शेख
प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका
9552941271
प्रत्येक ओळ ना ओळ खरी आहे सर .... खरी ती परिस्थिती तुमच्या लेखणीतून बाहेर पडली आहे ... खरचं कुठ तरी हे थाबल पाहिजे ...
ReplyDeleteहो सर...
Deleteखरोखरच विचार करायला लावणारा लेख . खूप छान
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद मॅडम
Deleteअप्रतिम लेखन .
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
Deleteखूप सुंदर लिखाण. वाचनीय असा लेख आहे.अभिमान वाटतो आयुब थुझा एवढं छान लेखन केले आहे.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
DeleteKhup chhan lekh
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
Deleteयथोचित आणि मार्मिक लेखन सरजी
ReplyDeleteअप्रतिम लेख
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
Deleteखूपच अप्रतिम लेख...
ReplyDelete