Sunday, August 13, 2023

आनंदी शनिवारची एक गंमत

 आनंदी शनिवारची एक गंमत

        अनुजा, परी आणि आरती तिघी शाळेपासून दीड-एक किलोमीटर अंतरावर राहतात. सकाळी अनुजाची किंवा परीची आई शाळेत तिघींना सोडते आणि संध्याकाळी आरतीची आई घेऊन जाते. अनुजाचे डोळे आलेत अन् परी आजारी पडली. त्यामुळे शनिवारी आरतीला शाळेत सोडवायला आणि न्यायला कोणीच नव्हतं. त्यामुळे आई तिला शाळेत जाऊ नको म्हणत होती. आरतीचं रडणं सुरू होतं.

     सकाळी पावणेसात वाजता मला फोन आला, तेव्हा आरतीची आई काकुळतीने, "तिला तुम्हीच समजावून सांगा सर, माझं ऐकेना", म्हणाली.

     मी, 'ठीक आहे', म्हणालो. पण तरीही आरतीचं रडणं काही थांबत नव्हतं. तिची शाळेविषयीची ओढ, आनंदी शनिवारची उत्सुकता तिला रडण्यापासून अडवू शकत नव्हती.

        "तुम्ही तिला घेऊन या, मी शाळा सुटल्यावर घरी सोडतो असं सांगताच पलीकडचा रडण्याचा आवाज बंद झाल्याचं मला फोन मध्ये ऐकू आलं.

         ती शाळेत आली, तिने आजची भेंडीची छानपैकी कलाकुसर केली आणि शाळा सुटल्यानंतर मी तिला घरी सोडलं. शाळेबद्दलची अशी ओढ निर्माण करता येणं, हे शिक्षकांचं खरं कसब असतं आणि विद्यार्थ्यांनी शाळा न बुडवणं म्हणजे आपलं शिकवणं त्यांना मनापासून आवडतंय याचं द्योतक असतं!

         गेली अनेक वर्षे मी असा 'आनंदी शनिवार नवोपक्रम' राबवतोय. राज्यस्तरीय शासकीय नवोपक्रम स्पर्धेत २०१९ ला पुण्यातून पहिला आलो अन् मागच्या वर्षी तिसरा. पण scert ने साधं सर्टिफिकेटही देण्याची दानत दाखवली नाही.

         पण आज आरतीने जो या उपक्रमाचा सन्मान केला, तो मला 'राष्ट्रीय पुरस्कारापेक्षाही उच्चकोटीचा' वाटला.प्र संग खूप छोटा आहे, पण भलामोठा संदेश आज मला मिळाला.

आयुब कलाम शेख,

म.न.पा.शाळा क्र.१७४बी,

कोंढवा बुद्रुक पुणे.

९५५२९४१२७१

☺️

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...