Wednesday, October 18, 2023

निळी निळाई आणि बरंच काही...

 


झोंबेल पण विचार कराच!

नवरात्रीतल्या 'घटस्थापने'चा उगम अश्मयुगीन स्त्रियांनी बी पेरत शेती जन्माला घातली या सृजनात आहे. फक्त नऊ रंगाच्या साड्या नेसणं म्हणजे नवरात्रोत्सव असेल का? देवीच्या रुपांची महिलांच्या कर्तबगारीशी सांगड घालत 'स्त्रीशक्तीचा जागर' करण्याचा हा महोत्सव आहे.

रोज काम काम करत अगदी घाण्याला जुंपणाऱ्या स्त्रिया वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसताहेत, मैत्रिणींना भेटताहेत, फोटो होतोय, व्हिडिओ, रिल्सची मज्जा अनुभवताहेत. भारी वाटतंय खरं तर पाहायला. मुक्त छंदातली एखादी कविता वाचावी तशाच या मुक्त बागडणाऱ्या फुलपाखरांचे कौतुकच!

पण याच्यात किती गुंतून राहायचं? याचाही एकदा विचार करायला हवा. दिवसभर त्याच त्या 'साड्यांच्या रंगाचे पोवाडे' गात, हातचं काम सोडून 'फोटोग्राफींचे सोहळे'च साजरे होत असतील तर थांबायला हवं, अगदी तिथंच, त्याच वेळी.

एरवी 'सावित्रीच्या लेकी' म्हणून मिरवणाऱ्यांना सावित्रीबाईंनी अंगच्या एकाच साडीवर शेण, खरकटं, अगदी दगडांचा मारा झेलत ओल्या अंगाने शाळेत प्रवेश करून सोबत आणलेली दुसरी साडी बदलून मुलींना शिक्षित केलं, ही गोष्ट विसरून कसं चालेल?

शिक्षिकांनी शाळेत आल्यानंतरचा तो वेळ कुणाच्या हक्काचा असतो? विद्यार्थ्यांच्या ना? मग त्या लेकरांनी तुमच्या त्या रंगाची उधळपट्टी बघत बसायची दिवसभर? निळ्या पाखरांची, निळ्या आभाळातल्या रहस्यांची त्यांना माहिती सांगितली तर चालणार नाही? तुमचा एक मिनिट वाया जात असेल हो, पण चाळीस पोरांची चाळीस मिनिटे वाया जातात त्याचं काय?

आपुले हे मन, आपुली देवता,

दीप हो तेवता, अंधारात!

आपुले हे मन, आनंदाचा कंद,

मनात गोविंद, वास करी!

मंगेश पाडगावकरांच्या कवितेतल्या ओळी लक्षात ठेवायला हव्यात. खरं तर सुख दाखवायचं नसतंच मुळी, ते अनुभवायचं...

आज निळ्या निळाईत वावरताना निळ्या आभाळाएवढं विशाल कार्य करण्याऱ्या महिलांची आठवण व्हायला हवी.

फक्त फोटोपुरता इव्हेंट

आणि स्टेटसपुरती मौज...

काय कामाची?

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...