रणरणतं ऊन आणि साताऱ्यातले तीन किल्ले
( गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान, निमगाव म्हाळुंगी पुणे सोबतचा उन्हाळ्यातला ट्रिपल ट्रेक )
स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती शंभूराजांचा जन्मदिन गडावर साजरा करण्याच्या उद्देशाने गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपचे चाळीस मावळे १३ मे २०२३ रोजी शनिवारी रात्री अकरा वाजता निमगाव म्हाळुंगी पुणे मधून रांजणगाव, शिक्रापूर, वाघोली, हडपसर करत सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाले. यांमध्ये नेहमीप्रमाणेच कंपनी कामगार, नोकरी वर्ग, शिक्षक, शाळकरी पोरं, कॉलेज विद्यार्थी, महिला, चिमुकली पोरं यांचा समावेश होता. वैभव करपे, प्राची वाखारे, अमोल नागवे, राधामावशी नागवे, सूरज माने, रवी काळे, शरद काळे (बाळाभाऊ), रवी मोरे (आण्णा), सरीता पाटसकर, गोजिरी मांढरे, विठ्ठल वडघुले, प्रेम त्रिभुवन, कोमल चोपडे, संतोष डफळ, युवराज शिंदे, श्याम मुंजाळ, वर्षा शिंदे, केशव पाटील, विश्वंभर पवार, वैभव चव्हाण, अथर्व देशमुख, नवनाथ देशमुख, बाबुराव लांडे, शारदा म्हस्के, कांचन पवार, अविनाश शिंदे, विनिता थोरात, आरती गोरे, कृष्णा गाढवे, प्रतिक्षा गाढवे, गोपाल शिंदे, सुमित चव्हाण, स्वयम काळे, मच्छिंद्र वाघोले, सागर चोपडे, कोमल चोपडे यांसोबतच अथर्व आणि दुर्वा ही तिसरीतली चिमुरडी पोरं. एकाच गाडीत सगळे मावले. प्राची मॅडम यांनी सगळ्यांसाठी आंबे आणलेत, असा मेसेज काळे सरांनी ग्रुपमध्ये टाकल्यापासून तोंडाला पाणी सुटले होते.
मुक्कामाचं ठिकाण गाठण्यासाठी किती मैल उरलेत? हे सांगणारे दगड जोपर्यंत दिसत राहतात, तोपर्यंत प्रवासाची उमेद वाढती राहते. अगदी त्याच नित्यनेमाने बरेच किल्ले आणखी पाहणं उरलंय, हे खुणावणं सुट्टीच्या दिवस घरात बसू देत नाही. अशी आमची गत होते. यावेळी भर उन्हाळ्यात एकाच दिवसांत साताऱ्यातले तब्बल तीन किल्ले सर करण्याचा मनसुबा आखला गेला. वर्धनगड, सज्जनगड आणि अजिंक्यतारा. मावळ्यांनी कंबर कसलीच होती. अनेक चेहरे नवीन होते. पंकज सर, गणेश दादा, माने सर, कटके सर, रवी काळे (अझहर), अप्पा, डॉक्टर, वैभव नरवडे, खाडे सर, सूरज बोरावके, अक्षयकुमार, करे सर, संतोष लांडे, बाप्पू यांसारखे नेहमीचे, हसवणारे चेहरे नसल्यामुळे काहीशी कमतरता जाणवत होती. गुलाबांच्या पाकळ्यांवरून अप्सरेने नृत्य करताना त्यातलाच एखादा काटा रुतावा असंच काहीसं.
आठवडाभर काम करून वितभर पोटाची खळगी भरल्यानंतर रविवारचा अख्खा दिवस गादीवर लोळून, मोबाईलवर डोळे लावून बोटं सरसर फिरवत बसण्याऐवजी आम्हा सगळ्यांना एकत्र आणत काळे सर प्रत्येक महिन्याकाठी अशी गड किल्ल्यांची सफर घडवून आणतात, हे भलतंच भारी वाटतं. रात्रीच्या प्रवासात वैभव चव्हाण शेजारच्या एका व्यक्तीला पंकज माने सरांच्या नियोजनाबाबत माहिती देत होता. सगळं ऐकून घेतल्यानंतर त्या व्यक्तीने मोबाईलच्या स्क्रिनवरचा फोटो दाखवून विचारले, "हेच का पंकज सर ? मोठा भाऊ आहे मी त्यांचा." या उत्तरावर वैभव चिडीचूप! बाळाभाऊ,काळे सर ड्रायव्हरला मार्ग दाखवत होते आणि आम्ही मागच्या सीटवर स्वप्नांच्या गावी पोहोचलो होतो. रस्ता आणि गाडीची चाकं यांच्या द्वंद्व समाप्तीनंतर वर्धनगडाच्या पायथ्याशी पहाटे चार वाजता पोहोचलो. काळे सरांचे मित्र किरण गोडसे यांनी वर्धनगड गावातल्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या शाळेच्या शौचालयात सर्वांच्या प्रातर्विधीची सोय केली. विष्णू वाघ यांनी पाणी भरून ठेवले. अज्ञात माणसांसाठी अशा सोयी करणं किती लाखमोलाची देणगी वाटली.
नित्यनेमाने बाळाभाऊ आणि निमगावातले मित्र पाण्याचे मोठाले जार, गॅस शेगडी, सिलिंडर, पातेली, किराणा मालाचं साहित्य अचूकपणे घेऊन येतात. बाळाभाऊंनी शाळेच्या मैदानात योग्य जागा बघून मॅगी बनवायला सुरुवात केली. विठ्ठल वडघुले, प्राची मॅडम, रवी अण्णा यांसोबत अनेकांनी कांदे, टोमॅटो, कोथींबीर कापून दिली. अस्सल तुपातली चवदार मॅगी आणि फक्कड चहासोबत पतंजली मिल्क बिस्किटे खात पहिल्या फोटोक्लिकची सुरुवात झाली. अन्नदाता सुखी भव! असे कित्येक आशीर्वाद बाळाभाऊंच्या खात्यावर जमा होत असतील त्याची गणती होऊ शकत नाही. ज्यांचा परिचय झाल्यावर आपल्याला आपलं जगणं समृद्ध झाल्यासारखं वाटतं, ती सगळी चैतन्याची रूपं. असं चैतन्य आम्ही सदैव अनुभवतो.
पातेली धुवायचं काम मी आणि अमोलने करावं अशी सूचनावजा धमकी काळे सरांनी दिली. म्हस्केताई देवासारख्या मदतीला धाऊन आल्या. मी पाणी ओतायला आणि त्या भांडी धुवायला. साहित्य गाडीत ठेवून गडभ्रमंतीला सुरुवात झाली. समोरचं एक दृश्य डोळ्यांना सुखद गारवा देणारं होतं. मंदिर आणि मस्जिद खांद्याला खांदा भिडवून अगदी शेजारी उभे. असा नजारा पाहणं खऱ्या भारतीयाला सुखद धक्का आहे सध्याच्या परिस्थितीत.
वैभव करपे भाऊंनी मला फोटो घ्यायला सांगितले. त्यांच्या ही नजरेतून हा नजारा सुटला नव्हता तर! गडाच्या बांधलेल्या पायऱ्या स्वागतासाठी सज्ज. ज्या गडावर देवदेवतांची मंदिरे आहेत, तिथे अशा पायऱ्यांची रेलचेल पहायला मिळते. इथेही वर्धनीमातेचं मंदिर असल्याने भाविकांसाठी ही सोय करण्यात आल्याचे समजले.
पायऱ्यांसाठी ज्यांनी आर्थिक दान केलंय त्यांची नावे वाचत पुढे गेलो. कच्च्या रस्त्याने गडाचे गोमुखी प्रवेशद्वार नजरेस पडले. आकाशाचा लालसर गुलाबी रंग फाकत सूर्य हळूवार पावलांनी रांगत येणाऱ्या बाळासारखा पुढेपुढे पाऊल टाकत होता.
महाराष्ट्रातली सह्याद्रीची एक रांग माणदेशातून फिरली, त्या महादेव डोंगर रांगेवरचा कोरगावपासून ७ मैलांवर हा किल्ला. १५०० फूट उंचीचा गिरीदुर्ग प्रकारातला सोप्या चढाईच्या श्रेणीतला साताऱ्याच्या वर्धनगड गावातला! एखाद्या दिवशी आंधळी-कोशिंबीर खेळताना घडावं तसं घडतंय या ग्रुपसोबत. आपण हवेतल्या हवेत हात फिरवावा आणि अचानक एखादा भिडू सापडावा तसे नवनवीन किल्ले काळे सर शोधून काढतात. ज्यांची कधीच नावंसुद्धा ऐकली नव्हती त्यांचा जिवंत इतिहास आम्ही जगतो.
वर्धनगड गावात शिरताना दोन तोफा आपले स्वागत करण्यासाठी मोठ्या डौलाने उभ्या आहेत. गडाचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचे आहे. 'राजा शिवछत्रपती परिवार, महाराष्ट्र राज्य' या संस्थेने तिथे सागवानी नवीन दरवाजा बसवून प्रवेशद्वाराची व किल्ल्याची शोभा अजून वाढवलीये. दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडेच असलेल्या ध्वजस्तंभाच्या थोडे पुढे गेल्यावर तटातून बाहेर पडण्यासाठी चोरवाट तयार केलेली आहे. दगडाच्या बांधलेल्या पायऱ्या. या टेकाडावर चढून जाताना वाटेतच हनुमानाची दगडी मूर्ती, शंकराचे छोटेसे देऊळ लागते. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
५ मे १७०१ या दिवशी पन्हाळा जिंकल्यावर औरंगजेबाने खटावला छावणी करण्यासाठी, पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेण्यासाठी साताऱ्याकडे लक्ष केंद्रित केले. औंरगजेबाने मंजुरी देताच फतेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटावचे ठाणे जिंकले. वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्लाखानाकडे पाठवला. त्याने सांगितले की, "किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला दण्यास तयार आहे. फतेउल्लाखानाने विनंती ताबडतोब मान्य केली. अशी बोलणी करणे हा वेळकाढूपणा होता. मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू. फतेउल्लाखान किल्लेदार आज येईल, उद्या येईल म्हणून वाट पाहत राहिला, पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकलासुद्धा नाही. फतेउल्लाखानाला मराठ्यांचा खेळ लक्षात आला आणि त्याने १३जूनला किल्ल्यावर हल्ला चढवला. १९जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून "सादिकगड' असे ठेवले. औरंगजेबाची पाठ फिरताच हा किल्ला मराठ्यांनी परत जिंकला आणि त्याचे सादिकगड नाव बदलून वर्धनगड केले.
किल्ल्यावरून निसर्ग पाहताना सृष्टीच्या या ऐश्वर्यात आपल्या श्रीमंतीपेक्षाही काहीतरी अधिक मोहक असतं. श्रीमंती, नट्टापट्टा यांच्यापेक्षा उदात्त सौंदर्य जगात कितीतरी आहे याची जाणीव होते.
गडावर अधिष्ठात्री वर्धनीमातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार झालाय. त्यामुळे रंगरंगोटी केलेले मंदिर आकर्षक दिसते. मंदिरासमोर फरसबंदीचा चौथरा, सभामंडप प्रशस्त आहे. मंदिराच्या मागच्या बाजूने टेकाडावरून एक वाट खाली उतरते. उजवीकडे पाण्याची टाकी, तटबंदी, चोर दरवाजा दिसतो.
गडाच्या एका बुरुजावर आम्ही 'बहरला हा मधुमास नवा " या गीतावर थिरकलो. पाच सहा वेळा त्याची रंगीत तालीम झाली. वारा प्यायलेल्या वासराप्रमाणे गडावर पोहोचल्यानंतर आम्ही धुंडाळत राहतो! गड पाहून उतरताना गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानच्या जबाबदार मावळ्यांनी प्लास्टिक कचरा, बॉटल्स गोळा करून शाळेच्या कचराकुंडीत टाकले.
ज्या शाळेत विसावलो, त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी डिक्शनरी भेट दिली. ऋणातून उतराई होण्याचा इवलासा प्रयत्न.
आता सज्जनगडाकडे गाडी निघाली, लगबगीने. कारण दुपारचं जेवण तिथे मठात करायचे होते. सज्जनगडावर आश्वलायन ऋषींचे वास्तव्य म्हणून आश्वलायनगड. परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. कारी, परळी, गजवाडी ही आसपासची गावं. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला. सातारा शहराच्या नैर्ऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा. शंखाकृती आकाराच्या या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११व्या शतकात केली. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदासस्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आल्याचा इतिहास ऐकिवात आहे. २२ जानेवारी १६८२ मध्ये याच गडावर रामदास स्वामींनी देह ठेवला. गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदिर. थोडीशी तटबंदी अस्तित्वाच्या खुणा जपताना दिसते. मंदिरालगतच अशोकवन, वेणाबाईचे वृंदावन, ओवऱ्या, अक्काबाइचे वृंदावन, आणि समर्थांचा मठ या वास्तू आहेत. गडाच्या पश्चिम टोकावर एक मारुती मंदिर आहे त्यास 'धाब्याचा मारुती' म्हणतात.
पंधरा ते वीस मिनिटात गडावर पोहोचता येते. वेगवेगळ्या गावातले मारुती गावाच्या नावाचे प्रतिनिधित्व करत इथे उभे आहेत. गडावर राहण्यासाठी धर्मशाळा देखील आहेत. भोजनासाठी तासभर ओळीत उभे राहिलो तरीही पंगतीला सुरुवात होईना म्हटल्यावर मी, वैभव करपे, संतोष डफळ आणि मच्छिंद्र वाघोले खाली उतरून एका हॉटेलमध्ये जेवायला आलो. समोर प्राची मॅडम मिसळ खात होत्या. मानलं वाघिणीला.
प्राची मॅडमनी आणलेले आंबे गाडीत होते. त्या म्हणाल्या, "खा." सगळे म्हणत होते, "एकेक आंबा खाऊ." पण मी तसे करण्यास सक्त मनाई केली. कारण आंबेचोरीचा सगळा दोष माझ्यावरच येणार होता. काळे सरांसोबत सगळे खाली उतरले. त्यांचा विषय एकच. "आयुब सरांनी आंब्यावर ताव मारला असणार!" मी मात्र थोडक्यात वाचलो. क्षणाच्या 'केशरी' आंब्याच्या मोहाने मला 'पायरी' दाखवली असती. माझ्याबद्दलचा विश्वास 'लंगडा' झाला असता. जो मी अगदी हट्टाने जपला. मनात खूप खूष झालो. समोर अजिंक्यतारा स्पष्ट दिसत होता. गड उतरताना पाहिले, दुचाकी, चार चाकी गाड्यांनी रस्ता (गडाचा घाटच म्हणा थोडक्यात) ओसंडून वाहत होता. आडव्यातिरप्या कशाही गाड्या लावल्या होत्या.
सगळे मावळे गाडीतून खाली उतरले. खेळण्यातली गाडी अलगद उचलून बाजूला ठेवावी, तशा रस्त्यातल्या कितीतरी गाड्या हलवून, उचलून बाजूला केल्या. तेव्हा कुठे तासाभराच्या अथक परिश्रमाने रस्ता मोकळा झाला. आम्ही सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गाडी अजिंक्यताराच्या मार्गे निघाली. प्राची वाखारे मॅडम यांनी आम्हा सर्वांसाठी स्वतःच्या बागेतला साखरेपेक्षाही गोड २२ किलो केशर आंबा आणला होता खरा पण काळे सर ते आम्हाला देण्याचा मुहूर्त शोधत होते की काय कोणास ठाऊक? खरंतर सकाळपासूनच कधी आंबे खायला मिळतात असे झाले होते. शेवटच्या गडावर आंबे वाटपाचा त्यांचा मनसुबा असावा बहुतेक. पण गडकिल्ले प्रेमीसुद्धा काही कमी नव्हते. गाडीच्या साऊंडवर 'आंबे आंबे जगदंबे' गाणं लावून काळे सरांना आंबे वाटपासाठी मजबूर करण्यात आले. आम्ही सर्वांनी मनसोक्त ताव मारत आंबे संपवले. विशेष नोंद म्हणजे नेहमीप्रमाणे मी मापातच आंबे खाल्ले. तोंड गोड करून भर उन्हात गडचढाई सुरू केली.
प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवरचा सातारा शहरातला अजिंक्यतारा. ४४०० फूट उंचीच्या या किल्ल्यावर, सिमेंटचे रस्ते, वृक्षारोपणासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. गड गाठण्यास साधारण १ तास लागला. मराठ्यांच्या चौथ्या राजधानीचं ठिकाण. राजगड, रायगड, जिंजी आणि नंतर अजिंक्यतारा असा हा राजधानीचा क्रम. साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स.१५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी हिला किश्वरखान याने येथे कैद करून ठेवले होते. या किल्ल्याचा उपयोग सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जेल म्हणून केला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर दोन महीने वास्तव्यास होते. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मुघलांनी सुरूंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. मोठा तट पुढे घुसणाऱ्या मोगलांवर ढासळला व दीड हजार मुघल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण 'आझमतारा' केले. ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर अजिंक्यतारा केले. गडाचे प्रवेशव्दार सुस्थितीत आहे. शंभूजयंतीमुळे उधळलेल्या भंडाऱ्याची पिवळीशाल पांघरून नव्या नवरीसारखं लाजत प्रवेशद्वार उभं होतं. दरवाजाचे दोन्ही बुरूज आज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर राहण्यास उत्तम आहे. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे प्रसारभारती केंद्राचे दोन टॉवर आहेत. पुढे वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासळलेला राजवाडा आणि कोठार आहे. मंदिराकडे जाताना तीन तळी वाटेत लागतात. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो. गडावरून साताऱ्याचे विहंगम दृश्य पहायला मिळाले.
गाडी स्टेशनवर वाजवीपेक्षा जास्त थांबली म्हणजे ज्याप्रमाणे जोरात पळवून ड्रायव्हर वेळ भरून काढतात, त्याप्रमाणे काळे सर आम्हांला पळवतच गड दाखवतात. या गडावर खूप कमी फोटो काढता आले. गड उतरलो, पोटात कावळे कोकलत होते. एका घरगुती ठिकाणी व्हेज नॉनव्हेज जेवणाची सोय काळे सरांचे मित्र स्वप्नील माने यांनी केली. ग्रुपच्या वतीने शिवराय प्रतिमा देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
गार पाण्याने मनसोक्त अंघोळ करून शरीराचा थकवा क्षणार्धात अंतर्धान पावला. जेवणावर ताव मारून परतीच्या वाटेवर निघालो.
भाकरीऐवजी कोणीही पैसा खात नाही, भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही किंवा पोटावर बांधताही येत नाही. म्हणजेच जीवनात ठराविक मर्यादेपर्यंत पैसा आणि श्रीमंतीला महत्त्व आहे, हे लक्षात ठेवायला हवं. अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी नकोत? सुगंध दरवळणारी उदबत्ती संपली की मागे फक्त राख उरते, त्या राखेला परत कसला आलाय सुगंध? मनुष्य देहरूपी जीव आहे तोपर्यंत सुगंध दरवळत राहिला पाहिजे. त्यासाठी ह्रदयाच्या गाभाऱ्यात अशा सुगंधी क्षणांना साठवून ठेवता आलं पाहिजे. त्यासाठी आधी ते क्षण जगले पाहिजेत.
गाडीत गाणी लावून धिंगाणा घातला. श्याम, सुमित, अमोल, अण्णा, युवराज, गाढवे ताई सगळ्यांचा डान्स परमोच्च आनंद देऊन गेला. "बसंती इन कुत्तों के सामने मत नाच!" या गाण्यावेळी रुमालाचा पदर घेऊन आलेली 'युवराज शिंदे ही बसंती' आणि तिची दिलखेचक अदाकारी केवळ घायाळ करून गेली. शोलेमधला विरू इथे असता तर नक्कीच त्याने पाण्याच्या टाकीऐवजी गाडीच्या टपावरून उडी मारत जीव दिला असता हे नक्की... अवघ्या सातशे रुपयांमध्ये साताऱ्यातले तीन किल्ले, भरपेट जेवण आणि गाठीला भलेमोठे अनुभव घेऊन सुखरूप घरी पोहोचलो. काळे सरांचा विजय असो! गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगीच्या नावानं चांगभलं!
गडभ्रमंतीवेळचे मनातले अनंत अनुभव शब्दरूप घेण्यासाठी आसुसले असतात. प्रत्येक ट्रेकमधल्या या अनुभवांचा स्वतःची ठसठशीत नाममुद्रा उमटलेला एक ललितबंधच तयार होईल. अशावेळी जे आयुष्य आपण जगतोय ते कित्येकांचे स्वप्न असेल याची उरात जाणीव होते. म्हणून तर रिटायरमेंट नंतर फिरायचे प्लॅन करून आता फक्त पैशांच्या मागे धावायचंच नाहीये.
सातत्याने ट्रेकची ही ज्योत पेटती ठेवण्याचं सामर्थ्य ज्यांच्या जवळ असेल त्यांनीच या रिंगणात उतरावं...
येथे पाहिजे जातीचे,
येरा गबाळाचे काम नाही!
तुकोबारायांच्या या वचनाची अनुभूती येते.
भेटू नव्या गडाच्या वाटा धुंडाळताना..
पुढील ट्रेक
निमगिरी आणि हनुमंतगड
रविवार २८ मे २०२३
आयोजकांशी अवश्य संपर्क साधा.
आयोजक
रवी काळे सर
(पुणे महानगरपालिका)
गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी
90964 65675
मार्गदर्शक
पंकज माने सर
8668251375
शब्दांकन
आयुब शेख सर
प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका
9552941271






















👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteऐतिहासिक धाग्यांनी विणलेले ट्रेकींगचे अनुभववस्त्र सुंदरच !
ReplyDelete