चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घेतल्या दिग्गजांच्या मुलाखती
मनपा शाळा क्रमांक १७४ बी, कोंढवा बुद्रुक,पुणे शाळेतल्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील 'मुलाखत' या पाठाचे उपयोजन करत परिसरातील डॉक्टर, दुकानदार, शिक्षक, पोस्टमन, शेतकरी, भाजीविक्रेते, रिक्षा ड्रायव्हर यांसोबतच प्रभागाचे नगरसेवक यांच्याही मुलाखती घेतल्या.
वर्गशिक्षक आयुब शेख यांनी तिसरीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील 'आम्ही चित्रे वाचतो' या पाठाखालील मुलाखतीची प्रश्नसूची विद्यार्थ्यांना प्रिंट काढून दिली. विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत या मुलाखतीचा शाळेतच सराव केला. प्रत्येक विद्यार्थ्याने दोन मुलाखती घेण्याचे ठरले. एक मुलाखत घरातील व्यक्तीची म्हणजे आई, वडील, आजी, आजोबा यांपैकी कोणाचीही एक आणि दुसरी मुलाखत इतर कामगारांपैकी घराजवळील कोणत्याही एका व्यक्तीची.
विद्यार्थ्यांनी प्रश्नांची खरीखुरी, स्वच्छ अक्षरात उत्तरे लिहिली. मुलाखत घेताना घरातील एक मोठी व्यक्ती सोबत होती, ज्यांनी त्यांचा फोटो काढून व्हाट्सअपच्या ग्रुपमध्ये पाठवला. घराबाहेरील कामगारांची मुलाखत घेताना किंवा फोटो घेताना पालक सोबत असतीलच अशी अट होती. शिवाय ही मुलाखत सकाळी शाळा भरण्यापूर्वी किंवा संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वी घ्यायची असे ठरले होते. दुसऱ्या दिवशी वर्गात मुलाखतीचे प्रकट वाचन विद्यार्थ्यांनी केले. मुलाखती दरम्यान आलेले अनुभव त्यांनी सांगितले. हे मजेशीर अनुभव ऐकताना सर्वांना भारी वाटले.
गुलामहबीब खान या विद्यार्थ्याने कोंढवा येवलेवाडी प्रभागाचे नगरसेवक वीरसेन जगताप यांची मुलाखत घेतली. आकाश पुरी या विद्यार्थ्याने डॉक्टरांची, भक्ती पारडे हिने दुकानदाराची तर निलेश नलावडे याने आपल्याच रिक्षा ड्रायव्हर वडिलांची मुलाखत घेतली.
शाळेच्या मुख्याध्यापिका भारतीय चौगुले मॅडम यांची मुलाखत घेताना विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले. आनंदाने उत्तरे सांगत मुख्याध्यापकांनीही त्यांना सहकार्य केले.
नगरसेवक वीरसेन बापू यांनी महानगरपालिकेच्या या विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षकांचेही कौतुक केले. यापुढील कोणत्याही उपक्रमासाठी आम्हाला शाळेत बोलवा, असे सुचवले.
मुलाखतीच्या या उपक्रमाचे आणि बालमुलाखतकारांचे शालेय परिसर, शिक्षक आणि पालकांमध्ये कौतुक होत आहे.