Saturday, August 27, 2022

भोरगिरी भीमाशंकर - श्रावणातला जंगल ट्रेक गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान, निमगाव म्हाळुंगीसोबतचा जंगल ट्रेक

 भोरगिरी भीमाशंकर - श्रावणातला जंगल ट्रेक

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान, निमगाव म्हाळुंगीमधून रविवारी २१ ऑगस्ट २०२२ रोजी पहाटे चार वाजता विजय माने, श्रावणी माने, वेदांत माने, वैभव करपे, ऋत्विक करपे, मुरलीधर कटके, गुरुदत्त गोसावी, दादाभाऊ कर्डीले, रविंद्र काळे, सोमनाथ चव्हाण, संतोष लांडे, गोरक्ष पाचुंदकर, युवराज शिंदे, हर्षवर्धन पाचुंदकर, गणेश घोरपडे, तनिष्का घोरपडे, अप्पा रणसिंग, वैभव पवार, अक्षयकुमार कांबळे, वैभव पवार, शेखर लांडे, लांडे बाळासाहेब, अविनाश धोत्रे, अभिषेक चव्हाण, शैलेश निकम, रवी नरसाळे, सुमित वडघुले, सुरेश चव्हाण, वैभव चव्हाण, राहूल पोतदार, गौरव वाणी, प्रियांका धुमाळ, नेहा करले, गिरीश तांबे आणि मी असे ३५ मावळे आणि सोबत ट्रेकमधील विशेष अतिथी मंदाबाई काळे (वय ६०), सुलोचना काळे (५५), पुष्पा काळे (६१), मंदाताई चव्हाण पाटील(६०) या मातृतुल्य महिला एकूण ३९ जणांना घेऊन भोरगिरीच्या दिशेने गाडी निघाली. यात एक नाव आयोजकांनी गुपित ठेवलं होतं, ग्रुपमध्ये अप्पाला "ठरलं की काय?",असं म्हणत खूप चिडवलं सगळ्यांनी.

पहाटे दुर्गभ्रमणाला निघण्याची खरं तर ही आमची पहिलीच वेळ. यंदा खूप काही नवीन होतं. या ट्रेकमध्ये विद्यार्थी, शिक्षक, महिला, कंपनी कामगार, मॅनेजर, व्यावसायिक, शेतकरी, नेव्ही ऑफिसर, राजकीय व्यक्तींचाही समावेश होता. वेगवेगळ्या वयांचे बरेच नवीन चेहरे होते. मार्गदर्शक पंकज माने सर, दिशादर्शक बापू आणि जेवणाची सर्व व्यवस्था काटेकोरपणे पाहणारे आमचे अन्नदाता बाळाभाऊ आज नव्हते, त्यांची उणीव भासत होती.

प्रत्येक महिन्याकाठी निसर्गात, वातावरणात बदल व्हावा अगदी तसंच दर महिन्याला आम्हाला हवापालट करण्याची संधी रवी काळे सर नित्यनेमाने घडवून आणतात.

पुरवून वापरता यावा म्हणून आपण गरजेनुसार मोबाईल डेटा बंद ठेवतो, फोटो, व्हिडीओ किंवा महत्वाच्या काॅल्ससाठी मोबाईलची बॅटरी वाचवतो, अगदी तसंच नकोशा विषयांवरचे चर्चा, परिसंवाद स्वतःपर्यंत पोहोचूच दिले नाहीत की आपली सकारात्मक ऊर्जा वाचते, महत्त्वाच्या गोष्टींसाठी. तीच ऊर्जा वापरायची गडकिल्ले भ्रमंतीसाठी. जगण्यातली उत्स्फूर्तता मात्र हरवू द्यायची नाही.

पावसामुळे दाटलेली हिरवळ आणि पाणीच पाणी गाडीच्या काचेतून पाहत आम्ही सकाळी आठ वाजता डेहणे गावी नाष्ट्यासाठी उतरलो. चवदार मिसळपाव, गरमागरम भजी आणि वाफाळता चहा घेतला अन् सकाळ कशी प्रसन्न झाली. काळे सरांची सगळीकडेच कशी ओळख? हा अचंबित करणारा नेहमीचाच प्रश्न. आता डायरेक्ट संध्याकाळी जेवण होणार होतं म्हणून मनसोक्त जेवलोच म्हणावं इतकं खाल्लं आम्ही. हाॅटेलमध्येच पहिल्यावहिल्या स्टेटससाठी ग्रुपफोटो झाले आणि निघालो पुढच्या प्रवासाला.

भोरगिरी हा भीमाशंकर डोंगररांगेतला ६८६ मीटर उंचीचा गिरिदुर्ग प्रकारातला, सोप्या चढाईच्या श्रेणीतला किल्ला. चासकमान, वाडा या गावांवरून टोकावडेमार्गे जाणारा रस्ता भोरगिरी गावाशी संपतो. जाताना वाटेत भीमा नदीवरील धरण पाहता येते. पुण्यापासून ८० किमी. अंतरावरचा प्रवास.

पायथ्याशी उतरलो सगळे. चौघी मातृतुल्य महिला भिमाशंकर दर्शनासाठी गाडीतून पुढे पाठवत आम्ही भोरगिरीकडे कूच केली. सगळ्यांत पुढे अप्पा, दादा आणि मी थांबायचे ठरले. ( ठरले की आयोजकांनी सज्जड दम भरला हे फक्त आम्हालाच माहीत.) शेवटी काळे सर चालणार होते.

हिरव्यागार झाडाझुडुपांनी, भाताच्या खाचरांनी समृद्ध प्रदेश पाहताना निसर्गरुपी चित्रकाराने हिरव्या रंगाचे सढळ हाताने मारलेले फटकारे डोळ्यांना सुखद अनुभव देत होते. मध्येच डोकावणारे छोटुले ओहोळ, धबधबे जिवंतपणाची साक्ष पुरवत होते. निसर्ग असा सौंदर्याचा अविष्कार करत असताना कॅमेऱ्यात त्या नजाऱ्याला टिपणार नाही ते गडकिल्ले प्रेमीचे मावळे कसले?

या मनमोहक क्षणांना तात्पुरत्या स्वरूपात डोळ्यांत साठवल्यानंतर कॅमेऱ्यात कैद करत आम्ही चिरंजीवी करतो हे काळे सरांच्या लक्षातच येत नाही बहुधा. उगाचच ओरडत असतात. पुढच्या दहा मिनिटांत पुढे आलेल्या आम्हाला कळून चुकले खरी फोटोग्राफी तर मागे थांबूनच भारी होते. पुन्हा युटर्न घेत आम्ही शेवटी मोर्चा वळवला.

डोळ्यांनी सगळेच पाहतात, एखादी व्यक्ती असं काहीतरी छान पाहते की कलाकार होते. आकाश रोजचंच असतं, इंद्रधनुष्य एखाद्याच दिवशी. ते देखणेपण निर्माण करतो तो कलाकार. असा आमच्या ग्रुपमधील वैभव करपे. उत्कृष्ट फोटोग्राफर. यावेळी पोराला घेऊन आल्यामुळे जास्त मौज नाही करता आली, पण धबधब्याखाली भिजण्यात माघार घेतली नाही.

संततधार पावसामुळे पाषाणावर शेवाळ साठलेलं होतं, वाट काहीशी घसरडी आहे हे जाणवण्यापूर्वीच वेदांत आणि अक्षयकुमार कांबळे घसरले. आमचे दोन मावळे सुरुवातीलाच धारातीर्थी पडलेले पाहून आम्ही सावधगिरी बाळगली.

वेदांत, श्रावणी, तनिष्का, ऋत्विक ही छोटी पोरं मोठ्यांबरोबर धीटाईनं ट्रेक करत होती, हे विशेष.

पुढे भला मोठा धबधबा. निसर्गाने दृश्य रुपात अवतरताना काय भुरळ घालणारी रुपं निवडलीत याचा पेच पडतो बऱ्याचदा. इथेही बरचसं फोटोसेशन करून पुढे मार्गस्थ झालो.

समोरच भोरगिरी दिसला. मंदिर असणाऱ्या गुहेचं दर्शन चढाईला सुरुवात करतानाच नजरेच्या टप्प्यात येतं. गुडघाभर गार पाण्यातून आत जात देवीचं दर्शन घेतलं. प्रशस्त गाभारा अन् पूर्वजांनी केलंलं दगडी खोदकाम आश्चर्यकारक होतं.

काळे सरांनी आणि संतोष लांडे यांनी शिवरायांच्या जयजयकारात घोषणा दिल्या.

वर किल्ल्यावर नवव्या शतकात खोदलेल्या गुहा, पाण्याचे टाके आहेत. पुढे गेल्यावर पिंडीचे अवशेष, बुरुजांच्या अस्तित्वाच्या खुणा पहायला मिळतात. एक व्याघ्रशिल्प, मारूती मंदिर, गुहा नजरेस पडते. पाण्याची कुंडे दुथडी भरून वहात असतात.

गडावर गडपणाचे तुरळक अवशेष आहेत. दक्षिण अंगाला लेणी कोरलेली आहेत. ट्रेकला उशीर होईल म्हणून आम्ही वर गेलो नाही, हे सगळं पहायचं, अनुभवायचं राहिलंच.

जवळपास चारशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा जपणारे कित्येक गडकिल्ले आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत. मोठमोठाले डीजे लावून नाचण्याची हौस जयंतीदिवशी पूर्ण करणारे बरेच आहेत. त्या दिवशी समाजहिताची कामे व्हायला हवीत खरं तर. तो संपूर्ण पैसा गड-किल्ल्यांच्या देखरेखीसाठी शिवराय, शिवराज्य किंवा सह्याद्री प्रतिष्ठान यांसारख्यांना देऊन आपण शिवरायांबद्दल आपली आपुलकी, आस्था व्यक्त करू शकतो. महापुरुषांच्या कर्तृत्वाला, विचारांना शोभेल अशी जयंती साजरी करायला हवी.

भोरगिरी किल्ला छोटेखानी असून भोरगिरी ते भीमाशंकर हे आठ किलोमीटरचे अंतर हा एक सुंदर जंगल ट्रेक आहे. डोंगरधारेजवळून रमतगमत करता येणारा. या संपूर्ण ट्रेक मार्गावर असंख्य धबधबे आणि वैविध्यपूर्ण रानफुलं पहायला मिळतात.

अनामिक कवीच्या काही ओळी आवर्जून आठवल्या,

बालझरा तू बालगुणी

दरीदरी घुमवित येई!

खेळ लतावलयी फुगड्या

फिर गरगर अंगाभवती

लपत-छपत हिरवाळीत

झुलव गडे, झुळझुळ गाणे!

इथे जंगलसफरीसाठी स्थानिक गाईड मिळतात. पाचशे, हजार रुपयांपर्यंत. काळे सरांनी तीनशे रुपये म्हणणाऱ्या एका सातवीतल्या शाळकरी मुलाची निवड केली. त्यांच्यातल्या शिक्षकी पिंडाची पुन्हा जाणीव झाली.

चिखल तुडवत, भातशेती पाहत, गप्पांच्या ओघात मित्रांचं टोळकं घेऊन पुढे पुढे जात होतो.

कवी ग्रेस आपल्या कवितेतून व्यक्त होतात,

मन सैरभैर होताना

कंदील घरातील घ्यावा,

संध्येच्या पारावरती

उजळून हळू ठेवावा!

असा उत्साहाचा एखादा कंदील प्रत्येकाने वेळोवेळी उजळवत ठेवायला हवा. जेव्हा कधी नैराश्याचा प्रसंग येईल तेव्हा या ज्योतीच्या प्रकाशात चालत रहावं. 

सगळ्यांची ओळख परेड झाली. वेगवेगळ्या क्षेत्रातली मातब्बर मंडळी, हुशार विद्यार्थी, कोणी काय नि कोणी काय..

संतोष लांडे म्हणाले,

एक पणती धिटाईनं पुढे आली

आणि

आत्मविश्वासाने बोलती झाली.

दिसायला जरी मी इवलीशी,

तरी काम करीन सर्व शक्तीनिशी. दाखवून देईन जगाला

प्रकाश भेदतो अंधाराला!

असा नैराश्याचा प्रकाश भेदणारा आमचा जिवलग मित्र 'रवी' आमच्या आयुष्यात आला हे आम्हा सर्वांचं भाग्य. टाळ्या वाजवून सर्वांनी दाद दिली.

कर्तृत्व असं असावं की चरीत्र ऐकणाऱ्याने टाळ्या वाजवतच राहिलं पाहिजे.

जगताना आयुष्याच्या कडेकडेने भरपूर निसटतं हे निश्चित. पण निसटतंय काहीतरी हे माहीत असतानाही ओंजळीत जेवढं सामावता येईल तेवढा प्रयत्न करायला काय हरकत आहे?

जास्तीत जास्त अनुभव गाठीशी असावेत यासाठी झगडत राहिलं पाहिजे. फिरत राहिलं पाहिजे, माणसं जोडत गेलं पाहिजे.

मनुष्याला शाप ही असा असावा की मन अखंड भरेपर्यंत तुला थांबता येणार नाही.

सगळ्यांची खेचत म्हणा किंवा आनंदाची लहर उत्पन्न करत म्हणा एक व्यक्ती आम्हा सर्वांना दिलखुलास हसवतो, दादा घोरपडे. या माणसाशिवाय ट्रेक म्हणजे मिठाशिवाय जेवण. दोन्हीकडेही चव लागत नाही मग. नेव्ही ऑफिसर चव्हाण सरांकडून समुद्रातले भरपूर किस्से ऐकले. भारी वाटलं.

पुढे एका धबधब्याखाली सगळेच मनसोक्त चिंब झालो.

आयुष्यात किती पावसाळे बघितले यापेक्षा कितीवेळा पावसात भिजलो, हे महत्त्वाचं.

मन मारुन जगण्यापेक्षा मन भरून जगायचं सतत, कारण इथला मुक्काम कधी संपेल सांगताच येणार नाही.

फोटो काढताना अप्पा रणसिंग इतक्या वेगवेगळ्या पोझ देतो की टिपताना कॅमेरा हताश होतो आणि कॅमेरामन गोंधळतो.

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपमध्ये लाभलेलं सर्वांत हसरं, दिलखुलास, मनसोक्त जगणारं व्यक्तीमत्त्व. अप्पा तू जिथे बसशील तो दगडही सिंहासन वाटतो, असा तुझा सहवास असतो, हे खरंय.

कटके सर, अक्षयकुमार, नेव्ही ऑफिसर चव्हाण सर, लांडे गॅंग आणि बरीच नवी, उमद्या स्वभावाची माणसं यावेळी भेटली. अनुभवांचं गाठोडं आणखी विस्तारलं.

युवराज शिंदेचे रिल्स बघून त्याच्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला. हा पोरगा भविष्यात खूप लांब पोहोचणार याची सगळ्यांना खात्री झाली. दादा घोरपडे यांनी त्याला 'रंगाचा विचार करू नको, तू फक्त रिल्सवर भर दे',असा लाखमोलाचा सल्ला दिला. आम्ही कृतकृत्य झालो.

आजारी असतानाही गिरीश ट्रेकला आला, याला म्हणतात जिद्द.

वदनाचे बोल सगळे ऐकतात,

काळजाची कळ त्यासी ठावी! (माझ्या हाकेला ओ देत सहभागी झालेला गिरीश)

पुढे एका पॉइंटवर फोटो काढण्यासाठी पळत येताना अविनाश धोत्रे सरपटत घसरला. शिवाय हसत म्हणाला,"एक नंबर पडलो." हसून पुरेवाट झाली. अभी आणि शैलेश ने त्याला उचललं. सकाळच्या दोन धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांना सगळे साफ विसरले. हवा फक्त अविनाशचीच. पुढे चालत जात भीमा नदीचा उगम कसा होतो हे प्रत्यक्ष पाहिलं. झरा किंवा धबधब्याचं पाणी वाहत, एकमेकांच्या हातात हात घालत इतक्या वेगात प्रवाहीत होतं की भीमेसारखी विराट सरिता निर्माण होते.

हे सौख्य याचि देही याचि डोळा पाहण्याचं भाग्य रवी काळे सरांमुळे आम्हा सर्वांना लाभलं. निःस्वार्थाचाही एक चेहरा असतो. आम्ही प्रत्येक ट्रेकमध्ये तो चेहरा पाहतो, अगदी जवळून अनुभवतो. समोर अखंड समुदाय एन्जॉय करताना पाहत, भर पावसात न भिजणं किती धीराचं काम आहे हे वेगळं सांगायला नकोच. जबाबदारी झटकणं या माणसाला कधीच जमत नाही. केवळ नाममात्र ६५० रुपयांत जेवणासहीत आम्हा सर्वांना भटकंती घडवून आणणारा हा अवलिया माणूस आजच्या युगातला एक अपवादच म्हणावा लागेल. ग्रुपमधील सर्वांची जबाबदारी आंदणात मिळालीये अशी त्यांची अवस्था. अन् आम्ही नर्मदेचे गोटे जे त्यांना आणखी त्रास देत राहतो.

संततधार पाऊस सुरुच होता. भिजत, गप्पा मारत, थोडेसे फोटो काढत पुढे पुढे जात होतो. गुप्त भिमाशंकरचा नजारा विलोभनीय होता. सुख पदरी पाडून घेण्याच्या अशा कित्येक संधी आम्हाला ट्रेक करताना मिळतात. धबधब्यावरून पडणारं पाणी फेसाळ आणि दुधाळ होतं. हीच ती भीमा जी कित्येकांना जीवनदायिनी ठरते. गंगेइतकीच पवित्र. पण पुढे गेल्यावर दिसते माणसांनी प्लास्टीक बाटल्या, इतर कचरा टाकून केलेली घाण. किती विचित्र वाटते ते. भरभरून देणाऱ्या निसर्गाची अवहेलना करण्याची कोणतीच संधी आपण सोडत नाही याची लाजच वाटली.

भिमाशंकर मंदिराचा कळस दृष्टिक्षेपात आला. काळ्या कातळातलं सुबक मंदिर. श्रावणामुळे असणाऱ्या दाट गर्दीमुळे लांबूनच दर्शन घेत परतीच्या प्रवासाला लागलो. देवस्थानच्या नियोजनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मंदिर परिसरात फक्त पीएमटी बस आणि एसटी. लांब पाच सहा किलोमीटर पर्यंत १ते५ पार्कींगची सोय केलेली होती. बस किंवा पीएमटीमध्ये बसून आपल्या पार्किंग पर्यंत जायचे. आवडलं आम्हाला. ट्राफीकची कसलीच चिंता नाही.

घोडेगावला आशीर्वाद हाॅटेल‌मध्ये सगळे जेवणावर तुटून पडलो. बाळाभाऊंची प्रकर्षाने उणीव जाणवली. सगळेच भुकेले भस्मासूर. वेटर तर थकून गेले बिचारे वाढता वाढता. आम्ही कोपऱ्यात बसलेलो. एखादी रोटी यायची, जी चौघात खायचो. त्या नादात आम्ही किती खाल्लं याची गणतीच नव्हती. संध्याकाळी साडे अकराच्या सुमारास घरी सुखरूप पोहोचलो.

शेवटी नोबेल पारितोषिक विजेत्या पाब्लो नेरुदा या जगप्रसिद्ध कवीच्या अनुवादित कवितेतील काही ओळी...

तुम्ही प्रवासाला नाही जात,

भटकत नाही,

तुम्ही वाचतच नाही काही,

जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,

चुकून कधी नाही देत तुम्ही

स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.

याचा अर्थ,

तुम्ही मरताय हळूहळू...

सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,

रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,

चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,

चुकून कधी वाट चुकत नाही,

परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,

त्यांच्याशी काही बोलत नाही,

अंगावर चढवत नाही, नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग.

याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू...

सोडत नाही चाकोरी,

झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या स्वप्नांसाठी स्वत:ला,

तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,

एक संधीही देत नाही स्वत:ला,

स्वत:साठी जगण्याची,

आयुष्यच बदलून टाकण्याची.

याचा अर्थ...

तुम्ही मरताय हळूहळू...

नवनव्या संकल्पनांचे गड काबीज करत

प्रचंड जीवनोत्साह उरात भरत पुन्हा भेटू नव्या वळणावर...

तोपर्यंत जय शिवराय!

पुढील सफर

रविवार १८ सप्टेंबर २०२२

किल्ले जीवधन, नाणेघाट पावसाळी ट्रेक

आयोजकांशी अवश्य संपर्क साधा.

आयोजक 

रवी काळे सर

(पुणे महानगरपालिका)

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी

9096465675

मार्गदर्शक

पंकज माने सर

8668251375

शब्दांकन

आयुब शेख सर

प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका

9552941271

2 comments:

  1. तुमच्या लेखणीला १०० तोफांची सलामी.... आम्ही भाग्यवान आहोत तुमचा सहवास आम्हला भेटत आहे

    ReplyDelete
  2. खूप छान लेख आहे सर👌👌👌

    ReplyDelete

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...