उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक'
किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड
प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वाट पाहत असतो आणि काळे सर गडभ्रमंतीची आमची ही तहान नित्यनेमाने भागवतात.
एकमेकांशी संवाद जोडण्यासाठी मांडलेला हा थाट पंढरपूरच्या वारीप्रमाणे अखंड सुरू आहे, सुरू राहील.
इंग्रजी महिन्यानुसार फक्त म्हणायला उन्हाळा सुरू आहे पण हा आमचा पावसाळी पहिला ट्रेक होता, असंही म्हणायला हरकत नव्हती.
खरं सौंदर्य प्रवासात असतं, मुक्कामातलं ते 'साठलेपण' नकोच, असं म्हणत २४ मे २०२५ शनिवारी रात्री रांजणगाव गणपतीवरून गाडी घेऊन विशाल पाचुंदकर निमगाव म्हाळुंगी मध्ये आले. तिथून गाडी विठ्ठल वडघुले यांनी सांभाळली. ट्रॅफिकमुळे नियमित वेळेपेक्षा दीड तास गाडी पुढच्या प्रत्येक थांब्यावर उशिरा येत होती.
रात्री दोन वाजता वाघोली मधून चंदननगर बायपास, येरवडा असं करत गाडी पनवेलच्या दिशेने निघाली.
विशाल पाचुंदकर, पायल खेडेकर, विठ्ठल जाधव, दत्ता पारेकर, माधुरी वडघुले, अश्विनी पवार, कुलदीप म्हसडे, किरण शिंदे, स्वाती शिंदे, विश्वंभर पवार, विक्रम केदारी, जयदीप पुंडे, विद्या वाबळे, ज्योती जाधव, तनिष्का जाधव, समर्थ जाधव, साक्षी बांदल, वैभवी शेळके, सुषमा घावटे, सागर रामदास सासवडे, गौरी घावटे, विठ्ठल वडघुले, नितीन सटाले, नवनाथ मेमाणे, मुरलीधर कटके, वनिता कटके, शारदा मस्के, प्रदीप गवळी, ओंकार साकोरे, प्रांजळ टाकळकर, शशांक तिवारी, बलभीम बोदगे, वैभव वडघुले, रवी नरसाळे, संदीप गीते, सुषमा गीते, वैभव कोळपे, रविंद्र काळे सर आणि मी सज्ज झालो कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य पाहण्यासाठी. खरंतर 'कैलासगड' ठरलेला असताना अनपेक्षितपणे सरांनी हा गड निवडून सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता.
सरांच्या योजना आम्हा सर्वांच्या इच्छेपेक्षाही सुंदर असतात, रात्रीनंतर उगवणाऱ्या सुंदर पहाटेसारख्या.
यावेळी मार्गदर्शक पंकज सर, हास्यसम्राट दादा घोरपडे, अन्नदाता बाळाभाऊ, जिमबॉय वैभव करपे, गझलकार विजय माने सर, बॅजेस लोगो डिझायनर वैभव नरवडे, विशेष म्हणजे माझा पार्टनर, फोटोग्राफर गिरीश, बापू, काका ही मंडळी सोबत नव्हती. बरंचसं चुकल्यासारखं वाटत होतं.
मध्यरात्रीची वेळ, गाडीत झोप लागताच गीते सरांचं ओरडणं आमच्या कानी आलं.
"थांबा मारू नका, बाजूला घेतो. मारू नका, बाजूला घेतो."
टोलनाक्याजवळ गाडी थांबली होती, हा संवाद ऐकताच आम्हाला वाटलं ड्रायव्हरने गाडी कोणाला तरी ठोकली.
सर्वजण ड्रायव्हरच्या अवतीभवती गोळा झाले होते. थोड्या वेळाने समजलं, फास्टटॅगचा रिचार्ज संपला होता, ड्रायव्हरने त्याच्या दुसऱ्या गाडीवर रिचार्ज केला होता, तो वेगळीच गाडी आज घेऊन आला होता आणि फास्टटॅगशिवाय टोलनाक्यावरचा बसणारा डबल फाईन वाचावा म्हणून "फाईन मारू नका, मी गाडी बाजूला घेतो", अशी विनवणी गीते सर करत होते. सावळागोंधळ नुसता. एकतर माझ्याकडून सगळ्यांना फ्री आंबे खायला देतो म्हणून काळे सरांनी आधीच फसवलं होतं, त्यात ही घटना. आजचा दिवसच "पोपट होण्याचा होता तर!"
पहाटे गाडी अभयारण्यासमोरच्या पुलाखाली थांबली. विठ्ठल वडघुले, नितीन सटाले, नवनाथ मेमाणे आणि इतर मावळ्यांनी चहा, शेवया बनवल्या आणि आम्ही मनसोक्त ताव मारला. अन्नदाता बाळाभाऊ सोबत नसले तरी नाश्त्यासाठी लागणारे प्रत्येक साहित्य ते निमगाव म्हाळुंगीतून पॅकिंग करून देतात. सकाळचा नाश्ता करताना ही मंडळी पाहून पहिला घास घेताना साऱ्या जगातली त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आमच्या दृष्टीत साठलेली असते. 'माझा गडकिल्ले प्रेमी ग्रुप' या भावनेने प्रेरित होऊन ही लोकं कामं करतात.
इथे येणारा प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रातला 'सम्राट' आहे. कोणी शेतकरी, कोणी उद्योजक, शिक्षक, कॉलेजचे विद्यार्थी, राजकारणी, कंपनी कामगार, गृहीणी महिलाही आहेत पण इथे सगळे समान. गडभ्रमंतीच्या पालखीचे भोई!
अनेक ज्ञात अज्ञात सारथ्यांचे हात या ग्रुपच्या कामासाठी लागतात.
गडकिल्ले प्रेमी ग्रुप नावाच्या या 'गर्भरेशमी पैठणीला' कुणीतरी जरतारी काठ पदर लावतं, कुणी मोराची नक्षीकाम केल्यासारखं मदतीला येतं, आणि कुणीतरी मनाच्या कोपऱ्यात हळुवार जपून ठेवतं. असा याचा लौकिक!
रवी काळे सर, यांच्याविषयी काय सांगू? मला तर ते श्रीकृष्णाचा तो अवतार वाटतात, जे आमच्यासारख्या शिशुपालाचे ९९ काय सगळेच अपराध पोटात घालून क्षमा करतात. मेंढरं हाकण्यासारखं त्यांचं काम. चला पुढे म्हणत ढकलत नेण्यासारखं. काळे सरांच्या जन्मावेळी त्यांच्या आईला 'मधाचे डोहाळे' लागले असावेत बहुतेक. उगीच नाही इतका गोड स्वभाव झालाय त्यांचा. एखादी गोष्ट सुरू करणं सोप्पं असतं. खरा कस लागतो त्यात सातत्य ठेवायला. ७९ ट्रेक या माणसानं अव्याहतपणे सुरू ठेवलेत, हे विशेष.
अभयारण्याच्या प्रवेशाद्वाराशी काळे सरांनी प्लास्टिक कचरा, गडभ्रमंती, शिस्त यांविषयी सूचना दिल्या.
मी गडाविषयी मला माहित असलेली माहिती माझ्या सहकाऱ्यांना सांगितली. वर्गात पोरं ऐकतात तितक्याच उत्कटतेने ही थोर मंडळी ऐकतात, ही गोष्ट भारी वाटते.
कर्नाळा हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून १२ किमी अंतरावरचा एक डोंगरी किल्ला. ह्या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो. शिरढोण हे जवळचं गाव.
देवगिरी यादव (१२४८) आणि तुघलक शासक (१३१८) यांच्याअंतर्गत किल्ला बांधला गेला असण्याची शक्यता आहे. १५४० मध्ये अहमदनगरच्या निजामशाहने त्याचा ताबा घेतला. नंतर पोर्तुगीजांकडे आला. शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये मोगलांकडून जिंकला. त्यानंतर १७४० पेशव्यांकडे आणि १८१८ मध्ये ब्रिटिशांनी बळकावला. स्वातंत्र्यसैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. पूर्वी बोरघाटद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. किल्ल्याचा सुळका विशेष लक्षवेधी आहे, हा सुळका अंगठ्यासारखा दिसतो. किल्ल्याची तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर एक मोठा वाडा लागतो. परंतु सध्या तो सुस्थितीत नाही. करणाई देवीचे मंदिर, तटबंदी, जुने बांधकाम व थंड पाण्याच्या टाक्या आहेत. गो. नी.दांडेकर(अप्पा) आणि निनाद बेडेकर यांच्या पुस्तकात किल्ल्याविषयी सविस्तर माहिती मिळते.
त्यानंतर वैभव कोळपेने शिवगारद देऊन स्फुरण चढवले. यावेळी किल्ल्याचे बॅजेस बनवून विशाल पाचुंदकर यांनी चार चांद लावले.
आणि सुरू झाला कर्नाळा किल्ला प्रवास.
कोकणपट्टी म्हणजे दमट हवामान. ढगाळ वातावरणामुळे 'भास्करराव' लपंडाव खेळत होते पण त्यांचं अस्तित्व मात्र जाणवत होतं. जोवर क्षितिजावर सूर्य येतोय तोवर सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार, याची ग्वाही देत किल्ला सज्ज उभा होता.
पावसाची नाजूकशी सर बरसत होती. कर्नाळ्याचे हे पक्षी अभयारण्य म्हणजे श्वसनासाठीचं राखीव झाडंच म्हणावं लागेल.
या निसर्गाचं हिरवेपण पाहून आमच्या वृत्तीलासुद्धा नवी पालवी फुटली होती. अशावेळी आपणही हिरवेगार होऊन जातो, त्या शुद्ध मोकळ्या हवेत फुप्फुसांची एकूण एक कवाडं उघडी होत होती आणि गात्रागात्रांतून उत्साह सळसळत होता. मोकळं आकाश आणि हिरवी धरित्री. तब्बल ५० दिवसांनंतर आम्ही एकत्र जमलो होतो.
या ट्रेकमुळं एकमेकांसोबत घालवलेले हे क्षण फुलवता येतात, जगता येतात.
घसरडी मातकट वाट, दगड धोंडे, हिरवी वनराई, दमट वातावरण यांच्यातून ओळीनं रांगेत चाललो आम्ही. निसर्ग न्याहाळत होतो, पक्ष्यांचे विविध आवाज ऐकत होतो, बुलबुल पक्ष्याविषयी सविस्तर माहिती विठ्ठल वडघुले यांनी सांगितली. या पक्ष्याचं 'गावठी नाव' प्रदीप गवळी सरांनी सांगितलं आणि एकच हशा पिकला. गप्पा गोष्टी, चेष्टामस्करी करत पुढे निघत होतो.
इंस्टाग्राम वर प्रसिद्ध झालेला 'चंगळ्या' याची एक सुंदर रील आम्ही बनवली. चंगळ्या बोले कु हू.. इथून पुढे आमचा चंगळ्या रवी अण्णा नरसाळे यावर शिक्कामोर्तब झालं. वैभव वडघुले याने शुटिंग केलं. आयुष्याच्या पुस्तकातलं सर्वांत सुंदर पान म्हणजे सह्याद्रीची भटकंती आणि स्वर्ग पृथ्वीवर खेचून आणणारे हे जॉली मित्र. सुपर कॉम्बिनेशन! गिरीश नसल्यामुळे माझ्या फोटोग्राफी अन् शुटींगची जबाबदारी वैभव वडघुले याने लीलया पार पाडली. दीड तासांच्या पायपीटीनंतर गडाचे अवशेष दिसायला लागले.
लहानशी तटबंदी, बुरुज, महादरवाजा. गडाचं वैशिष्ट्य असणारा सुळका लांबूनच लक्ष वेधत होता. मुसळधार म्हणावा असा पाऊस नसल्यामुळे फोटोग्राफी जय्यत झाली. सोबत आणलेला कोरडा खाऊ खाल्ला. विठ्ठल जाधव सर, आम्ही त्यांना 'मामा' म्हणतो आणि त्यांच्या धर्मपत्नी. दोघांनीही बाजरीची भाकरी आणि शेंगदाण्याची ठेचाटाईप चटणी बांधून आणली होती. आहाहा! पावसाच्या त्या वातावरणात काय खुमासदार चव लागत होती म्हणून सांगू. साक्षात अन्नपूर्णा वास करते हो मामींच्या हातात. 'अन्नदाता सुखी भव' म्हणत आम्ही अनेक आशीर्वाद दिले. उदंड प्रेम करणारी माणसं कशाचीही गॅरंटी मागत नाहीत, हेच खरं.
गड उतरण्यास परतीच्या मार्गाला लागलो. साडेअकरा पर्यंत खाली पोहोचण्याचा दम काळे सरांनी जाताना दिला होताच.
विहित वेळेत खाली पोहोचलो. अभयारण्य असल्यामुळे भरपूर छान पद्धतीने गड आणि गडाचा परिसर सांभाळण्यात आला आहे. प्लास्टिक कचरा नाहीच. लहान मुलांसाठी जागोजागी खेळणी, पक्ष्यांच्या प्राण्यांच्या हुबेहूब प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. सहकुटुंब करता येईल असा ट्रेक आहे.
ग्रुपमधली सगळी जिवाभावाची माणसं. एकमेकांना सहकार्य करणारी.
व.पु. म्हणतात, ज्याला दुसऱ्यासाठी सख्खं होता येतं, त्यालाच कोणीतरी सख्खं असतं. बाकी फक्त परिचितांची यादी असते. नको असलेल्या माणसांची गर्दी असते. आपल्या जवळचं खायचं, प्यायचं सगळं साहित्य सगळ्यांसमोर खुलं केलं जातं. अर्ध पोट या पाहुणचारानेच भरतं.
गड पायउतार झालो. ओले कपडे बदलले. सपाटून भुका लागल्या होत्या पण यावेळी अचानक ठरलेल्या गडामुळे जेवणाची व्यवस्था कुठल्यातरी हॉटेलमध्ये चौकशी करून करण्यात येणार होती.
पनवेल गेलं, लोणावळा गेला. संध्याकाळी साडेचार वाजता जेवणासाठी काळे सरांनी हॉटेल निवडलं आणि तेव्हा कुठे आम्ही पेटपूजा केली. मस्त झालं जेवण.
के.के.किचन यांचे सर्वेसर्वा स्वातीताई शिंदे आणि किरणदाजी शिंदे दोघांच्या लग्नाचा वाढदिवस होता.
ट्रेकमध्ये आलेल्या सगळ्यांना आईस्क्रीमची पार्टी दोघांनी दिली. दिलदार जोडीला भरभरून शुभेच्छा देऊन पुण्याकडे परतीची वाट आम्ही धरली.
नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात. आपल्यावर त्यांचं छत आहे, या आनंदात मनसोक्त विहार करायचा असतो फक्त. हे नक्षत्रांचं देणं कधीच चुकवता येणार नाही. अशा अलौकिक चांदण्या, तेजस्वी तारे अवतीभवती वावरतात तिथे आपण केवळ माथा झुकवावा.
आम्ही तेच करतो. डोळे झाकून काळे सर आणि पंकज सरांच्या मागे चालत राहतो. डोळे उघडले जातात तेव्हा फक्त स्वर्गाहून सुंदर सौंदर्यच दिसतं. सह्याद्रीच्या कुशीतून महाराज नजरेस पडतात.
रोजच्या त्याच त्या कामातून मोकळीक म्हणून आम्ही या ग्रुप सोबत फिरतो. मन कसं शांत होतं. पुन्हा ऊर्जा मिळते नव्या कामासाठी.
व.पु.लिहितात,
कुणाच्या आगळी वृत्ती
कुणाची वेगळी मुक्ती,
अशा साऱ्या निमित्तांची
एकेक कथा झाली!
किती अज्ञात ही दुःखे
तरी हसतात चेहरे,
तशा प्रत्येक चेहऱ्याची
एकेक कथा झाली.
गडकिल्ले प्रेमी ग्रुप हा आमचा असाच एक ग्रंथ आहे, जिथं प्रत्येकाची वेगळी कथा आहे. जी प्रत्येकाने स्वतः लिहिलीये.
माझा 'गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान, निमगाव म्हाळुंगी पुणे' ग्रुप म्हणजे वैविध्यपूर्ण माणसांचं एक सुंदर उद्यान, सकारात्मक विचारांचं भरगच्च कोठार, सर्व प्रेमळ भावभावनांच्या पक्वानांनी भरलेली मेजवानी, आपलासा वाटणारा जवळचा मित्र, चुकल्यास वाट दाखवणारा एक वाटाड्या आणि आयुष्यातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारा एक सल्लागार! पौर्णिमेच्या वाटोळ्या चंद्राप्रमाणे प्रत्येक महिन्याकाठी गडभ्रमंतीची शीतलला देणारा हा ग्रुप सदैव आयुष्यात सोबत रहावा, हीच सदिच्छा.
पुढचा ट्रेक
८जून२०२५
शिवराज्याभिषेकानंतर दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडी झालेला कचरा उचलून स्वच्छता मोहीम करणे असा आहे.
अत्यंत सुंदर, गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाला साजेशी, थोरल्या महाराजांच्या चरणी खरी श्रद्धा वाहण्याची स्तुत्य कल्पना!
पंकज सर आणि रवी सर यांच्या माध्यमातून सत्यात उतरेल. आम्हीही मावळे म्हणून या स्वच्छता मोहीमेच्या पालखीचे भोई होऊ, हेच या जन्माचं सार्थक!
सामर्थ्य आहे चळवळीचे,
जो जो करील तयांचे!
आपणांस सहभागी व्हायचे असेल तर आयोजकांशी संपर्क साधा.
एकच ध्यास, रायगडाची आस.
तोपर्यंत जय शिवराय!
⛳⛳⛳⛳
मार्गदर्शक पंकज माने सर
86682 51375
आयोजक रवी काळे सर
90964 65675
लेखन आयुब शेख सर
9552941271
























