लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ!
इथल्या जातीव्यवस्थेमुळे फक्त दीड दिवसाची शाळा शिकलेले अण्णा स्वतःच वाचायला, लिहायला शिकले. मराठी भाषेतल्या ३५कादंबऱ्या, १५ लघुकथा, कित्येक नाटकं, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा , पोवाडा शैलीतली १० गीतं लिहिली. त्यांनी प्रस्थापित साहित्याला प्रचंड तडाखे देत समाजात हिणवले जाणाऱ्यांना 'नायक, नायिका' म्हणून उभे केले. त्यांना 'स्त्री' हा शब्द कधीही लिहिता आला नाही परंतु त्यांनी बंड करणाऱ्या सशक्त नायिका उभ्या केल्या.
सुगंधाचा प्रारंभ आणि शेवट शोधता येत नाही, म्हणूनच वाऱ्याचा एक हलकासा झोका त्याला जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत त्याचा आकाश. ज्यांचं अवकाश अडवलं गेलं, त्यांनीच ज्ञानाच्या प्रकाशाचं कोंदण समाजाला दान केलं.
अण्णाभाऊ,
त्यांनी जातीचं विष पेरलं,
तुम्ही माणुसकीची मशागत केली.
त्यांनी विषमतेचा द्वेष रुजवला,
तुम्ही समतेचा मळा फुलवला.
त्यांनी दुबळी भीती फवारली,
तुम्ही बंडाचं चांदणं शिंपलं,
सर्वांसाठी...
अण्णाभाऊ,
मस्तकातूनी काढून फेकी
कल्पनेचा तो शेष,
तळहातावर उभा केला
हा कष्टकऱ्यांचा देश!
प्रत्येक सुशिक्षित माणूस ज्ञानी असेलच असं नाही. त्यांच्या पदवीचा उपयोग दरवाजाच्या नावावरच्या 'पाटी'पुरताच, बारीक अक्षरात लिहिण्याइतका! तो दरवाजा बंद केला की ती पदवी बाहेरच राहते. चार भिंतीपल्याड ज्यांना समाज आपलं घर वाटतं, समाजाचं दुःख या आपल्या जाणिवा वाटतात, रंध्रारंध्रातून माणुसकी वाहते, ज्यांना बंड पुकारता येतं, हक्कासाठी आवाज उठवता येतो, ती माणसं ह्या जगात येतानाच त्या पदव्या घेऊनच जन्माला येतात,
त्यांनी मिळवलेल्या पदव्यांच्या विद्यापीठांना नावं नसतात, मात्र विद्यापीठात त्यांचं चरित्र नक्कीच अभ्यासलं जातं, हे प्रखर सूर्यप्रकाशाइतकंच सत्य!
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
✍🏼 आयुब कलाम शेख,
पुणे महानगरपालिका ...