Saturday, September 23, 2023

मुक हंबरडा शिक्षकांच्या माथी येणाऱ्या अशैक्षणिक कामाविषयीचा हंबरडा कविता लेखन आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका

शिक्षकांवर लादण्यात येणारी अशैक्षणिक, ऑनलाईन किंवा इतर कामे कमी करून जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांसाठी शिल्लक रहावा, एवढीच एक माफक अपेक्षा असणाऱ्या शिक्षकांची व्यथा मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न!


मुक हंबरडा!


झाली चाचणी पायाभूत

अखेर सेतू ही संपली,

कच्च्या पक्क्यांचा ठाव घेत 

गुणं कागदावर टिपली...


पोरं कुठं कमी पडली 

याचा जरा घेतला कानोसा,

तोच सर्वेक्षणं, बीएलओचा

शिक्षका माथी भार नकोसा..


पान्हा फुटल्या गाईच्या

पुढ्यात भुकेलं वासरू,

सवड पाजण्याची नाही

भुकेचं मोजमाप सुरू...


घाण्याला जुंपलेल्या गाईचा

वेळ इतर कामातच जाई,

खोंडाच्या गुणवत्ता सिद्धतेची

पुन्हा करतील घाई...


कागदी घोडे नाचवताना

शिकवणं दुर्लक्षित राही,

समाजही मारील ताशेरे

सरकारी शाळेत 'राम' नाही...


वासराच्या भुकेचं प्रमाण

गाई कागदावर लिही,

माझ्यासाठी सवड कधी?

पिल्लू आशेने पाही...


पिलाची वाढवावी क्षमता की

द्यावा लेखी खुलासा?

उपचारात्मक अध्यापनाचा

कागदीच बोजा पुरेसा!


त्यापरी सत्व पाजण्याची 

इथं द्यावी गाईला मुभा,

खोंड कुपोषित अवखळ

कसा राहील खंबीर उभा...


✍🏼

आयुब कलाम शेख

प्राथमिक शिक्षक,

पुणे महानगरपालिका

9552941271

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...