गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपचा सुवर्ण महोत्सवी ट्रेक
मधुमकरंदगड आणि प्रतापगड
शनिवारी दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ११ वाजता गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी, पुणे ग्रुपच्या तीन गाड्या साताऱ्याच्या दिशेने वाटचाल करू लागल्या. विशेष होतं पन्नासाव्या ट्रेकचं औचित्य! तीन वर्षांपूर्वी सहा मावळ्यांनी स्वराज्य दर्शनाचा उचललेला विडा आता मात्र शिवधनुष्य होऊन शे-दिडशे मावळे आपल्या बळकट खांद्यावर लीलया पेलत आहेत, ही बाब गौरवास्पद आहे. लेकुरवाळ्या पांडुरंगाच्या दिशेने असेच वारकरी चालत राहतात. वेगवेगळ्या जातींची, वयाची, गावांची माणसं एकत्र येतात. एक काळ असा होता, मला पुण्यातून एकही जोडीदार मिळायचा नाही, आता दोन बस पुण्याच्याच होतात. सासवडमधून टिळेकरताई भेटतात. साताऱ्यातून खांडेकर ताई.
एक बस निमगाव म्हाळुंगीमधून (५० सीटर) शरद (बाळाभाऊ) काळे, नितीन रनसिंग, वैभव करपे, सोहम करपे, रोहन वाळके, प्रमोद वडघुले, नवनाथ मेमाणे, गणेश (दादा) घोरपडे, गोजिरी मांढरे, प्रदीप मांढरे, अभिजीत चव्हाण, वर्षा शिंदे, चैतन्य शिंदे, रवी नरसाळे, अजिंक्य मांढरे, नितीन सटाले, चंद्रकांत काळे, राहुल गायकवाड, हिरामण गायकवाड, महेश गोसावी, विठ्ठल वडघुले, अवी शिंदे, शुक्रांती खांडेकर, शुभ्रा काळे, अक्षय खळदकर, सुमित वडघुले, संग्राम तामणे, सौरभ जगताप, वैभव चव्हाण, राहुल पिसाळ, अमोल चव्हाण, विजय जगताप, अतुल नरके, विश्वंभर पवार, अतुल गोपाळे, सचिन, माऊली गवारे, संतोष लांडे, दिपाली अडसूळ, सुरज अडसूळ, चिन्मय अडसूळ, शारदा मस्के, भारत दिघे, वनिता थोरात, संतोष डफळ, भरत साकोरे, किरण गवारे, मच्छिंद्र वाघोले, अथर्व देशमुख, ऋषिकेश काळे, नवनाथ देशमुख यांना घेऊन सासवडच्या दिशेने रवाना झाली. याचे नेतृत्व वैभव करपे आणि भरत साकोरे यांनी केले. ड्रायव्हरला दिशा देण्याचं काम बाप्पूचं. ही गाडी निमगाव म्हाळुंगी, तळेगाव ढमढेरे, उरुळी कांचन, सासवड, नारायणपूर, शिरवळ, वाई करत महाबळेश्वरच्या पारगावी आली.
दुसरी गाडी चंदननगर बायपासवरून (५० सीटर) विजय माने, अनिल गायकवाड, अमोल हरगुडे, विजय तागड, रवींद्र काळे, मनी कुमार, विकास हांडे, अभिजीत शिंदे, प्रदीप नाथू, प्रशांत शिंदे, अक्षय दसगुडे, सरिता पाटसकर, रवींद्र गुळवे, गणेश साळुंके, स्नेहल घावटे, दत्ता जगदाळे, सुभाष भुरे, निरंजन ठणठणकार, शुभम बोरावके, रवींद्र भोसले, अथर्व भोसले, विकास मोरे, मंगेश बढे, राहुल दांडेकर, डॉ.कुमार कामठे, योगिता टिळेकर, परमेश्वर पांडे, नंदा साळुंके, अक्षयकुमार कांबळे, केशव पाटील, विकास गायकवाड, आकाश गायकवाड, गिरीश तांबे, प्रदीप गवळी, रामचंद्र नरवडे, भूषण बहिरमे, सुरेश चव्हाण मामा, सुधाकर शिंदे, संगीता शिंदे, संतोष पुणेकर, निर्मला खिलारे, जयश्री वानखेडे, सागर वानखेडे, स्मिता धारूरकर, प्राची पासलकर, आम्रपाली धुमाळ, शितल भानूस, प्रवीण पिलावरे आणि मी यांसोबत हडपसर मार्गे सासवडकडे रवाना झाली. या गाडीचं संपूर्ण नेतृत्व विजय माने सर आणि सहकार्यासाठी अक्षय कांबळे, अमोल हरगुडे होते.
तिसरी बस (१७ सीटर) हडपसर गाडीतळ मार्गे साताऱ्याच्या दिशेने निघाली. सूरज बोरावके, लक्ष्मण आरु सर, स्नेहल आढाव, पायल खेडेकर, दत्ता वाघ, मंगेश दळवी, स्वप्निल रोमन, प्रितेश खेडेकर, अक्षय खेडेकर, शांतीलाल सूर्यवंशी, अनिल गवारी, महादेव भोसले, आदित्य देवकर, मनोज वाढणे, उदय कोळी, अक्षय वाढणे, दिपाली जाधव यांना घेऊन. या गाडीचे नेतृत्व सूरज बोरावके यांनी केले. आमचे मार्गदर्शक, ग्रुपचे खंदे शिलेदार पंकज माने सर, तरुणांना लाजवतील असे उत्साही कटके सर, ड्रायव्हर सोबत जागणारे खाडे सर, खळखळून हसणारे डॉक्टर अभी चव्हाण, फोटोग्राफर अमोल नागवे, पाण्यातला निळा मासा अप्पा रणसिंग, सहकार्य करणारे अण्णा मोरे, करे सर, अविनाश यांसारखी माणसं यावेळी नव्हती. त्यांची उणीव भासत होती. थोडसं चुकल्यासारखं वाटत होतं.
महिनाभर काबाडकष्ट करून पहिल्या तारखेला खात्यात पगार जमा व्हावा, अगदी त्याच नित्यनेमाने काळे सर महिन्यातून एकदा आम्हाला गड भ्रमंती घडवून आणतात. आमच्या आयुष्याच्या खात्यात महिन्याकाठी आनंद, उत्साह यांचा भरणा करतात. मॅगी आणि चहा यांसाठी लागणारे सगळे साहित्य घेऊन बाळाभाऊ आधीच तयारीत असतात. गॅस सिलेंडर, शेगडी, पाण्याचे जार, किराणा सामान, अगदी मिठापासून ते सर्व काही हे सर्व साहित्य निमगावच्याच गाडीत असतं. पहाटेच्या बोचऱ्या थंडीत कुठंतरी अंधारात आम्ही उतरलो. मग सुरू झाले प्रात:र्विधी. कांदा, टोमॅटो कापायला मदत सुरूवात झाली. या कामात बाळाभाऊंना विठ्ठल वडघुले, दादा, वैभव करपे आणि अनेकांनी सहकार्य केले. दूध तापवणे, चहा बनवणे, ही कामं कशी झटपट होत होती. अगदी लगीनघाईच जणू. खरं तर प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी कित्येकांची घोडदौड सुरू असते. न केलेल्या कामाचंही श्रेय लाटून, लोकांच्या गरम तव्यावर आपल्या भाकऱ्या भाजणारी कित्येक माणसं मी पाहिलीत. पण विठ्ठल वडघुलेंसारखे प्रामाणिक, प्रसिद्धीपासून अलिप्त राहून गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानसाठी मनापासून काम करणारे, सच्चे दुर्गप्रेमी खूप कमी. अक्षरशः मॅगीसाठी कांदे, टोमॅटो कापण्यापासून पंक्चर गाडीचे चाक बदलण्यापर्यंतची कामे ते अगदी घरचे काम करावे तसे न सांगता करता. काळे सरांनी जो या गडभ्रमंतीचा घाट मांडला, तो त्यांच्यासारख्या शिलेदारांनी तडीस नेला, हेच शाश्वत सत्य! अशी सोनेरी माणसं या ग्रुपमध्ये आहेत म्हणून हा सुवर्णमहोत्सवी ट्रेक बिनधास्त पार पडतोय.
परीसरभर मॅगीचा सुगंध दरवळत होता. कोणी कितीही जहागीरदार असला तरी तुपाची मॅगी घरी खात नसेल किंवा मॅगीसाठी तेवढं झटत नसेल. इथल्या मॅगीत मात्र तूप असतं, लज्जत असते. बाळाभाऊंनी बनवलेली मॅगी, अहाहा.. त्याला एक निराळीच चव असते. अर्थात चव हा शब्द आपण फार सरावाने किंवा कधी कधी सहज वापरतो. पण चव काय पदार्थाची असते? तुम्ही ज्या भावनेने तो पदार्थ ऑफर करता त्या भावनेची पहिली चव. वस्तू नाममात्रच असते, पुष्कळदा. सूर्याची मंद किरणं अंधाराचा पडदा बाजूला सारत हळूवार डोकावून पाहत होती. लख्ख उजाडत होतं. सगळ्यांनी ओळी करून मॅगी घेतली, गरमागरम मॅगी तोंड भाजत, बोटं चाटत खाल्लीसुद्धा. तेवढ्यात कानात मैफिलीच्या सुरांनी अलवार गुदगुल्या कराव्या तसा आयोजकांचा आवाज घुमला. "कोणाला पाहिजे असेल तर डबल घ्या!" जन्माच्या उपाशी माणसांना आणखी काय हवंय? मोकळ्या डिश पुन्हा भरल्या गेल्या. डबलच्या ओळीत पहिला क्रमांक संतोष लांडे भाऊंचा. काय करणार, धिप्पाड देहाचा माणूस. मी मात्र एकच डिश मॅगी फस्त केली. 'अन्नदाता सुखी भव'चा गजर झाला. फक्कड चहा आणि पतंजली बिस्किटांचा आस्वाद घेतला गेला. हे सगळं झालं मोकळ्या रोडवर. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची चिंता होती कुणाला?
काळे सरांनी शाळा भरावी तशी सर्वांची हजेरी घेतली. सात - आठ वर्षांपासून चौसष्ट वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. वैभव करपे यांनी या पन्नासाव्या ट्रेकनिमित्त सगळ्यांना बॅचेस मोफत दिले. प्रत्येक गाडीमध्ये बॅचेसचे वाटप झाले. याचे संपूर्ण डिझाईन वैभव नरवडे म्हणजे आमच्या काळे सरांचे मेव्हणे दरवेळी करतात. यावेळी पायाला जखम असूनही वैभव ट्रेकला आले. बुटाऐवजी चप्पल घालून. पण ट्रेक सोडला नाही. अशा संधी पुन्हा थोड्याच मिळतात? घायल शेर की साँसे उसकी दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है, यही सच बात! बाकी सब झूठ. आमचे मेजर रामचंद्र नरवडे सर वॉकीटॉकी घेऊन सगळ्यात पुढे. नेव्ही मॅन सुरेश चव्हाण सर मोठ्या उत्साहात होते. गुळवे सर, गवळी सर, पुणेकर सर जोमात. पाटसकर मॅडम, विनिता मॅडम यांसोबत शारदाताई म्हस्के आणि वर्षाताई या दोन बहिणी म्हणजे गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपकडून मिळालेलं अनोखं नातं. किती बी चेष्टा करा, फक्त हसायचं, खारावलेले शेंगदाणे आम्हाला देऊन मध्येच तोंड बंद करायचं आणि गड उतरताना घसरत चालायचं. बाकी जास्त काही लिहित नाही,मला जगायचंय.
ज्यांचा परिचय झाल्यावर आपल्याला आपलं जगणं समृद्ध झाल्यासारखं वाटतं, ती सगळी चैतन्याची रूपं असतात. अशी कित्येक रुपं या ग्रुपच्या माध्यमातून नेहमी सामोरी येतात. आपलं बनवून जातात. डॉ. कामठेंनी सर्वांना ORS चे मोफत वाटप केले. येरगे सरांनी वॉकीटॉकी दिली. दानशूर व्यक्तींनी ग्रुपला अशाप्रकारे सहकार्य करून ग्रुपविषयीची आपली आस्था प्रकट केली.
गडाकडे जायला आणखी २०-२५ किलोमीटर अंतर कापायचं होतं. रस्ता छोटा असल्यामुळे मोठी गाडी पुढे जाईल का नाही याची शंका. अक्षय दसगुडेंना ड्रायव्हर रात्री म्हणाला होता, "मैंने काठमांडू में गाडी चलाया हैं, ये सह्याद्री का घाट क्या चीज हैं?" अंधाऱ्या रात्रीत मेन हायवेवरून गाडी चालवणारा हाच पावरफुल्ल ड्रायव्हर मात्र महाबळेश्वरच्या घाटातून गोगलगायच्या वेगाने गाडी चालवत होता. वाह रे पठ्ठ्या. "बैल आहे, बैल!" अशी कोणीतरी ड्रायव्हरची केलेली स्तुती मी उघड्या कानांनी ऐकली. तो आवाज अक्षय दसगुडेचा होता का? हे मी खात्रीने सांगू शकत नाही. पुढे अरुंद वाट होती. पन्नास सीटर गाडी जाणार नाही म्हणून काहीजण चालत होते. सतरा सीटर गाडी सर्वांना घोणसपूर फाट्यापर्यंत सोडवून परत येत होती. फाट्यावर ग्रुप फोटो झाला आणि गड चढायला सुरुवात झाली. वातावरण तापलं होतं, पहिल्यांदाच इतक्या उशीरा ट्रेकींगची सुरुवात झाली होती. पावसाची शक्यता नव्हतीच. गरम होत होतं. घामाने चिंब भिजलो. भरपूर चाललो.
बरेचजण पहिल्यांदाच ग्रुपला जोडले गेलेले. पुणेकर सर, साळुंके सर आणि त्यांची कन्या, सगळ्यांची नावे नाही घेता येणार. पण एक विशेषत्व आवर्जून सांगेन. हरिहर ट्रेकवेळी तुळजापूरची पाच पोरं भेटली आणि या ग्रुपचीच झाली. आदित्य देवकर, उदय कोळी, मनोज वढणे, महादेव भोसले आणि अक्षय वढणे तुळजापूरहून ट्रेनने पुण्यात येऊन मधुमकरंदगडासाठी सज्ज झाली.
अकेला चला था अपने रास्ते,
लोग मिलते गये, कारवाँ बनता गया!
अशी काळे सरांची अन् ग्रुपची ख्याती.
दुर्ग महर्षी प्रमोद मांडे यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं, "शिवबा राजा देव मानून फोटोत पुजायची गोष्ट नाही. डोक्यात साठवून, अभ्यासून अवलंब करायची गोष्ट आहे." काळे सरांनी शिवरायांसारखीच माणसं जोडली, जपली. चार किलोमीटर चालून गेल्यानंतर घोणसपूरातली जंगम वस्ती लागली. रायरेश्वरावर पाहिली तशीच. तिथून पुढे आणखी दोन तास गडाची चढाई करायची होती. महाबळेश्वरच्या मुंबई पॉईंटवरुन सुर्यास्त पाहताना तो घोड्याच्या पाठीवरच्या खोगीरीसारख्या दिसणाऱ्या डोंगराच्या मागे होतो, तोच मधुमकरंदगड. मधु आणि मकरंद हे जोड किल्ले. प्राचीन हातलोट घाटाच्या रक्षणासाठी यांची निर्मिती. शुद्ध शाकाहारी माणसं, उन्हाने रापलेली, राकट, काटक. सर्वजण ताक प्यालो. गार, शुद्ध, देशी म्हशींचं ताक. छान वाटलं. गार पाण्याने डोकं, टोप्या भिजवल्या. बाटलीभर पाणी भरून घेतलं आणि गडाची चढाई सुरू केली.
पुढे महादेवाचे मल्लिकार्जुन मंदिर. बारा ज्योतिर्लिंगाची पिंड एकत्रच. पांडवांनी बांधल्याची आख्यायिका. भारी होतं. काही झिजलेल्या वीरगळी इतिहासाची साक्ष देताना दिसल्या. आता डोंगरावरचं मंदिर खुणावत होतं. सह्याद्री म्हणजे विभिन्न आकाराचे पर्वत, डोंगर श्रृंखलांची खाण, घाटवाटा आणि लेण्यांचे समूह. डोळे तृप्त व्हावेत असं लोभसवाणं सौंदर्य. फोटो झाले, व्हिडिओ झाले, इंदुरीकरांची रिल दादा घोरपडे आणि अक्षय कुमार यांनी महिला भगिनींना सोबत घेत पुर्ण केल्या. ग्रुपचे हास्यसम्राट दादा, ज्यांनी कित्येकांना हसवलं. निखळ विनोदी स्वभाव. 'आमचं शिक्षण कमी हो!' म्हणत उच्चशिक्षितांची खेचून इतरांना हसवून पळती भुई थोडी करणारा अवलिया माणूस. रोजच्या दैनंदिन घडामोडींतून एक वेगळंच जग या इथे निर्माण होतं. अत्तराच्या कुपीत साठवावेत असे काही क्षण या इथेच गवसतात.
"काय करायचं? फिरायची इच्छा असते पण वेळच मिळत नाही", असं म्हणणाऱ्या माणसांवर माझा विश्वास नाही. सवड असली की वेळ मिळतोच! आवर्जून काढावा लागतो. ग्रुपमध्ये पन्नाशीच्या पुढचे वीसएक मावळे, हिरकण्या. हे अनुभवी, म्हातारे खोड बघितले आणि त्यावेळेस वाटलं, की रसिकतेचं नातं देहाशी, वयाशी नसतंच मुळी. ते टवटवीत मनाशी असतं!
उमेदीच्या काळात कमावून ठेवू आणि नंतर उतारवयात फिरून घेऊ, असा विचार मनात करणारे घर सोडत नाहीत. सतत काम करत राहतात, पैशाला पैसा जोडतात, इमले बांधतात. वाढत्या वयाबरोबर एकेक पर्याय वजा होत जातो, स्वप्नांच्या गाठी तशाच उराशी वाढत राहतात आणि न सोडवणारा गुंता तयार होतो. काही वर्षांनी कष्टाने पैसा उभा राहतो. वृद्धापकाळात जिथे गाडी घोडा पोहोचतो, तिथपर्यंत ठीक आहे पण जिथे पोहोचतच नाही तिथलं काय? जिथे तुम्हाला फक्त तुमचे बळकट पाय किंवा बळकट शरीर घेऊन जाईल अशी रहस्यं, क्षेत्रं, ठिकाणं बघायची असतील तर लवकर सुरुवात केली पाहिजे. अख्खं जग पालथं घालायचंय, अख्खी दुनिया बघायचीये. मग पहिलं कुठे जाऊ? खिशात जास्त पैसे नाहीयेत? अशावेळी पहिलं पाऊल घराशेजारच्या, गावच्या डोंगरावर पडलं तरी बेहत्तर. पण सुरुवात केली पाहिजे. एकदा का या निर्मितीविषयी, या निसर्ग किंवा सह्याद्रीविषयी कुतूहल वाटायला सुरुवात झाली की मग घराची वेस कधी ओलांडली हे समजतही नाही. निसर्ग भुलवतो, नवी प्रेरणा देतो. आणि निमित्त ठरतो गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी, पुणे ग्रुप.
मल्लिकार्जुन मंदिराच्या मागून १५ मिनिटांचा खडा चढ चढल्यावर किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. येथे दगड फोडून किल्ल्याचे प्रवेशद्वार बनवलेले असावेत, अशा अस्पष्ट खुणा दिसत होत्या. खांबटाके पाहून गडमाथ्यावरील मंदिराबाहेरील नंदी दिसला. गड म्हणावे असे अवशेष फार कमी. मकरंदगडावरुन महाबळेश्वरचा डोंगर, चकदेव पर्वत, मधुगड, रसाळ, सुमार आणि महिपतगड हे किल्ले दृष्टीक्षेपात येतात. मंदिरात बसलो. सर्वांनी आपापले अनुभव सांगितले. पोवाड्याचे गायन झाले. संतोष भाऊंची खमक्या आवाजातली शिवगर्जना झाली. काळे सरांविषयी त्यांनी मांडलेल्या भावनांचे तरंग आमच्याही काळजात अगदी सेम टू सेम उमटत होते. भल्याभल्यांना असं बोलता येत नाही. कित्येकांनी मिळवलेल्या पदव्यांच्या गुंडाळ्या करून चुलीत घालाव्यात असा विचार करायला लावणारं लेखन, भाषण करणारे संतोष भाऊ लांडे पाटील. निर्मला खिलारे मॅडम यांनी जिजाबाईंचे स्वगत सादर केले. अंगावर शहारे, डोळ्यात अश्रू आणि काळजाची वाढणारी धडधड यांचा मिलाफ अनुभवला. सगळं काही सुन्न करून टाकणारं. त्यांचे ते वक्तृत्व ऐकून भारी वाटलं.मी ही "प्रतापगडच्या पायथ्याशी खान.." पोवाडा म्हटला. महाराजांच्या खास अश्वशाळेचा प्रमुख महंमद रईस, राजांचा विश्वासू चिटणीस काझी हैदर, आरमारांचा प्रमुख दर्यासारंग दौलतखान, राजांचा अंगरक्षक सिद्धी इब्राहिम यांचं प्रतिनिधित्व केल्याचं समाधान अनुभवलं. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेलं कार्य किती महान आहे, याची जाणीव झाली. डॉ. कामठेंनी आयोजक रवी काळे सर आणि बाळाभाऊ यांचा सन्मान केला. काळे सरांच्या ऋणातून उतराई होऊच नये, अशी सगळ्यांची स्थिती.
एखादी गोष्ट अतिपरिचयाची झाली की, तिचं फारसं कौतुक राहत नाही. काळे सर मात्र याला अपवाद आहेत. सरांच्या बाबतीत अशी 'अतिपरिचयात अवज्ञा' कधीही झाली नाही. या माणसाबद्दलचा आदर प्रत्येक ट्रेकगणिक आणखी वाढत जातो. एका रुपयाचाही ज्या व्यक्तीला हव्यास नाही, अशा या माणसाला सह्याद्रीएवढं काळीज लाभलंय, एवढं मात्र नक्की. उतरतीचा प्रवास सुरू झाला. काही वास्तू आणि शब्द यांचे संकेत ठरलेले असतात. जसं की गाभारा म्हटलं की घंटा नाद, शाळा म्हटलं की सांघिक प्रार्थना आणि गड म्हटलं की तटबंदी, बुरुज आले. इथे मात्र थोडीशी निराशाच झाली. गडावर गडपणाच्या मूठभरही खाणाखुणा नाहीत, किंवा त्या जतन करण्यात आपण कमी पडलो, बहुतेक. काळे सरांनी सुवर्ण महोत्सवानिमित्त हा गड का निवडला? अशी शंका चमकून गेली. असो ट्रेक मात्र भारी झाला.
पायथ्याशी गार पाण्यात अंघोळी केल्या. गाडीत बसलो, वाटलं पहिल्यांदाच लवकर आलो, पटकन पहिल्या पंगतीला जेवण करू. पण ड्रायव्हर इतका घाबरत होता वळणा वळणाला चाक बघावं लागायचं. शेवटी तिन्ही गाड्या वाडा-कुंभरोशी गावी एकदाच आल्या. जिथे आम्ही सकाळी नाष्टा केला होता. पोटभर जेवण केलं. व्हेज नॉनव्हेज सर्व काही भारी, मनसोक्त. काय भारी खीर होती. व्वा! व्हेज जेवल्याचे समाधान लाभले. सरांचे मित्र अशोक ढेबे, महाराष्ट्र पोलीस, महाड यांनी या ट्रेकसाठी संपूर्ण मदत केली.जेवणाची सोय, नाष्ट्यासाठी जागा, सगळं काही. एवढा नम्र पोलीस मी पहिल्यांदाच पाहिला. प्रत्येक गडपायथ्याला काळे सरांचे मित्र, शिक्षक, पोलीस, डॉक्टर, कोणत्या ना कोणत्या अवतारात भेटतातच. तृप्ततेची ढेकर देत दोन तीन किलोमीटरवर प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. प्रतापगड पाहायचाच होता. अंधार पडत होता पण अंधारात उजळलेला प्रतापगड म्हणजे भर मध्यरात्री सूर्योदय व्हावा असा स्वयंप्रकाशी भासत होता.
प्रतापगडाचं शौर्य सगळ्यांना माहीत आहेच, तरीही थोडक्यात सांगतो.
विजापूरचा अली आदिलशहा तख्तावर बसला. बडी बेगमने दरबारात ठेवलेला विडा अफजलखानाने उचलला. सोबत दोन मुलं, नाईक, घोरपडे भोसले, प्रतापराव मोरे यांसोबत खान विजापुरातून तुळजापूर, पंढरपूर मार्गे वाईला निघाला. तुळजापूर लुटलं, मुर्त्या फोडल्या, खंडोजी खोपडे, जगदाळे, झुंजारराव घाटगे, जावळीकर, राजांचे चुलत काका सुद्धा खानाला मिळाले. कान्होजी जेधे मात्र पाच मुलांसह राजांकडे निष्ठेने आले. राजगडी सईबाई वारल्या. आभाळाएवढं दुःख उरात दाबत राजे स्वराज्य रक्षणासाठी उभे राहिले. मोरोपंत पिंगळ्यांनी प्रतापगड सज्ज केला. केदारेश्वर मंदिर तिथंच. कृष्णाजी भास्कर खानाचा वकील. खानाच्या तळासाठी प्रतापगडापासून दक्षिणेस कोसभर अंतरावरील पारगावजवळ छावणी. भेटीसाठी गडाखालची माचीसोंडेची जागा निवडली, गडावरून लक्ष ठेवण्यासाठी. अनाजी मलकरांनी खानासाठी देखणी ऐश्वर्यसंपन्न सदर उभारली. शामियाना तयार ठेवला. राजे घाबरल्याचे दर्शवलं. राजांनी नियोजन पूर्वक जिवा महाला याला सय्यद बंडासाठी अन् संभाजी कावजी खानावर लक्ष ठेवण्यासाठी सोबत घेतला. बिचवा आणि डाव्या हाती वाघनखांचा गनिमी कावा केला. दहा सैनिक भेटी जागेपासून बाणाच्या टप्प्यावर उभे ठेवले. एकांतात भेट ठरली. खान पहार सहज वाकवतो आणि सरळ करतो अशी ख्याती. खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा दांडपट्टा फिरवण्यात मशहूर. राजांनी दाढी हाती न येण्यासारखी कमी केली. खानाचा दगा कळताच राजांनी बिचवा घुसवला, खानाने डोक्यावर घाव घातला. डोकं बधीर झालेल्या राजांवर बंडा चालून आला, जिवा महालाने त्याचा हात मोडला. खान ओरडला. लपलेलं सैन्य चालून आलं, संभाजी कावजीने पाठलाग करून खानाची मुंडी आणली. राजगडाच्या महाद्वारात मुंडकं पुरलं आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाला विधीवत दफन केलं. स्वराज्यावरचं संकट टळलं, शत्रू मेला वैर संपलं, असं राजमाता जिजाऊंनी सुचवलं. राजगडावर संपत्ती आली. तुळजापूरच्या भोप्यांनी खरी मूर्ती लपवली होती. अफजलखानाने वेगळीच मूर्ती फोडली. विजयाच्या आनंदात खानाला मारून राजे गप्प बसले नाहीत. चंदनवंदन पासून पन्हाळ्यापर्यंतचा मुलूख स्वराज्यात घेतला. अशा या प्रतापगडाच्या वाटेवर ३६०-७० वर्षांपूर्वी शिवरायांची दिव्य पावलं उमटली, इथल्या दगडबुरुजांनी गनिमी काव्याचे ते शब्द ऐकले, तिथे आम्ही जाऊन आलो, ही गोष्ट साधी नाही. ही संधी ग्रुपमुळे मिळाली. माची पाहिली, बुरुज पाहिले, शिवरायांच्या स्मारकाजवळ नमन केले आणि उतरलो खाली. ढेबे सरांचा शिवप्रतिमा देत सत्कार केला.
कवी अनंतराव राऊतांची कविता मला इथे आठवली.
कधी जर सांडली स्वप्ने
करून गोळा पुढे जावे
जुने अवशेष स्वप्नांचे
नव्याने जोडता यावे
तिथे सुंदर सरळ वाटा
सहज मिळतात का सांगा
स्वतःची वाट शोधावी
स्वतः वाटे सजवावे!
काळे सरांनी नियोजन केलेलं सगळंच १००% पूर्णत्वास नेलं. गाड्यांची लाईट लावून फोटो घेतला आणि सहिसलामत घरी पोहोचलो. अवघ्या ९०० रुपयांत ही पर्वणी लाभली, त्याबद्दल शतशः आभार!
शेवटी एवढंच सांगेन, स्वतःकडचा मोहक सुगंध, दिव्य सुवासाचा शोध घेण्यासाठी उर फुटेस्तोवर धावणारा कस्तुरीमृग शेवटी कोसळून खाली पडतो. सुगंध शोधाच्या त्या प्रश्नांची उत्तरं त्याला कधीच मिळत नाहीत, मात्र तोंडातून निघणारा तांब्रसर किंचित गोड, खारट निराळा, मधुर मादक असा सुवास मात्र सर्वत्र दरवळतो. कुडीतून प्राण जाताक्षणी त्याला जाणीव होते, कस्तुरी माझ्याजवळच होती, उगाच भटकत राहिलो. मनभरून जगायला पाहिजे होतं.
मिल जाये राहत रूह को
जिसका हात छुकर,
उसी हथेली पर घर बना लो,
के घर वही है,
पनाह भी है!
आम्हाला आमचं सुख समजलंय. ते या ग्रुपमध्येच आहे.
तुम्हाला ही सौख्य अनुभवायचं असेल तर या आमच्या सोबत!
पुन्हा भेटू नव्या गडाचं सौंदर्य न्याहाळत शिवराय उलगडताना....
तोपर्यंत जय शिवराय!
विशेष टिप -
गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या पन्नासाव्या ट्रेकनिमित्त अनाथांची माय, सिंधुताई सपकाळ यांच्या शिरुर येथील अनाथाश्रमास भेट वस्तू देण्यात येणार आहेत. गडकिल्ले भ्रमंतीसोबतच सामाजिक ऋणांचे भान हे मूल्य या ग्रुपच्या माध्यमातून जपले जात आहे.
मार्गदर्शक
पंकज माने सर
7709159044
आयोजक
रवी काळे सर
निमगाव म्हाळुंगी, पुणे
9096465675
लेखनप्रपंच
आयुब कलाम शेख, पुणे महानगरपालिका
9552941271



















👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteजबरदस्त लेखन... मनाला भावलं..!!!?
ReplyDeleteखूपच सुंदर लेखन....सर
ReplyDeleteसुवर्ण शब्दांत मांडलाय संपूर्ण लेख !
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteखूपच छान सर
ReplyDeleteखूपच छान उत्तम
ReplyDelete