सोनटक्का!
वर्षभरापूर्वी घोडेगाव (आंबेगाव) चेतन सोमवंशी सरांकडून आणलेल्या सोनटक्क्याच्या कंदाचं रोपटं झालं, फुलांचा गुच्छ आला.
या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे याची पांढरीशुभ्र फुलं तर सुगंधी आहेतच शिवाय पानं दोन बोटांत धरून थोडीशी चुरगळली तरी सुवास दरवळतो.
सोन्यात माणसाने तांबं मिसळलं अन् कॅरेटच्या टक्क्यात घट झाली. पण निसर्गाच्या निर्मितीला टक्केवारीत मोजता येत नाही. मधाचा गोडवा, फुलांचा सुगंध, शुद्ध पाण्याची पारदर्शकता यांत कधीच भेदभावाची टक्केवारी नसते.
बिना मुहूर्ताचा जन्माला आलेला माणूस आयुष्यभर शुभ मुहूर्ताच्या शोधात राहतो आणि शेवटी बिना मुहूर्ताचाच जगाचा निरोप घेतो. अन् निसर्गाच्या हिरव्या, पिवळ्या, केशरी, निळ्या रंगांत सौंदर्य शोधण्यापेक्षा जातीच्या एका फटकाऱ्यात रंगाचा बेरंग करतो.
अशावेळी गॅलरीतली फुलं पाहिली की उमगतं, रोपांच्या एकाच फांदीच्या टोकावर चार-चार फुलं, कळ्या वेगळ्याच! कॅमेरादेखील हताश होतोय टिपायला. भरभरून देतोय निसर्ग, नुसता फुलतोय, बागडतोय. त्याचे आभार तरी किती मानावेत?
न राहवून मंगेश पाडगावकरांच्या कवितेतल्या शेवटच्या ओळी आठवतात,
ज्यांची हृदये झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात,
तेच फक्त गुच्छासारखा पावसाळा हुंगून घेतात!
लेखन
आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका
9552941271
😍

No comments:
Post a Comment